टॅग: महाराष्ट्र

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निषेध आंदोलन

, , ,

बदलापूर येथील ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेतील दोन चिमुरड्या बालिकांवर, शाळेचा सफाई कर्मचाऱ्याने नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, बदलापूर शहरात मोठा जनक्षोभ उसळला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आल्यावर, या संपूर्ण घटनाक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करुन, गुन्हेगारांना पाठीशी घातले गेले असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होत असल्याने, दोषींवर ताबडतोब कठोर-कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार दि. २२ ऑगस्ट-२०२४ रोजी, पक्षाध्यक्ष मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, सायंकाळी ४:०० वा.पासून ते सायंकाळी ५:०० वा.पर्यंत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय विश्रागृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन !

, , , ,

मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन ! ● सेंद्रिय शेती, निसर्गरक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत केले मार्गदर्शन.
वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रदेशी साजरा करण्यात येतो. याच अभिमानास्पद दिवसाचे औचित्य साधून ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या साखरे-साजगाव येथील त्यांच्या शेतघराच्या प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीसाठी आलेल्या शेकडो शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वनभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील शिक्षकवृंददेखील उपस्थित होता. विद्यार्थीवर्गाला शालेय जीवनापासूनच निसर्गरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे महत्व कळावे, यासाठीच या वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. राजन राजे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःहून शेतघर परिसरातील विविध झाडे, वनस्पतींची माहिती दिली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी, याबरोबरच ऊस, द्राक्ष, फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यात आली.
दरम्यान, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सहल फक्त मनोरंजनात्मकच नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाची कवाडे उघडणारी ठरली. यानिमित्ताने शेती कशी करावी? सेंद्रिय शेती म्हणजे काय? निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाचे संवर्धन म्हणजे नक्की काय, त्याचे मानवी जीवनातील नेमके महत्व किती? याची सखोल माहिती मा. श्री. राजन राजे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख असणारा ‘धर्मराज्य पक्ष’ फक्त निवडणुकांचेच राजकारण करीत नसून, तर तो सातत्याने पर्यावरणच्या माध्यमातून ‘निसर्गकारण’ करीत असतो, हेच मराठी राजभाषा दिनाच्या माध्यमातून व शालेय सहलीच्या निमित्ताने अधोरेखित झाले. वनभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर मा. श्री. राजन राजे यांनी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या गुळाची प्रत्येकी १ किलोची ढेप भेट म्हणून दिली. यावेळी विद्यार्थीवर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा टवटवीतपणा स्पष्टपणे दिसत होता. “शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली ही सहल खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. जी गोष्ट आम्ही शाळेत पुस्तकीरुपात शिकवतो, तीच आमच्या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्षात शिकायला मिळाली.” अशा भावना व्यक्त करून शिक्षकवृंदाने मा. श्री. राजन राजे यांचे आभार मानले. याप्रसंगी राजे यांच्या सुकन्या ऋचा राजे आवर्जूनउपस्थित होत्या. त्याचबरोबर तुकाराम हलपतराव, धनाजी हलपतराव, विश्वनाथ मोरे आदी मंडळी उपस्थित होती.

ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस महिला विशेष लोकल सुरू करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची स्वाक्षरी मोहीम

, , , ,

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत जात असून, त्यात महिला नोकरदार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या उपनगरीय लोकल गाड्यांमधले महिलांसाठी राखीव असलेले डबे अपुरे असून, त्यांची संख्या आणखी दोन डब्यांनी वाढवावी तसेच कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकातून ‘ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस’ अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेस सुरु करावी या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य महिला संघटना’ आणि ‘धर्मराज्य प्रवासी संघटना’ यांच्यामार्फत २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. याला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात महिलांच्या अपघातांची संख्या वाढली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांच्या डब्यांची संख्या जैसे थे अशी आहे मात्र, महिला नोकरदारवर्गाची संख्या प्रचंड वाढलेली आहे. याचा संपूर्ण ताण हा महिलांना प्रवास करताना सोसावा लागत आहे. शिक्षणात आणि नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरी, उपनगरीय रेल्वे लोकलच्या माध्यमातून सातत्याने घडत असलेल्या अपघातांपासून महिलांना संरक्षण कधी मिळणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक आणि मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.

दि. २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी प्रवाशांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून, उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांची संख्या वाढवावी तसेच ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेत सुरु करावी, अशी मागणी या स्वाक्षरी मोहीमेच्यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, सहसचिव दर्शना पाटील ठाणे लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, धर्मराज्य शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, सचिव भरत जाधव, नवी मुंबई शहर महिला अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, पोर्णिमा सातपुते, उज्ज्वला जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

, , , , ,

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डाॅ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे (टेक्निशिएन), रूपाली कदम (टेक्निकल सुपरवायझर), पल्लवी कैतकर (पी.आर.ओ.), दया सुतार (स्टुडन्ट नर्स), कोमल हुंडारे (स्टुडन्ट नर्स), वत्सला राठोड (अटेन्डन्ट), राधा मखवाना (अटेन्डन्ट), उमेश वाघचैरे (ब्लड आॅन काॅल बाॅय) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानपूर्वी तपासण्या व रक्तदान घेण्यात आले. यावेळी ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ‘सिव्हील रूग्णालया’तर्फे रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर ‘रक्तदान शिबीर’ रविवार, दि. ८ फेब्रुवारी-२०१५ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी २.०० यावेळेत संपन्न झाले.

या शिबीराचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाण्यातील खोपट प्रभागातर्फे प्रभाग अध्यक्ष राजू षिंदे व उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष सुनिल घाणेकर यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, महासचिव राजू फणसे, उपाध्यक्ष नितीन देषपांडे, ‘धर्मराज्य महिला संघटना’ अध्यक्षा जयश्री पंडित, ठाणे जिल्हा समन्वयक राजेश गडकर, ठाणे जिल्हा सचिव नरेंद्र पंडित, ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे शहर सचिव समीर चव्हाण, सहसचिव विजय भोसले, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेषसिंग ठाकूर, सचिव रूपेष पवार  आदी मान्यवर उपस्थित होते.

धर्मराज्य पक्ष स्थापना…

, ,

दि. १६ नोव्हेंबर २०११ रोजी आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना झाली.

बुधवार, दि.१६ नोव्हेंबर-२०११ रोजी ‘धर्मराज्य’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना व उदघाटन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष-राजन राजे, सरचिटणीस-राजू फणसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपाल दुखंडे, माजी न्यायमूर्ती/जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बी.जी.कोळसेपाटील, ‘अर्थक्रांती’ प्रतिष्ठानचे अध्वर्यु श्री. यमाजी मालकर, पक्षाचे खजिनदार श्री. जयेंद्र जोग, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते श्री. रघुनाथदादा पाटील यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याजवळ दिप-प्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

उपस्थित मान्यवर आणि जनता जनार्दनाच्या साक्षीने पक्षाचा नामफलक, मुद्रा आणि झेंड्याचे अनावरण करून ‘धर्मराज्य पक्षा’ची मुहूर्तमेढ रोवली. नंतर ‘धर्मराज्य पक्षा’चे ब्रीद असलेली प्रतिज्ञा उद्धृत करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस श्री. राजू फणसे यांनी सुमारे ६५ कार्यकर्त्यांना नियुक्ती-पत्र देऊन त्यांच्या प्राथमिक नेमणूका झाल्याचे घोषित केले. नियुक्ती-पत्र मिळालेल्या सर्व पदाधिकार्यांना प्रा.गोपाल दुखंडे यांनी शपथ दिली. पक्षाच्या उदघाटन सोहळ्यामद्धे महापुरुषांचे पुतळे न ठेवता हुतात्म्यांचा पुतळा ठेवण्यामागील पक्षाची भूमिका सरचिटणीस राजू फणसे यांनी स्पष्ट केली व सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्यात येईल.

याबाबतचे विवेचन केले. प्रा.गोपाळ दुखंडे यांनी आपल्या भाषणात सध्याची राजकीय परिस्थिती, राजकीय पक्ष व त्यांचे नेते यावर कडक ताशेरे ओढले. तसेच धर्मराज्य पक्षाकडून जनतेची खूप अपेक्षा आहे असे सांगून पक्षाच्या वाटचालीला आशीर्वाद दिले.

१% राजकीय व आर्थिक शासकवर्गानं ९९% बहुसंख्यांकांवर लादलेलं ‘पारतंत्र्य’… लादलेली गुलामगिरी मोडून काढून खऱ्याखुऱ्या ‘सामाजिक लोकशाही’तल्या कल्याणकारी स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर राजकीय संस्कृतिची नव्यानं उभारणी करणाऱ्या एका जाज्वल्य राजकीय पक्षाची स्थापना होणं… नव्या सकस-जातिवंत राजकीय रोपटयाच रोपण होणं, ही काळाची गरज बनली होत़ी !

‘जशी उक्ति तशी कृती’ या न्यायाने ‘धर्मराज्य पक्ष’ चालणार असून त्याच्या नावातच सारंरूपाने तो नैसर्गिक तत्वाच्या मुल्यांवर आधारीत असा पक्ष आहे. पक्षाच्या ध्वजाच्या रंगांमधील लाल रंग हा क्रांतीदर्शी, तर पांढरा रंग हा सप्तरंगांनी बनलेला म्हणून सर्वसमावेशक व उर्जावान, हिरवा रंग निसर्गाशी तादात्म्य दाखविणारा तर निळा रंग हा महासागराची व आभाळाची विशालता व गांभीर्य दाखविणारा तर भगवा रंग हा चैतन्याशी व आध्यात्म्याशी निगडीत असणारा आहे. झेंडयाच्या मध्यभागी असणारे भगव्या रंगाचे चक्र हे श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचे प्रतिक असून ‘धर्मराज्य पक्षा’चा तात्विक पाया (धार्मिक नव्हे!) हा युगंधर श्रीकृष्णाच्या कळीकाळाला व्यापून उरणाऱ्या तत्वज्ञानावर आधारलेला आहे, हे दर्शविते. कुठल्याही राज्यव्यवस्थेचं, मानवी आकांक्षांचा सन्मान राखणं हे मुख्य काम असतं. गेले शतकभर भांडवलशाहीविरुद्ध साम्यवाद (कम्युनिझम्) हा सामान्य माणसाच्या हितरक्षणासाठी स्वीकारलेल्या दोन विचार-प्रणालींचा संघर्ष चालू आहे. सामान्य माणूस संपला – उध्वस्त झाला. हा संघर्ष आजही संपलेला नाही. म्हणून जणू मानवी मर्कटलिलांवर संतप्त होत निसर्गाने आपला तिसरा डोळा उघडून येत्या काही दशकात हा संघर्ष मिटवायला घेतल्याची दु:चिन्हे आहेत. मानव जातीपुढे जागतिक तापमान वाढ, जैविक बहुविधतेचा ऱ्हास व रासायनिक प्रदूषण अशी महाभयंकर पर्यावरणीय संकटे उभी ठाकलेली आहेत. टोकाचे मानवी शोषण व निसर्गाचे शोषण याबाबत दुरदर्शीपणे ठाम व कठोर भूमिका घेण्याची तयारी व राजकीय इच्छाशक्ती भारतातील राजकीय पक्ष दाखवत नसल्याने हि जबाबदारी ‘धर्मराज्य पक्ष’ स्वीकारीत आहे.

अण्णा हजारेंच्या ‘जनलोकपाल’ विधेयकाला आणि श्री अनिल बोकिलांच्या ‘अर्थक्रांती’ संकल्पनेला पूर्ण पाठींबा, औद्योगिक सेवाक्षेत्रातील अस्पृश्यता व गुलामगिरी बनलेल्या मजूर-कंत्राटदारी पद्धतीचं समुळ उच्चाटन व विध्वंसक अणूऊर्जेला विरोध तसेच शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांमधील बेलगाम खाजगी करणाला तीव्र विरोध हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत.परिपूर्ण संघराज्यीय पद्धतीनुसार ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. महाराष्ट्र’ या तत्वावर सर्वच राज्यांना जास्तीत जास्त स्वायतत्ता देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी असेल.

error: Content is protected !!