“रोहा (रायगड) | ०९.०३.२०२६ : ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स’मध्ये १४ हजारांची थेट पगारवाढ – विजयी सभेत राजन राजे यांचा भांडवली व्यवस्थेवर घणाघाती प्रहार”
कामगार सन्मानाने जगला तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे!
रोह्यातील विजयी सभेत, राजन राजे यांचा ‘भांडवली-व्यवस्थे’वर घणाघाती प्रहार….
“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्ष काढायचे, राजकारण करायचं आणि त्याच मराठी कामगाराची फसवणूक करायची, त्याचे संप फोडायचे! मराठी-माणसांच्या हातात दगड द्यायचे, कामगारांना एकमेकांची डोकी फोडायला लावायची…आणि, तेच ‘दगड’ गोळा करत, त्या मराठी-नेत्यांनी आपले ‘गड’ बांधायचे… हा उफराटा उत्पात, महाराष्ट्राच्या कामगारविश्वात अजून कितीकाळ चालणार आहे? मराठी माणसांनो, म्हणजे अर्थातच मराठी-कामगारांनो, लक्षात घ्या की, “फेकला तर दगड, रचला तर गड” याच मराठी-मराठी करणाऱ्या नेत्यांनी, “कारखाना जगला तरच, कामगार जगेल’ अशी मालकवर्गाची ‘दलाली’ करणारी आणि आपल्याच श्रमिक मराठी-जमातीला मुळातूनच भेदरवून टाकणारी घोषणा दिली…कुठल्याही जातिवंत नेत्याने आपल्या समाजाला, विजिगिषू प्रेरणा व चेतना द्यायची असते; अकारण घाबरवून सोडायचं नसतं. या देशातला एक ‘बाबासाहेब’, शेकडो-हजारो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या पददलित ‘मृण्मय’ मनांना ‘चिन्मय’ करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो; तर, आमचे मराठी राजकारणी ‘दुकानदारसाहेब’, आपल्याचं जमातीचं खच्चीकरण करु पहातात? ‘भाषा आणि भाषण’ यावरील अंगभूत प्रभुत्वाचा गैरवापर करत, मराठी-कामगाराला ‘भांडवली-गुलामी’कडे कौशल्याने ढकलत नेणाऱ्या घृणास्पद राजकीय-डावपेचांना छेद देण्यासाठीच, “कामगार सन्मानाने जगला; तरच, कारखाना जगेल…अन्यथा नव्हे”, ही गेली चार दशकं आम्ही भीमगर्जना करत आलोत! ‘धर्मराज्य’सारखं ‘सहकार्य आणि संघर्ष’ इतर कोणी करु शकत नाही…तेव्हा, यातलं नेमकं काय निवडायचं; ते संबंधित व्यवस्थापनांनी व भांडवलदारांनी ठरवावं!” असं रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, रोह्यात केले.
धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांना नुकतीच ऐतिहासिक स्वरुपाची रु. १४ हजारांची ‘थेट’ (‘C.T.C.’सारखी तद्दन फसवी पगारवाढ नव्हे) पगारवाढ त्रैवार्षिक कराराद्वारे करण्यात आली, त्याप्रसंगी, झालेल्या विजयी-सभेत राजन राजे बोलत होते.
यावेळी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे खजिनदार अजित सावंत, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, श्रमिक संघाचे नेते शिशिर ढवळे, आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नाना अहिरे, कामगार प्रतिनिधी निरंजन म्हात्रे, दिलीप राणे, विनोद गायकवाड आदी मान्यवरांसह, ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आपल्या तासाभराच्या तडाखेबंद भाषणात कामगारांना संबोधित करताना राजन राजे यांनी सुरुवातीलाच, १४ हजारांची भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल उपस्थित कामगारांचे अभिनंदन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या प्रत्येक कामगाराचे आर्थिक-उन्नयन व्हावे; यासाठी, मी गेली चार दशकं ‘भांडवली-व्यवस्थे’शी संघर्ष करत आलोय. कामगारांनी ‘श्रीमंत’ जरुर व्हायला हवं; पण, त्याआधी ‘नितीमंत’ होणे गरजेचे आहे… “आधी नितीमंत, मगच श्रीमंत! ‘फोडा आणि झोडा’, या कपटी-दुष्ट भांडवली-नितीने, कृत्रिमरित्या निर्माण केलेले… ‘कंत्राटी / कायम / मुदतबंद कामगार’ वगैरे कामगारभेदांना ‘फाट्यावर मारुन’, प्रत्येक कामगाराच्या जगण्यात श्रीकृष्णाचं आनंदी ‘गोकुळ’ निर्माण व्हावं, ही माझी जीवन-प्रेरणा आहे… तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर बांधलेलं समाधानाचे-सुरक्षिततेचं ‘पैंजण’; हेच, माझ्या जगण्याचं ‘इंधन’ आहे…ते कुठलं वनस्पती तेल अथवा आखाती खनिज तेलस्वरुप इंधन नव्हे! संकटं सर्वांवर येतात, ती सज्जनांवर येतात; तशी दुर्जनांवरही येतात…पण, शंभर संकटं कोसळूनही सज्जन ठाम उभा राहू शकतो: पण, एखाद्या संकटानेही, आतून पोकळ डोलारा असलेला दुर्जन कोसळू शकतो, हे लक्षात ठेवा. ‘आळशी-उद्धट कामगार राष्ट्राला भार…नितीमान कामगार राष्ट्राला आधार’, ही आपली ‘धर्मराज्य-घोषणा’ कधिही विसरु नका; आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे कधी संकट ओढवून घेऊ नका…संकटं यायचीच असतील, तर त्यांना त्यांच्याच पावलांनी येऊ द्यात…तुमची पाऊले वा तुमच्या पादुका, त्यांना बहाल करु नका”, असा वडीलकीचा सल्लादेखील राजन राजे यांनी यावेळी कामगारांना दिला.
राजन राजे भाषणाचा ओघ पुढे न थांबता सुरुच होता….”डाॅ दत्ता सामंतांसारखे लढवय्ये कामगार-नेते आणि ‘FERA’सारखे कायदे होते; तोपर्यंतच, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून कामगारांना उत्तम वेतन-सुविधा मिळत होत्या; पण, आता बहुराष्ट्रीय कंपन्याच कामगारांचं शोषण करण्यात व काॅर्पोरेटीय क्षेत्रात ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate Terrorism) माजवण्यात आघाडीवर आहेत. निष्ठावंत कामगार हा, कामगार चळवळीच्या ‘पायाचा दगड’ असतो, दहीहंडीच्या सगळ्यात खालच्या थरासारखा संघटनेचा तो मजबूत आधार असतो; जोडीला शिस्त व एकजुटीचं कसोशीनं पालन करा. वाढीव पगाराचा पैसा अत्यंत खुबीने कुटुंबाच्या हितासाठीच वापरा, नवीन चकचकित चारचाकी गाडी घेतल्यादिवसापासूनच म्हातारी व्हायला सुरुवात होते; म्हणून त्यावर पैसे उडवण्यापेक्षा आपली ‘काळी आई’ असणाऱ्या जमिनीत पैसे गुंतवा, योग्य ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणूक करा…पुढील काळाचा भरवसा नाही; म्हणून भविष्यातील संकटे वा संघर्षासाठी पगारातले ठराविक पैसे राष्ट्रीयीकृत बँकेतील मुदतठेवीत राखून ठेवा, चंगळवादाच्या नादी लागू नका…येणाऱ्या कठीण काळाची पाऊले वेळीच ओळखा, यश मिळवणे सोपं असतं; पण, ते टिकवणे आणि वाढवणे कठीण असते. केवळ, तुमचंच नव्हे; तर, रोह्यातील प्रत्येक कामगाराचं चांगभलं व्हायलाच पाहिजे, या दिशेने प्रयत्नरत रहा…फक्त पगार/बोनस वाढीसाठी नव्हे; तर, कामगारांच्या सन्मानासाठी ‘राजन राजे’ हा ‘पंचाक्षरी-मंत्र’ आहे, हे विसरु नका!” अशा शब्दांत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.
…या आनंदोत्सवा समयी, ‘डीआरटी अँथिया’च्या कामगारांनी, संपूर्ण रोहा शहर आणि धाटाव एमआयडीसीतून बाईक रॅली काढत, राजन राजे यांचे अभूतपूर्व स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिट अध्यक्ष प्रमोद जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“धर्मराज्य पक्ष”प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा औद्योगिक चमत्कार : रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना १४ हजारांची थेट भरघोस पगारवाढ — राजन राजे यांचे नेतृत्व ठळक!
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिकक्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ (CTC वगळून) मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे. सोमवार, दि. २ फेब्रुवारी-२०२६ रोजी, ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख श्री. लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर श्री. आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष श्री. प्रदीप जंगम, उपाध्यक्ष श्री. निखिल वरणकर, सेक्रेटरी श्री. मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य श्री. विनोद मगर आणि श्री. रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, मा. राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना मा. राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगारच, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत दिले!वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली-अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली एमआयडीसी आणि अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त, डोंबिवली (पू.) येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे येथे, वाल्मेट युनियन युनिटच्या वतीने रविवार, दि. ६ ऑक्टोबर-२०२४ रोजी, एका स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेतील कामगारांनी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर, वर्षभरातच मा. राजन राजे यांच्या सक्षम व प्रखर नेतृत्त्वाखाली, पगारवाढीचा पहिलावहिला त्रैवार्षिक करार यशस्वीपणे संपन्न झाला होता. याच कराराच्या वर्षपूर्तीनिमित्त, या दिमाखदार स्नेहसंमेलनाचे आयोजित करण्यात आले

होते. यावेळी कामगार सदस्यांच्या वतीने मा. राजन राजे यांना शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देतानाच, शिवछत्रपती महाराजांचे स्मृतिचिन्ह प्रदान करुन, त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री. कमलेश कोल्हे, श्री. अविनाश बढे, श्री. लोटन येलवे, श्री. संदीप पवार, श्री. मिलिंद जोशी, श्री. निलेश जगताप, श्री. सुभाष देशमुख, श्री. लक्ष्मण शिंदे या युनिट कार्यकारिणी सभासदांसह, ‘वाल्मेट’च्या डोंबिवली आणि अंबरनाथ आस्थापनेतील कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
नवी मुंबईस्थित (Rabale TTC) ‘प्रोटेगो इंडिया’ या, जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत…’धर्मराज्य पक्ष’प्रणित “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा…अगदी टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांमध्ये सनसनाटी व थरार पैदा करणारा करार!

रबाळे एमआयडीसीतील ‘हिवा इंडिया’ कंपनीतील २४२ कामगारांना तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ…सलग ‘पाचवा त्रैवार्षिक-करार’!

‘हिवा इंडिया’ कंपनीत भव्यदिव्य त्रैवार्षिक करार !
करार, कामगार, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ, धर्मराज्य पक्ष, पगारवाढ
“ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात……”
राजन राजेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास रचला…!!!
एकीकडे नवी मुंबईतील दिघा येथील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना ऐन गणेशोत्सवात दीड ते दोन लाखांच्या दरम्यान बोनस देऊन त्यांची दिवाळी साजरी झालेली असतानाच, नुकत्याच साजऱ्या झालेल्या दिवाळसणाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून नवी मुंबईस्थित महापे येथील ‘हिवा इंडिया’ कंपनीतदेखील भव्यदिव्य असा, तब्बल १२ हजार १०० रुपये पगारवाढीचा त्रैवार्षिक करार ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होऊन पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात येऊन कंपनीतील एकूण ७२ कंत्राटी कामगार कायम झाले आहेत. या करारामुळे गेली अनेक वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या कामगारांना हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळून, त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना कमीतकमी ५० हजार, तर जास्तीतजास्त ६५ हजार इतकी दरमहा पगारवाढ झाली असून, बोनस म्हणून कमीतकमी ६० हजार, तर जास्तीतजास्त ८० हजार रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदानासहित कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे ‘हिवा इंडिया’ कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटी नोकरीच्या गुलामगिरीत खितपत पडलेले कामगार आज खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ झालेले असून, आम्हाला स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मा. श्री. राजन राजे साहेबांनाच जाते, अशा शब्दांत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, गेल्या ३६ वर्षांपासून कामगारक्षेत्रात कार्यरत असलेल्या राजन राजे यांनी, तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळात हजारो कामगारांना समृद्धीचा मार्ग दाखवलाय. कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी व्यवस्थापनाशी आणि भांडवलदारी व्यवस्थेशी त्यांनी प्राणपणाने संघर्ष केलाय. गुलामगिरीचे प्रतीक असलेली कंत्राटीपद्धती ही कामगारक्षेत्रातील नव-अस्पृश्यता असल्यामुळे राजे यांनी सुरुवातीपासूनच या प्रथेविरुद्ध लढा उभारला व तो यशस्वीही करून दाखवला. ‘हिवा इंडिया’ कंपनीचा भव्यदिव्य त्रैवार्षिक करार हा उल्लेखनीय असला, तरी या कंपनीतील ७२ कंत्राटी-कामगार गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाले, हेच माझ्या आतापर्यंतच्या संघर्षाचं फलित असल्याची प्रतिक्रिया राजन राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ऐन दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवार, दि. ५ नोव्हेंबर-२०१८ रोजी पार पडलेल्या या काराराप्रसंगी ‘हिवा इंडिया’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद गांगुली हेदेखील उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि खजिनदार अण्णा साळुंखे या पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक करारान्वये १२ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांचे वेतनमान उंचावले असून, याबाबत ‘हिवा इंडिया’च्या समस्त कामगारांनी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे जाहीर आभार व्यक्त करून एकच जल्लोष केला.