भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, “ईव्हीएम हटाव… देश बचाव… बॅलेट-पेपर लाव” या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती मा. बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते मा. फिरोज मिठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. धनंजय शिंदे, मा. मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच मा. रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते. दरम्यान, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन मा. राजन राजे यांनी उपस्थित मान्यवरांना केले.
