तिसऱ्या भाषेच्या लबाडीविरोधात एल्गार – ‘मराठीकारण’ासाठी आझाद मैदानात हुंकार!

प्राथमिक अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून, हिंदीभाषा सक्तीचा समावेश जरी, राज्य शासनाने तूर्तास रद्द केला असला तरी, सरकारची ही शासकीय लबाडी असून, “लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल?” या घोषणेखाली, ‘शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती’चे आयोजक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. ७ जुलै-२०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, पक्षाचे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, काँग्रेसचे रोजगार विभाग प्रदेश संयोजक श्री. धनंजय शिंदे आणि ठाण्यातील मराठीप्रेमी वकील श्री. रशिकांत थोरवे आदी मान्यवरांसह, श्री. अविनाश सावंत, श्री. सुमित कदम, श्री. निलेश सावंत हे ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाचवीपर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉ. नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवण्यात यावी, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि SCERT संचालक राहुल रेखावार यांची हकालपट्टी करण्यात यावी, १५ मार्च २०२४चे नवीन संचमान्यता धोरण रद्द करावे, या मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक पवार आणि मा. राजन राजे यांच्यात महाराष्ट्रात शिक्षणाचे ‘मराठीकारण’ व मराठी भाषेच्या संरक्षण-संवर्धन चळवळीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!