‘हिवा इंडिया’ कंपनीत भव्यदिव्य त्रैवार्षिक करार !

“ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात……”
राजन राजेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास रचला…!!!

एकीकडे नवी मुंबईतील दिघा येथील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना ऐन गणेशोत्सवात दीड ते दोन लाखांच्या दरम्यान बोनस देऊन त्यांची दिवाळी साजरी झालेली असतानाच, नुकत्याच साजऱ्या झालेल्या दिवाळसणाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून नवी मुंबईस्थित महापे येथील ‘हिवा इंडिया’ कंपनीतदेखील भव्यदिव्य असा, तब्बल १२ हजार १०० रुपये पगारवाढीचा त्रैवार्षिक करार ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होऊन पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात येऊन कंपनीतील एकूण ७२ कंत्राटी कामगार कायम झाले आहेत. या करारामुळे गेली अनेक वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या कामगारांना हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळून, त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना कमीतकमी ५० हजार, तर जास्तीतजास्त ६५ हजार इतकी दरमहा पगारवाढ झाली असून, बोनस म्हणून कमीतकमी ६० हजार, तर जास्तीतजास्त ८० हजार रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदानासहित कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे ‘हिवा इंडिया’ कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटी नोकरीच्या गुलामगिरीत खितपत पडलेले कामगार आज खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ झालेले असून, आम्हाला स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मा. श्री. राजन राजे साहेबांनाच जाते, अशा शब्दांत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, गेल्या ३६ वर्षांपासून कामगारक्षेत्रात कार्यरत असलेल्या राजन राजे यांनी, तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळात हजारो कामगारांना समृद्धीचा मार्ग दाखवलाय. कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी व्यवस्थापनाशी आणि भांडवलदारी व्यवस्थेशी त्यांनी प्राणपणाने संघर्ष केलाय. गुलामगिरीचे प्रतीक असलेली कंत्राटीपद्धती ही कामगारक्षेत्रातील नव-अस्पृश्यता असल्यामुळे राजे यांनी सुरुवातीपासूनच या प्रथेविरुद्ध लढा उभारला व तो यशस्वीही करून दाखवला. ‘हिवा इंडिया’ कंपनीचा भव्यदिव्य त्रैवार्षिक करार हा उल्लेखनीय असला, तरी या कंपनीतील ७२ कंत्राटी-कामगार गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाले, हेच माझ्या आतापर्यंतच्या संघर्षाचं फलित असल्याची प्रतिक्रिया राजन राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ऐन दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवार, दि. ५ नोव्हेंबर-२०१८ रोजी पार पडलेल्या या काराराप्रसंगी ‘हिवा इंडिया’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद गांगुली हेदेखील उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि खजिनदार अण्णा साळुंखे या पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक करारान्वये १२ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांचे वेतनमान उंचावले असून, याबाबत ‘हिवा इंडिया’च्या समस्त कामगारांनी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे जाहीर आभार व्यक्त करून एकच जल्लोष केला.

" , , , ,

No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!