ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस महिला विशेष लोकल सुरू करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची स्वाक्षरी मोहीम

  • स्थळठाणे रेल्वे स्थानक
  • सद्य स्थितीसंपन्न
  • सुरुवात दिनांक२०-०७-२०१६
  • संपन्न दिनांक २१-०७-२०१६
  • कालावधी२ दिवस

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत जात असून, त्यात महिला नोकरदार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या उपनगरीय लोकल गाड्यांमधले महिलांसाठी राखीव असलेले डबे अपुरे असून, त्यांची संख्या आणखी दोन डब्यांनी वाढवावी तसेच कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकातून ‘ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस  अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेस सुरु करावी या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्षप्रणित ‘धर्मराज्य महिला संघटना आणि ‘धर्मराज्य प्रवासी संघटना यांच्यामार्फत २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. याला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात महिलांच्या अपघातांची संख्या वाढली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांच्या डब्यांची संख्या जैसे थे अशी आहे मात्र, महिला नोकरदारवर्गाची संख्या प्रचंड वाढलेली आहे. याचा संपूर्ण ताण हा महिलांना प्रवास करताना सोसावा लागत आहे. शिक्षणात आणि नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरी, उपनगरीय रेल्वे लोकलच्या माध्यमातून सातत्याने घडत असलेल्या अपघातांपासून महिलांना संरक्षण कधी मिळणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक आणि मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.

दि. २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ‘धर्मराज्य प्रवासी संघटनेच्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी प्रवाशांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून, उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांची संख्या वाढवावी तसेच ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेत सुरु करावी, अशी मागणी या स्वाक्षरी मोहीमेच्यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, सहसचिव दर्शना पाटील ठाणे लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, धर्मराज्य शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, सचिव भरत जाधव, नवी मुंबई शहर महिला अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, पोर्णिमा सातपुते, उज्ज्वला जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.