Blog

‘धर्मराज्य पक्ष’तर्फे ठाणे मनपाच्या प्रस्तावित करवाढीविरोधात शांततामय आंदोलन; लेखापरीक्षण अहवाल, नियोजनबद्ध वाहनतळाची मागणी; ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’च्या प्रस्तावावरही सवाल!

ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित मालमत्ता कर व मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढीविरोधात तसेच सन २०२४-२५ व २०२५-२६ चे लेखापरीक्षण अहवाल जाहीर करावेत, थकीत महसुलाची प्रभावी व कालबद्ध वसुली करावी, विकास आराखड्यातील वाहनतळासाठी सुविधा भूखंडांचा वापर करून नियोजनबद्ध वाहनतळ निर्माण करावेत आणि रस्त्यावरील धोकादायक पार्किंगसंदर्भातील ठराव रद्द करावा, या मागण्यांसाठी ‘धर्मराज्य पक्षातर्फे’ सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेच्या दिवशी परमार्थ निकेतनजवळ शांततामय आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिकेने सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना करवाढ न करता GIS तंत्रज्ञानाद्वारे मालमत्ता शोधून महसूल वाढविण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर मालमत्ता करासह हस्तांतरण शुल्कवाढीचा प्रस्ताव पुढे आल्याने आधी थकीत महसूल वसूल करा, महसूल गळती रोखा आणि त्यानंतरच करवाढीचा विचार करा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. “करवाढ नको, न्याय हवा! आर्थिक बोजा नको, पारदर्शक कारभार हवा! टॅक्स आमचा, पैसा आमचा! हिशोबही आम्हालाच हवा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी सन २०२४-२५ व २०२५-२६ चे लेखापरीक्षण अहवाल तातडीने जाहीर करून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करावेत, तसेच महसूल थकबाकीची अद्ययावत, अधिकृत व विभागनिहाय आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. “थकबाकी वसूल करण्याची हिंमत दाखवा; करवाढीचा सोपा मार्ग सोडा!” असा इशाराही देण्यात आला.
ठाणे शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपुऱ्या पार्किंग सुविधांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, विकास आराखड्यातील वाहनतळासाठी आरक्षित/निर्धारित सुविधा भूखंडांवर बहुमजली व नियोजनबद्ध वाहनतळ उभारावेत आणि रस्त्यावरील धोकादायक पार्किंगला प्रोत्साहन देणारा ठराव रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’च्या प्रस्तावावर सवाल
किसन नगर परिसरातील क्लस्टर-प्रकल्पाच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ‘ठामपा’च्या नियंत्रणाखाली ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करून त्यासाठी महासभेची मंजुरी घेण्याच्या घाईमागे नेमके कोणाचे हित आहे?, असा सवाल धर्मराज्य पक्षाने उपस्थित केला.
ठाणे शहरात पाणी, वीज, मलनि:स्सारण, अग्निसुरक्षा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक व पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असताना, वाढत्या बांधकामामुळे शहरावर आणखी भार टाकण्यापूर्वी या कंपनीच्या माध्यमातून एकूण किती चटईक्षेत्राचे क्लस्टर प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, त्यासाठी किती चटई निर्देशांक देण्यात येणार आहे आणि एवढा चटई निर्देशांक शहराच्या सध्याच्या पायाभूत सुविधांना झेपणारा आहे का, याचा संपूर्ण व पारदर्शक खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली.
“महापालिका कोणाची? जनतेची की कंपन्यांची? क्लस्टरच्या नावाखाली कंपनी कोणासाठी? ठाणेकरांसाठी की बिल्डरांसाठी?” असा सवाल करत, कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पापूर्वी शहराची वहनक्षमता, पायाभूत सुविधांची क्षमता आणि भविष्यातील परिणामांचा शास्त्रशुद्ध अभ्यास सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान ठाणे महानगरपालिका आयुक्त मा. सौरभ राव यांना धर्मराज्य पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ठाणेकर नागरिकांच्या हितासाठी यापुढेही अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धर्मराज्य पक्षाने दिला.
यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यासह, काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाअध्यक्ष राहुल पिंगळे, सचिव महेंद्र म्हात्रे, संभाजी ब्रिगेडचे श्री. चंद्रशेखर पवार, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे श्री. संजय मं.गो., ठाणे मतदाता जागरण अभियानचे उन्मेष बागवे व राजेंद्र चव्हाण (भारत जोडो अभियान), आम आदमी पक्षाचे ठाण्यातील पदाधिकारी, तसेच धर्मराज्य पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ता समीर चव्हाण, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे खजिनदार अजित सावंत, जगन्नाथ सल्लागार, हनुमंत किणी, शरद भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ठाणे रिक्षा संघटनेचे सुशीलकुमार चंद्रा, रवी मिश्रा, महासंघाचे कामगार सदस्य तुषार बर्डे व अन्य कामगार सदस्य आणि ठाणेकर नागरिक सहभागी झाले होते.

भर पावसात तिरंगा रॅली… पावसात भिजत उत्साहात साजरा झाला भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन!

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरातील चंदनवाडी शिवसेना शाखेत १४ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भर पावसात तिरंगा रॅली काढण्यात आली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले. पावसात भिजत, हातात तिरंगा घेऊन आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात निघालेल्या या रॅलीने परिसरात राष्ट्रभक्तीचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
या विशेष सोहळ्यास ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार श्री. राजन विचारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, श्री. नरेश मणेरा, ज्येष्ठ पत्रकार श्री. हेमंत देसाई, तसेच अनेक माजी सैनिक उपस्थित होते. ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने प्रवक्ता श्री. समीर चव्हाण, लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, पक्षाचे सचिव श्री. नरेंद्र पंडित आणि श्री. अनिल महाडिक यांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा तसेच वीरपत्नींचा मा. राजन राजे आणि श्री. केदार दिघे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
पावसाची पर्वा न करता स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकवटलेला शिवसैनिकांचा उत्साह, तिरंग्याप्रती असलेला अभिमान आणि देशभक्तीची भावना या संपूर्ण सोहळ्यात प्रकर्षाने जाणवत होती.
या दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंनिसच्या ३७व्या वर्धापन दिनी विवेक, विज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाचा जागर ठाणे शहर शाखेच्या कार्यक्रमात राजन राजे व कुमार केतकर प्रमुख वक्ते; लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त महा. अंनिस – ठाणे शहर शाखेच्या वतीने रविवार, दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित विशेष कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे तसेच ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात १५व्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनाचे सातारा येथील नवनिर्वाचित अध्यक्ष व लोकशाहीर साथी संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक चळवळीच्या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी साहित्य, कला, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन यांचा परस्परांशी असलेला संबंध यावरही विचारमंथन झाले.
मा. राजन राजे यांच्या भाषणातील महत्त्वपूर्ण विचार —
“ज्ञान-विद्वत्ता, व्यासंग आणि अनुभवसिद्धता…याचा अर्थाअर्थी ‘आकलनशक्ति’शी थेट सबंध असतोच असं नाही! आकलन, ही काव्यप्रतिभेसारखी किंवा अन्य तर्‍हेच्या प्रतिभेच्या आविष्कारासारखी जन्मसिद्ध असते का…ते तुमच्या DNA मध्येच वसलेलं असतं का; नक्की समीकरण मांडणं, तसं कठीण आहे…पण, ‘आकलन’ म्हणजे, एरव्ही आपण समजतो तसं इंग्रजीत Assessment नव्हे; तर, Comprehension होय. जगण्याच्या प्रश्नांची यशस्वीरित्या सोडवणूक करण्यासाठी लागणारा अत्यावश्यक घटक! समज, समजूतदारपणा, व्यवहारज्ञान, परिस्थितीचं भान आणि ज्ञान…हे त्याच्या जवळपास जाणारे अर्थ. समस्यांचं मुळातून आकलन झाल्याखेरीज त्यातून सुटकेचा मार्ग कसा समजणार?
कार्ल मार्क्स, म. गांधी हे राजकारण-समाजकारणाच्या दृष्टीकोनातून…गौतम बुद्धांपासून सुरुवात केली की, आपली संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई, तुकाराम, तुकडोजीमहाराज, गाडगेबाबा ही सगळी आध्यात्मिक अंगाने आणि शिवछत्रपती महाराज, पं. नेहरु, डाॅ . बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही दृष्टीकोनातून अत्युच्च दर्जाचं ‘आकलन’ असलेली, सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असलेली मंडळी!
बाबासाहेबांनी काळाची पावलं अचूक ओळखून आपल्या जमातीला “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा”, असा अमोघ संदेश दिला!
स्वातंत्र्य-चळवळ उभारताना….बहुजनांना, महिलांना, वंचित वर्गाला समाविष्ट करुन घेतलं आणि जशी आजच्या -जेन-झी’ने जुलमी सत्ताधाऱ्यांबाबतची जनतेच्या मनातील भिती नष्ट केली; हे त्यांच्या उत्तुंग आकलनाचेच दर्शन होय.
कार्ल मार्क्स, अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिपादन करुन गेला, “The philosophers have only interpreted the world, in various ways; the point is to change it.” तेव्हा, मला कधि कधि वाटतं की, लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत असंच अवचित कधि उठून कार्ल मार्क्सने, आमच्या पोरसवदा वयाच्या ‘संभाजी भगत’च्या डोक्यावर हात ठेवला असेल आणि त्यातूनच, ‘शाहीर संभाजी भगत’ घडला असणार…कारण, हाच “जग बदलण्याचा” विचार तहहयात त्यांचा पिच्छा पुरवतोय!
पण, कार्ल मार्क्स फक्त, जाणिवेच्या पातळीवर काम करत होता; तर, गौतम बुद्ध, म. गांधी जाणिवा आणि नेणिवा अशा दोन्ही पातळ्यांवर काम करु पहात होते आणि तोच मार्ग शाहीर संभाजी भगतांनी अनुसरलेला दिसतो. सांस्कृतिक-कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या ‘जाणिवा आणि नेणिवा’ विकसित केल्याखेरीज कल्याणकारी ‘शाश्वत-परिवर्तन’ होणार नाही; ही त्यांची ठाम असलेली धारणा, अगदी योग्यच होय!
माझी तशी त्यांच्याशी ओळख अलिकडचीच…साधारण वर्षभरापूर्वी निवर्तलेले, कामगार-चळवळीचे आधारस्तंभ, काॅ. संजय संघवींचे, यांचे ते जिगरी दोस्त…हे ही आम्हाला अलीकडेच समजलेलं! बायबलमध्ये म्हटलंय… “By their fruit you will recognize them…Do people pick grapes from thornbushes, or figs from thistles?” अगदी तसंच, “त्यांच्या कृती आणि त्यांच्या अस्तित्वाचे भवतीच्या समाजावर झालेले परिणाम” पाहिल्यानंतर…अगदी थोडक्या परिचयात, मी त्यांच्या एकूण व्यक्तित्वाचा धांडोळा घेऊ शकलो, ते माझ्यासाठी, एकूणच समाजासाठी व कामगार-चळवळीसाठी खूपच महत्त्वाचं आहे.
शाहीर संभाजी भगतांच्या हातून समाजात कल्याणकारी परिवर्तन होवो आणि त्याकामी आमचं ‘योगदान’ खर्ची पडो…हीच, साताऱ्याच्या ‘विद्रोही साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदी’ निवड झाल्याबद्दलच्या सत्कार-समारंभाप्रसंगी आमची मनोकामना, धन्यवाद… ॥ जय महाराष्ट्र, जय हिंद ॥”
अंधश्रद्धेच्या अंधारातून विवेकाच्या प्रकाशाकडे, अज्ञानातून विज्ञानाकडे आणि अन्यायातून समता-न्यायाच्या दिशेने समाजाला घेऊन जाण्याचा हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाची उपस्थिती; राजन राजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले संविधान अभिवादन

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कोर्ट नाका, अशोक स्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यासह धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यानंतर भारतीय जनतेने स्वतःला अर्पण केलेले भारतीय संविधान हेच आपल्या लोकशाहीचे खरे अधिष्ठान आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये अबाधित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीशिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपकरी कामगारांच्या लढ्याला कामगार ऐक्याची भक्कम साथ!

मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगार गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. आपल्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला आता विविध उद्योगांतील कष्टकरी कामगारांकडूनही भक्कम पाठिंबा मिळत आहे.

धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाशी संलग्न रायगड, तळोजा येथील जॉन्सन मॅथे कंपनीतील कामगार सदस्यांनी अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपकरी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या संघर्षाप्रती एकजूट व्यक्त केली. यावेळी संपकरी कामगारांना रु. २२,५००/- चा धनादेश प्रदान करून आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.

विशेष म्हणजे, जॉन्सन मॅथे कंपनीतील कामगारांनीदेखील चार वर्षांपूर्वी आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. या संघर्षानंतर व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेतून एक त्रैवार्षिक वेतन करारदेखील संपन्न झाला. त्यामुळे अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या कामगारांच्या सध्याच्या संघर्षातील वेदना आणि त्यांची लढ्याची गरज जॉन्सन मॅथेतील कामगारांनीही जवळून अनुभवलेली आहे.

ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, “एक उद्योगातील कामगारांच्या न्याय्य लढ्याच्या पाठीशी दुसऱ्या उद्योगातील कामगार ठामपणे उभे आहेत,” या संघटित कामगार चळवळीच्या ऐक्याची आणि बंधुभावाची जिवंत प्रचिती आहे.

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचा ठाम आणि सक्रिय पाठिंबा आहे. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन चर्चेच्या माध्यमातून लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या आर्थिक मदतीमुळे संपकरी कामगारांना आपला संघर्ष पुढे नेण्यासाठी निश्चितच बळ मिळाले आहे. विविध उद्योगांतील कामगारांनी एकमेकांच्या न्याय्य लढ्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच संघटित कामगार शक्तीचे खरे सामर्थ्य आहे.

कामगार एकजुटीचा विजय असो!

गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्या आशीर्वादासाठी कार्यकर्त्यांची ठाणे कार्यालयात मांदियाळी; न्याय, पर्यावरण व कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटित संघर्षाचा निर्धार!

भारतातील पहिलावहिला पर्यावरणस्नेही हरित पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला धर्मराज्य पक्ष आणि कष्टकऱ्यांची लढाऊ संघटना धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ यांचे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, आज बुधवार, दि. २९ जुलै-२०२६ रोजी पक्षाच्या ठाणे येथील कार्यालयात निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
आपल्या गुरूप्रती असलेली निष्ठा, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांचा ओघ सुरू होता. प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-दुःखाची विचारपूस करत मा. राजन राजे यांनी सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले.
कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांच्या या प्रेमाने, ‘कामगारहृदयसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मा. राजन राजे यांचे हृदयदेखील भारावून गेले होते.
यावेळी मा. राजन राजे यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्था, अन्यायकारक व धनदांडग्या भांडवलदारी प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज अधोरेखित केली. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढणे, हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
कामगार आणि शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, तेच देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचेही आधारस्तंभ आहेत, याची जाणीव करून देत त्यांनी संघटित शक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी आपल्या मार्गदर्शकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य व हितचिंतकांचे मा. राजन राजे यांनी मनःपूर्वक आभार मानले आणि न्याय, पर्यावरण, कामगार व शेतकरी हिताच्या लढ्यात अधिक जोमाने कार्य करण्याचा संदेश दिला.

भिवंडीतील ‘सिम्प्रेस इंडिया’मध्ये “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा आणखी एक उल्लेखनीय करार!

वाशेरे (भिवंडी) येथील मेसर्स सिम्प्रेस इंडिया प्रा. लि. या डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील कंपनीत, अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही धर्मराज्य पक्षप्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघातर्फे कामगारांच्या पगारवाढीचा करार यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या करारानुसार, कंपनीतील ३५ कायम कामगारांना सरासरी रु. १२,९५८ (सुमारे रु. १३,०००) थेट पगारवाढ मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून केवळ ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून व्यवसाय करत, तोट्यातून हळूहळू नफ्याकडे वाटचाल करणाऱ्या कंपनीत अशा स्वरूपाचा करार होणे ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे. करारानुसार दुसऱ्या वर्षापासून पगारवाढीपैकी ६० टक्के रक्कम बेसिक वेतनात व ४० टक्के रक्कम अलाउन्समध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
याशिवाय, कामगारांना दरवर्षी ६ अतिरिक्त सशुल्क सुट्ट्या, दरवर्षी ३ गणवेश, तसेच कामगार व त्यांच्या पालकांचा मेडिक्लेम प्रीमियम कंपनीतर्फे भरण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत ५ ते ६ कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात कायम होणारे व संघटनेचे सभासद बनणारे कामगारही या करारातील सर्व लाभांसाठी पात्र असतील.
अत्यंत आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही कामगारहित जपत झालेल्या या करारामुळे सिम्प्रेस इंडिया कंपनीतील कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांनी मा. राजन राजे व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे आभार व्यक्त केले आहेत.

रोहा येथील अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपाला १०० दिवस पूर्ण; एलजी हिंग व प्रोटेगोच्या कामगारांकडून संपकऱ्यांना प्रत्येकी ₹२५ हजारांची आर्थिक मदत!

मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगारांच्या बेमुदत संपाला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त, धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाशी संलग्न एलजी हिंग, मुंबई व प्रोटेगो, नवी मुंबई येथील कामगार सदस्यांनी संपकरी कामगारांना एलजी हिंग, मुंबई व प्रोटेगो, नवी मुंबई युनिटकडून प्रत्येकी रु. २५,०००/- चा धनादेश प्रदान करून आर्थिक मदत केली. या प्रसंगी न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या संपाला संघटित कामगार चळवळीचा ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या आर्थिक मदतीमुळे संपकरी कामगारांना संघर्ष पुढे नेण्यासाठी बळ मिळाले असून, विविध उद्योगांतील कामगारांनी दाखविलेल्या ऐक्यभावनेचे हे उल्लेखनीय उदाहरण ठरले.

दिल्लीतील जंतर-मंतर जनआंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चा ठाम पाठिंबा!

आज धर्मराज्य पक्षासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तसेच विविध सामाजिक, कामगार, विद्यार्थी व राजकीय संघटनांच्या संयुक्त वतीने ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निर्माण झालेल्या संकटाबाबत, तसेच लेह-लडाखच्या पर्यावरण संरक्षणासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री. राजन राजे म्हणाले, “लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मार्ग दडपशाही नव्हे, तर संवाद आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न असो किंवा पर्यावरण संरक्षणाचा विषय असो, केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तात्काळ चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सरकारची संविधानिक जबाबदारी आहे.”
धर्मराज्य पक्षाचा स्पष्ट विश्वास आहे की, विद्यार्थ्यांना न्याय, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन ही कोणत्याही सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे. आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष न करता केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची ठाम भूमिका आहे.
या निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), धर्मराज्य पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शप), जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), भारत जोडो अभियान, श्रमिक जनता संघ, आयटक, बहुजन विकास संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कायद्याने वागा लोकचळवळ, अन्न अधिकार अभियान, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन, गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समिती तसेच अंगणवाडी व आशा वर्कर संघ यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पुणे येथील सुल्झर इंडिया कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली राजन राजे यांची सदिच्छा भेट; कामगार हक्कांसाठी संघटनात्मक बळकटीचा संकल्प!

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीजवळील कोंढापुरी येथील सुल्झर इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तसेच सुल्झर इंडिया कामगार युनियनचे मार्गदर्शक मा. राजन राजे यांची युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर धुमाळ, सेक्रेटरी स्वप्नील शेळके, कार्याध्यक्ष किरण दरेकर, उपाध्यक्ष प्रशांत माने, खजिनदार प्रवीण शेळके, मिलिंद पिंगळे, मंगेश गायकवाड, अजय निळकंठ तसेच इतर सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीदरम्यान कामगारांच्या विविध प्रश्नांवर, संघटनेच्या आगामी वाटचालीवर, कामगार हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर तसेच संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित प्रयत्न अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ व सुल्झर इंडिया कामगार युनियन यांच्या माध्यमातून कामगार हितासाठीची लढाई अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प!
error: Content is protected !!