महिना: एफ वाय

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन !

, , , ,

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन ! ● सेंद्रिय शेती, निसर्गरक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत केले मार्गदर्शन.
वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रदेशी साजरा करण्यात येतो. याच अभिमानास्पद दिवसाचे औचित्य साधून ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या साखरे-साजगाव येथील त्यांच्या शेतघराच्या प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीसाठी आलेल्या शेकडो शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वनभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील शिक्षकवृंददेखील उपस्थित होता. विद्यार्थीवर्गाला शालेय जीवनापासूनच निसर्गरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे महत्व कळावे, यासाठीच या वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. राजन राजे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःहून शेतघर परिसरातील विविध झाडे, वनस्पतींची माहिती दिली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी, याबरोबरच ऊस, द्राक्ष, फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यात आली.
दरम्यान, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सहल फक्त मनोरंजनात्मकच नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाची कवाडे उघडणारी ठरली. यानिमित्ताने शेती कशी करावी? सेंद्रिय शेती म्हणजे काय? निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाचे संवर्धन म्हणजे नक्की काय, त्याचे मानवी जीवनातील नेमके महत्व किती? याची सखोल माहिती मा. श्री. राजन राजे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख असणारा ‘धर्मराज्य पक्ष’ फक्त निवडणुकांचेच राजकारण करीत नसून, तर तो सातत्याने पर्यावरणच्या माध्यमातून ‘निसर्गकारण’ करीत असतो, हेच मराठी राजभाषा दिनाच्या माध्यमातून व शालेय सहलीच्या निमित्ताने अधोरेखित झाले. वनभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर मा. श्री. राजन राजे यांनी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या गुळाची प्रत्येकी १ किलोची ढेप भेट म्हणून दिली. यावेळी विद्यार्थीवर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा टवटवीतपणा स्पष्टपणे दिसत होता. “शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली ही सहल खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. जी गोष्ट आम्ही शाळेत पुस्तकीरुपात शिकवतो, तीच आमच्या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्षात शिकायला मिळाली.” अशा भावना व्यक्त करून शिक्षकवृंदाने मा. श्री. राजन राजे यांचे आभार मानले. याप्रसंगी राजे यांच्या सुकन्या ऋचा राजे आवर्जूनउपस्थित होत्या. त्याचबरोबर तुकाराम हलपतराव, धनाजी हलपतराव, विश्वनाथ मोरे आदी मंडळी उपस्थित होती.

अण्णा हजारेंच्या बेमुदत आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘धर्मराज्य पक्षा’चे साखळी उपोषण सुरू !

देशातील भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याबरोबरच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठीच आंदोलन -राजन राजे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे पुकारलेल्या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’ने जाहीर पाठिंबा दिला असून, पक्षाच्या वतीने अण्णांच्या समर्थनार्थ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारीपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. देशातील बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्याला उत्तेजन देणारी भ्रष्ट राजकीय व प्रशासकीय व्यवस्था यामुळेच देशापुढे सर्वच मूलभूत प्रश्न निर्माण झाले असून, अण्णा हजारेंच्या या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच देशातील भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याबरोबरच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने लोकशाहीमार्गाने लढा उभारला असून, त्यासाठी आम्हीदेखील साखळी उपोषण सुरू केल्याचे पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते विक्रांत कर्णिक, पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सचिव सुनील घाणेकर, कोपरी-आनंदनगर विभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख अनिल महाडिक, अंजुर गावचे सरपंच मनीष तर, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत या पदाधिकाऱ्यांसोबत नरेंद्र शिंदे, मनोज बेर्डे, सुशांत भोईर, संदीप सोनखेडे, गौरव गोरे, किशोर वाडकर, नरेंद्र पारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, “देशातील भ्रष्टाचार समूळ उपटून काढायचा असेल, तर करसंरचना आणि अर्थकारणात आमूलाग्र बदल करावे लागतील” असे नमूद करून राजन राजे पुढे म्हणाले की, “अर्थक्रांती विधेयक खऱ्या अर्थाने भ्रष्ट राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना सत्तेतील खुर्चीच्या उबेपासून तुरुंगातील मिरचीच्या धुरापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरेल, त्यासाठी जन-लोकपाल कायदा त्वरित अंमलात आणला गेलाच पाहिजे, हीच आमची आग्रही मागणी आहे” असे ठाम प्रतिपादन राजे यांनी यावेळी बोलताना केले. २०११ साली अण्णा हजारेंच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनापुढे तत्कालीन सरकार नमले व त्यांनी जन-लोकपाल कायदा पारित केला. मात्र राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊनही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील या कायद्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात आली. गेल्या काही वर्षांत देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, दुर्दैवाने त्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. नापिकी, शेतीमालाला न मिळणारा हमीभाव आणि कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक यातच बळीराजा पार पिचून गेलेला आहे. याच पार्श्वभूमीवर झोपी गेलेल्या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने साखळी उपोषण सुरू केले असल्याचे पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी शेवटी बोलताना म्हटले. यादरम्यान, ठाणे शहराच्या कोपरी परिसरातदेखील पक्षाच्या वतीने ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरून, शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
error: Content is protected !!