ठाणे (प्रतिनिधी): यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या ‘यवतमाळ पब्लिक स्कूल’मधील, अल्पवयीन विद्यार्थिनींचे शाळेतील शिक्षकांनीच लैंगिक शोषण केल्याची संतापजनक आणि घृणास्पद घटना घडलेली असल्याने, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असून, विद्यादानासारख्या पवित्र क्षेत्रात घडलेल्या या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेलाय. गेल्या काही
महिन्यात राज्यातील विविध ठिकाणी, अल्पवयीन विद्यार्थिनींचे शाळेच्या आवारात लैंगिक शोषण होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे कि नाही याबाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, या घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मंगळवारी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर (पश्चिम), वाहतूक पोलीस चौकीशेजारील पदपथावर निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक केली असली तरी, बलात्कारी प्रवृत्तीला संरक्षण देणाऱ्या संपूर्ण दर्डा कुटुंबियांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.
दरम्यान स्वतःच्याच शाळेतील १४ अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण हे फक्त शिक्षकी पेशालाच नव्हे, तर अवघ्या मानवजातीलाच काळीमा फासणारे दुष्कर्म असून, विजय दर्डा यांची ‘काँग्रेसी संस्कृती’ हीच का ? असा सवाल यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना उपस्थित केला. दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध भागातील शाळांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. याचाच अर्थ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक आता गुंडांबरोबर शिक्षण क्षेत्रातील नराधमांनादेखील राहिलेला नसल्याचा आरोप यावेळी राजेश गडकर यांनी केला. या घृणास्पद घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी तसेच याप्रकरणी संपूर्ण दर्डा कुटुंबियांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने आक्रमकपणे करण्यात आली. या निदर्शनावेळी ठाणे स्टेशन परिसरातील नागरीकांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवून घंटानाद करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, मुरबाड विधानसभा अध्यक्ष भरत हलपतराव, ठाणे विधानसभा सचिव विजय भोसले, सह-सचिव चंद्रकांत येरुणकर, नौपाडा प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, लोकमान्य नगर प्रभाग अध्यक्ष महेश क्षीरसागर, पाचपाखाडी प्रभाग अध्यक्ष अमित लीबे, ‘धर्मराज्य शिक्षक शिक्षकेतर संघटने’च्या महासचिव साक्षी शिंदे, पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव दर्शना पाटील,नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, रुपेश पवार, दिनेश चिकणे, नितीन उगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. निदर्शनाच्या या कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.