खड्डयांच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठा.म.प मुख्यालयवर ‘हेल्मेट मोर्चा…!

ठाण्यातील खड्डयांबाबत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी ‘धर्मराज्य पक्षा’ला दिले दुरुस्तीचे आश्वासन…!
ठाणे शहरातील पडलेल्या खड्डयांबाबत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अभिनव पद्धतीच्या ‘हेल्मेट मोर्चा’ला ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करुन चिंतामणी चौक ते ठाणे महापालिका मुख्यालयावर हातात ठाण्यातील खड्डयांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन धडक मारली. ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामाध्यमातून होणा-या अपघातांना महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आला. शहरातील नवीन व जुन्या रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करणे, रस्त्यांची निकृष्ठ दर्जाची कामे करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, त्यांच्यावर दंडात्मक करणे, सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या गॅरेज आणि जुन्या मोटारी विकणा-यांवर कायदेशीर कारवाई करुन, ठाण्यातील सर्व रस्ते तसेच पदपथ मोकळे करणे अशा मागण्या आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी गणेशोत्सवापूर्वी ठाण्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व्हिस रस्त्यावर असलेले अनधिकृत गॅरेज आणि जुन्या गाड्यांची विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाच्या पदाधिका-यां समोर मान्य केले.
दरम्यान याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, महेशसिंग ठाकूर, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष प्रा. भरत जाधव, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा सह-सचिव दर्शना पाटील, सदस्या उज्ज्वला जाधव या महिला आणि पुरुष पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेकर नागरिकांनी विशेषतः दुचाकीधारकांनी या अभिनव ‘हेल्मेट मोर्चा’बद्दल समाधान व्यक्त करुन, पक्षाच्या या उपक्रमाबाबत आभार मानले.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!