दिवस: जून 11, 2024

रबाळे एमआयडीसीतील ‘हिवा इंडिया’ कंपनीतील २४२ कामगारांना तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ…सलग ‘पाचवा त्रैवार्षिक-करार’!

भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही हरित पक्ष अशी मान्यता असणारा व “Zero Tolerance Towards Corruption and Exploitation Of Man and Nature”, असं ब्रीद असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापकीय अध्यक्ष आणि अवघ्या औद्योगिकविश्वात ‘कामगार-हृदयसम्राट’ अशी ख्याती असणारे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत (कंपनीला गेल्या दिडदोन वर्षांपूर्वी एका व्यवहारातून फार मोठा आर्थिक-फटका बसल्यानंतरही)…देशातील प्रस्थापित निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेऊन, पुन्हा एकदा आपल्या नावलौकिकाला साजेसा असा, ‘चमत्कार’ घडवून आणला आहे!
…चमत्कार असा की, ४ कामगारघातकी कायद्यांनी बनलेल्या ‘काळ्या कामगार-संहिते’अंतर्गत समस्त कामगार-कर्मचारीवर्गावर लादल्या गेलेल्या सद्यस्थितीतल्या ‘गुलामगिरी’त… जेवढा मासिक-पगार (विशेषतः, कंत्राटी-कामगारांना म्हणजेच, ‘आधुनिक-गुलामां’ना, १२ तासाला १२ हजार पगार, इतका तुटपुंजा मिळणारा पगार विचारात घेता) हल्ली मिळत नाही; तेवढी नुसती थेट वेतनवाढ ‘हिवा-कामगारां’ना मिळालेली आहे.
नवी मुंबईस्थित रबाळे एमआयडीसीमधील ‘हिवा इंडिया’ कंपनी; ही वहातूक, बांधकाम, खाणकाम, अवजडसाहित्य-हाताळणी वगैरे क्षेत्रांसाठी टीपर्स, हाॅक-लोडर्स, काँपॅक्टर्स यासारखी ‘हायड्रॉलिक-उपकरणे’ उत्पादित करणारी जगभरातील ख्यातनाम कंपनी होय.
या हिवा-कंपनीतील कामगार सदस्यांना, या त्रैवार्षिक कराराअंतर्गत, सरासरी तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ मिळालेली आहे. विशेष म्हणजे, ‘CTC या व्यवस्थापकीय-फसव्या संकल्पने’वर आधारित ही पगारवाढ बनावट नसून, सर्व कामगारांना समानपद्धतीने (Flat) थेट पगारवाढ देण्यात आलेली आहे…
…विशेष बाब म्हणजे, कामगार-कर्मचारीवर्गाच्या संदर्भात, या देशातील “प्रगती-समृद्धीची गंगा उलटी वहात असताना”, प्रवाहाविरुद्ध पोहून जात प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारी व कामगारविश्वाच्या हितार्थ ‘मूलगामी-बदला’चा संदेश देणारी…आपली अदम्य-साहसी परंपरा कायम राखताना, कामगार-हृदयसम्राट राजन राजे यांनी कंपनीतील उरल्यासुरल्या, हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या कंत्राटी-कामगारांना देखील (पूर्वीच्या करारांच्या माध्यमातून, याच कंपनीतील जवळपास १५० ‘कंत्राटी-कामगार’ आजवर कायम केले गेले आहेत, हे विशेषत्वाने नमूद करतो आहोत), या कराराच्या कालावधीत ‘कायमस्वरुपी’ नोकरीत सन्मानाने प्रविष्ट करुन घेतले आहे!
मंगळवार, दि. ११ जून-२०२४ रोजी, रबाळे एमआयडीसीमधील आस्थापनेत मोठ्या जल्लोषात आणि हर्षोल्हासाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या ऐतिहासिक पगारवाढीत कंपनीतील एकूण २४२ कामगारांना व भविष्यात कंपनी-सेवेत ‘कायम’ होऊ शकणाऱ्या, अशा सगळ्याच कामगारांना,
* पहिल्या वर्षी *५,८०० रुपये,
* दुसऱ्या वर्षी *४,३५० रुपये तर,
* तिसऱ्या वर्षी *४,३५० रुपये पगारवाढ देण्यात आली असून, बेसिकमध्ये ६० टक्के व इतर अलाऊन्सेसमध्ये ४० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, दिवाळी-बोनस म्हणून, कमीतकमी ८० हजार व जास्तीतजास्त १ लाखाहून अधिक रुपयांची भरघोस रक्कम कामगारांना मिळणार आहे.
अशा प्रकारचा चमत्कार, कुठलंही भक्कम राजकीय-पाठबळ सोबत नसतानाही, “राजन राजे” नावाच्या, असंख्य कामगारांचं आर्थिक-उन्नयन करणाऱ्या, ‘पंचाक्षरी-मंत्रा’ने केला आहे आणि तोच ते करु जाणे!
मरगळलेल्या औद्योगिकविश्वात सनसनाटी निर्माण करणारा, आणखी एक करार म्हणून, हा करार खचितच ओळखला जाणार आहे. या ऐतिहासिक कराराच्या माध्यमातून, ‘हिवा’च्या कामगारांना सर्व्हिस अवॉर्ड म्हणून,
पाच वर्षांसाठी ५००० रुपये,
दहा वर्षांसाठी १०,००० रुपये,
पंधरा वर्षांसाठी १५,००० रुपये,
वीस वर्षांसाठी २०,००० रुपये,
पंचवीस वर्षांसाठी २५,००० रुपये; तसेच,
पुढे एखादा कामगार २६व्या वर्षी सेवानिवृत्त होत असेल तर, त्याला २६ हजार रुपये, २७व्या वर्षी सेवानिवृत्त होणार असेल तर, २७ हजार रुपये आणि कामगार जर २७ व ३०च्या दरम्यान सेवानिवृत्त होणार असेल तर, त्या कामगाराला ३० हजारांची रक्कम देण्यात येणार असल्याचे, या करारात नमूद करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त इतर, अनेक सेवासुविधा व सेवाभत्त्यांमधेही, कराराअंतर्गत भरघोस वाढ करण्यात आलेली आल्यानं, सध्याच्या पावसाळी वातावरणात, पहिल्यावहिल्या पावसाच्या आगमनाने थुईथुई नाचणार्या मोरासारखं, समस्त हिवा-कंपनी कामगारवर्गाचं मन आनंदानं थुईथुई नाचू लागलंय!
दरम्यान, या ऐतिहासिक अशा त्रैवार्षिक करारामुळे, प्रामुख्याने भूमिपुत्र असलेल्या कामगारांच्या आयुष्यात ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा कोंबडा खणखणीत स्वरात आरवल्यामुळे, आर्थिक समृद्धीची पहाट झालेली आहे. त्यामुळेच, “केवळ एका पिढीचंच नव्हे; तर, कामगारांच्या तमाम पुढील पिढ्यापिढ्यांचंही कल्याण साधणारा नेता”, या राजन राजे यांच्या क्रांतिकारी लौकिकावर पुनश्च नव्याने शिक्कामोर्तब झालेलं आहे.
“एका कायम कामगाराच्या जागी, तीन कंत्राटी-कामगार नेमण्याचे” कामगारघातकी ‘ट्रिपल-इंजिन’ सरकारचे धोरण असताना व संपूर्ण भारतात कामगारविरोधी धोरणांचे चक्रीवादळ गरगरत असतानाच, प्रवाहाच्या विरोधात पोहून जाण्याची किमया, पोलादी कामगार-एकजुटीच्या बळावर, राजन राजे आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील ‘धर्मराज्य पक्ष’ व त्याअंतर्गत असलेल्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ नावाच्या कामगार संघटनेने, करुन दाखवलेली आहे. काळी कामगार संहिता लादून, कायम-कुशल कामगारांना अक्षरशः ‘गुलाम’ बनविण्याचे विश्वासघातकी-घृणास्पद उद्योग सुरु असताना, राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली संपन्न झालेला, हा ऐतिहासिक करार होय!
कराराप्रसंगी समस्त हिवा-कामगारांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, “कामगारांसाठी ‘अमृत’ नव्हे; तर, ‘विषाक्त किंवा विषा’समान ठरलेल्या, या ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळा’त…म्हणजेच, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेल्यावर व पुढील वर्षी देश प्रजासत्ताक झाल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाच…माझा, हिवा-कंपनीचा कामगार, या करारान्वये पगाराच्या सरासरीची ‘पंचाहत्तरी’ गाठत असावा (सरासरी पगार ७५ हजार) व स्वातंत्र्याचा ‘शतकी-महोत्सव’ साजरा होण्यापूर्वीच बोनसची ‘शंभर-हजारी’ (म्हणजेच, एक लाखाहून अधिक ‘सहा आकडी’ बोनस) मजल गाठावी…हा दुर्लभ असा, दुग्धशर्करा-योग आहे आणि तो केवळ, कामगारांच्या पोलादी एकजुटीने व संघर्षासाठी कुठल्याही त्यागाला तयार असण्याच्या दृढ निर्धारानेच घडून आला आहे…राजन राजे, हा कामगार-नेता, केवळ, निमित्तमात्र आहे!”
यादरम्यान, या कराराप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण यांच्यासह, ‘हिवा इंडिया’ युनिट अध्यक्ष श्री. निलेश बारोटे, उपाध्यक्ष श्री. संतोष गाडवे, सचिव श्री. संजय उघडे, उप-सचिव श्री. विजय सोनावणे, खजिनदार श्री. दादा मोरे, उप-खजिनदार श्री. गुरुनाथ पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री. विनोद बावकर त्याचप्रमाणे व्यवस्थापनाच्या वतीने ऑपरेशन्स डायरेक्टर श्री. प्रशांत मानकामे, एच. आर., बिजनेस पार्टनर आणि डायरेक्टर श्री. हेमंत सुर्वे, सिनियर मॅनेजर, एच. आर. आणि इंडस्ट्रीयल रिलेशन्स श्री. संदेश मोडक, डेप्युटी मॅनेजर, एच. आर. श्री. संतोष आग्रे आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
error: Content is protected !!