कामगार सन्मानाने जगला तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे!
रोह्यातील विजयी सभेत, राजन राजे यांचा ‘भांडवली-व्यवस्थे’वर घणाघाती प्रहार….
“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्ष काढायचे, राजकारण करायचं आणि त्याच मराठी कामगाराची फसवणूक करायची, त्याचे संप फोडायचे! मराठी-माणसांच्या हातात दगड द्यायचे, कामगारांना एकमेकांची डोकी फोडायला लावायची…आणि, तेच ‘दगड’ गोळा करत, त्या मराठी-नेत्यांनी आपले ‘गड’ बांधायचे… हा उफराटा उत्पात, महाराष्ट्राच्या कामगारविश्वात अजून कितीकाळ चालणार आहे? मराठी माणसांनो, म्हणजे अर्थातच मराठी-कामगारांनो, लक्षात घ्या की, “फेकला तर दगड, रचला तर गड” याच मराठी-मराठी करणाऱ्या नेत्यांनी, “कारखाना जगला तरच, कामगार जगेल’ अशी मालकवर्गाची ‘दलाली’ करणारी आणि आपल्याच श्रमिक मराठी-जमातीला मुळातूनच भेदरवून टाकणारी घोषणा दिली…कुठल्याही जातिवंत नेत्याने आपल्या समाजाला, विजिगिषू प्रेरणा व चेतना द्यायची असते; अकारण घाबरवून सोडायचं नसतं. या देशातला एक ‘बाबासाहेब’, शेकडो-हजारो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या पददलित ‘मृण्मय’ मनांना ‘चिन्मय’ करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो; तर, आमचे मराठी राजकारणी ‘दुकानदारसाहेब’, आपल्याचं जमातीचं खच्चीकरण करु पहातात? ‘भाषा आणि भाषण’ यावरील अंगभूत प्रभुत्वाचा गैरवापर करत, मराठी-कामगाराला ‘भांडवली-गुलामी’कडे कौशल्याने ढकलत नेणाऱ्या घृणास्पद राजकीय-डावपेचांना छेद देण्यासाठीच, “कामगार सन्मानाने जगला; तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे”, ही गेली चार दशकं आम्ही भीमगर्जना करत आलोत! ‘धर्मराज्य’सारखं ‘सहकार्य आणि संघर्ष’ इतर कोणी करु शकत नाही…तेव्हा, यातलं नेमकं काय निवडायचं; ते संबंधित व्यवस्थापनांनी व भांडवलदारांनी ठरवावं!” असं रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, रोह्यात केले.
धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांना नुकतीच ऐतिहासिक स्वरुपाची रु. १४ हजारांची ‘थेट’ (‘C.T.C.’सारखी तद्दन फसवी पगारवाढ नव्हे) पगारवाढ त्रैवार्षिक कराराद्वारे करण्यात आली, त्याप्रसंगी, झालेल्या विजयी-सभेत राजन राजे बोलत होते.
यावेळी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे खजिनदार अजित सावंत, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, श्रमिक संघाचे नेते शिशिर ढवळे, आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नाना अहिरे, कामगार प्रतिनिधी निरंजन म्हात्रे, दिलीप राणे, विनोद गायकवाड आदी मान्यवरांसह, ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आपल्या तासाभराच्या तडाखेबंद भाषणात कामगारांना संबोधित करताना राजन राजे यांनी सुरुवातीलाच, १४ हजारांची भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल उपस्थित कामगारांचे अभिनंदन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या प्रत्येक कामगाराचे आर्थिक-उन्नयन व्हावे; यासाठी, मी गेली चार दशकं ‘भांडवली-व्यवस्थे’शी संघर्ष करत आलोय. कामगारांनी ‘श्रीमंत’ जरुर व्हायला हवं; पण, त्याआधी ‘नितीमंत’ होणे गरजेचे आहे… “आधी नितीमंत, मगच श्रीमंत! ‘फोडा आणि झोडा’, या कपटी-दुष्ट भांडवली-नितीने, कृत्रिमरित्या निर्माण केलेले… ‘कंत्राटी / कायम / मुदतबंद कामगार’ वगैरे कामगारभेदांना ‘फाट्यावर मारुन’, प्रत्येक कामगाराच्या जगण्यात श्रीकृष्णाचं आनंदी ‘गोकुळ’ निर्माण व्हावं, ही माझी जीवन-प्रेरणा आहे… तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर बांधलेलं समाधानाचे-सुरक्षिततेचं ‘पैंजण’; हेच, माझ्या जगण्याचं ‘इंधन’ आहे…ते कुठलं वनस्पती तेल अथवा आखाती खनिज तेलस्वरुप इंधन नव्हे! संकटं सर्वांवर येतात, ती सज्जनांवर येतात; तशी दुर्जनांवरही येतात…पण, शंभर संकटं कोसळूनही सज्जन ठाम उभा राहू शकतो: पण, एखाद्या संकटानेही, आतून पोकळ डोलारा असलेला दुर्जन कोसळू शकतो, हे लक्षात ठेवा. ‘आळशी-उद्धट कामगार राष्ट्राला भार…नितीमान कामगार राष्ट्राला आधार’, ही आपली ‘धर्मराज्य-घोषणा’ कधिही विसरु नका; आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे कधी संकट ओढवून घेऊ नका…संकटं यायचीच असतील, तर त्यांना त्यांच्याच पावलांनी येऊ द्यात…तुमची पाऊले वा तुमच्या पादुका, त्यांना बहाल करु नका”, असा वडीलकीचा सल्लादेखील राजन राजे यांनी यावेळी कामगारांना दिला.
राजन राजे भाषणाचा ओघ पुढे न थांबता सुरुच होता….”डाॅ दत्ता सामंतांसारखे लढवय्ये कामगार-नेते आणि ‘FERA’सारखे कायदे होते; तोपर्यंतच, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून कामगारांना उत्तम वेतन-सुविधा मिळत होत्या; पण, आता बहुराष्ट्रीय कंपन्याच कामगारांचं शोषण करण्यात व काॅर्पोरेटीय क्षेत्रात ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate Terrorism) माजवण्यात आघाडीवर आहेत. निष्ठावंत कामगार हा, कामगार चळवळीच्या ‘पायाचा दगड’ असतो, दहीहंडीच्या सगळ्यात खालच्या थरासारखा संघटनेचा तो मजबूत आधार असतो; जोडीला शिस्त व एकजुटीचं कसोशीनं पालन करा. वाढीव पगाराचा पैसा अत्यंत खुबीने कुटुंबाच्या हितासाठीच वापरा, नवीन चकचकित चारचाकी गाडी घेतल्यादिवसापासूनच म्हातारी व्हायला सुरुवात होते; म्हणून त्यावर पैसे उडवण्यापेक्षा आपली ‘काळी आई’ असणाऱ्या जमिनीत पैसे गुंतवा, योग्य ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणूक करा…पुढील काळाचा भरवसा नाही; म्हणून भविष्यातील संकटे वा संघर्षासाठी पगारातले ठराविक पैसे राष्ट्रीयीकृत बँकेतील मुदतठेवीत राखून ठेवा, चंगळवादाच्या नादी लागू नका…येणाऱ्या कठीण काळाची पाऊले वेळीच ओळखा, यश मिळवणे सोपं असतं; पण, ते टिकवणे आणि वाढवणे कठीण असते. केवळ, तुमचंच नव्हे; तर, रोह्यातील प्रत्येक कामगाराचं चांगभलं व्हायलाच पाहिजे, या दिशेने प्रयत्नरत रहा…फक्त पगार/बोनस वाढीसाठी नव्हे; तर, कामगारांच्या सन्मानासाठी ‘राजन राजे’ हा ‘पंचाक्षरी-मंत्र’ आहे, हे विसरु नका!” अशा शब्दांत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.
…या आनंदोत्सवा समयी, ‘डीआरटी अँथिया’च्या कामगारांनी, संपूर्ण रोहा शहर आणि धाटाव एमआयडीसीतून बाईक रॅली काढत, राजन राजे यांचे अभूतपूर्व स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिट अध्यक्ष प्रमोद जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.