महानगरपालिकेचा लेखाजोखा

ठाण्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांनी मिळून करून दाखवले”ठाण्याचे वाटोळे आणि भ्रष्टाचाराचे घोटाळे”

कालचा भाजीवाला वा रिक्षावाला, एकदा का ठाणे महानगरपालिकेत निवडून गेला की, अल्पावधितच बंगला/आलिशान फ्लॅट्स्-महागडया गाडया बाळगणारा ‘गडगंज संपत्तीवाला’ बनतोय हे ‘ठामपा’च्या ३० वर्षांच्या कारभाराचं मन अस्वस्थ करणारं व्यवच्छेदक लक्षण होय! भ्रष्टाचारातला अफाट पैसा (प्रत्येक विकास कामात ५०% हून अधिक रक्कम ठाण्यातील सर्वपक्षीय राजकारणी व महापालिका अधिकारी/कर्मचारी यांना द्याव्या लागणाऱ्या टक्केवारीत फस्त होते!) जिरविण्याचा ‘शाप’ जडलेल्या, या ठाण्याच्या भूमीवर आजवर असंख्य भ्रष्टाचाराचे घोटाळे घडले… बातम्या घडल्या… समित्या नेमल्या गेल्या… कागदोपत्री कामाचे तमाशे यथासांग पार पडले, पुढे मात्र कसं सगळं रितीरिवाजाप्रमाणं व संगनमतानं ‘शांतम् पापम्’ घडलं! यापैकी नंदलालसमितीच्या अहवालात तर भ्रष्टाचाराचा गुन्हेगारी ठपका ठेवलेल्यांपैकी बहुतेक जण आजही नगरसेवक/आमदार म्हणून ठाण्यात मिरवतायतं… हे सुसंस्कृत ठाणेकरांना अत्यंत लज्जास्पद आहे; पण हे सारं आपण आपल्या मध्यमवर्गीय अलिप्ततेच्या कोषातून बाहेर येऊन विचार करणार असलो तर आणि तरच.. अन्यथा नव्हे! काही अपवाद वगळता, बहुसंख्य नगरसेवक आरपार भ्रष्ट व त्यातील बरेच गुन्हेगारी प्रवृत्तिचे असणं, हे ‘ठामपा’चं दुर्दैवी प्राक्तन बदलणं आपल्याच हाती आहे; हे नम्रतापूर्वक नमूद करून महापालिकेचा ‘महालेखाजोखा’ खालीलप्रमाणे मांडीत आहोत.

अनधिकृत बांधकाम

१. वृक्षराजीने नटलेले तलावं चे सुंदर शहर अशी पूर्वी ख्याती असणाऱ्या ठाणे शहराची अलीकडच्या काळात अनधिकृत बांधकामाचे शहर म्हणून अपकिर्ती सर्वत्र गाजतेयं.

२. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या १लाखाहून अधिक व २० लाखांच्या ठाण्यातील लोकसंख्येपैकी जवळपास ४०% (म्हणजेच ७ ते ८ लाख) जनता अनधिकृत झोपडपट्टया व अनधिकृत बांधकामात रहाते.

३. ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांची शेकडो कार्यालये अनधिकृत.

४. मुंबई उच्चन्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून येऊर परिसरातील धनदांडग्यांचे व भ्रष्ट राजकीय नेत्यांचे बंगले अनधिकृतरित्या आजही उभे.

पाणीपुरवठा

१. ठाणे शहराला दररोज पुरवठा होणाऱ्या ४२२दशलक्ष लिटर (डस्क्) पुरवठ्या पैकी ३०% म्हणजेच अंदाजे १२५ दशलक्ष लिटर पाण्याची दररोज खुलेआम चोरी केली जाते. (त्याबाबत २७ पालिका अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई व खातेनिहाय चैकशी सुरू…मात्र त्यांना पाठीशी घालणारे व मदत करणारे स्थानिक राजकारणी अद्याप मोकळे) ‘ठामपा’ला पाणी वितरणात गळती व चोरीमुळे दरवर्षी अंदाजे २५ कोटी रू.चा तोटा.

२. म.औ.वि.मं. व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पाणीबिलापोटी देय असलेल्या सुमारे ४३३ कोटी रूपये वादग्रस्त थकबाकीची ठामपाच्या डोक्यावर टांगती तलवार.

३. ठाण्याच्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी गंजलेल्या अवस्थेत असून ठिकठिकाणी त्यांचा प्रवास गटारांमधून व सांडपाण्याच्या नाल्यातून होतो. (ठामपाच्या अहवालानुसार ठाणे परिसरातील ७७% पेय जल अनेकविध कारणांमुळे आरोग्याच्या दृष्टीनं पिण्यास अयोग्य).

सांडपाणी व मलनिःसारण

१. शहरात दररोज अंदाजे ३५० दशलक्ष लिटर (डस्क्) सांडपाणी व मलजलाची निर्मिती होते.

२. अत्यंत धक्कादायक बाब ही की, गेली ३० वर्षे कुठलीही आवश्यक शास्त्रीय प्रक्रिया न करता हे बहुतांश सांडपाणी व मलजल थेट ठाण्याच्या खाडीत सोडले जात आहे. हा जलचर व पर्यावरणाच्या दृष्टीनं प्रदीर्घ काळ जलप्रदूषण कायद्याला पायदळी तुडवून केला गेलेला निसर्गावरील अनन्वित अत्याचार होय!

३० वर्षांच्या कर्तव्यशून्यतेनंतर प्रस्तावित केल्या गेलेल्या विविध मलप्रक्रिया केंद्रांच्या उभारणीची सद्यस्थिती खालील कोष्टकावरून सहजी कळून येईल.

प्रकल्प आकार (द.ल.ली.)(कोटीत) अंदाजे किंमत कोटीत) वाढीव किंमत कोटीत) किंमतीत वाढ वाढ प्रकल्प पूर्ण होण्याचे साल सद्यस्थिती
कोपरी १२० १५० २३० ८० ५३ % २०१० अजून पूर्ण नाही
कळवा १०० १४० २०४ ६४ ४५ % २०१० अजून पूर्ण नाही
मुंब्रा ३२ ४२ ७० २८ ६ ६ % २०१० अजून पूर्ण नाही

(वरील प्रकल्पांच्या संथगती प्रवासामुळे सर्व प्रकल्पांचा खर्च अंदाजे १७२ कोटींनी म्हणजेच ५२% हून अधिक वाढलेला आहे व प्रकल्प बांधणीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभेच आहे.)

घनकचरा व्यवस्थापन

१. ठाणे शहरात दररोज जवळजवळ ७०० टन घनकचऱ्याची निर्मिती होते, ज्यामध्ये अंदाजे ७०% जैविक कचऱ्याचा अंतर्भाव असतो.

२. गेल्या ३० वर्षात या मुंबईपेक्षा अधिक वेगाने वाढणाऱ्या ठाण्यातील लोकसंख्येसाठी येथील राजकारण्यांना भूखंड आरक्षित करता आलेला नाही.

३. अशातऱ्हेनं पर्यावरणाच्या व नागरिकांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘घनकचरा व्यवस्थापना’च्या अक्षम्य हेळसांड झालेली आहे.

४. खाडीकिनारी तसेच काही खाजगी जागांमध्ये कुठल्याही प्रकारे प्रक्रिया न करता हा घनकचरा टाकला जात असल्याकारणाने शहरातील जलस्त्रोत बिघडल्यामुळे, हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे, खाडीतील जलचरसृष्टीला प्रचंड धोका निर्माण झाल्यामुळे फार मोठ्या गंभीर पर्यावरणाच्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

५. राजकीय वरदहस्तामुळे वादग्रस्त ‘अॅन्थनी वेस्ट हॅंडलिंग’ या खाजगी कंपनीला ठाण्यातील कचरा उचलण्याचे संपूर्ण कंत्राट मक्तेदारीने.

परिवहन खाते (टी.एम्.टी.)

१९८९ साली मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ठामपा परिवहन सेवा आज त्यातील प्रचंड भ्रष्टाचार व अकार्यक्षम कारभारामुळे मरणासन्न अवस्थेत आहे.

१. राष्ट्रीय मानकानुसार दरलाख लोकसंख्येमागे ३० बसेस हे प्रमाण असताना ठाण्यामध्ये हेच प्रमाण दरलाख लोकसंख्येमागे केवळ १८ बसेस एवढेच आहे (दिल्ली, बंगळूर, चेन्नई मध्ये हेच प्रमाण अनुक्रमे दरलाख लोकसंख्येमागे ४४, ३९ व ३३ बस एवढे मोठे आहे).

२. ठाण्यातील २० लाखाच्या लोकसंख्येला ६०० बसेसची आवश्यकता असताना दररोज जेमतेम अंदाजे २५०च्या आसपास बसेस रस्त्यावर धावतात.

३. परिवहनच्या ताळेबंदात विकत घेतलेले हजारो टायर्स व इतर महागड्या स्पेअर स्पार्टस्चा हिशेब जुळत नाही. तसेच राजकारण्यांच्या गाड्यांसाठी व त्यांच्या आशिर्वादाने चाललेल्या छुप्या डिझेलचोरीमुळे परिवहन संत्रस्थ.

४. परिवहनचे अनेक कर्मचारी सर्वपक्षीय राजकारणी व पालिका अधिकारी यांच्या खाजगी दिमतीत बेकायदा तैनात.

रस्ते, पदपथ, फेरीवाले

१. ठामपाला आजवर ‘खड्डेमुक्त रस्ते’ कसे असावेत याचा ‘रस्ता’च भ्रष्टाचारामुळे सापडलेला नाही.

२. ठाण्यात २८० किमी लांबीच्या रस्त्यांपैकी ६० किमी लांबीचे रस्ते कॉंक्रिटचे, तर आजवर रस्त्यांवर केलेल्या प्रयोगात पालिकेचे साधारण ५०० कोटी रू. खड्ड्यात.

३. २४०कोटीची रस्त्याच्या कामाची टेंडरे चर्चेविना मंजूर तर ३०० कोटी रू. ची टेंडरे ३० मिनिटांत मंजूर.

४. साधारण रस्त्यांच्या निम्मे, म्हणजेच ठाण्यात १३८ किमी लांबीचे नाले आहेत. सध्या फार मोठा नालेसफाई घोटाळा वृत्तपत्रातून गाजतोयं.

५. नाला डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’च्या सदराखाली ६०९ कोटींची वारेमाप उधळपट्टी.

६. ठाण्यातील रस्ते एकतर खड्ड्यां च्या किंवा फेरीवाल्यांच्या मालकीचे असतात. फुटपाथ व रस्ते अडवून बसलेले हजारो अनधिकृत फेरीवाले हे स्थानिक नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांच्या दृष्टीने पैशाची ‘सोन्याची खाण’ बनलेले आहेत.

७. ठाण्यात अडवल्या गेलल्या व अरूंद रस्त्यांमुळे व वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंग ही फार मोठी समस्या आहे व या पार्किंगचा ठेका देण्यात देखील फार मोठा भ्रष्टाचार गुंतलेला आहे.

जकात व टोलवसूली

जकात हे ठामपाचे महत्वाचे उत्पादनाचे साधन असून वर्ष २०१२ चे अपेक्षित उत्पन्न ४९४ कोटी आहे.

१. ठामपातर्फे निर्धारित लक्ष्यानुसार जकातवसूली १००% हून अधिक होत असल्याचे भासवले जात असले, तरीही ती धूळफेक आहे.

२. ठाण्यातील ४३ वाईन्सशॉप्सवर १५० कोटी जकात बुडवल्याचा आरोप करून दोन दुकानांना सील लावण्याची कारवाई केली. मात्र त्या कारवाईचे पुढे काय झाले, ही गोष्ट गुलदस्त्यात आहे.

३. तसेच सोनेचांदी विक्री करणाऱ्या दुकांनांवरदेखील अशीच करोडो रू. जकात चुकविल्याचा आरोप करून सकृतदर्शनी कारवाई करण्याचा घाट घातला गेला. मात्र पुढे सगळे प्रकरण थंड बस्त्यात बांधले गेले.

४. अशातऱ्हेनं ठामपाचा शेकडो कोटींचा अधिकचा जकातरूपी संभाव्य महसूल सर्वपक्षीय राजकारणी, महापालिका अधिकारी व दुकानदार-व्यापारी यांच्या भ्रष्ट व गुन्हेगारी संगनमताने दरवर्षी बुडविला जातो, हे ढळढळीत सत्य आहे.

५. ठाणे शहरातून कोणत्याही दिशेने बाहेर पडताना चालू असलेली टोलवसूली ही दिवसाढवळ्या चाललेली, पूर्वीच्या ‘ठग’ लोकांसारखी वाटमारी असून; त्यात ठाण्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते भागीदार आहेत.

पर्यावरण, मोकळ्या जागा व हरित जागा

१. ठाण्यात येणारे पायाभूत सुविधाप्रकल्प हे केवळ त्यातून मिळणाऱ्या टक्केवारीच्याच निकषावर येतात, नागरीहिताचा विचार त्यात बाजूला पडतो आणि पर्यावरणाचा विचाराचा तर त्यात बिलकूल अंतर्भाव नसतो.

२. कुठल्याही शहरात राष्ट्रीय मानकानुसार दरहजार लोकसंख्येमागे अनुक्रमे ०.४ हेक्टर मोकळी जागा व ०.२ हेक्टर बागबगिचे असायला हवेत. प्रत्यक्षात धक्कादायक बाब ही की, ठाणेशहरात ही सगळी ‘मानकं’ मोडीत काढली गेल्यामुळे आजमितीस ठाण्यात दरहजार लोकसंख्येमागे अनुक्रमे ०.००५ हेक्टर मोकळी जागा व ०.१४५ हेक्टर एवढेच बागबगिचे आहेत.

३. ठाण्यात एकूण १४ लाख वाहने असून त्यातील निम्मी म्हणजेच जवळपास ७लाख वाहने दुचाकी आहेत. गेल्यावर्षी ठाण्यात २. ६४ कोटी लिटर्स पेट्रोल व १.७५ कोटी लिटर्स डिझेल वाहनांव्दारे जाळले गेले.

४. यासर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून, ठाण्यातील नागरी संस्कृतिचा व पर्यावरणाचा वारेमाप ऱ्हास झालेला आहे. आता या शहरात धूळ व धूराच्या साम्राज्याने साधी शुध्द हवा श्वसनासाठी मिळणं, ही चैनीची बाब झाली आहे.

महापालिकेची आर्थिकस्थिती

महापालिकेची एकंदर आर्थिक स्थिती नाजूक आहे,या स्थितीस कारण होणारी लूट, उदा. श्रछछन्त्ड या स्कीम खाली ठामपाचे जे अनेक प्रकल्प सुरु आहेत, त्याचा प्रस्तावित खर्च ६९३ कोटी रुपयांचा होता. पूर्णत्वास जाताना त्यांचा खर्च होणार आहे, १०७१ कोटी अथवा अधिक, म्हणजे ५५% जास्त. याचा बोजा महापालिकेवर साधारण ३८० कोटी रुपयांचा पडणार आहे. मालमत्ता कर थकबाकी गेल्या वर्षीची ६१ कोटी रुपये आहे. अहवालाप्रमाणे विविध कारणांनी झालेले आर्थिक नुकसान ६६.३६ कोटी, ७.८३ कोटी रुपये वसूली बाकी. २६३ कोटी रुपयांचे कर्ज. पाणी वितरणात होणारी वार्षिक २५% आर्थिक तूट साधारण २५ कोटी रुपये. सुमारे ४३३ कोटी रुपये पाण्याची वादग्रस्त देणी ठामपाच्या डोक्यावर आहेत. टीमटीची सुरु असलेली आर्थिक अधोगती. या सर्व बाबींचा विचार करता महापालिकेची सत्य आर्थिक परिस्थिती २०१०-११चे लेखा परीक्षण अहवाल आल्यानंतरच दिसेल. जवळपास १००० कोटी रुपयांचे अतिरिक्त ओझे ठामपाच्या मानगुटीवर असणार आहे.

ठाणे महानगरपालिकेत कोणीही सत्ताधारी पक्ष नाही, किंवा कोणीही विरोधी पक्ष नाही वा कोणीही जबाबदार अधिकारी नाही… येथे एकच ‘पक्ष’ अस्तित्वात आहे, तो म्हणजे ‘लुटारूंचंचा पक्ष’!

“येथे फक्त निवडणूकीपूर्वी कलगीतुरा… निवडणूकीनंतरं मात्र आपापसात सलगी व जनतेच्या पाठीत सुरा; असा उफराटा न्याय आहे”.