कामगार-सहकारातून दिवाळी बोनस

  • स्थळरेप्रो इंडिया लिमिटेड
  • सद्य स्थितीसंपन्न
  • सुरुवात दिनांक२१-१०-२०१७
  • संपन्न दिनांक २१-१०-२०१७
  • कालावधी१ दिवस

एक एका साहए करूं I अवघें धरुं सुपंथ II …संत तुकाराम …

“कामगारांचा पैसा, कामगारांसाठी…!” – राजन राजे

धनादेशाद्वारे प्रत्येक कामगाराला दरडोई रु. १५,०००/- असे एकूण ३११ कामगारांना एकूण रु. ४६ लाख ६५ हजार रुपयांचं वाटप. सोबत १० लाख रुपयांचा शिधा आणि रु. ५ लाखांचा दिवाळी फराळ.

ठाणे/नवी मुंबई (प्रतिनिधी) : ‘‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ !’’ अशी थोर शिकवण आमच्या संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून आम्हाला करून दिलीय… त्याच अनुषंगाने पुढच्या काळात ‘सहकारातून समृद्धी’ हे ब्रीदवाक्य अंगिकारून, महाराष्ट्रात सहकार चळवळ सुरू झाली. दुर्दैवाने नंतर या चळवळीला राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याने सहकारातून समृद्धी होण्याऐवजी महाराष्ट्राची बरबादी सुरू होऊन शेतकरी, कामगार व कष्टकरीवर्गाची एकच वाताहात झाली. १ मे-१९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी सहकार चळवळ सुरू केली. सुरुवातीच्या काळात ‘सहकारातून समृद्धी’ पाहायला मिळाली असली तरी, नंतरच्या काळात मात्र हीच सहकार चळवळ महाराष्ट्रातील राजकारण्यांसाठी दोन नंबरच्या उत्पन्नाचे साधन बनली.

या सहकारी चळवळीचं खरं मर्म जाणून, राजन राजे यांनी कामगारांमधील ‘कामगार-धर्म’ जागवत, कामगारांमध्ये ‘सहकारा’ची भावना महाराष्ट्रभर चेतवली. त्याचीच परिणिती म्हणून, अनेक प्रसंगी अडचणीत सापडलेल्या संपकरी कामगारांच्या सहाय्यासाठी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या बिरुदाखाली सुस्थितीत असणारे कामगार धावून जावू लागले. अशातच गेली तीन तपांहून अधिक काळ मृतपाय झालेले कामगारविश्व ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते मा. श्री. राजन राजे यांनी आपल्या ज्वलंत आणि जाज्वल्य विचारांनी पुन्हा एकदा ढवळून काढायला सुरुवात केलीय. ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून मराठी कामगारांच्या न्यायहक्कांसाठी राजन राजे यांनी भांडवलदारी प्रवृत्तीच्या कारखानदारांविरोधात एल्गार पुकारलाय. याच पार्श्वभूमीवर गुणवंत कामगार कसा असावा? याचं ठळक उदाहरण यंदाच्या दिवाळीत स्पष्ट झालंय. ‘सहकारातून समृद्धी’ म्हणजे नेमकं काय? हेही यानिमित्ताने पाहायला मिळालंय.

पगारवाढ आणि आपल्या न्यायहक्कांसाठी ‘धर्मराज्य’च्या झेंड्याखाली व राजन राजे यांच्या प्रखर नेतृत्त्वाखाली नवी मुंबईस्थित सॅन्डोझ-नोव्हार्टिस प्रा. लि., रेप्रो इंडिया लिमिटेड आणि मित्सुबोशी बेल्टींग प्रा. लि. चे कामगार गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संपावर बसलेत. ऐन दिवाळीत कामगारांचा संप म्हणजे स्वतःसोबतच कुटुंबाचाही कठीण काळ… अशावेळी ‘‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ !’’ हे संतवचन प्रत्यक्षात आचरणात आणून, सहकाराचा खराखुरा साक्षात्कार घडवून आणण्याची किमया साधली ती ‘धर्मराज्य’च्या शेकडो कामगार-कर्मचाऱ्यांनी. संपावर बसलेले रेप्रो इंडियाचे २८९ आणि मित्सुबोशीच्या ३२ कामगारांना स्वतःच्या वेतन आणि बोनसमधील काही रक्कम काढून ती बोनस म्हणून देण्याचं परमकर्तव्य ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या सदस्यांनी पार पाडलं. प्रत्येकी १५ हजारांचा बोनस, सोबत मिठाई आणि दिवाळी फराळाचं वाटपदेखील या कामगार सदस्यांनी केलं. यात सिंहाचा वाटा उचलला तो ‘सुल्झर पंप्स’मधील नीतिमान कामगारांनी. ‘सहकारातून समृद्धी’ म्हणजे नेमकं काय, याच जिवंत उदाहरण म्हणून या अभिमानास्पद घटनेकडे प्रामुख्याने पाहता येईल. राजन राजे यांच्या ‘‘आळशी उद्धट कामगार राष्ट्राला भार… मेहनती, नीतिमान कामगार राष्ट्राला आधार !’’ या संस्कारात वाढलेल्या कामगार-कर्मचाऱ्यांनी, संपकरी कामगारांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने प्रज्वलित केली. अखेर कामगारच कामगारासाठी धावून आला… स्वतःच्या दिवाळीसोबतच संपकरी कामगारांचीही दिवाळी ‘गोड’ झाली. संपूर्ण भारतातील कामगारविश्वात असे उदाहरण प्रथमच घडलेय आणि अर्थातच याचे प्रणेते आहेत, ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. श्री. राजन राजे…!!!

दरम्यान, पगारवाढ आणि आपल्या विविध न्यायहक्कांच्या मागण्यांसाठी ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या झेंड्याखाली आणि ज्येष्ठ कामगार नेते, अध्यक्ष मा. श्री. राजन राजे यांच्या ज्वलंत नेतृत्त्वाखाली बेमुदत संपावर बसलेल्या नवी मुंबईस्थित ‘रेप्रो इंडिया लि.’ आणि ‘मित्सुबोशी बेल्टींग प्रा. लि.’ या कंपन्यांच्या कामगारांना प्रत्येकी १५ हजार रुपये अशी एकूण ४६ लाख ६५ हजारांची रोख रक्कम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस म्हणून मा. श्री. राजन राजे यांच्या शुभहस्ते वाटण्यात आली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे १० लाख रुपयांचा शिधा (घरगुती किराणा सामान) आणि ५ लाख रुपयांचा दिवाळी फराळ असा सुमारे ६१ लाख ६५ हजार रुपयांचा विनियोग संपकरी कामगारांसाठी करण्यात आला.

‘रेप्रो इंडिया लि.’चे २७९ कामगार हे गेल्या ६ महिन्यांपासून, तर ‘मित्सुबोशी बेल्टींग प्रा. लि.’चे ३२ कामगार गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ लोकशाही मार्गाने कंपनी व्यवस्थापनाविरोधात संघर्ष करीत आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या कामगारांना बोनस वाटपावेळी मा. श्री. राजन राजे यांनी कामगारांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करून, त्यांचे मनोबल वाढवले. धनदांडगे व भांडवलदारी वृत्तीचे व्यवस्थापन जरी अमानवी पद्धतीने वागत असले, तरी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ शेवटच्या क्षणापर्यंयत तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचं भावनिक प्रतिपादन राजे यांनी यावेळी बोलताना केलं. महत्त्वाचं म्हणजे हिवा इंडिया, ईडिकॉन, एल. जी. हिंग यांसारख्या अनेक कंपन्यांतील, विशेषतः सुल्झर पंप्समधील कामगार-कर्मचारीवर्गाने दिलेल्या भरघोस आर्थिक योगदानामुळेच सदरहू रेप्रो व मित्सुबोशी कंपन्यांतील कामगारांच्या नशिबात दिवाळीचा आनंद येणं शक्य झालयं…. त्याबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. श्री. राजन राजे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या हृदयस्पर्शी कार्यक्रमाप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव श्री. राजेंद्र फणसे, उपाध्यक्ष श्री. राजू सावंत, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, खजिनदार श्री. अण्णा साळुंखे, कामगार प्रतिनिधी श्री. भरत मते, श्री. निवास साळुंखे, श्री. दीपक पाटील, श्री. केशव म्हात्रे, माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश गाडे, श्री. नितीन पाटील, श्री. रवींद्र मोरे आणि श्रीमती यमुना म्हात्रे आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.