सिव्हिल हॉस्पिटलसमोरील इमारत क्रमांक दोनच्या गच्चीचा भाग शनिवारी (ता. ६) सायंकाळी कोसळल्याने पोलिस कुटुंबीय धास्तावले आहेत. पोलिस वसाहतींत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून घरभाडेपट्टी व देखभाल खर्च घेतला जात असतानाही या इमारतींची व्यवस्थित देखभाल किंवा दुरुस्ती केली जात नव्हती. या इमारती ६० वर्षे जुन्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम असतानाही एकही ऑडिट करण्यात आलेले नाही. या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींतील जिने, व्हरांडे यांची स्थिती पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इमारत क्रमांक २ मधील गच्चीचा कोबा तोडून केलेल्या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात घरांत पाणी गळते, अशी तक्रार या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने संबंधित विभागास युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत व या वसाहतीतील पोलिस कुटुंबांचे जीवन सुसह्य करावे, या मागणीसंदर्भात ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गुरुवार दि. ११ डिसेंबर-२०१४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान सरकारी विश्रामगृह, ठाणे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.