शिक्षणक्षेत्रात कंत्राटीकरण आल्यानंतरच, ‘सरां’चं चुलीतलं ‘सरपण’ झालं! धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे यांचा, प्रस्थापित भांडवली व्यवस्थेवर जोरदार घणाघात…

“शिक्षण आणि आरोग्य, या सार्वजनिकक्षेत्रातल्या बाबी आहेत… मात्र, आपल्या या देशात अशी कुठली परिस्थिती उद्भवलीय की, सार्वजनिक शाळांमध्ये लोक जायला तयार नाहीत. सरकार आणि भांडवली-व्यवस्था, सार्वजनिक शिक्षणसंस्था उभारायला तयार नाहीत, एवढी शिक्षणक्षेत्रातली नितीमत्ता खालावलीय. एक नवा ‘चातुर्वर्ण्य’ उभा राहिलाय की, ज्यात माझ्या मराठी श्रमिकांची मुलं, संसाधनसंपन्न अशा श्रीमंत शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत; कारण, लाखो रुपयांच्या फी आहेत या शाळांच्या. दुर्दैवाने, संपूर्ण शिक्षणक्षेत्राला एकप्रकारची वाळवी लागलेली आहे. त्यातलीच एक कीड म्हणजे, कंत्राटीपद्धत. शिक्षणक्षेत्रात कंत्राटीपद्धत आल्यानंतर आणि शिक्षक कंत्राटावर नेमले जाऊ लागल्यानंतर, ‘सरां’चं चुलीत घालणारं ‘सरपण’ कधी झालं, ते आम्हाला कळलंदेखील नाही. सध्याची शिक्षणाची जी काही शोचनीय अवस्था झालीय ती यामुळेच…दळवी सर व दळवीबाई या दांपत्याने आणि तुम्ही सार्या शिक्षकवृंदाने निम्न आर्थिकस्तरातील पालकांचा स्नेहभावाने हात हातात धरुन…ज्या प्रकारची जातिवंत ‘मराठी-संस्कृती’ इथे रुजवलीय-वाढवलीय, ती पाहून मी मनापासून धन्य झालो. संपूर्ण शिक्षण-क्षेत्राला वेड्यावाकड्या पद्धतीने नफा कमावण्याची ‘भांडवली-वाळवी’ लागली असताना… ‘दळवी-दांपत्य’ सेवेभावे करत असलेलं काम मोठं आहे!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केला. कल्याणमधील प्रतिष्ठित शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, एस.डी.एल.के. एज्युकेशन ट्रस्ट संचालित, द्वारका विद्यामंदिर आणि बालविकास मंदिर या विद्यालयांच्या १५व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुढे बोलताना राजन राजे म्हणाले की, भांडवलदार आणि धनदांडग्यांच्या गेल्या दोन-तीन पिढ्यांनी, या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलेलं आहे. त्यांच्यामुळेच ८० ते ९० टक्के असलेल्या मराठी श्रमिकवर्गाला अत्यंत तुटपुंजे वेतन दिलं जातंय… आणि म्हणूनच, आम्ही कामगारक्षेत्रात काम करत असताना आणि पुढे राजकारणात कंत्राटीपद्धतीविरुद्ध आवाज उठवताना, या रक्तपिपासू शोषक-व्यवस्थेला ठामपणे नव-अस्पृश्यता व नवी गुलामगिरी संबोधतो, ज्याच्याविरोधात एकही राजकीय पक्ष बोलू शकत नाही; कारण, दुर्दैवाने कुठेतरी भांडवली व्यवस्थेशी त्यांचे हात बांधलेले असतात. माझ्या मराठी भगिनीला, तिचा नवरा कंत्राटी कामगार असल्याने, त्याचा दहा-बारा हजारांचा पगार पुरत नाही. त्याच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून, आम्ही कामगारक्षेत्रात एक घोषणा दिलीय, “किमान वेतन ४० हजार रुपये प्रतिमास… न देणाऱ्यास तुरुंगवास” …आणि मित्रांनो, तुम्हाला अभिमानाने सांगतोय, यातून एक चळवळ उभी राहिलीय. भविष्यात आम्ही कुठल्या पद्धतीचा देश, या मुलांच्या हाती सोपवणार आहोत? हीच आमच्या समोरची मोठी चिंता आहे. महाराष्ट्रातील माझी मराठी मुलं, उच्चशिक्षित होवोत न होवोत… प्रत्येक मुलगा डॉक्टर-इंजिनियर झालाच पाहिजे, याची आवश्यकता नाही; पण झालाच तर आनंदच आहे. मात्र, झालात न झालात आणि साधे कामगार जरी झालात, तरी तुम्हाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. या देशातली आर्थिक-विषमता रोखली गेली पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा-संदेश व्यवहारात उतरला पाहिजे, यासाठीच आम्ही काम करीत आहोत. मराठी माणसाच्या हातातून महाराष्ट्राची माती निसटू नये यासाठी, आम्हाला डोळ्यात तेल घालून काम करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही नेटानं करतो आहोत, असा दुर्दम्य आशावाद राजन राजे यांनी यावेळी बोलून दाखवला.
दरम्यान, एस.डी.एल.के. एज्युकेशन ट्रस्ट संचालित, द्वारका विद्यामंदिर आणि बालविकास मंदिर या विद्यालयांचे संस्थापक/अध्यक्ष डी.बी. दळवी आणि मुख्याद्यापिका मीरा दळवी या दाम्पत्याचे ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, तोंडभरुन कौतुक केले. तुम्ही उभयता, समर्पित भावनेनं काम करीत आहात, ज्यामुळे आमचा उर निश्चितपणे अभिमानाने भरुन आल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभाच्या याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्षा’चे खजिनदार अजित सावंत, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, माजी जीएसटी आयुक्त जे.एल. पांडे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, समाजसेवक विनोद मिश्रा, नांदिवलीचे माजी सरपंच पंढरीशेठ ढोणे, बिर्ला महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सुनील फडके, राष्ट्रीय कुस्ती पंच संघटनेचे अध्यक्ष सुभाष ढोणे, द्वारका विद्यामंदिराचे शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष संतोष खामकर, कल्याण युवा सेना अध्यक्ष प्रतिक पाटील, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष प्रशांत भामरे, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, समाजसेवक रामदास ढोणे, कल्याण जिल्हा शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण जगे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, द्वारका विद्यामंदिराच्या सीमा दळवी, गौरी देवधर आणि बालविकास मंदिराचे मुख्याद्यापक प्रकाश धानके यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!