कॅटेगरी: आंदोलन

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाची उपस्थिती; राजन राजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले संविधान अभिवादन

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कोर्ट नाका, अशोक स्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यासह धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यानंतर भारतीय जनतेने स्वतःला अर्पण केलेले भारतीय संविधान हेच आपल्या लोकशाहीचे खरे अधिष्ठान आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये अबाधित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीशिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दिल्लीतील जंतर-मंतर जनआंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चा ठाम पाठिंबा!

आज धर्मराज्य पक्षासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तसेच विविध सामाजिक, कामगार, विद्यार्थी व राजकीय संघटनांच्या संयुक्त वतीने ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निर्माण झालेल्या संकटाबाबत, तसेच लेह-लडाखच्या पर्यावरण संरक्षणासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री. राजन राजे म्हणाले, “लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मार्ग दडपशाही नव्हे, तर संवाद आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न असो किंवा पर्यावरण संरक्षणाचा विषय असो, केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तात्काळ चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सरकारची संविधानिक जबाबदारी आहे.”
धर्मराज्य पक्षाचा स्पष्ट विश्वास आहे की, विद्यार्थ्यांना न्याय, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन ही कोणत्याही सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे. आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष न करता केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची ठाम भूमिका आहे.
या निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), धर्मराज्य पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शप), जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), भारत जोडो अभियान, श्रमिक जनता संघ, आयटक, बहुजन विकास संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कायद्याने वागा लोकचळवळ, अन्न अधिकार अभियान, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन, गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समिती तसेच अंगणवाडी व आशा वर्कर संघ यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘बेमुदत संपा’ला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे जाहीर पाठींबा

आजवर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील ‘NDA’ सरकारने, यापूर्वी किमान ७ वेळा झालेल्या राज्यस्तरीय आंदोलनांपश्चात, तात्पुरती खोटी आश्वासने देऊन…१७ लाख शासकीय-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याने; आज दि. २१ एप्रिल-२०२६ पासून सुरु झालेल्या, त्यांच्या न्याय्य ‘बेमुदत संपा’ला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे जाहीर पाठींबा दिला जातानाचे क्षणचित्र….

ठाणे, दि. १२ फेब्रुवारी २०२६ : चार काळ्या कामगार कायद्यांच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षचे जोरदार निदर्शने; अध्यक्ष राजन राजे यांचा मोदी-शहा सरकारवर घणाघात

चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचा मोदी-शहांवर जोरदार घणाघात…
“आयोध्येत राम मंदिर बांधणारे; पण, कामगार-चळवळीला स्मशानभूमी दाखवणारे मोदी-शहा सरकार हे, श्रमिकांच्या विरोधात असून, कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या रक्ताघामाच्या लुटीवर, मस्तवाल झालेल्या धनदांडग्या-भांडवलदारी मालकशाहीचे तारणहार असलेल्या भारतीय जनता पक्षाला रान मोकळं सोडू नका… यातून केंद्र सरकारचा, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला गेलाय!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी, ठाण्यात केला. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी-२०२६ रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजन राजे यांनी यावेळी केले. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. दरम्यान, आपल्या तडाखेबंद भाषणात राजे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, “उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू” अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ते समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

मराठी शाळांच्या आंदोलनात, राजन राजे यांचे रोखठोक प्रतिपादन… भैय्ये आणि गुजराथी भांडवलदार यांच्यात, मराठी माणसाचं सॅन्डविच झालंय!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, मराठी शाळा बंद करण्याचा सपाटा महाराष्ट्र शासनाने सुरु केला असून, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत, मराठी शाळा बंद करुन, त्याठिकाणची जागा भांडवलदारांच्या घशात घालण्याचा मराठीद्रोही कट रचला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भ्रष्ट पालिका प्रशासन, भुमाफिया आणि कणाहीन राजकारणी यांच्या अभद्र युतीविरोधात, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली, मराठी शाळांसाठी दि. १८ डिसेंबर-२०२५ रोजी, हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कम्युनिष्ट नेते प्रकाश रेड्डी, डाव्या चळवळीतील विचारवंत अजित अभ्यंकर, पत्रकार युवराज मोहिते, पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रणाली राऊत, काँग्रेसच्या रोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय शिंदे, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे विवेक भुरके आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी मराठी शाळांसाठीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारुन दडपशाही सुरु केली. याचसंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे म्हणाले, “मराठी शाळांचे हे आंदोलन राजकीय नव्हे; तर, सामाजिक आहे. पोलिसांनी नियम व न्यायालयीन आदेश इतर राजकीय मंडळींनाही दाखवावेत, तेव्हा कुठे पोलिसांची दंडुकेशाही पेंड खायला जाते?” असा थेट प्रश्न उपस्थित करुन ते पुढे म्हणाले, “पोलीस-कर्मचारी जरी मराठी असले; तरी, बहुतांशी आयपीएस-आयएएस अधिकारी हे अमराठी असतात. त्यांच्याच आदेशावर खालचे लोक चालतात. पोलिसांच्या या फक्त काठ्याच नाहीत तर, भैय्यांच्या लाठ्या असून, खालच्या बाजूला परप्रांतीय भैय्ये आणि वरच्या बाजूला गुजराथी भांडवलदार यांच्यात मराठी माणसाचं सॅन्डविच झालेलं आहे… त्याच विरोधातला हा एल्गार आहे, तो रोखण्याचा प्रयत्न कशाला? काही हिंसक घडणार आहे का? असा सवाल विचारुन, रोखठोक प्रतिपादन केलं. दरम्यान, हुतात्मा स्मारक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंतच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, काहीवेळ कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ पोहोचल्यावर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत, आझाद मैदानात आणल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी सर्व वक्त्यांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी शेवटपर्यंत एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोर्चाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, सचिव नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, अविनाश सावंत, सचिन उगले आदी पदाधिकारी आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सदस्य उपस्थित होते.
          

संविधान दिनी कामगारविरोधी कायद्यांविरुद्ध देशव्यापी आंदोलन; ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’सह विविध संघटनांचे ठाण्यात राष्ट्रपतींना निवेदन

कामगारांच्या हिताचे कायदे रद्दबातल ठरवून, त्याठिकाणी कामगारविरोधी व मालकधार्जिणे चार काळे-कायदे लादून, देशभरातील श्रमिकांना गुलामगिरीत ढकलण्याचं महापातक, केंद्र सरकारकडून घडलेलं असून, त्याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी ‘संविधान दिना’चे औचित्य साधून, देशभरातील कामगार संघटनांनी, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, संपूर्ण भारतात निदर्शने/आंदोलने केली. त्याच पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समिती’च्या वतीने, भारताच्या राष्ट्रपतींना, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, निवेदन देण्यात आले. सदर निवेदन ठाण्याचे अपर-जिल्हाधिकारी श्री. हरिश्चंद्र पाटील यांनी स्विकारले. याप्रसंगी ‘सर्व श्रमिक संघा’चे अध्यक्ष रवी नायर, ‘टीयूसीआय’चे अध्यक्ष रवी जोशी, ‘भारतीय महिला फेडरेशन’च्या कार्याध्यक्षा निर्मला पवार, ‘आयटक’चे कार्याध्यक्ष उदय चौधरी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कार्यालय-प्रमुख संजय दळवी, ‘सीमेन्स वर्कर्स युनियन’चे अध्यक्ष मनोज बोडके, ‘श्रमिक जनता संघा’चे अध्यक्ष जगदीश खैरालिया, ‘ठाणे जिल्हा मध्यवर्ती शासकीय कर्मचारी महासंघा’च्या अध्यक्षा श्रीमती पुजारी, ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन’चे कार्याध्यक्ष राजेश सिंग आणि ‘राज्य सहकारी मध्यवर्ती संघटने’चे अध्यक्ष भास्कर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘लोकसत्ते’च्या प्रक्षोभक संपादकीयाविरोधात ठाण्यात ‘धर्मराज्य पक्षा’चा धगधगता निषेध

ज्वालामुखी धगधगतो आहे….
‘लोकसत्ते’चे बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी प्रतिकात्मकरित्या ठाण्यात गोखले रस्त्यावरील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…
कामगारविश्वावर ‘४ काळ्या कामगार-संहितां’चा बुलडोझर फिरवणाऱ्या भाजप-संघीय NDA सरकारचा आणि गिरीश कुबेरांसारख्या, प्रसारमाध्यमातील त्यांच्या मेंदूविक्या ‘बोलक्या बाहुल्यां’चा…’धर्मराज्य पक्षा’तर्फे व कामगारवर्गाकडून ठाण्यात तीव्र निषेध!
—————————-
सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५च्या लोकसत्ता-‘संपादकीय लेखाला जाणिवपूर्वक “तळपत्या तलवारीचे म्यान”, असं शीर्षक देत, पद्मश्री कामगार-कवी कै. नारायण सुर्वे यांचा, आपल्या बुद्धीकौशल्याने ‘अवमान’ करणाऱ्या आणि त्या लेखातून “कामगार नेते, हे नेते कमी आणि खंडणीखोर अधिक असेच आहेत”, असं समस्त ‘कामगार-चळवळी’बाबत अपप्रचार करणारं, अत्यंत बेजबाबदार व संतापजनक वक्तव्य करणाऱ्या ‘भांडवली-दलाल’ गिरीश कुबेर यांचा कामगारांकडून लोकसत्तेचे अंक जाळून तीव्र निषेध करण्यात आला!
…तत्पूर्वी, लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ने, ‘अस्पृश्य’ मानलेले…धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्रभरातील संपूर्ण कामगारविश्वात ज्यांचं नाव दीर्घकाळ दुमदुमतंय, असे झुंजार कामगार नेते ‘राजन राजे’ यांनी, ‘लोकसत्ते’च्या हिणकस संपादकियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवणारा, एक खरमरीत लेख समाजमाध्यमातून प्रसारीत करत, पत्रकार-जगतातील या दलाली-ढोंगी प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला होता, ज्याला सगळ्या कामगार जगतातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला! त्यातच, कामगारविश्वातील संतप्त भावनेला सनदशीर मोकळी वाट करुन देणारा, लोकसत्ता-संपादकीय-दहनाचा जाहीर कार्यक्रम ठाण्यात काल, दि. २५ नोव्हेंबर-२०२५ रोजी सायंकाळी पार पडला.
राजन राजे यांच्या खांद्याला खांदा लावून सदर निषेधाच्या कार्यक्रमात…काँग्रेसच्या अर्थविभागाचे प्रमुख व नेते विश्वास उटगी, समतेच्या चळवळीतील एक अग्रणी ॲड. नाना अहिरे, आंबेडकरी चळवळीतील जाज्वल्य विचारवंत-कार्यकर्ते आनंदा ओव्हाळ व धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे सचिव समीर चव्हाण व पदाधिकारी सचिन शेट्टी; तसेच, विविध कंपन्यांतील कामगारांनी हिरिरीने सहभाग घेतला.
“तळागाळातील जनतेला कायम लुबाडणाऱ्या व श्रमिकांच्या रक्तघामाचं ‘वरकड-मूल्य’ ओरपणार्या भांडवलशाहीचे निर्लज्ज समर्थन करत भांडवलदारांच्या चरणांवर आपला मेंदू अर्पण करणाऱ्या व त्या व्यवस्थेचे मोठे ‘लाभार्थी’ असणाऱ्या गिरीश कुबेरांना…खुशाल, राष्ट्रीय संपत्तीच्या निर्मात्याची तळपती तलवार ‘म्यान’ होण्याची स्वप्न पडू द्यात; पण, टोकाच्या अन्याय-अत्याचार-शोषणाने कामगारविश्वातला ज्वालामुखी आतून धगधगतो आहे आणि तो कुठल्याही क्षणी प्रस्फुटीत होण्याचा देशाला मोठा धोका आहे”, असा इशारा देत…राजन राजे यांनी तासाभराच्या आपल्या तडफदार भाषणातून, गिरीश कुबेर बनावट अग्रलेख लिहिल्याबद्दल यांच्यावर अतिशय जळजळीत शब्दात टीका केली. शिवाय, भाषणातून आपल्या भांडवली-हितसंबंधांची जपणूक करणाऱ्या व ‘संपादकीय-हक्का’चा सर्रास गैरवापर करत जनतेची फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या ‘कुबेरी-प्रवृत्ती’चा मुखवटाही टराटरा फाडला.
ते पुढे म्हणाले की, “४ काळ्या कामगार-संहितांद्वारे कायम नोकऱ्या संपवण्यातून, कामगार-चळवळ साफ कमकुवत करण्यातून…सगळ्या कामगार-कर्मचारीवर्गावर ‘गुलामगिरी’ लादण्याच्या भाजप-संघीय सरकारी-धोरणाचं, ‘आता नव्या कायद्यांतून कामगारांचं चांगभलं होणार’, असं बनावट-विसंवादी ‘कुबेरी’ समर्थन म्हणजे, ‘दहशत-जबरदस्तीने बलात्काराला सामोरं जावं लागणाऱ्या स्त्री संदर्भात, बलात्कार ‘एन्जॉय’ करण्याची संधीच तिला उपलब्ध होतेय’, असं म्हणण्यासारखं, ते एक भयंकर गुन्हेगारी-प्रतिपादन आहे. गिरीश कुबेर, जर कामगार नेत्यांना खंडणीखोर’ म्हणत असतील; तर, त्यांना आव्हान आहे की, अशांना त्यांनी कायद्यासमोर आणून त्यांना कडक शासन करावच; त्यात एखादा जरी डाव्या चळवळीतला पुढारी आढळतो, का ते बघावंच!”
राजन राजे यांनी आपल्या शब्दांच्या अंगारातून लोकभावनेला प्रकट करताना ज्या लोकसत्तेतून नारायण सुर्वेंचा अवमान करण्यात आला, त्याच्या संपादक कुबेरांसह, अवघ्या भांडवल-व्यवस्थेला…पुन्हा एकवार नारायण सुर्वेंचा जाणिवपूर्वक ज्वलंत परिचय व जागर करुन देताना म्हटलं, “कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे २००४ साली नारायण सुर्वेंना ‘जनस्थान-पुरस्कार’ देताना त्यांच्या गौरवार्थ निवेदकाने जी प्रदीर्घ कविता म्हटली होती, त्यातील चार ओळी आठवतात…आणि, आठवतात ते नारायण सुर्वेंचे पाण्यात बुडून गेलेले डोळे!
‘आठवतं का रे तुला नारायणा, याच हमरस्त्यावर वाळत घातली होतीस तू स्वतःची आतडी कितीकदा…आणि, हिशोब केला होतास, एवढी आतडी पुरतील का, हे जग करकचून बांधायला आणि एकदा बांधल्यावर ते बदलायला’… असा हा, ‘Poet of the Proletariat’ कुठे आणि गिरीश कुबेर नावाचा भांडवली-व्यवस्थेच्या हातातला मिठू मिठू बोलणारा ‘पोपट’ कुठे? अनैतिकरित्या गलेलठ्ठ पगार घेत, भांडवली-व्यवस्थेचे लाभ ‘स्वांतसुखाय’ ओरपणारे, गिरीश कुबेर हे एक भांडवली-दलाल; तर, नारायण सुर्वे म्हणजे, कार्ल मार्क्सच्याच पावलावर पाऊल ठेऊन उन्हापावसात तडफडत, वणवण करत शोषितांचं जग बदलायला निघालेला अवलिया! कविवर्य नारायण सुर्वे यांचे महाराष्ट्राच्या कामगार-चळवळीवर थोर उपकार आहेत…आम्ही ४०-४५ वर्षांपूर्वी त्यांच्याच ‘भाकरीचा चंद्र’, ‘कामगार, एक तळपती तलवार’ वगैरे कविता, बॅनरवर छापून कामगार-चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती.”
भाषणाच्या ओघात राजन राजे पुढे गरजले, “आपला ‘EVM-जादुगरी’मधून निवडून आलेला पंतप्रधान, आईबापाशी असलेला आपला जैविक-संबंध नाकारतो आणि स्वतःला ‘नाॅन-बायाॅलाॅजिकल’ घोषित करतो; तर, तिथे मुंबईच्या गिरणगावात कुणी जैविक-आईबापच पोटच्या पोराला नाकारतात आणि एका गिरणीसमोरच्या कचराकुंडीत फेकून देतात… असं ते ‘अनाथ’ पोरं, गंगाराम व काशीबाई नावाचं सुर्वे-दांपत्य
‘सनाथ’ बनवून वाढवतात; पुढे हाच ‘नारायण’, कामगार म्हणून ‘आत्मभान’ जागृत झाल्यावर, एखादा मातीचा घडा फुटावा आणि आतला अंधार मोकळा व्हावा, ‘अवघा प्रकाशू व्हावा’… तसा त्या प्रकाशात भूतकाळाविषयी कुठलाही आकस न बाळगता, कुठलीही तक्रार न करता; आपला भवताल ‘लाल बावटे की जय’ म्हणत, चळवळ आणि साहित्याच्या माध्यमातून बदलायला बाहेर पडतो… जसं अमेरिकेतल्या नवनिर्वाचित डेमोक्रॅटिक-सोशॅलिस्ट महापौर जोहरान ममदानींसाठी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून युजिन डेब्ज आणि वर्ष-२०१५ पासून बर्नी सँडर्स, ‘डेमाॅक्रसी ॲट वर्क’चे रिचर्ड वोल्फ, अलेक्झांड्रा ओकॅसिओ काॅर्टेझ (AOC) आणि त्यांचा पुरोगामी विचारसरणीचा U.S. House of Representatives मधला सोशालिस्ट-डेमोक्रॅटिक विचारसरणीचा “The Squad” हा गट वगैरेंनी, पार्श्वभूमी तयार करुन ठेवली होती; तशीच, वामनराव दादा कर्डक, शाही अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्याकरवी नारायण सुर्वेंसाठी तयार करुन ठेवली होती; असं म्हटलं तर वावगं ठरु नये…पण, सुर्व्यांचा नारायण, त्यापलिकडे निघून गेला… त्यांच्या काव्यलेखन-शैलीची तुलना जगविख्यात आंग्ल कवी ‘राॅबर्ट फ्राॅस्ट’शी केली जाते. तशीचं संभाषणात्मक, अगदी बोलीभाषेसारखी शैली; पण, थेट भस्सकन आत जाऊन हृदयाचा ठाव घेणारी, कुणाच्या कुठल्या पूर्वपरवानगीविनाच अंतःकरणाला सरळ भिडणारी…म्हणून, मला वाटतं, तेव्हा जर आजच्या सारखं एकनाथ शिंदे, अजित पवार मिळून ‘फडणविशी ट्रिपल-इंजिन’ सरकार महाराष्ट्रात आणि मोदी-शाहांचं रासवट सरकार दिल्लीत असतं; तर, ते ‘पद्मश्री’ वगैरे नागरी-सन्मान मिळणं सोडाच; उलट सरकार-दप्तरी नारायण सुर्वेंचं नाव, ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘अर्बन नक्सलाईट’ म्हणून समाविष्ट झालं असतं. तुकारामांच्या गाथेसारखी ग्रामीण रांगडी काव्यभाषा…तळागाळातील जगण्यातल्या व्यथा-वेदनांचा वेध घेणारी; म्हणून, त्यांचं काव्य तुकारामांच्या गाथेसारखंच अक्षय/अक्षर काव्य ठरलं… म्हणूनच असेल कदाचित, एके प्रसंगी बोलताना, लक्ष लक्ष मराठमोळ्या मनांमध्ये ‘सांस्कृतिक-पूल’ बांधणारे, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणाले होते, ‘अरे, केशवसुत कशाला इकडेतिकडे शोधताय? तुमचा केशवसुत, तिकडे परळमध्ये राहतोय!’
इस्लामिक काळात वर्णव्यवस्थेला छेद देऊन कबीर, सेना न्हावी, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी आणि तुकाराम वाणी यासारखे बहुजनसमाजातले संत कवी जोरकसपणे पुढे आले खरे… पण, जसं अमेरिकेतही जागतिक-महामंदीच्या पार्श्वभुमीवर आर्थिक-विषमता, बेरोजगारी दूर करणारं व कल्याणकारी-राज्य अथवा welfare state संकल्पना राबवणारं फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं ‘न्यू-डील’ आलं…मात्र, पुढील काही दशकातच ‘भांडवली-व्यवस्थे’नं पुन्हा उचल खात ‘न्यू डील’ मोडून काढलं. आणि, त्यानंतर, आजतागायत Neoliberalism किंवा नवउदारमतवाद नावाच्या नववसाहतवादाच्या नावाखाली खाजगीकरण, आपल्याकडच्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’सारखे ‘कामगारविरोधी कायदे’ करुन कामगारवर्गाचं खच्चीकरण व आर्थिक-विषमते’चा नंगानाच, अमेरिका-भारतासह जगभर चालूच ठेवलाय…तशीच, मुस्लिम-राजवटीतील बहुजन-साहित्याच्या सुवर्ण-काळानंतर आपल्याकडच्या वर्चस्ववादी वर्णव्यवस्थेनं पुन्हा उचल खाल्ली आणि ती सगळी साहित्यिक काव्य-व्यवस्था सवर्णांच्या बेड्यात अडकून पडली; ती थेट नारायण सुर्वे यांनी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोकळी करेपर्यंत. त्यांनी फक्त, कृत्रिम रंगांसोबत गिरणीतल्या वस्त्राला आपल्या घामाचाही रंग देणार्या गिरणी-कामगारांचीच व्यथा मांडली नाही; तर, पोटाची खळगी भरण्यासाठी वस्त्रहीन अवस्थेत गिऱ्हाईकाच्या घामाचा रंग आणि गंध, आपल्या देहावर चढवणार्या वेश्यांचाही ‘श्रमिक’ म्हणून वेगळा विचार केला… ‘कामगार’ या नात्याने, वेश्यांचेही प्रश्न सोडवण्याचा व त्यांचा यातनामय प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न केला होता… कुबेरांच्या गिरीशासारखे सांपत्तिक ‘कुबेरी’ व पत्रकारितेतली ‘सुभेदारी’ उभारण्याच्या स्वार्थकार्यात ते मग्न नव्हते!”
राजन राजेंच्या या घणाघाती भाषणानंतर, लोकसत्ते’चं दि. २४ नोव्हेंबरचं बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी मिळून ठाण्यातील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…विशेष म्हणजे, या ‘लोकसत्ते’च्या प्रतिकात्मक दहनानंतर गोखले रस्त्यावर पडलेली राख, सुसंस्कृत-नागरिक, या नात्याने सगळ्या कामगारांनी गोळा करुन रस्ता पूर्वीसारखाच स्वच्छ करुन ठेवला!

१० नोव्हेंबर २०२५ : असीम सरोदे यांच्या सनद रद्दीकरणाच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे ठाण्यात मूक-निदर्शने

महाराष्ट्राच्या सार्वजनिक हिताच्या खटल्यांचे कामकाज पाहणारे व पीडितांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे निर्भीड वकील असीम सरोदे यांची सनद, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल यांनी, राजकीय दबावापोटी सुडबुद्धीने आणि आकस बाळगून, तीन महिन्यांसाठी रद्द केल्याच्या निषेधार्थ, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सोमवार, दि. १० नोव्हेंबर-२०२५ रोजी, सायंकाळी ५ वा. पासून ते ७ वा. पर्यंत, ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १च्या बाहेर, सॅटीस पुलाखाली मूक-निदर्शने आयोजित करण्यात आली होती. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मूक-निदर्शनाच्या या कार्यक्रमासाठी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते समीर चव्हाण, पक्षाचे खजिनदार अजित सावंत, ठाणे लोकसभा महिला समन्वयक पौर्णिमा सातपुते, नवी मुंबई सचिव नरेंद्र शिंदे, ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाठारे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह, संजय दळवी, सोपान चौधरी, संजय उघडे, दादा मोरे, रामचंद्र गावडे, विकास पाटील इत्यादी कार्यकर्ते आणि कामगार सभासद उपस्थित होते.

१२ ऑक्टोबर-२०२५ : ‘घर हक्क परिषदे’त राजन राजे यांची ज्वलंत भूमिका — “कुणी घर देता का घर?

मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त, मुंबई आणि उपनगरांपुरता नाहीये; तर, मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, नागपूर या सगळ्या शहरांमधून तुम्ही-आम्ही सगळेजण विस्थापित झालेलो आहोत किंवा हळूहळू होत आहोत. करोना-काळात वन्यप्राण्यांनी जशा आपापल्या जागा माणसांकडून पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या; तशा, आता महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी-माणसांच्या ताब्यात देण्यासाठी, धनदांडग्यांकडून ‘जागा रिकाम्या’ करुन घ्याव्या लागतील!
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील, गणपतराव बेलवलकरांचं, “कुणी घर देता का घर”, हे जे स्वगत आहे, अगदी तशीच अवस्था मराठी माणसाची झालेली आहे. अशी ‘घरघर’ लागूच कशी शकते, मराठी माणसाला आपल्याच हक्काच्या महाराष्ट्रात? “माणसांना घरं नाहीत आणि घरांना माणसं नाहीत”, असा विलक्षण विपरीत काळ “घराच्या-दुकानांच्या साठेबाजीतून सध्या मराठी-माणसांवर येऊन ठेपलाय”, अशा रोखठोक शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले…ते दादर येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या, टिळक भवन येथील सभागृहात बोलत होते.
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या परवडणाऱ्या घरांसंदर्भात, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आयोजित केलेल्या ‘घर हक्क परिषदे’च्या मेळाव्यात राजन राजे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, “बारा तासांसाठी बारा हजार रुपये” अशी महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती आहे. मुंबई सोडाच, ठाण्यासारख्या शहरात पाचशे-साडेपाचशे चौरसफुटांचा वन बीएचके फ्लॅट, ५० लाखांत येतो. नोकरी साधारण पस्तीस वर्षांची धरली तरी, कामगाराचा सगळा पगार दरमहा हप्ते फेडण्यात गेल्यावरच, त्याची नोकरी संपताना तो फ्लॅट खऱ्याअर्थाने त्याच्या मालकीचा होणार… या काळात तुम्ही भोजन-खानपान, कपडालत्ता, मुलाचं शिक्षण-आरोग्य कशाकशावर म्हणून खर्च करायचा नाही, हौसमौज तर विसरुनच जा…फक्त, एका हाताने पगार घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तो बँकेत भरायचा आणि शहरातल्या प्रदूषित हवेवर घरात कोंडून जगायचं… आहे शक्य कोटीतलं हे भयंकर आक्रित? एवढी केविलवाणी परिस्थिती मराठी सामान्य जनांची आपल्याच महाराष्ट्रात झालीच कशी??
…जर, अजूनही तुम्ही या जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारांना आणि त्यांना साथ देणाऱ्या मराठी राजकारणी-दलालांना आवरलं नाहीत…वेळीच जागे झाला नाहीत; तर, लक्षात ठेवा, एकदिवस वेळ अशी येईल की, जसा तुम्ही जमिनीवर-पाण्यावर कर भरता; तसाच, तो उद्या सूर्य-किरणांवर ते कर भरायला लावतील…सूर्यकिरणांचा ‘सातबारा’च त्यांच्या नावावर करुन घेतील, इतकी गंभीर परिस्थिती आहे.
वर्ष १९७०पर्यंत प्रत्येक प्रौढ व्यक्तिला जास्तीतजास्त एकच फ्लॅट खरेदी करता येत होता; पण, बिल्डर राजकारण्यांनी आणि राजकारणातून बिल्डर बनलेल्यांनी घरांचं बांधकाम, हा ‘उद्योग’ बनवला व आपल्या नफेखोरीतल्या सगळ्या अडचणी, अटीशर्ती काढून टाकल्या; त्यामुळे फ्लॅट व दुकाने खरेदी, हा बक्कळ परतावा देणारा गुंतवणुकीचा मार्ग व त्यातूनच, काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत बनला!
“अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे घर”, हा माणसाचा नैसर्गिक व मूलभूत अधिकार असताना…१९७०नंतर घरांची प्रचंड साठेबाजी व काळाबाजार सुरु होऊन भाव गगनाला भिडायला लागले व त्यातच मराठी कामगार-कर्मचारीवर्ग कायमच पिचला जायला लागला!
…तेव्हा, लक्षात ठेवा, सुदैवाने वर्ष १९७७-७८च्या राज्यघटनेतील ४४व्या घटनादुरुस्तीमुळे सुदैवाने ‘संपत्तीचा-अधिकार’, हा आता ‘मूलभूत-अधिकार’ राहिलेला नाही. तो आता फक्त, कायदेशीर-अधिकार आहे; म्हणूनच कायदा करुनच ‘संपत्तीचं फेरवाटप’ व्हायला हवं! त्याकामी, शहरं-उपनगरांमधून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक मकान, एक दुकान”असा कायदा व्हायला हवा…तो झाल्याशिवाय, गगनाला भिडलेले फ्लॅटस् आणि दुकानांचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार नाहीत!
…जसं भूदान-चळवळीतून विनोबा भावेंनी “सब भूमी गोपाल की” गर्जना करत, लाखो हेक्टर जमीन फेरवाटपासाठी मिळवली; तसेच, हे अतिरिक्त लाखो फ्लॅट्स व दुकाने…सिंगापूरच्या धर्तीवर, महाराष्ट्र-सरकारने ताब्यात घेऊन सुशिक्षित मराठी-तरुणाईला, वाजवी भाड्याने उपलब्ध करुन द्यायला हवीत…तरच, मराठी माणूस मुंबई-महाराष्ट्रात सन्मानाने व सुखासमाधानाने अस्तित्वात राहील…अन्यथा मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर (मुंठापुराना) शहरांतून त्यांचं साफ उच्चाटन होईल व वाघांसाठी जशी चंद्रपुरच्या ताडोबासारखी अभयारण्ये राखावी लागलीयत; तशी सामान्य मराठी-माणसांसाठी ‘अभयारण्ये’ निर्माण करावी लागतील!
…या परिषदेच्या निमित्ताने विविध २७ पक्ष-संघटना एकत्र आलेत, ही फार चांगली गोष्ट आहे. पण, एवढ्यावर थांबून चालणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत, जे खरंतर चळवळीतून आलेले आहेत. *ते कुठल्या बड्या श्रीमंत घराण्यातून आलेले नाहीत की, एखाद्या बड्या राजकारण्याच्या घरात पाळणा हलला, म्हणून ते नेते झालेले नाहीत, म्हणूनच त्यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा असल्याच्या भावनादेखील राजन राजे यांनी बोलून दाखवल्या. यावेळी राहुल गांधी यांचं कौतुक करताना, ते पुढे म्हणाले, मला महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल, या दोन्ही व्यक्तित्वांचा ‘संगम’ राहुल गांधीमध्ये दिसतो… आज ही माणसं काँग्रेसमध्ये आहेत, म्हणून आशा करायला काही जागा आहे… राष्ट्रीयस्तरावर राहुल गांधी तर, राज्यस्तरावर हर्षवर्धन सपकाळांसारखी नेतेमंडळी आहेत, म्हणून आम्ही कॉंग्रेससोबत आहोत. राहुल गांधींसोबत महाराष्ट्राचे ‘भीष्माचार्य’ कुमार केतकर आहेत आणि हर्षवर्धन सपकाळांसोबत महाराष्ट्राचे ‘द्रोणाचार्य’ विश्वास उटगी आहेत, अशा ओघवत्या शैलीत राजन राजे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
…याप्रसंगी, व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष शिशिर ढवळे, आयटकचे सुकुमार दामले, कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, गिरणी कामगारांच्या वकील गायत्री सिंग यांच्यासह, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार-सभासद तसेच, कामगारक्षेत्रातील व डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होती.

मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ठाण्यात निषेध : ‘धर्मराज्य पक्ष’ाचा सहभाग

भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात, मनुवादी विचारसरणीच्या वकिलाकडून झालेल्या बूटफेकीच्या भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ, ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ, ‘संविधानप्रिय समता-मूलक समाज’ आणि आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांकडून गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आंदोलन पुकारण्यात आले होते. या निषेध आंदोलनात ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित, पक्षाचे प्रवक्ते तथा ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनुवादी मानसिकता तसेच, जातीयवादी कृत्ये करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, प्रस्थापित ब्राह्मणी व राजकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करण्यात आला. “भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांसारख्या जात्यंध आणि धर्मांध शक्तींविरोधात, देशातील बहुजन समाजाने एकत्र येऊन प्राणपणाने लढा दिल्याशिवाय, अशा प्रवृत्ती नष्ट होणार नाहीत. त्यासाठी, सामाजिक-राजकीय-जातीय मतभेद विस

रुन, लोकशाही व सनदशीरमार्गानेच संविधानाचे रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे!” असे विधान ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी, प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब इंदिसे, श्री. जितेंद्रकुमार इंदिसे, श्री. भैय्यासाहेब इंदिसे, श्री. संदीप खांबे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. संजय मं.गो., श्री. पंढरीनाथ गायकवाड, श्री. भास्कर वाघमारे, श्री. प्रमोद इंगळे, श्री. संजय भालेराव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

error: Content is protected !!