Content

Style Switcher

श्रीकृष्णाच्या जीवनसंदेशानुसार व शिवछत्रपतींच्या राजनीतिनुसार चालणारा एकमात्र ‘अंतिम-सत्यवादी पक्ष’ -“धर्मराज्य पक्ष”
img

आज दि. 16 नोव्हेंबर 2011 रोजी आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना झाली, तिच मुळी काळाच्या अशा एका टप्प्यावर की, जेव्हा सामाजिक, राजकीय, आर्थिक व पर्यावरणीय समस्यांनी आपल्या देशात हाहाःकार माजलेला आहे. आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या बुरख्याआडून शेती, उद्योग, शिक्षण व आरोग्य या जीवनावश्यक क्षेत्रात सर्वसामान्य माणसाला राजकारणी, नोकरशहा आणि उद्योगपती व त्यांचे दलाल या मूठभर 1ः वर्गाच्या भ्रष्टाचारी संगनमतानं विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देण्यात आलेले आहे. शेती, उद्योग व सेवा या सर्वच क्षेत्रांमध्ये उत्पन्न व संधी या बाबतीत विषमतेनं कळस गाठल्यानं, या देशात एक नवी ‘अस्पृश्यता’ रूजविण्याचे षड्यंत्र मोठया प्रमाणावर चालू आहे.

या देशाचा खरा मालक असलेल्या कामगार व शेतकऱ्याला, ”आपण देशाच्या तथाकथित विकासाच्या प्रक्रियेतील केवळ ‘कच्चामाल’ वा दर 5वर्षानी येणाऱ्या निवडणूकींमध्ये मतदान करणारे, केवळ यांत्रिक मानव नसून या देशात निर्माण होणाऱ्या साधनसंपत्तीसाठी मधे व नैसर्गिक संसाधनांमधे समान हक्काचे वाटेकरू आहोत“.... याची प्रखर जाणिव करून देण्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ नेटानं प्रयत्न करेल. अन्याय, विषमता व समाजातील विशिष्ट वर्गासाठीच काम करण्याची, या देशातील राजकारण्यांची वृत्ती सहन ‘न’ करण्याची प्रखर मानसिकता सर्वसामान्य जनतेमध्ये ‘धर्मराज्य पक्ष’ निर्माण करेल. या द्वारे समाजाची निकोप जडण-घडण नव्यानं करण्याची जबाबदारी धर्मराज्य पक्ष स्विकारीत आहे.

“समाजाच्या मूळ रोगावर इलाज ‘न’ करता, वरकरणी केवळ रोगाच्या लक्षणांवरच फसवे इलाज करत, ‘बेरजे’चं बदमाषीचं राजकारण करुन माणसं जोडणं मला साफ नामंजूर आहे!" - राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

हे करताना आपल्याला यश मिळो वा अपयश, इतरेजनांकडून स्तुतींचा वर्षाव होवो वा निंदेला सामोरे जावे लागो, आर्थिक लाभ मिळो वा ना मिळो याची यःकिंचितही पर्वा न करता, आपण जी कृती करीत आहोत ती ‘नैसर्गिक-न्याया’च्या तत्वानुसार योग्य आहे की अयोग्य... केवळ हेच ध्यानात घेऊन ‘धर्मराज्य पक्ष’ व त्याचा प्रत्येक सभासद कृति करेल.

विकासाच्या कुठल्याही प्रारूपाचा केवळ ‘माणूस-केंद्री’ विचार ‘न’ करता संपूर्ण निसर्गाचा व पर्यावरण-संरक्षणाचा विचार साकल्यानं करण्याचं अभिवचन ‘धर्मराज्य पक्ष’ देत आहे!

विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक साधने, पोलाद-तेल-सिमेंट वा विद्युतऊर्जा यांचा दरडोई वाढलेला खप, संपन्नतेनं व विपूलतेनं नटलेल्या माॅल्स् सारख्या बाजारपेठा, चकचकीत रूंद चारपदरी महामार्ग व जागोजागी उड्डाणपूल वा उंचच उंच काॅंक्रिटच्या इमारती असं नव्हे, तर ‘निसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शंाति व प्रसन्नता हा खरा विकास होय! तो साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल!