Month: November 2011

धर्मराज्य पक्ष स्थापना…

, ,

दि. १६ नोव्हेंबर २०११ रोजी आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना झाली.

बुधवार, दि.१६ नोव्हेंबर-२०११ रोजी ‘धर्मराज्य’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना व उदघाटन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष-राजन राजे, सरचिटणीस-राजू फणसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपाल दुखंडे, माजी न्यायमूर्ती/जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बी.जी.कोळसेपाटील, ‘अर्थक्रांती’ प्रतिष्ठानचे अध्वर्यु श्री. यमाजी मालकर, पक्षाचे खजिनदार श्री. जयेंद्र जोग, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते श्री. रघुनाथदादा पाटील यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याजवळ दिप-प्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

उपस्थित मान्यवर आणि जनता जनार्दनाच्या साक्षीने पक्षाचा नामफलक, मुद्रा आणि झेंड्याचे अनावरण करून ‘धर्मराज्य पक्षा’ची मुहूर्तमेढ रोवली. नंतर ‘धर्मराज्य पक्षा’चे ब्रीद असलेली प्रतिज्ञा उद्धृत करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस श्री. राजू फणसे यांनी सुमारे ६५ कार्यकर्त्यांना नियुक्ती-पत्र देऊन त्यांच्या प्राथमिक नेमणूका झाल्याचे घोषित केले. नियुक्ती-पत्र मिळालेल्या सर्व पदाधिकार्यांना प्रा.गोपाल दुखंडे यांनी शपथ दिली. पक्षाच्या उदघाटन सोहळ्यामद्धे महापुरुषांचे पुतळे न ठेवता हुतात्म्यांचा पुतळा ठेवण्यामागील पक्षाची भूमिका सरचिटणीस राजू फणसे यांनी स्पष्ट केली व सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्यात येईल.

याबाबतचे विवेचन केले. प्रा.गोपाळ दुखंडे यांनी आपल्या भाषणात सध्याची राजकीय परिस्थिती, राजकीय पक्ष व त्यांचे नेते यावर कडक ताशेरे ओढले. तसेच धर्मराज्य पक्षाकडून जनतेची खूप अपेक्षा आहे असे सांगून पक्षाच्या वाटचालीला आशीर्वाद दिले.

१% राजकीय व आर्थिक शासकवर्गानं ९९% बहुसंख्यांकांवर लादलेलं ‘पारतंत्र्य’… लादलेली गुलामगिरी मोडून काढून खऱ्याखुऱ्या ‘सामाजिक लोकशाही’तल्या कल्याणकारी स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर राजकीय संस्कृतिची नव्यानं उभारणी करणाऱ्या एका जाज्वल्य राजकीय पक्षाची स्थापना होणं… नव्या सकस-जातिवंत राजकीय रोपटयाच रोपण होणं, ही काळाची गरज बनली होत़ी !

‘जशी उक्ति तशी कृती’ या न्यायाने ‘धर्मराज्य पक्ष’ चालणार असून त्याच्या नावातच सारंरूपाने तो नैसर्गिक तत्वाच्या मुल्यांवर आधारीत असा पक्ष आहे. पक्षाच्या ध्वजाच्या रंगांमधील लाल रंग हा क्रांतीदर्शी, तर पांढरा रंग हा सप्तरंगांनी बनलेला म्हणून सर्वसमावेशक व उर्जावान, हिरवा रंग निसर्गाशी तादात्म्य दाखविणारा तर निळा रंग हा महासागराची व आभाळाची विशालता व गांभीर्य दाखविणारा तर भगवा रंग हा चैतन्याशी व आध्यात्म्याशी निगडीत असणारा आहे. झेंडयाच्या मध्यभागी असणारे भगव्या रंगाचे चक्र हे श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचे प्रतिक असून ‘धर्मराज्य पक्षा’चा तात्विक पाया (धार्मिक नव्हे!) हा युगंधर श्रीकृष्णाच्या कळीकाळाला व्यापून उरणाऱ्या तत्वज्ञानावर आधारलेला आहे, हे दर्शविते. कुठल्याही राज्यव्यवस्थेचं, मानवी आकांक्षांचा सन्मान राखणं हे मुख्य काम असतं. गेले शतकभर भांडवलशाहीविरुद्ध साम्यवाद (कम्युनिझम्) हा सामान्य माणसाच्या हितरक्षणासाठी स्वीकारलेल्या दोन विचार-प्रणालींचा संघर्ष चालू आहे. सामान्य माणूस संपला – उध्वस्त झाला. हा संघर्ष आजही संपलेला नाही. म्हणून जणू मानवी मर्कटलिलांवर संतप्त होत निसर्गाने आपला तिसरा डोळा उघडून येत्या काही दशकात हा संघर्ष मिटवायला घेतल्याची दु:चिन्हे आहेत. मानव जातीपुढे जागतिक तापमान वाढ, जैविक बहुविधतेचा ऱ्हास व रासायनिक प्रदूषण अशी महाभयंकर पर्यावरणीय संकटे उभी ठाकलेली आहेत. टोकाचे मानवी शोषण व निसर्गाचे शोषण याबाबत दुरदर्शीपणे ठाम व कठोर भूमिका घेण्याची तयारी व राजकीय इच्छाशक्ती भारतातील राजकीय पक्ष दाखवत नसल्याने हि जबाबदारी ‘धर्मराज्य पक्ष’ स्वीकारीत आहे.

अण्णा हजारेंच्या ‘जनलोकपाल’ विधेयकाला आणि श्री अनिल बोकिलांच्या ‘अर्थक्रांती’ संकल्पनेला पूर्ण पाठींबा, औद्योगिक सेवाक्षेत्रातील अस्पृश्यता व गुलामगिरी बनलेल्या मजूर-कंत्राटदारी पद्धतीचं समुळ उच्चाटन व विध्वंसक अणूऊर्जेला विरोध तसेच शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांमधील बेलगाम खाजगी करणाला तीव्र विरोध हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत.परिपूर्ण संघराज्यीय पद्धतीनुसार ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. महाराष्ट्र’ या तत्वावर सर्वच राज्यांना जास्तीत जास्त स्वायतत्ता देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी असेल.

error: Content is protected !!