कॅटेगरी: सामाजिक

मराठीचं अस्तित्व, महाराष्ट्रधर्माचं रक्षण – हिंदीसक्तीविरोधात वैचारिक एल्गार!

राज्यशासनाच्या हिंदीसक्तीविरोधात, मराठी अभ्यास केंद्र यांच्या वतीने, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, माकपचे मा. अनिल नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मा. राजन राजे यांनी, आपल्या ओघवत्या शैलीत आपले विचार आक्रमकपणे उपस्थितांसमोर मांडले…
———————————-
मराठी ही जगातील एकमेव निसर्ग-पर्यावरणस्नेही भाषा!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे मातृभाषेप्रती गौरवोद्गार…
———————————-
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसह, ठाणे आणि नवी मुंबईसोबतच, महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांतील येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने, राज्यातील हिंदी-भाषिकांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु केले असून, परप्रांतीयांची एकगठ्ठा मतं भाजपाच्या पारड्यात पाडून, मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा मनसुबा आता लपून राहिलेला नाही. मराठी माणसाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्क डावलण्याचे कारस्थान, दिल्ली-दरबारी शिजल्यानंतर महाराष्ट्रद्रोही भाजपाने आता, त्यासाठी कंबर कसून, आपले मराठीद्वेष्टे राजकारण सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राज्यभरातील शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून, हिंदीसक्तीचा निर्णय राज्यशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. यामाध्यमातून मराठीची गळचेपी करुन, महाराष्ट्राच्या अधिकृत राजभाषेला दुय्यम दर्जा देण्याचा कट आखला जात असतानाच, महाराष्ट्रातील समविचारी पक्ष आणि संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, या निर्णयाला कडाडून विरोध केला. ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे निमंत्रक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या पुढाकाराने, प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या, पर्यायाने हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठीप्रेमी नागरी समाज आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत अन्याय्य शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी आणि जाहीर सभेचे रविवार, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे अजित नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राजन राजे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’ची मराठीवादी भूमिका प्रकर्षाने मांडली. “संयुक्त महाराष्ट्रानंतर… आता, ‘स्वायत्त महाराष्ट्र’ ….राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त महाराष्ट्र’…. ‘शिवछत्रपती-राष्ट्र’ !!!” हीच आमची महाराष्ट्र-धर्माची खरीखुरी व्याख्या असून, राजकीयदृष्ट्या आमची ताकद कमी असली तरी, मराठी भाषा आणि मराठी माणूस या दोन गोष्टींबाबत, आम्ही कमालीचे कडवट आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या वतीने आपण सगळ्या अत्यंत उचित मागण्या मांडलेल्या आहेत. त्याला आमचा पूर्वी पाठिंबा होता, आजही आहे आणि यापुढेही राहील. आपला महत्त्वाचा मुद्दा भाषा संवर्धनाचा होता. भाषा संवर्धनाचा का? मराठी भाषेचं संवर्धन करायचं आणि कसं करायचं असे दोन मुद्दे होते. मला इथे सांगायला अभिमान वाटतोय, मराठी भाषा ही, आजच्या जागतिक-तापमानवाढीच्या पर्यावरणीय महासंकटाच्या काळात, एकमेव अशी निसर्ग आणि पर्यावर-स्नेही अशी भाषा आहे. कारण, याच भाषेत आपण “वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे” असं म्हणतो. आपले सणदेखील प्राणी, वनस्पती यांच्याशीच निगडीत आहेत. मग ती नागपंचमी असेल, बैलपोळा असेल, तुळशी-विवाह असेल, वटपौर्णिमा असेल… मला नाही वाटत, असे नैसर्गिक संस्कार इतर कुठल्या संस्कृतीत असतील. त्यामुळे मराठी भाषेच्या सक्तीसोबतच, आता तिची पर्यावरणीय महासंकटांच्या पार्श्वभुमीवर ‘भक्ती’ होण्याची खरी गरज आहे. जगभरात तिची दखल घेतली गेली पाहिजे, असे गौरवोद्गार राजन राजे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले.
दरम्यान, आपल्या ओघवत्या शैलीत ‘धर्मराज्य पक्षा’ची भूमिका अधिक ठळकपणे विषद करताना, राजन राजे पुढे म्हणाले, मराठी भाषेवर वेगवेगळ्या भाषांचे आक्रमण होतंय, संक्रमण होतंय… ते, का आणि कशासाठी होतंय हे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. मुलांवरील अभ्यासाचं दडपण आपण कमी केलं पाहिजे, गणित आणि विज्ञान हे विषय अत्यंत गुंतागुंतीचे होत चाललेत. त्यातच रेशीम बागेतून आमचा इतिहासदेखील त्यात खोटेपणा घुसडवून गुंतागुंतीचा केला जातोय…खोटेपणा घुसवून इतिहास तर बदललाच; पण, आमचा भूगोलही बदलला…लडाखच्या गलवान खोऱ्यातला आमचा चार हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश, चीनला दान देऊन! त्यातच आणखी तिसऱ्या भाषेचं दडपण, आमच्या मुलांच्या बालमनावर बिलकुल येता कामा नये. हिंदीचं शिक्षण घ्यायचं असेल; तर, काळजी करायची गरज नाही, सक्ती तर अजिबात करायची नाही… कारण, त्याची काळजी ‘बॉलिवूड’ घेत आहे. मुलं आपसूकच हिंदी शिकतील ना, त्यासाठी शाळेतून सक्ती कशाला? शिवाय, महाराष्ट्रात घुसलेले करोडो उत्तर भारतीय आहेतच ती काळजी घ्यातला, अशा उपरोधिकपणे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… पण, आपल्याला ही बाजारपेठेतील किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं असून, त्यासाठी भांडवली व्यवस्थेला हादरे द्यावे लागतील. हा प्रश्न फक्त हिंदीभाषिक म्हणून उत्तर-भारतीयांपुरता मर्यादित नाहीये; तर, गुजराती आणि मारवाडी यांच्या भांडवली-व्यवस्थेला हादरा देण्याचा सुद्धा आहे आणि म्हणूनच, अनेक गोष्टींसोबत कंत्राटी-कामगारपद्धतीचं उच्चाटन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. देशासोबतच, प्रामुख्याने महाराष्ट्रासमोरील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या गुजराथी-भाषिकांच्या भांडवली व्यवस्थेला हादरे दिलेत, तरच तुमची मराठी भाषा आणि मराठी माणूस सुरक्षित राहील, नाहीतर त्याचं महाराष्ट्रातून उच्चाटन होईल. अनेक आंदोलनं करताना, पर्यावरणीय महासंकटाच्या संदर्भात आम्हाला सांगितलं जातं की, कोण कुठे जन्माला येतो हा अपघात असतो. कोण कोकणात जन्माला येतो तर, कोण आणखी कुठे जन्माला येतो; मग, आमच्या सगळ्यांचा महाराष्ट्रातला जन्मसुद्धा एकदाचा अपघात ठरवा आणि आम्हाला अरबी समुद्रात ढकला… नाहीतरी, आमच्या महापुरुषांचा पुतळा तुम्ही अरबी समुद्रात उभारत आहातच. मराठी तरुणतरुणींचे संसार आणि व्यवसाय फुलण्यासाठी (मुं.ठा.पु.रा.ना. म्हणजेच, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक अन् नागपूर) शहरं मोकळी करुन घ्यावी लागतील….आपल्याला पुढे भविष्यात दरडोई प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान-एक मकान” अशी कडक धोरणं राबवावी लागतील…तरच आणि तरच महाराष्ट्रात मराठी माणसाचा बोलबाला होईल, मराठी भाषेला पुन्हा एकदा कायमस्वरुपी महत्त्व प्राप्त होईल. गुजराथी माणसं हिंदी बोलतात, गुजराथी माणसं इंग्लिश बोलायला लागले तरी, गुजरातचे महत्त्व कमी होणार नाही… कारण, भारताची संपूर्ण अर्थव्यवस्थाच त्यांच्या ताब्यात आहे. आम्ही पाचवीपासून इंग्लिश शिकलो. पण, उत्तम इंग्लिश बोलू शकतो, भाषण करू शकतो, उत्तम लिखाण करू शकतो. थोडं इकडे तिकडे होईल, काही फरक पडत नाही. सध्याच्या AI गुगल-भाषांतराच्या तंत्रज्ञानाने इंग्रजीसह विविध भाषांमधील भाषांतरं सोपी झालेली आहेत…त्यामुळे, आपण जी सगळी धोरणं घेतलेली आहेत, ती अनुपम आहेत, योग्य आहेत आणि त्याला आमचा सदैव पाठिंबा राहील, हे या व्यासपीठावरून आम्ही जाहीर करतो, अशा शब्दांत राजन राजे यांनी, आपले मनोगत व्यक्त करुन, भविष्यातील मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले.

मुंब्रा रेल्वे अपघातातील बळींना ‘धर्मराज्य पक्षा’ची श्रद्धांजली

मुंब्रा येथे रेल्वे अपघातात बळी पडलेल्या, प्रवाशांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ११ जून-२०२५ रोजी, ठाणे रेल्वे स्थानकपरिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी फलकांच्या माध्यमातून, रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि उदासीन भूमिकेविरोधात, निषेधाच्या घोषणा व्यक्त करीत, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नेतृत्व, पक्षाचे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. महेशसिंग ठाकूर, श्री. सचिन शेट्टी, ‘धर्मराज्य रिक्षा संघटने’चे श्री. रमेश रेड्डी, श्री. सुशीलकुमार चंद्रा आदी पदाधिकाऱ्यांसह, श्री. संजय दळवी, श्री. सोपान चौधरी, श्री. अमित लिबे, श्री. निलेश सावंत, श्री. अनिल डांगळ, श्री. सुनील जाधव, श्री. संतोष मोरे, श्री. सुनील डांगळ इत्यादी कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

मा. खासदार व शिवसेना नेते राजनजी विचारे यांची कनिष्ठ कन्या धनश्री, हिच्या वाङनिश्चय (साखरपुडा) सभारंभप्रसंगी

मा. खासदार व शिवसेना नेते राजनजी विचारे यांची कनिष्ठ कन्या धनश्री, हिच्या ‘ताज द् ट्रीज बॅन्क्वेट’मधील दि. ९ मे रोजीच्या वाङनिश्चय (साखरपुडा) सभारंभप्रसंगी गप्पा-हास्यविनोदात रंगलेल्या राजकीय नेत्यांची क्षणचित्रे

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट

दि. १९ जानेवारी-२०२५ (रविवार) रोजी धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपले सुपूत्र ऋग्वेद राजे, ठाण्याचे माजी खासदार सर्वश्री राजनजी विचारे यांच्यासमवेत आपल्या सहकाऱ्यांसह (महेश ठाकूर, समीर चव्हाण, राजेश गडकर) शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रचलित ‘ईव्हीएम’वरील (EVM) अत्यंत संशयास्पद व शंकास्पद मतप्रक्रियेसंदर्भाने सखोल चर्चा झाली आणि ठाणे-जिल्हा प्रीपेड स्मार्ट मीटर (घरगुती इलेक्ट्रिक मीटर) विरोधी समितीला लवकरच भेटीसाठी बोलावण्याचं आश्वासन दिलं.
बैठकीत मा. उद्धवजींनी EVM मुद्द्यापलिकडे जाऊन मतदानासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला व उपस्थित सर्वांना एकूणच मतप्रक्रियेबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. राजन राजे यांनी सत्ताधारी भाजप-NDA आघाडी, ‘प्रजासत्ताका’चा अमृतमहोत्सव (वर्ष १९५० ते वर्ष-२०२५) साजरा करण्याबाबत पूर्णतया उदासीन असण्यामागे, त्यांचा ‘प्रजासत्ताक-संकल्पने’लाच (प्रजा म्हणजेच जनता, देशाची मालक असण्याच्या लोकशाही-तत्त्वाला) मुळातून विरोध असल्याचा मुद्दा ठासून मांडला…मुठभरांच्या हातात सत्ता केंद्रित करण्याची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता असणाऱ्यांचा भाजप हा पक्ष असल्यानेच, ते घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, EVM हॅक अथवा मॅनेज (प्रोग्रॅम्ड) होवोत वा न होवोत…आता, जनतेला पूर्वीचीच कागदी-मतपत्रिकेवरील पारदर्शक-मतदानप्रक्रिया हवी असल्याचं, राजन राजे यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं व त्यासंदर्भात ‘धर्मराज्य पक्ष’ मोहिम राबवत असल्याचं व प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवदिनी म्हणजेच, २६ जानेवारी-२०२५ रोजी रात्रौ ठीक ९.०० वा. फक्त ५ मिनिटे ‘ईव्हीएम’चा निषेध म्हणून सर्व घरातील लाईट्स बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात असल्याचंही…मा. उद्धवजींच्या कानावर घातलं.
याचसंदर्भात, दि. २८ जानेवारी रोजी (मंगळवार) सायंकाळी ६.०० वा. ठाणे (प.), जांभळी नाका येथील ‘शिवाजी मैदाना’त राहुल चिमणभाई मेहता यांनी बनवलेल्या ईव्हीएम-मशीनद्वारे अमित उपाध्याय, मेघराज जोशी यांचा चमू (Team), ‘ईव्हीएम’ (EVM) कसं ‘मॅनेज’ केलं जाऊ शकतं (भले हॅक होऊ शकत नसलं तरी)…याचं प्रात्यक्षिक आयोजित केल्याची माहितीही शिवसेना पक्षप्रमुखांना दिली. त्यावर, मा. उद्धवजींनी त्यादिवशी मुंबईत असल्यास, सदर कार्यक्रमाला आवर्जून येण्याचं आश्वासन दिलं.

“ईव्हीएम हटाव… देश बचाव… बॅलेट-पेपर लाव” बैठकीत प्रमुख उपस्थिती…

भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, “ईव्हीएम हटाव… देश बचाव… बॅलेट-पेपर लाव” या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती मा. बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते मा. फिरोज मिठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. धनंजय शिंदे, मा. मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच मा. रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते. दरम्यान, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन मा. राजन राजे यांनी उपस्थित मान्यवरांना केले.

error: Content is protected !!