३१ जानेवारी २०२६ : कल्याणमध्ये माई आंबेडकर जयंतीनिमित्त आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार

दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृह, कल्याण येथे, कल्याणमधील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ. सविता ऊर्फ माई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती महोत्सवामध्ये आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या नवविवाहित जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक तसेच माईसाहेबांचा अतिशय जवळून सहवास लाभलेले विजय सुरवाडे होते. कार्यक्रमासाठी खास संभाजीनगर येथून माईसाहेबांवर चित्रपट निर्माण करणारे निर्माते, लेखक व दिग्दर्शक प्रकाश त्रिभुवन उपस्थित होते. तसेच प्रख्यात कामगार नेते राजन राजे व जगदीश खैरालिया हेही ठाण्याहून विशेषतः कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माईसाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर शरद लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद गायकवाड यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा बसवंत यांनी अत्यंत खुमासदार व प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमादरम्यान विविध गायकांनी सादर केलेल्या चळवळीतील प्रबोधनपर व प्रेमगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
समता संघर्ष संघटनेच्या सुरेखा पैठणे, श्रमिक मुक्ती दलचे जगदीश खैरालिया व राजन राजे, ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे तसेच चित्रपट निर्माते प्रकाश त्रिभुवन यांनी आपल्या भावना अतिशय थोडक्यात, मात्र अत्यंत प्रभावी शब्दांत मांडल्या.
कार्यक्रमामध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहित जोडप्यांचा माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात” या पुस्तकाच्या प्रती तसेच मोतन हिने मातीपासून तयार केलेली घंटा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
नवविवाहित जोडप्यांमध्ये सबुरी–रवी, मोतन–प्रतिक, साक्षी–ओंमकार व आचल–सुचित या जोडप्यांचा समावेश होता. यावेळी प्रत्येक जोडप्याने व्यक्त केलेले मनोगत उपस्थितांना भावले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सुरवाडे यांनी लोकांना माहिती नसलेल्या अनेक सत्यघटना उलगडून सांगितल्या, ज्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय चौधरी, संकल्पना कऱ्हाडे, शंबूक, बाबा रामटेके, राजू रणदिवे, संतोष कटके, ज्ञानेश पाटील, संगीता जोशी तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामध्ये भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती संघटना, सकल भारतीय समाज, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, ऑल इंडिया युथ फेडरेशन, नागरी हक्क संघर्ष संघटना, आयटक व अनुबंध या सर्व संघटनांचा सक्रिय सहभाग होता. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!