मराठी राजभाषा दिनानिमित्त राजन राजे यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन ! ● सेंद्रिय शेती, निसर्गरक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत केले मार्गदर्शन.
वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रदेशी साजरा करण्यात येतो. याच अभिमानास्पद दिवसाचे औचित्य साधून ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या साखरे-साजगाव येथील त्यांच्या शेतघराच्या प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीसाठी आलेल्या शेकडो शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वनभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील शिक्षकवृंददेखील उपस्थित होता. विद्यार्थीवर्गाला शालेय जीवनापासूनच निसर्गरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे महत्व कळावे, यासाठीच या वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. राजन राजे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःहून शेतघर परिसरातील विविध झाडे, वनस्पतींची माहिती दिली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी, याबरोबरच ऊस, द्राक्ष, फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यात आली.
दरम्यान, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सहल फक्त मनोरंजनात्मकच नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाची कवाडे उघडणारी ठरली. यानिमित्ताने शेती कशी करावी? सेंद्रिय शेती म्हणजे काय? निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाचे संवर्धन म्हणजे नक्की काय, त्याचे मानवी जीवनातील नेमके महत्व किती? याची सखोल माहिती मा. श्री. राजन राजे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख असणारा ‘धर्मराज्य पक्ष’ फक्त निवडणुकांचेच राजकारण करीत नसून, तर तो सातत्याने पर्यावरणच्या माध्यमातून ‘निसर्गकारण’ करीत असतो, हेच मराठी राजभाषा दिनाच्या माध्यमातून व शालेय सहलीच्या निमित्ताने अधोरेखित झाले. वनभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर मा. श्री. राजन राजे यांनी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या गुळाची प्रत्येकी १ किलोची ढेप भेट म्हणून दिली. यावेळी विद्यार्थीवर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा टवटवीतपणा स्पष्टपणे दिसत होता. “शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली ही सहल खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. जी गोष्ट आम्ही शाळेत पुस्तकीरुपात शिकवतो, तीच आमच्या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्षात शिकायला मिळाली.” अशा भावना व्यक्त करून शिक्षकवृंदाने मा. श्री. राजन राजे यांचे आभार मानले. याप्रसंगी राजे यांच्या सुकन्या ऋचा राजे आवर्जूनउपस्थित होत्या. त्याचबरोबर तुकाराम हलपतराव, धनाजी हलपतराव, विश्वनाथ मोरे आदी मंडळी उपस्थित होती.