दिवस: नोव्हेंबर 21, 2025

राजमाता जिजाऊंचे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांची राजन राजेंना सदिच्छा भेट

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे थेट चौदावे वंशज तसेच, ‘सनय छत्रपती शासन पक्षा’चे संस्थापक/अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची, दि. २१ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजन राजे यांनी, प्रा. नामदेवराव जाधव यांचे, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, संयुक्त महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त, ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यालयातील हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला मा. राजन राजे व प्रा. नामदेवराव जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात, मोराराजी देसाई या मराठीद्वेष्ट्या-महाराष्ट्रद्रोही नरराक्षसाने दि. २१ नोव्हेंबर-१९५६ रोजी, फ्लोरा-फाउंटन (आताचा हुतात्मा चौक) येथे केलेल्या अमानुष गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या, १०६ हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, या भेटीत सद्य राजकीय परिस्थिती व मराठी तरुणांच्या सामाजिक प्रश्नांवर दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. कंत्राटी-कामगारपद्धतीमुळे मराठी तरुण गुलामगिरीत ढकलला गेलेला असून, प्रस्थापित राजकारणी आणि भांडवलशाही व्यवस्थेने, महाराष्ट्राचा मूळ भूमिपुत्र उध्वस्त केला असल्याचे रोखठोक प्रतिपादन मा. राजन राजे यांनी यावेळी केले. यादरम्यान, प्रा. नामदेवराव जाधव यांनी, मा. राजन राजे यांची “एक दुकान, एक मकान” ही संकल्पना उचलून धरत, आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपणही यासंदर्भात लोकशाहीमार्गाने चळवळ उभी करु, असे आश्वस्त केले. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘सनय छत्रपती शासन पक्ष’ या दोन्ही पक्षांची विचारसरणी ही, मराठी माणसाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याने, भविष्यात ‘मराठी-माणूस’ व ‘महाराष्ट्रधर्मा’साठी आपण नक्कीच एकत्र येऊ, असे आवाहन प्रा. नामदेवराव जाधव यांनी करताच, “जोपर्यंत तुमच्या हातून सत्कर्म घडतंय, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू… कारण, मी व्यक्तीच्या नव्हे; तर, प्रवृत्तीच्या प्रेमात पडणारा माणूस आहे!” अशी आपली थेट भूमिका मा. राजन राजे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. याप्रसंगी प्रा. नामदेवराव जाधव यांनी लिहिलेली, “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” (भाग-२), “जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज्” आणि “सनय” ही तीन पुस्तके, मा. राजन राजे यांना सप्रेम भेट दिली. या सदिच्छा भेटीवेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव श्री. नरेंद्र पंडित, प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!