राज्यशासनाच्या हिंदीसक्तीविरोधात, मराठी अभ्यास केंद्र यांच्या वतीने, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, माकपचे मा. अनिल नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मा. राजन राजे यांनी, आपल्या ओघवत्या शैलीत आपले विचार आक्रमकपणे उपस्थितांसमोर मांडले…
———————————-
मराठी ही जगातील एकमेव निसर्ग-पर्यावरणस्नेही भाषा!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे मातृभाषेप्रती गौरवोद्गार…
———————————-


दरम्यान, आपल्या ओघवत्या शैलीत ‘धर्मराज्य पक्षा’ची भूमिका अधिक ठळकपणे विषद करताना, राजन राजे पुढे म्हणाले, मराठी भाषेवर वेगवेगळ्या भाषांचे आक्रमण होतंय, संक्रमण होतंय… ते, का आणि कशासाठी होतंय हे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. मुलांवरील अभ्यासाचं दडपण आपण कमी केलं पाहिजे, गणित आणि विज्ञान हे विषय अत्यंत गुंतागुंतीचे होत चाललेत. त्यातच रेशीम बागेतून आमचा इतिहासदेखील त्यात खोटेपणा घुसडवून गुंतागुंतीचा केला जातोय…खोटेपणा घुसवून इतिहास तर बदललाच; पण, आमचा भूगोलही बदलला…लडाखच्या गलवान खोऱ्यातला आमचा चार हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश, चीनला दान देऊन! त्यातच आणखी तिसऱ्या भाषेचं दडपण, आमच्या मुलांच्या बालमनावर बिलकुल येता कामा नये. हिंदीचं शिक्षण घ्यायचं असेल; तर, काळजी करायची गरज नाही, सक्ती तर अजिबात करायची नाही… कारण, त्याची काळजी ‘बॉलिवूड’ घेत आहे. मुलं आपसूकच हिंदी शिकतील ना, त्यासाठी शाळेतून सक्ती कशाला? शिवाय, महाराष्ट्रात घुसलेले करोडो उत्तर भारतीय आहेतच ती काळजी घ्यातला, अशा उपरोधिकपणे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… पण, आपल्याला ही बाजारपेठेतील किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं असून, त्यासाठी भांडवली व्यवस्थेला हादरे द्यावे लागतील. हा प्रश्न फक्त हिंदीभाषिक म्हणून उत्तर-भारतीयांपुरता मर्यादित नाहीये; तर, गुजराती आणि मारवाडी यांच्या भांडवली-व्यवस्थेला हादरा देण्याचा सुद्धा आहे आणि म्हणूनच, अनेक गोष्टींसोबत कंत्राटी-कामगारपद्धतीचं उच्चाटन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. देशासोबतच, प्रामुख्याने महाराष्ट्रासमोरील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या गुजराथी-भाषिकांच्या भांडवली व्यवस्थेला हादरे दिलेत, तरच तुमची मराठी भाषा आणि मराठी माणूस सुरक्षित राहील, नाहीतर त्याचं महाराष्ट्रातून उच्चाटन होईल. अनेक आंदोलनं करताना, पर्यावरणीय महासंकटाच्या संदर्भात आम्हाला सांगितलं जातं की, कोण कुठे जन्माला येतो हा अपघात असतो. कोण कोकणात जन्माला येतो तर, कोण आणखी कुठे जन्माला येतो; मग, आमच्या सगळ्यांचा महाराष्ट्रातला जन्मसुद्धा एकदाचा अपघात ठरवा आणि आम्हाला अरबी समुद्रात ढकला… नाहीतरी, आमच्या महापुरुषांचा पुतळा तुम्ही अरबी समुद्रात उभारत आहातच. मराठी तरुणतरुणींचे संसार आणि व्यवसाय फुलण्यासाठी (मुं.ठा.पु.रा.ना. म्हणजेच, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक अन् नागपूर) शहरं मोकळी करुन घ्यावी लागतील….आपल्याला पुढे भविष्यात दरडोई प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान-एक मकान” अशी कडक धोरणं राबवावी लागतील…तरच आणि तरच महाराष्ट्रात मराठी माणसाचा बोलबाला होईल, मराठी भाषेला पुन्हा एकदा कायमस्वरुपी महत्त्व प्राप्त होईल. गुजराथी माणसं हिंदी बोलतात, गुजराथी माणसं इंग्लिश बोलायला लागले तरी, गुजरातचे महत्त्व कमी होणार नाही… कारण, भारताची संपूर्ण अर्थव्यवस्थाच त्यांच्या ताब्यात आहे. आम्ही पाचवीपासून इंग्लिश शिकलो. पण, उत्तम इंग्लिश बोलू शकतो, भाषण करू शकतो, उत्तम लिखाण करू शकतो. थोडं इकडे तिकडे होईल, काही फरक पडत नाही. सध्याच्या AI गुगल-भाषांतराच्या तंत्रज्ञानाने इंग्रजीसह विविध भाषांमधील भाषांतरं सोपी झालेली आहेत…त्यामुळे, आपण जी सगळी धोरणं घेतलेली आहेत, ती अनुपम आहेत, योग्य आहेत आणि त्याला आमचा सदैव पाठिंबा राहील, हे या व्यासपीठावरून आम्ही जाहीर करतो, अशा शब्दांत राजन राजे यांनी, आपले मनोगत व्यक्त करुन, भविष्यातील मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले.