राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्यात ‘हुतात्मा दिन’ संपन्न!
धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात, डॉ. विवेक कोरडे व कॉ. आनंद तेलतुंबडे यांचे तडाखेबंद भाषण
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. ३० जानेवारी-२०२६ रोजी, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी, “गांधीहत्या आणि आपण…” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करुन, उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, आयटकचे काॅ. उदय चौधरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेत्या वंदनाताई शिंदे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. जावळे, समाजवादी नेते संजय मं. गो., जगदीश खैरालिया, आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, काँग्रेस ठाणे सचिव राहुल पिंगळे, ॲड. नाना अहिरे आदी मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी, आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना, गांधीहत्येमागील कारणे विषद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आरएसएसवर एकच शरसंधान साधले. महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते, उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता. ज्या आरएसएसने कधीही राष्ट्रध्वज स्विकारला नाही, त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे म्होरके होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुजारी होते, अशा शब्दांत डॉ. विवेक कोरडे यांनी आपले परखड मत मांडले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉ. आनंद तेलतुंबडे यांनीदेखील आरएसएसच्या विचारांवर एकच प्रहार केला. सद्यस्थितीत भारतातील जी राजकीय व सामाजिकव्यवस्था ढासळलेली आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की, “पुढील एकहजार वर्षे तरी भारतातून भाजपची सत्ता जाणार नाही, जोपर्यंत ते ठरवत नाहीत”, असा अपप्रचार होत असला; तरी त्यात बिलकूल तथ्य नाही…आपण सारे एकत्र आलो आणि त्यांचं सगळं साम्राज्य, हे फक्त आणि फक्त, खोटारडेपणाच्याच पायावर उभारलेलं आहे, हे ध्यानात घेऊन त्यावर एकत्रित व सनदशीर मार्गाने प्रहार केला; तर, ते सहजशक्य आहे. आज त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. राजन राजे यांच्यासारखी जी काही हाताच्या बोटावर काम करणारी मोजकी माणसं समाजात आहेत, त्यामुळेच भाजप-आरएसएससारख्या धर्मविद्वेशीशक्तींवर काही प्रमाणात का होईना, अंकुश आहे यातच समाधान असल्याचे प्रतिपादन कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी खास उपस्थिती लावून आपल्या पहाडी आवाजात कविता सादर केळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. शिरीष ढवळे यांनी केले तर, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

डॉ. दीपक पवारांच्या ‘मराठीनामा–मराठीकारण’ चळवळीला राजन राजेंचा जाहीर पाठींबा
मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी समाजाच्या हितासाठी, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे डॉ. दीपक पवार हे, गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन व चळवळींच्या माध्यमातून, प्रस्थापित मराठीद्वेष्ट्या-महाराष्ट्रद्रोही, भांडवली-राजकीय व्यवस्थेविरोधात, लोकशाही आणि सनदशीरमार्गाने संघर्ष करीत आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून, डॉ. दीपक पवार यांनी, दि. २ जानेवारी-२०२६ रोजी, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे पत्रकार परिषद घेऊन, “मराठीनामा आणि मराठीकारण” ही चळवळ नव्या जोमाने सुरु करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भूमिकेचे ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी समर्थन करुन, त्यांना आपला जाहीर पाठींबा व्यक्त केला आहे. त्याबाबतचे एक पत्रदेखील डॉ. दीपक पवार यांना लिहिले आहे. “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मुळावर येऊन, त्याला त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रात दुय्यम नागरिकत्वाचा शाप भोगावा लागत आहे!” असे रोखठोक प्रतिपादन करुन, “आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने, आपण तयार केलेला ‘मराठीनामा’ हा केवळ एका निवडणुकीपुरता जाहीरनामा न राहता, तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग व्हावा!” अशी अपेक्षा व्यक्त करीत, मा. राजन राजे यांनी आपल्या पत्रातून, डॉ. दीपक पवार यांना, त्यांच्या पुढील वाटचालीस व ‘मराठीकारणा’च्या चळवळीस अनेकोत्तम शुभेच्छा आणि संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे.
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी २०२६ रोजी महात्मा गांधीच्या जीवन-चरित्रावर परिसंवादाचे आयोजन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७व्या पुण्यतिथीनिमित्त, येत्या ३० जानेवारी-२०२६ रोजी, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने, ठाणे शहरातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे सायंकाळी ४ ते रात्रौ ८ वा.पर्यंत, महात्मा गांधींच्या जीवन-चरित्रावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. याच अनुषंगाने ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोर्डे व डॉ. सुरेश पंडित यांनी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात मा. राजन राजे यांची सदिच्छा भेट घेऊन, नियोजित कार्यक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा केली. परिसंवादाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यालयापासून ते मराठी ग्रंथ संग्रहालयापर्यंत महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एक फेरी काढण्यात येणार असल्याचे यावेळी चर्चेअंती ठरविण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. विवेक कोर्डे हे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन-चरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, या बैठकीला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव श्री. नरेंद्र पंडित आणि प्रवक्ते श्री. समीर चव्हाण उपस्थित होते.
ठाणे येथील धर्मराज्य पक्ष कार्यालयात दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी ‘वृत्तमानस’ दिनदर्शिकेचे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते प्रकाशन
मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मुंबईतील प्रतिष्ठीत वर्तमानपत्र असलेल्या ‘वृत्तमानस’ या दैनिकाचे मुद्रक/प्रकाशक श्री. भूषण म्हात्रे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची, पक्षाच्या ठाणे कार्यालयात सोमवार, दि. २९ डिसेंबर-२०२५ रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ‘वृत्तमानस’च्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री. भूषण म्हात्रे यांनी, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून जो लढा लोकशाही व सनदशीरमार्गाने सुरु आहे, त्याचे कौतुक केले. ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्य हे, इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक प्रामाणिक आणि ठोस असते, म्हणूनच ‘वृत्तमानस’ दैनिकात त्याबाबतची बातमी प्रकाशित करताना आम्हाला जास्त आनंद होतो, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. याच अनुषंगाने देशातील राजकीय सद्यस्थिती, भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून लादण्यात आलेले काळे कामगार कायदे. देशातील काढता धार्मिकविद्वेष, मराठी माणसाची होणारी गळचेपी, भूमिपुत्र शेतकऱ्यांवरील अन्याय, यावर मा. राजन राजे यांनी सविस्तर विवेचन केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आणि ‘वृत्तमानस’चे जाहिरात विभागातील कर्मचारी श्री. राजेंद्र शिर्के आदी मंडळी उपस्थित होती.
रोहा, धाटाव एमआयडीसी | रविवार, दि. २८.१२.२०२५ : कामगारांच्या बैठकीत राजन राजेंचे सडेतोड प्रतिपादन
कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं; तर, शोषक-अन्यायी भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही!
रोह्यातील कामगारांच्या बैठकीत, राजन राजे यांचे रोखठोक प्रतिपादन…
“कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे… कारण, “कामगार हाच खरा संपत्तीचा निर्माता आहे”. कामगारांनी ‘कामगारधर्म’ पाळला, एकमेकांशी स्नेहभाव जोपासून आपलं आत्मभान जागं केलं; तर, प्रस्थापित रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) शरण येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही!” असे रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा इथे केले. रविवार, दि. २८ डिसेंबर-२०२५ रोजी, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ आणि ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीतील कामगार सभासदांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांच्या जागी ११ ने भाग धेऊन ४ काळे कामगार कायदे आणले आणि कामगारांच्या जगण्याचाच अवघा ‘भागाकार’ केलाय!त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय.मराठी शाळांच्या आंदोलनात, राजन राजे यांचे रोखठोक प्रतिपादन… भैय्ये आणि गुजराथी भांडवलदार यांच्यात, मराठी माणसाचं सॅन्डविच झालंय!
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, मराठी शाळा बंद करण्याचा सपाटा महाराष्ट्र शासनाने सुरु केला असून, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत, मराठी शाळा बंद करुन, त्याठिकाणची जागा भांडवलदारांच्या घशात घालण्याचा मराठीद्रोही कट रचला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भ्रष्ट पालिका प्रशासन, भुमाफिया आणि कणाहीन राजकारणी यांच्या अभद्र युतीविरोधात, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली, मराठी शाळांसाठी दि. १८ डिसेंबर-२०२५ रोजी, हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कम्युनिष्ट नेते प्रकाश रेड्डी, डाव्या चळवळीतील विचारवंत अजित अभ्यंकर, पत्रकार युवराज मोहिते, पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रणाली राऊत, काँग्रेसच्या रोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय शिंदे, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे विवेक भुरके आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी मराठी शाळांसाठीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारुन दडपशाही सुरु केली. याचसंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे म्हणाले, “मराठी शाळांचे हे आंदोलन राजकीय नव्हे; तर, सामाजिक आहे. पोलिसांनी नियम व न्यायालयीन आदेश इतर राजकीय मंडळींनाही दाखवावेत, तेव्हा कुठे पोलिसांची दंडुकेशाही पेंड खायला जाते?” असा थेट प्रश्न उपस्थित करुन ते पुढे म्हणाले, “पोलीस-कर्मचारी जरी मराठी असले; तरी, बहुतांशी आयपीएस-आयएएस अधिकारी हे अमराठी असतात. त्यांच्याच आदेशावर खालचे लोक चालतात. पोलिसांच्या या फक्त काठ्याच नाहीत तर, भैय्यांच्या लाठ्या असून, खालच्या बाजूला परप्रांतीय भैय्ये आणि वरच्या बाजूला गुजराथी भांडवलदार यांच्यात मराठी माणसाचं सॅन्डविच झालेलं आहे… त्याच विरोधातला हा एल्गार आहे, तो रोखण्याचा प्रयत्न कशाला? काही हिंसक घडणार आहे का? असा सवाल विचारुन, रोखठोक प्रतिपादन केलं. दरम्यान, हुतात्मा स्मारक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंतच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, काहीवेळ कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ पोहोचल्यावर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत, आझाद मैदानात आणल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी सर्व वक्त्यांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी शेवटपर्यंत एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोर्चाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, सचिव नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, अविनाश सावंत, सचिन उगले आदी पदाधिकारी आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सदस्य उपस्थित होते.

दि. ५ डिसेंबर २०२५, रात्री ११ वाजता : महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांना अभिवादन, मा. राजन राजे यांची उपस्थिती
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला, दि. ५ डिसेंबर-२०२५ रोजी, रात्रौ ११ वाजताच्या सुमारास ठाणे शहरातील पंचगंगा सोसायटी-राबोडी येथील ‘संजीवनी बहुउद्देशीय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आणि त्यानंतर कोर्टनाका येथे, आंबेडकरी-नेते सुनील खांबे यांनी आयोजित केलेल्या, महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी उपस्थित राहुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्रस्मृतींस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भीमसैनिकांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हणाले की, “आजच्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ या भूमिकेच्या पलीकडे जाऊन, ‘समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणे अधिक गरजेचं असून, ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ किंवा ‘दलितांचा मसीहा’ या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं म्हणजे, ‘कोहिनूर हिऱ्या’ला अंगठीत कोंडून टाकण्यासारखे आहे. शिवछत्रपती असोत वा बाबासाहेब असोत, त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं ‘आर्थिक-उन्नयन’ करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी, शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान निश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा, ‘नांगरधारी’ शिवछत्रपती जे, न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे होते. हे जेवढे महात्त्वाचे; तितकेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही, ‘समतेचा संदेश’ देणारे बाबासाहेब जनसामान्यांसाठी अधिक महात्त्वाचे आहेत!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भाषणात मा. राजन राजे यांनी, कंत्राटी-कामगार पद्धत व केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘काळ्या-कामगार संहिते’वर एकच शरसंधान साधून, कामगारद्रोही भाजप सरकार आणि भांडवलधारी प्रस्थापित व्यवस्थेवर सडकून टीका केली. या अभिवादन कार्यक्रमाला पंचगंगा-राबोडी परिसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी तसेच, कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ मोठ्यासंख्येने भीमसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील नेते सुनील खांबे आणि संदीप खांबे यांनी केले होते.
संविधान दिनी कामगारविरोधी कायद्यांविरुद्ध देशव्यापी आंदोलन; ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’सह विविध संघटनांचे ठाण्यात राष्ट्रपतींना निवेदन
कामगारांच्या हिताचे कायदे रद्दबातल ठरवून, त्याठिकाणी कामगारविरोधी व मालकधार्जिणे चार काळे-कायदे लादून, देशभरातील श्रमिकांना गुलामगिरीत ढकलण्याचं महापातक, केंद्र सरकारकडून घडलेलं असून, त्याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी ‘संविधान दिना’चे औचित्य साधून, देशभरातील कामगार संघटनांनी, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, संपूर्ण भारतात निदर्शने/आंदोलने केली. त्याच पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समिती’च्या वतीने, भारताच्या राष्ट्रपतींना, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून, दि. २६ नोव्हेंबर-२०२५ रोजी, निवेदन देण्यात आले. सदर निवेदन ठाण्याचे अपर-जिल्हाधिकारी श्री. हरिश्चंद्र पाटील यांनी स्विकारले. याप्रसंगी ‘सर्व श्रमिक संघा’चे अध्यक्ष रवी नायर, ‘टीयूसीआय’चे अध्यक्ष रवी जोशी, ‘भारतीय महिला फेडरेशन’च्या कार्याध्यक्षा निर्मला पवार, ‘आयटक’चे कार्याध्यक्ष उदय चौधरी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कार्यालय-प्रमुख संजय दळवी, ‘सीमेन्स वर्कर्स युनियन’चे अध्यक्ष मनोज बोडके, ‘श्रमिक जनता संघा’चे अध्यक्ष जगदीश खैरालिया, ‘ठाणे जिल्हा मध्यवर्ती शासकीय कर्मचारी महासंघा’च्या अध्यक्षा श्रीमती पुजारी, ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन’चे कार्याध्यक्ष राजेश सिंग आणि ‘राज्य सहकारी मध्यवर्ती संघटने’चे अध्यक्ष भास्कर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
