दि. २१ आदर्श अहवाल जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी संतप्त मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केलीय.
आदर्श इमारतीतील घोटाळ्याला जबाबदार कलंकित मंत्र्यांना आणि वशिलेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आदर्श घोटाळ्यातील चौकशी अहवाल फेटाळून लावला आहे. तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अटक करण्याची सीबीआयला परवानगी नाकारली आहे. आदर्श घोटाळ्यातील भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रकार संतापजनक आहे. जनतेच्या मताला आपण काडीची किंमत देत नाही हे कॉग्रेस आघाडीच्या सरकारने याद्वारे दाखवून दिले आहे. यामुळे ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कचेरीवर संतप्त निदर्शने करण्यात आल्याचं राजन राजे यांनी म्हटल.
आदर्श घोटाळ्यातील चौकशी अहवाल जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘धर्मराज्य पक्षा’ने केली आहे.