मुंबईतील गिरणी कामगारांसाठी लढा देणाऱ्या ‘घर हक्क परिषद’ या संघटनेची बैठक शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ‘इंटक’चे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ-भोईवाडा, मुंबई येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी गिरणी कामगार व नागरिकांसाठीच्या जाहीरनाम्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव व ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, गिरणी कामगारांचे प्रतिनिधी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्री. विश्वास उटगी, ज्येष्ठ विचारवंत श्री. शिशिर ढवळे, रेमण्ड कंपनीच्या कामगारांचे प्रतिनिधी श्री. विलास घाग, श्री. प्रदीप साळसकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. दरम्यान, ‘घर हक्क परिषदे’ची आगामी बैठक रविवार, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, टिळक भवन, दादर-मुंबई दुपारी ३ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती, यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.
‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’त दसरा साजरा : मा. राजन राजे यांची उपस्थिती
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीतील, डोंबिवली आणि अंबरनाथ या युनिटमधील कामगार सभासदांनी, दसरा व विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित राहून, सर्व कामगार सभासद तसेच, कंपनी व्यवस्थापनास दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री सत्यनारायणाच्या पूजेचे मा. राजन राजे यांनी, मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, ‘वालमेट फ्लो-कंट्रोल प्रा. लि.’ या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीने, मा. राजन राजे यांचे शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर व सचिव श्री. समीर चव्हाण उपस्थित होते.
“धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा, ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं अधिक नुकसान करतात!” -राजन राजे
“अंधश्रद्धा स्वतःच एक ‘व्यवस्था’ असते; जी आतून मुठभरांच्या वर्चस्वाला चांगलीच आधारभूत होत रहाते… आणि, आजच्या भांडवली-व्यवस्थेत अशा अनेक अंधश्रद्धांना, ‘व्यवस्था’ चालवणारे जाणिवपूर्वक, याच कारणामुळे पुढावा देत असतात. म्हणूनच तर, आपल्या महाराष्ट्रात, दिवसागणिक खोल गर्तेत जात चाललेल्या मराठी-माणसाला, विविध धर्मसंप्रदायात व्यवस्थेकरवी कौशल्याने अडकवलं जातं. परिणामी, धार्मिक अंधश्रद्धा, जेवढं समाजाचं नुकसान करतात; त्याच्यापेक्षा कैकपटीने अधिक ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं नुकसान करतात!” असे रोखठोक भाष्य ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगारनेते, तथा राजकीय व सामाजिक विचारवंत राजन राजे यांनी नुकतेच ठाण्यात केले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल, समितीच्या ठाणे शहर शाखा आणि ठाण्यातील सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना, राजन राजे पुढे म्हणाले की, “कुणी बुलंद आवाजात भाषणं ठोकत, आपलं प्रतिनिधित्व करणारा अमकातमका राजकीय पुढारी (जो कधि ‘जाणता राजा’ म्हणून मिरवत असतो; तर, कधि कुठलं ‘सम्राटपद’ भूषवत असतो), आपल्या समाजाचं पुनरुत्थान करेल, आपल्यावर चारही बाजुंनी होत असलेला अन्याय दूर करेल, अशी थेट ‘अवतार-संकल्पने’ला जाऊन भिडणारी आपली अंधश्रद्धा असते; जेव्हा, तो नेता बोलत एक असतो आणि करत वेगळंच असतो… तो व्यवस्थेचा लाभार्थी तर असतोच; पण, व्यवस्थेच्या बळकट पाठिंब्यावरच त्याचं ‘नेतेपद’ अवलंबून असल्यामुळे, ही ‘राजकीय-नौटंकी’ तो तहहयात करत रहतो आणि लोकं त्या ‘राजकीय-अंधश्रद्धे’ला बळी पडत रहातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन व ‘किमान-वेतन’ सन्मानजनक झाल्याखेरीज, उत्तरेचं नोकरपेशातलं आक्रमण थोपवल्याखेरीज आणि शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान, एक मकान” धोरण राबवून धनदांडग्या गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला रोखल्याखेरीज… ‘मराठी-माणसां’चं (जे महागड्या शहरांमधून निवासाची व व्यवसायाची संधि उपलब्ध नसल्यामुळे, बहुतांश दूरवर रहाणारे कामगार आहेत) भलं होणं शक्यच नाही, हे एखादं गल्लीतलं शेबडं पोरं पण जाणतं…पण, मी मी म्हणणारा कुठलाही मराठी-नेता (ज्यांच्याविषयी मराठी भाबडी जनता ‘राजकीय-अंधश्रद्धा’ बाळगून असते), असल्या व्यवस्थेच्या गाभ्यातील अथवा ‘मराठी-जगण्या’च्या आसाला भिडलेल्या मुद्द्यांवर चुकूनही काम करणं तर सोडाच; साधा उच्चारही करताना दिसणार नाहीत. तेव्हा, या राजकीय-अंधश्रद्धांना जोवर आपण मराठी-माणसं ‘मूठमाती’ देत नाही व स्वतःला सक्षम बनवत नाही, तोवर मराठी-माणसांचं पिढ्यानपिढ्या नुकसान होतच रहाणार आहे, मराठी-माणसं गुलामीत ढकलली जातच रहाणार आहेत… मराठी-माणसानं स्वतःला सक्षम बनवणं म्हणजे, “व्यक्ति आधारित कमी आणि धोरण आधारित जास्त राजकारण करणं!” अशा परखड शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी व्यसपीठावर, प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनपीएम’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय मं.गो., ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चे विश्वस्त दत्ता बाळसराफ, प्रा. मच्छिंद्र मुंडे उपस्थित होते. दरम्यान, समितीच्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंनिस’च्या केंद्रीय सदस्या सुशीला मुंडे यांनी केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे संजय दळवी, अनिल महाडिक, नरेंद्र शिंदे, रामसकल भर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेचा श्रध्दावंत सागर – कामगारहृदयसम्राट राजन राजेंना निष्ठेचा वंदन!
भारतातील पहिलावहिला पर्यावरणस्नेही हरित-पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला ‘धर्मराज्य पक्ष’ आणि कष्टकऱ्यांची लढाऊ संघटना असलेल्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात गुरुवार, दि. १० जुलै-२०२५ रोजी ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य आणि हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, “राजन राजे” या पंचाक्षरी मंत्रावर श्रध्दा असणाऱ्या निष्ठवंतांचा ओघ मात्र, आपल्या गुरुला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर सुरुच होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांच्या या प्रेमाने, ‘कामगारहृदयसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मा. राजन राजे यांचे हृदयदेखील भारावून गेले होते. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची, त्याच्या कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करुन, भरभरुन आशीर्वाद देत, मा. राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्था आणि धनदांडग्या-भांडवलदारी प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन संघर्षरत झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे सूतोवाच यानिमित्ताने केले. कामगार आणि शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेतच; परंतु, त्याचबरोबर हे दोन्ही घटक म्हणजे, देशाची सामाजिक व सांस्कृतिक ओळख असल्याची जाणीव मा. राजन राजे यांनी, आपल्या निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांना यावेळी करुन दिली. दरम्यान, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील, ‘सेऊ’ कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्रीमती मीनल मल्ल्या यांची निवड करण्यात येऊन, कामगार संघटनेत महिलांनादेखील सन्मानाचे स्थान देण्यात येत असल्याचे, यानिमित्ताने अभिमानास्पदरित्या अधोरेखित झाले.

तिसऱ्या भाषेच्या लबाडीविरोधात एल्गार – ‘मराठीकारण’ासाठी आझाद मैदानात हुंकार!
प्राथमिक अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून, हिंदीभाषा सक्तीचा समावेश जरी, राज्य शासनाने तूर्तास रद्द केला असला तरी, सरकारची ही शासकीय लबाडी असून, “लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल?” या घोषणेखाली, ‘शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती’चे आयोजक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. ७ जुलै-२०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, पक्षाचे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, काँग्रेसचे रोजगार विभाग प्रदेश संयोजक श्री. धनंजय शिंदे आणि ठाण्यातील मराठीप्रेमी वकील श्री. रशिकांत थोरवे आदी मान्यवरांसह, श्री. अविनाश सावंत, श्री. सुमित कदम, श्री. निलेश सावंत हे ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाचवीपर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉ. नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवण्यात यावी, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि SCERT संचालक राहुल रेखावार यांची हकालपट्टी करण्यात यावी, १५ मार्च २०२४चे नवीन संचमान्यता धोरण रद्द करावे, या मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक पवार आणि मा. राजन राजे यांच्यात महाराष्ट्रात शिक्षणाचे ‘मराठीकारण’ व मराठी भाषेच्या संरक्षण-संवर्धन चळवळीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
मराठीचं अस्तित्व, महाराष्ट्रधर्माचं रक्षण – हिंदीसक्तीविरोधात वैचारिक एल्गार!
———————————-
मराठी ही जगातील एकमेव निसर्ग-पर्यावरणस्नेही भाषा!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे मातृभाषेप्रती गौरवोद्गार…
———————————-
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसह, ठाणे आणि नवी मुंबईसोबतच, महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांतील येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने, राज्यातील हिंदी-भाषिकांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु केले असून, परप्रांतीयांची एकगठ्ठा मतं भाजपाच्या पारड्यात पाडून, मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा मनसुबा आता लपून राहिलेला नाही. मराठी माणसाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्क डावलण्याचे कारस्थान, दिल्ली-दरबारी शिजल्यानंतर महाराष्ट्रद्रोही भाजपाने आता, त्यासाठी कंबर कसून, आपले मराठीद्वेष्टे राजकारण सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राज्यभरातील शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून, हिंदीसक्तीचा निर्णय राज्यशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. यामाध्यमातून मराठीची गळचेपी करुन, महाराष्ट्राच्या अधिकृत राजभाषेला दुय्यम दर्जा देण्याचा कट आखला जात असतानाच, महाराष्ट्रातील समविचारी पक्ष आणि संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, या निर्णयाला कडाडून विरोध केला. ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे निमंत्रक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या पुढाकाराने, प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या, पर्यायाने हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठीप्रेमी नागरी समाज आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत अन्याय्य शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी आणि जाहीर सभेचे रविवार, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे अजित नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राजन राजे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’ची मराठीवादी भूमिका प्रकर्षाने मांडली. “संयुक्त महाराष्ट्रानंतर… आता, ‘स्वायत्त महाराष्ट्र’ ….राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त महाराष्ट्र’…. ‘शिवछत्रपती-राष्ट्र’ !!!” हीच आमची महाराष्ट्र-धर्माची खरीखुरी व्याख्या असून, राजकीयदृष्ट्या आमची ताकद कमी असली तरी, मराठी भाषा आणि मराठी माणूस या दोन गोष्टींबाबत, आम्ही कमालीचे कडवट आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या वतीने आपण सगळ्या अत्यंत उचित मागण्या मांडलेल्या आहेत. त्याला आमचा पूर्वी पाठिंबा होता, आजही आहे आणि यापुढेही राहील. आपला महत्त्वाचा मुद्दा भाषा संवर्धनाचा होता. भाषा संवर्धनाचा का? मराठी भाषेचं संवर्धन करायचं आणि कसं करायचं असे दोन मुद्दे होते. मला इथे सांगायला अभिमान वाटतोय, मराठी भाषा ही, आजच्या जागतिक-तापमानवाढीच्या पर्यावरणीय महासंकटाच्या काळात, एकमेव अशी निसर्ग आणि पर्यावर-स्नेही अशी भाषा आहे. कारण, याच भाषेत आपण “वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे” असं म्हणतो. आपले सणदेखील प्राणी, वनस्पती यांच्याशीच निगडीत आहेत. मग ती नागपंचमी असेल, बैलपोळा असेल, तुळशी-विवाह असेल, वटपौर्णिमा असेल… मला नाही वाटत, असे नैसर्गिक संस्कार इतर कुठल्या संस्कृतीत असतील. त्यामुळे मराठी भाषेच्या सक्तीसोबतच, आता तिची पर्यावरणीय महासंकटांच्या पार्श्वभुमीवर ‘भक्ती’ होण्याची खरी गरज आहे. जगभरात तिची दखल घेतली गेली पाहिजे, असे गौरवोद्गार राजन राजे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले.
ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध
ठाणे शहरात विकासकामांच्या नावाखाली, सर्वसामान्य करदात्या ठाणेकर नागरिकांची होणारी कुचंबणा, मेट्रो कामातील दिरंगाई, रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून निर्माण होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, यामुळे ठाणेकर जनता गेल्या काही वर्षांपासून हाल सहन करीत असून, याचाच निषेध करण्यासाठी ठाणे (शहर) जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने, जिल्हाध्यक्ष श्री. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवार, दि. २७ जून-२०२५ रोजी, घोडबंदर येथील आनंदनगर नाका, कासारवडवली येथे एकदिवसीय ‘लक्षवेधी-आंदोलन’ पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित राहून, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्प रखडलेला असल्याने, त्यामुळे घोडबंदर रस्त्यावर रोजचीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यातच अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरुन तयार केलेले रस्ते म्हणजे, अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. या संपूर्ण कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानेच, ठाणेकर नागरिक ‘करदाता’ असूनही, त्यांना त्यांच्या हक्काची नागरी-सुविधा मिळत नाही. याप्रकरणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरवा करण्यात येऊनही, ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन अक्षरशः गेंड्याच्या कातडीसारखे बनून राहिलेले आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळेच, आज ठाणेकरांच्या वाट्याला ही वेळ आली असल्याची टीका मा. राजन राजे यांनी यावेळी केली. दरम्यान, आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, सर्वसामान्य नागरिकांनी खऱ्याखुऱ्या ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजावावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी बोलताना केले.
मुंब्रा रेल्वे अपघातातील बळींना ‘धर्मराज्य पक्षा’ची श्रद्धांजली
मुंब्रा येथे रेल्वे अपघातात बळी पडलेल्या, प्रवाशांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ११ जून-२०२५ रोजी, ठाणे रेल्वे स्थानकपरिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी फलकांच्या माध्यमातून, रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि उदासीन भूमिकेविरोधात, निषेधाच्या घोषणा व्यक्त करीत, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नेतृत्व, पक्षाचे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. महेशसिंग ठाकूर, श्री. सचिन शेट्टी, ‘धर्मराज्य रिक्षा संघटने’चे श्री. रमेश रेड्डी, श्री. सुशीलकुमार चंद्रा आदी पदाधिकाऱ्यांसह, श्री. संजय दळवी, श्री. सोपान चौधरी, श्री. अमित लिबे, श्री. निलेश सावंत, श्री. अनिल डांगळ, श्री. सुनील जाधव, श्री. संतोष मोरे, श्री. सुनील डांगळ इत्यादी कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वाहतूक शाखेच्या टॉईंग व्हॅन घोटाळ्याविरोधात, ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर, जोरदार आंदोलन…
वाहतूक शाखेच्या टॉईंग व्हॅन घोटाळ्याविरोधात, ठाण्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. अजय जेया यांनी, दि. ७ जून-२०२५ रोजी, ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर, जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला ठाणेकर नागरिकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थित राहुन उदंड प्रतिसाद दिला. या सर्वपक्षीय आंदोलनात, ‘धर्मराज्य पक्षा’ने सक्रिय सहभाग घेतला होता. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष श्री. राजेश गडकर, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. सचिन शेट्टी आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मा. खासदार व शिवसेना नेते राजनजी विचारे यांची कनिष्ठ कन्या धनश्री, हिच्या वाङनिश्चय (साखरपुडा) सभारंभप्रसंगी
मा. खासदार व शिवसेना नेते राजनजी विचारे यांची कनिष्ठ कन्या धनश्री, हिच्या ‘ताज द् ट्रीज बॅन्क्वेट’मधील दि. ९ मे रोजीच्या वाङनिश्चय (साखरपुडा) सभारंभप्रसंगी गप्पा-हास्यविनोदात रंगलेल्या राजकीय नेत्यांची क्षणचित्रे