कॅटेगरी: प्रकाशन

राजन राजे लिखित, ‘इंडिया एक आयडिया’ पुस्तिकेचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते दिमाखदार प्रकाशन.

, , ,

“लोकसभा निवडणुकीनंतर, या संपूर्ण भारतातील सगळ्यात महत्त्वाची निवडणूक कुठली असेल तर, ती आता येऊ घातलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक तुम्ही-आम्ही पाहिली, ‘इंडिया आघाडी’ म्हणून आपण सगळे एकत्र लढलो. त्यावेळी या सगळ्यांच्या कानाजवळून तीर गेला. इलेक्टोरल बाँड, इलेक्शन कमिशन आणि इडी या सगळ्यांच्या मेहेरबानीमुळे ते फक्त धाराशाही झाले नाहीत, थोडक्यात वाचले; पण, त्यांची लाज गेली. एवढं सगळं करुन आज सगळे राजकीय तज्ज्ञ सांगतायेत की, सत्तर ते ऐंशी जागा यांनी लाटलेल्या आहेत आणि आता, ‘अबकी बार मोदी सरकार’ म्हणणाऱ्यांचा अहंकार धुळीला मिळाला. पण, ते संपलेत असं नव्हे. आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, या ठाण्यातून दगाफटका झालेला आहे. ठाण्यातूनच सुरत ते गुवाहाटी असं गलिच्छ राजकारण झालेय. काळ्या पैशांतून आमदार विकत घेतले गेले. ज्याला आपण खोके सरकार म्हणतो, आजही घटनात्मकदृष्ट्या ते बेकायदेशीर आहे. तत्कालीन राज्यपालांचा कारभारही बेकायदेशीरच होता. त्यामुळे ज्या गद्दारीची सुरुवात ठाण्यातून झाली, त्या गद्दारांची तटबंदी येत्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातूनच सर्वप्रथम उध्वस्त करा!” असा जोरदार घणाघात करीत, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ठाण्यातील शिवसैनिकांना साद घातली. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात ‘भगवा-सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, सायंकाळी ७ वा. घेण्यात आलेल्या सभेत, राजन राजे बोलत होते. यावेळी आपल्या धडाकेबाज भाषणातून, उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना राजे पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रधर्माचा आणि या संपूर्ण सज्जनशक्तीचा, या गद्दारांकडून जो काही अवमान करण्यात आलाय, तो आपल्याला विसरून चालणार नाही. यानिमित्ताने मला आपल्याला एवढंच सांगायचंय, ज्या महाशक्तीच्या इशाऱ्यावर या लोकांनी उद्धवजींचं सरकार पाडलं, त्यांना धडा शिकवायची वेळ आता आलेली आहे आणि ही संधी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला गमावून चालणार नाही. ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधन आणि दु:शासनाच्या इशाऱ्यावर शकुनी फासे टाकत होता, त्याचपद्धतीने इथे गलिच्छ राजकारणाचे फासे टाकले गेले. इथे मला आवर्जून सांगायचंय की, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात आणि भारतात राहुलजी गांधी हे जे कोदंडधारी धनुष्य हातात घेऊन उभे आहेत, त्यांच्या धनुष्यातून असे शकुनीचे फासे फेकले जात नाहीत तर, त्यांच्या धनुष्यातून तीक्ष्ण बाण रोरावत बाहेर पडतात. ते रामबाण आहेत, अशा शब्दांत राजन राजे यांनी, शिवसैनिकांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, जे काही सलग १८ लेख लिहिले होते, त्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘इंडिया एक आयडिया’ या पुस्तिकेचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी गडकरी रंगयातनमध्ये उपस्थित असलेल्या हजारो शिवसैनिकांना या पुस्तिकेचं वाटप करण्यात आले. आगामी विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, या पुस्तिकेतील प्रासंगिक मुद्द्यांचा संदर्भ घेत, लोकांशी बोलताना, भाषणं करताना आणि मतदारांशी संपर्क साधताना, त्यातील लेख मार्गदर्शक ठरतील, असा आशावाद राजन राजे यांनी, शेवटी बोलून दाखवला.

error: Content is protected !!