Blog

कंत्राटी ते कायमस्वरूपी सेवेत; ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या संघर्षाला यश मिळाल्याने वॉलमेट कामगारांनी घेतली राजन राजे यांची सदिच्छा भेट

दि. ०८/०६/२०२६ रोजी मेसर्स. वाॅलमेट फ्लो कंट्रोल प्रा. लि., डोंबिवली/अंबरनाथ येथील कंत्राटी कामगार सभासदांनी त्यांना कायमस्वरूपी (परमनंट) सेवेत सामावून घेण्यात आल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’चे अध्यक्ष राजन राजे यांची ठाणे येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी कामगार प्रतिनिधींनी श्री. राजन राजे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला तसेच कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने उभारलेल्या संघर्षाबद्दल व मिळालेल्या न्यायाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, निरंजन म्हात्रे तसेच वाॅलमेट युनिट कमिटीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री येथील बेमुदत संपस्थळी ‘धर्मराज्य पक्ष’ प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांची भेट

मेसर्स. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि., प्लॉट नं. २१/२, एम.आय.डी.सी., गाव-धाटाव, ता. रोहा, जि. रायगड-४०२ ११६ येथील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासद असलेले कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी व विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. १० एप्रिल २०२६ पासून महासंघाच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर ठामपणे बसले आहेत.
आज संपस्थळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी भेट देत संपकरी कामगारांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी कामगारांच्या अडचणी, व्यवस्थापनाकडून होत असलेला अन्याय व प्रलंबित मागण्यांबाबत माहिती जाणून घेत पुढील लढ्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, खजिनदार अजित सावंत तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते. संपस्थळी कामगारांमध्ये मोठा उत्साह व एकजूट पाहायला मिळाली.
कामगारांवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा लढा अधिक ताकदीने सुरू राहील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मार्क्सवादी शेतकरी नेते कॉ. प्रशांत सरखोत यांची राजन राजे यांना सदिच्छा भेट; पर्यावरण, शेती व ग्रामीण प्रश्नांवर सविस्तर चर्चा

दि. १३ मे २०२६ रोजी मार्क्सवादी शेतकरी नेते कॉ. प्रशांत सरखोत यांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे येथील कार्यालयात पक्षाध्यक्ष राजन राजे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान पर्यावरण, शेती, राजकारण आणि ग्रामीण भागासमोरील विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढते औद्योगिकीकरण, जंगलांची होणारी नासधूस, अनियंत्रित शहरीकरण आणि हवेतील वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम शेती, पाणी, पर्यावरण आणि सर्वसामान्य जनजीवनावर होत असल्याची गंभीर चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा, पाण्याचे संकट, पीक उत्पादनातील घट आणि रोगराई वाढत असून शेतकरी वर्ग सर्वाधिक संकटात सापडत असल्याचे मत चर्चेदरम्यान मांडण्यात आले. विशेषतः कोकणातील आंबा, काजू व इतर फळबागांवर बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ताकेंद्रित राजकारण सुरू असल्याची टीका करण्यात आली. बेरोजगारी, महागाई, शेतीमालाला न मिळणारा योग्य दर, वाढते खासगीकरण आणि ग्रामीण भागातील आर्थिक संकट यामुळे जनतेत असंतोष वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच मुरबाड तालुक्यातील काळू नदीवरील धरण प्रकल्पाविषयीही सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि आदिवासी समाजावर होणारे परिणाम, संभाव्य विस्थापन, पर्यावरणीय हानी तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर होणारा परिणाम या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे हक्क, पर्यावरण आणि जैवविविधता धोक्यात येणार नाही याची शासनाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

आंबा-काजू बागायतदारांच्या प्रश्नांवरील संयुक्त पत्रकार परिषदेस धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांची उपस्थिती

आज दि. १३ मे २०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांवरील सर्वपक्षीय आणि नागरी समाजातील चळवळीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे उपस्थित होते.
कोकणातील आंबा, काजू व मत्स्य व्यवसायाशी संबंधित शेतकरी गंभीर संकटात सापडले असून त्यांना तातडीने न्याय मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी तसेच नुकसानग्रस्त बागायतदारांना योग्य आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेत विनायक राऊत (शिवसेना उबाठा), भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), कॉ. अजित नवले (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), कॉ. प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), प्रभाकर नारकर (जनता दल सेक्युलर), डॉ. दीपक पवार (मराठी अभ्यास केंद्र) तसेच विविध शेतकरी, सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

बुद्धपौर्णिमा व संयुक्त जयंती महोत्सवा’स धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांची उपस्थिती

बुद्धपौर्णिमेनिमित्त ठाणे शहरातील कोपरी परिसरात ‘गौतम मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित “बुद्धपौर्णिमा व संयुक्त जयंती महोत्सव–२०२६” हा कार्यक्रम दि. ०१ मे ते दि. ०५ मे २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. तसेच, भाजपचे कोपरी–पाचपाखाडीचे आमदार संजय केळकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश गाडे यांनी मा. राजन राजे यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
आपल्या मनोगतात मा. राजन राजे यांनी तथागत बुद्धांच्या विचारांचा आजच्या जगभरातल्या युद्धजन्य परिस्थितीत व निसर्ग-पर्यावरणावर निरंतर होणाऱ्या आघातांचा विचार करता….सर्वत्र प्रसार होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचे आवाहन केले तसेच युवकांनी बुद्धांच्या शिकवणीचा आदर्श घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी पुढे यावे, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी ‘गौतम मित्र मंडळा’चे उपाध्यक्ष श्री. अमुल कदम, सेक्रेटरी श्री. कुंदन सपकाळे, खजिनदार श्री. सुमित कदम, श्री. अनंता चंदने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाशी मार्केट, मुंबई येथील भाजीपाला व इतर व्यवसाय करणाऱ्या पनवेल व परिसरातील स्थानिक महिलांनी आज ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची ठाणे कार्यालयात भेट घेतली.

वाशी मार्केट, मुंबई येथील भाजीपाला व इतर व्यवसाय करणाऱ्या पनवेल व परिसरातील स्थानिक महिलांनी आज ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची ठाणे कार्यालयात भेट घेतली.
यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक नेत्यांकडून होत असलेल्या त्रासाबाबत आणि मार्केटमधील विविध समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली; तसेच, संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.

‘धर्मराज्य पक्ष’तर्फे ठाण्यात ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात भव्य आक्रोश मोर्चा; मान्यवरांची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ यांच्या वतीने ठाण्यात ‘राष्ट्रीय संपत्ती-निर्मात्या’ कामगारांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायं. ४.३० वाजता सुरू झालेल्या या मोर्चात विविध औद्योगिक क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी, पदाधिकारी व ठाणेकर जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या संहितांमुळे कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येऊन शोषण, असुरक्षितता व कंत्राटीकरण वाढणार असल्याची वस्तुस्थितीवर यावेळी जनतेसमोर मांडण्यात आली. कामगार संघटनांची ताकद कमी करणे, नोकरीतील स्थैर्य नष्ट करुन ‘‘Hire & Fire’’ धोरणाला चालना देणे, अशा विविध मुद्द्यांवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
मोर्चादरम्यान कामगारांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या प्रखरपमे मांडल्या. ‘४ कामगार संहितां’ची तत्काळ रद्दबातल करावी, कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत; तसेच, कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली, त्यामध्ये ॲड. विजय कुर्ले, ॲड. नाना अहिरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष (ग्रामीण) चेतनसिंह पवार, काँग्रेस ठाणे जिल्हा पदाधिकारी राहुल पिंगळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ नेत्या वंदनाताई शिंदे व कॉ. उदय चौधरी, आनंदा होवाळ यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे या मोर्चात धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, पोर्णिमा सातपुते, जगन्नाथ सलगर आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत, ‘४ काळ्या कामगार-संहितां’मुळे जसा आपत्कालीन अवस्थेत विमानाचा वैमानिक, ‘मे डे’ (May Day) असा वाचविण्यासाठी संदेश (SOS) पाठवतो; तशीच अवस्था ‘कामगारां’ची झालीय…पण, लक्षात कोण घेतो? कामगार-चळवळ संपवून कामगारांना कंत्राटी-कामगार किंवा ‘मुदतबंद-कामगार’ (FTE…Fixed Term Employee) या नात्याने ‘गुलाम’ बनवणं सुरु आहे…
म्हणूनच यासारखे लढे, कामगारांच्या हक्कांसाठी निर्णायक ठरणार असल्याने, महाराष्ट्रातील सर्व कामगारांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला व भविष्यातही या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मराज्य पक्षाने दिला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘बेमुदत संपा’ला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे जाहीर पाठींबा

आजवर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील ‘NDA’ सरकारने, यापूर्वी किमान ७ वेळा झालेल्या राज्यस्तरीय आंदोलनांपश्चात, तात्पुरती खोटी आश्वासने देऊन…१७ लाख शासकीय-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याने; आज दि. २१ एप्रिल-२०२६ पासून सुरु झालेल्या, त्यांच्या न्याय्य ‘बेमुदत संपा’ला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे जाहीर पाठींबा दिला जातानाचे क्षणचित्र….

धर्मराज्य पक्ष”च्या पुढाकाराने ठाणे स्टेशन परिसरातील रिक्षा-टॅक्सी समस्या व वाहतूक कोंडीबाबत पोलिसांशी चर्चा

ठाणे स्टेशन येथील रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तसेच वाहतूक कोंडी व इतर समस्यांच्या अनुषंगाने, आज मंगळवार, दि. २१/०४/२०२६ रोजी ठाणे शहर वाहतूक विभागाच्या सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर मा. रोहिणी सोनार मॅडम व पोलीस सब-इन्स्पेक्टर मा. श्री. विजय कांबळे साहेब यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी, धर्मराज्य पक्षाचे सचिव श्री. नरेंद्र पंडित, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे सचिव श्री. समीर चव्हाण, स्थानिक रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे श्री. सुशिलकुमार चंद्रा, श्री. रवि मिश्रा व इतर सहकारी उपस्थित होते.

नवी मुंबईच्या ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’तर्फे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कामगारांच्या मोठ्या पगारवाढीचा त्रैवार्षिक-करार संपन्न!

कामगार नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, सरासरी १२,५०० रुपयांची इडिकॉन-कामगारांना थेट पगारवाढ (‘CTC’सारख्या तद्दन फसव्या संकल्पनेनुसार फुगवलेली नव्हे)….
———————————-
‘ट्रंप’कृत अमेरिकी-टेरिफ युद्धाला तोंड देता देता…ज्या कंपनीचं उत्पादन, मोठ्याप्रमाणावर आजवर अमेरिकेला निर्यात होतं आलेलं आहे; त्या कंपनीच्या वार्षिक-उलाढालीत स्वाभाविक मोठी घसरण अपेक्षितच होती. *गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ४२ कोटींवरुन ३५ कोटींपर्यंत वार्षिक-उलाढाल घसरण्याचा प्राथमिक अंदाज असताना देखील, आजवरच्या सौहार्द्रपूर्ण औद्योगिक-संबंधांची योग्य जाण ठेवत, इडिकॉन-व्यवस्थापनाने ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’शी केलेला* हा आश्चर्यजनक करार होय!
“Profis are Private & Losses are Public” चा सध्या कामगारविरोधी ‘जमाना’, औद्योगिक व सेवा क्षेत्रात सर्वत्र हातपाय पसरुन असण्याच्या पार्श्वभुमीवर झालेला, हा उल्लेखनीय करार आहे.
…भरीस भर म्हणून देशात भाजप-संघीय ‘कामगारघातकी’ सरकारने लादलेल्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’द्वारे (4 Black Labour-Codes) आणल्या गेलेल्या, ‘वैयक्तिक-करार’ करण्याच्या ‘फोडा-झोडी’च्या तरतुदींच्या प्रवाहाविरोधात पोहत जात केलेला हा करार आहे, हे विशेषच!
नवी मुंबई कामगारांच्या आर्थिक उन्नयनासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ, प्रस्थापित भांडवली व्यवस्थेविरोधात संघर्ष करणारे ज्येष्ठ कामगार-नेते, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापकीय अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, आपल्या कार्यकर्तृत्त्वाला साजेसा असा, पुन्हा एकदा पगारवाढीचा ऐतिहासिक त्रैवार्षिक-करार संपन्न केला असून, नवी मुंबईस्थित रबाळे एमआयडीसी येथील, ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ या बहुराष्ट्रीय कंपनीतील कामगार सभासदांना, तब्बल सरासरी १२ हजार ५०० रुपयांची (CTC वगळून) थेट पगारवाढ मिळाली आहे.
मंगळवार, दि. २४ मार्च-२०२६ रोजी, रबाळे येथील ‘विस्टा-ईन’ या हॉटेलमध्ये, औद्योगिकक्षेत्रात कामगारहिताची सळसळ निर्माण करणारा असा, त्रैवार्षिक-करार संपन्न झाला. या करारांतर्गत, ‘इडिकॉन’च्या कामगार सभासदांना, ९० हजार ते १ लाख ७३ हजार इतका भरभक्कम दिवाळी बोनसही दरवर्षी मिळणार आहे. परिणामी, या करारामुळे कामगारांचे वेतनमान कमीतकमी ६० हजार ५०० ते जास्तीतजास्त १ लाख ३ हजार इतके वाढले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी, भारतावर लादलेल्या अन्यायकारक टेरिफला समर्थपणे तोंड देत, इडिकाॅन व्यवस्थापन व कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली हा करार संपन्न झाल्याने, नवी मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारविश्वात मोठ्या उत्साहाचं उत्सवी वातावरण आहे. त्याचबरोबर, ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ कंपनीचे मालक (एमडी/सीईओ) श्री. ऑब्री डिकून्हा साहेब व त्यांचे पुत्र आणि कंपनीचे डायरेक्टर श्री. ॲरोन डिकून्हा साहेब, यांचे मोलाचे सहकार्य व सामंजस्याची भूमिका यामुळेदेखील हा करार यशस्वी झाला आहे. मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखालील, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनच्या परंपरेनुसार औद्योगिक शिस्त व शिरस्ता पाळत, ‘इडिकॉन’च्या कामगार सभासदांनी, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असतानाही, उत्पादनाचा दर्जा व मात्रा सातत्याने उंचावत नेल्यानेच…कामगारांना इतर सोयीसुविधांच्या वाढीसोबतच, ही ऐतिहासिक पगारवाढ झालेली आहे.
1) करारानंतरची थेट सरासरी पगारवाढ = रु. 11,500 प्रतिमास
2) VDA सह सरासरी पगारवाढ = रु. 12,500 प्रतिमास
3) किमान पगारवाढ = रु. 10,600 प्रतिमास
4) कमाल पगारवाढ = रु. 15,600 प्रतिमास
5) सरासरी पगार = रु. 76,000 प्रतिमास
6) किमान पगार = रु. 60,500 प्रतिमास
7) कमाल पगार = रु. 1,03,000 प्रतिमास
😎 सरासरी बोनस = रु. 121500 प्रतिवर्षी
9) किमान बोनस = रु. 90,000 प्रतिवर्षी
10) कमाल बोनस = रु. 1,73,000 प्रतिवर्षी
या ऐतिहासिक कराराप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण यांच्यासह कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने, आसिस्टंट मॅनेजर (एच. आर.) श्री. योगेश सूर्यराव, एच. आर. मॅनेजर श्री. नंदकुमार पवार, सिनियर मॅनेजर (प्रोडक्शन) श्री. रवींद्र वर्पे, आसिस्टंट मॅनेजर (अकाउंट व फायनान्स) श्री. सचिन गोलांबडे तसेच, कमिटीच्या वतीने युनिट अध्यक्ष श्री. दिलीप राणे, सेक्रेटरी श्री. तुषार बेर्डे, खजिनदार श्री. सचिन म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य श्री. राजेश कदम, श्री. दीपक घोले, श्री. प्रवीण वालनुस्कर, श्री. अमित पांचाळ आदी मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या भरघोस पगारवाढीमुळे ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ कंपनीच्या कामगार सभासदांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांनी या पगारवाढीचे जल्लोषात स्वागत करत, मा. राजन राजे यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
error: Content is protected !!