निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं... हे फक्त साधन आहे, साध्य नव्हे! अवघ्या जनतेच्या, सन्मानानं आणि समाधानाने जगण्याच्या आकांक्षांची पुर्तता करणं व निसर्गाकडून जेवढं घेऊ तेवढं निसर्गाला परत देऊ... हे आणि हेच, केवळ आमचं विश्वकल्याणकारी अंतिम ध्येय राहिलेलं आहे, अगदी आम्हा प्रत्येकाच्या अखेरच्या श्वासापर्यंत...
धर्म-जातीपाती-आरक्षणासारखी ‘रणं’ पेटती ठेवून सकळ राजकीय व्यवस्थेनं शिक्षण, आरोग्य, पायाभूतसुविधा इ. जनकल्याणकारी क्षेत्रातील आपली जबाबदारी झटकून टाकून, आपल्या स्वार्थासाठी खाजगी क्षेत्राला चरायला मोकळ रान दिलेलं आहे. त्याविरुध्दचा ‘धर्मराज्य पक्षा’चा लढा, हा जात-धर्म-निरपेक्ष ‘एल्गार’ आहे!
"संयुक्त-महाराष्ट्रानंतर 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्त-महाराष्ट्र" अशी परिपूर्ण संघराज्यीय तत्त्वप्रणाली राबवून भारतातील सर्व राज्यांना जास्तीतजास्त स्वायत्तता देण्यात यावी, तसेच प्रत्येक राज्याच्या भाषिक संस्कृतिचं जतन व संरक्षण करुन प्रत्येक राज्यात मातृभाषेला उत्तेजन व मातृभाषेतूनच न्याय, शिक्षण व सरकारी कामकाजाचा आग्रह.
संघटित-असंघटित कामगारक्षेत्रात, विशेषत: कंत्राटी कामगार प्रथेविरूध्द. या प्रथेला धर्मराज्य पक्ष सेवा व उद्योगक्षेत्रातली ‘नव-अस्पृश्यता’ व ‘गुलामगिरी’ मानतो. आजवर आम्ही दलित-बहुजनांचे टोकाचे लढे लढत आलेलो आहोत. कंत्राटदारीतल्या ‘नव-अस्पृश्यते’ विरुध्द प्रखर लढयासाठी देखील धर्मराज्य पक्ष कृतसंकल्प आहे.
राजकारणाची मैली-गंगा, अध्यात्माची ‘मात्रा’ देऊन शुध्द करण्याचा आमचा भगीरथ प्रयत्न राहील. आम्ही कुठलाही धर्म ही ‘अफूची गोळी’ न मानता, उलटपक्षी अन्यायी-संवेदनाशून्य, भ्रष्ट व विषम व्यवस्थेविरुध्द 'बंदुकीची गोळी' मानतो! देशात प्रथमच धर्मश्रध्दांचा प्रभावी वापर, आम्ही राजकारण-शुद्धीसाठी करु पहात आहोत.
शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली ‘चातुर्वर्ण्य’ व्यवस्था व आरोग्य व्यवस्थेत निर्माण झालेली ‘पंचतारांकित’ व्यवस्था मोडीत काढणे हे ‘धर्मराज्य पक्षा'चे ध्येय आहे. आजच्या महागडया खाजगी शिक्षण व आरोग्य व्यवस्थेऐवजी, स्वस्त व तेवढयाच उच्चदर्जाच्या सार्वजनिक भ्रष्टाचारमुक्त व कार्यक्षम शिक्षण व आरोग्य सुविधेला चालना.
गेल्या काही वर्षांपासून देशाची दोन पद्धतीत विभागणी झालीय…भारत आणि इंडिया! सव्वाशे कोटी लोकसंख्येपैकी ९० ते १०० कोटी जनता हि अजूनही रस्त्यावरच आहे. जे कोणी या लोकांचे हित साधतील, त्यांचे आपण स्वागतच केले पाहिजे. मी पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या सर्वसमावेशक विचारसरणीचे मनापासून स्वागत करतोय!
भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत. देशातील सर्वच पक्ष फक्त राजकारणच करीत असतात, समाजकारण नाही! मात्र, ‘धर्मराज्य पक्ष’ हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे, जो फक्त आणि फक्त अपेक्षित ‘समाजकारण’च करतो. ‘धर्मराज्य पक्षा’ला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
‘राजन राजे’ नावाच्या लढवय्या राजकीय व्यक्तिमत्वाला तळागाळापासून ते थेट सर्वोच्च स्थानापर्यंत नक्कीच भरभरुन यश मिळेल, याबाबत माझ्या मनात अजिबात संदेह नाही. मात्र पल्ला फार दूरचा आहे! सर्वसामान्यांच्या या लढयासाठी माझ्यावतीने ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘राजन राजे’ यांना अनेक शुभेच्छाशिर्वाद!