टॅग: कामगार

आंदोलनांची पुण्याई संपल्यामुळेच, भांडवलदारी व्यवस्था फोफावली! – राजन राजे

, , , , ,

‘‘या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्‍या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे… ‘कंत्राटी-कामगार पद्धत’, ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी ‘नागरी आण्विक दायित्व कायदा-123’ (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले; पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या…पण, आमच्या हाती ‘राजकीय ताकद’ नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल…इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही’’, अशा घणाघाती शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी, सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, ‘‘ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात… आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी ‘रक्तपिपासू शोषक-व्यवस्था’ म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय… ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?’’ असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *’’ज्याला आम्ही ‘कल्याणकारी राज्य’ म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य’ संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, खरं म्हणजे ‘अदानी-अंबानीकरणा’च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही… ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !’’* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील यांनी केले. यावेळी किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे, सचिव कॉ. रमेश जाधव, कार्याध्यक्ष कॉ. विलास शेलार, कॉ. भास्कर पाटील, कॉ. जयराम चंदे, कॉ. प्रकाश काठोळे, भिवंडी तालुका अध्यक्ष कॉ. बाळाराम भोईर, शहापूर तालुका अध्यक्ष भगवान दळवी, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. नारायण पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष कॉ. आदम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘हिवा इंडिया’ कंपनीत भव्यदिव्य त्रैवार्षिक करार !

, , , ,

“ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात……”
राजन राजेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास रचला…!!!

एकीकडे नवी मुंबईतील दिघा येथील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना ऐन गणेशोत्सवात दीड ते दोन लाखांच्या दरम्यान बोनस देऊन त्यांची दिवाळी साजरी झालेली असतानाच, नुकत्याच साजऱ्या झालेल्या दिवाळसणाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून नवी मुंबईस्थित महापे येथील ‘हिवा इंडिया’ कंपनीतदेखील भव्यदिव्य असा, तब्बल १२ हजार १०० रुपये पगारवाढीचा त्रैवार्षिक करार ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होऊन पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात येऊन कंपनीतील एकूण ७२ कंत्राटी कामगार कायम झाले आहेत. या करारामुळे गेली अनेक वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या कामगारांना हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळून, त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना कमीतकमी ५० हजार, तर जास्तीतजास्त ६५ हजार इतकी दरमहा पगारवाढ झाली असून, बोनस म्हणून कमीतकमी ६० हजार, तर जास्तीतजास्त ८० हजार रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदानासहित कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे ‘हिवा इंडिया’ कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटी नोकरीच्या गुलामगिरीत खितपत पडलेले कामगार आज खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ झालेले असून, आम्हाला स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मा. श्री. राजन राजे साहेबांनाच जाते, अशा शब्दांत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, गेल्या ३६ वर्षांपासून कामगारक्षेत्रात कार्यरत असलेल्या राजन राजे यांनी, तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळात हजारो कामगारांना समृद्धीचा मार्ग दाखवलाय. कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी व्यवस्थापनाशी आणि भांडवलदारी व्यवस्थेशी त्यांनी प्राणपणाने संघर्ष केलाय. गुलामगिरीचे प्रतीक असलेली कंत्राटीपद्धती ही कामगारक्षेत्रातील नव-अस्पृश्यता असल्यामुळे राजे यांनी सुरुवातीपासूनच या प्रथेविरुद्ध लढा उभारला व तो यशस्वीही करून दाखवला. ‘हिवा इंडिया’ कंपनीचा भव्यदिव्य त्रैवार्षिक करार हा उल्लेखनीय असला, तरी या कंपनीतील ७२ कंत्राटी-कामगार गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाले, हेच माझ्या आतापर्यंतच्या संघर्षाचं फलित असल्याची प्रतिक्रिया राजन राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ऐन दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवार, दि. ५ नोव्हेंबर-२०१८ रोजी पार पडलेल्या या काराराप्रसंगी ‘हिवा इंडिया’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद गांगुली हेदेखील उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि खजिनदार अण्णा साळुंखे या पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक करारान्वये १२ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांचे वेतनमान उंचावले असून, याबाबत ‘हिवा इंडिया’च्या समस्त कामगारांनी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे जाहीर आभार व्यक्त करून एकच जल्लोष केला.

इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ.

, , , , ,

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात, त्रैवार्षिक पगारवाढीचा विक्रमी करार संपन्न झाला. या करारामुळे, ‘‘इडिकॉन’’ कामगारांना रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ मिळणार आहे.

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात १ जानेवारी-२०१४ ते ३१ डिसेंबर-२०१६ या त्रैवार्षिक पगार वाढीचा करार संपन्न झाला. यानुसार किमान रूपये 10,000/- तर, कमाल वाढ रू. 4,440/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सदर पगारवाढीपैकी 70 टक्के रक्कम बेसिक व उर्वरीत 30 टक्के रक्कम इतर भत्यात समाविष्ट करण्यात खास कामगार हिताचा फॉर्म्युला अमलांत आलेला असून पूर्ण वाढीव रक्कम ही 50:25:25 या पध्दतीने तीन वर्षात देण्यात येईल. या करारानुसार 5 ते 10 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 15 दिवसाची ग्रॅच्युईटी, तर 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 20 दिवसाची ग्रच्युईटी, तसेच 15 ते 20 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 25 दिवासांची ग्रच्युईटी देण्यात आली, हे या कराराचे खास वैशिष्ट्या आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षावरून 60 वर्ष अशी 2 वर्षांने वाढविण्यात आली आहे. तसेच 22 कंत्राटी कामगारांपैकी 9 कामगारांना परमनंट केले असून उर्वरीत 14 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन, त्या कामगारांना सेवाकाळाप्रमाणे 20 लाख 50 हजार रूपयांची भरपाई देण्यात आली.

इडिकॉन कंपनीच्या वतीने करार करतांना, कंपनीचे मालक श्री. ऑब्री, व्यवस्थापक श्री. पद्माकर आठवले, श्री. मेलवीन फर्नांडीस हजर होते, तर ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने अध्यक्ष राजन राजे, महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव रूपेश पवार, खजिनदार अण्णा साळुंखे इत्यादी पदाधिकारी तसेच, कंपनी युनिटचे कमिटी सदस्य उपस्थित होते.

कराराप्रसंगी बोलतांना, महासंघाचे अध्यक्ष राजन राजे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलमुळे, प्रती महिना रूपये 5,000/- ते 6,000/- चे वेतन देऊन, कामगारांची लुट करून, कंत्राटदारी-मजूरीसारख्या गुलामगिरीला व नव-अस्पृश्यतेला कामगारांना तोंड द्यावे लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांमध्ये, राजकीय जागृतीचे भान, या करारामुळे येईल आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मुळावर आलेले चित्र बदलेल आणि या करारामुळे नवीन गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत घातकी असलेल्या, खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) या आर्थिक सुधारणांच्या तडाख्याने चैतन्यहीन झालेल्या कामगार चळवळीत केशव सुतांच्या तुतारीप्रमाणे ‘‘प्राण फुंकणारा’’ असा हा ‘इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि.’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’मधील क्रांतीकारी-करार असल्याचे कामगार क्षेत्रांत बोलले जात आहे. या करारानंतर, इडिकॉन, मुंबई येथील कंपनीतील कामगारांनी एकमेकांना मिठाई भरवून भरघोस पगारवाढीची दिवाळी साजरी केली.

error: Content is protected !!