Day: March 19, 2014

धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी

जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल-चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

चिमण्या, या पर्यावरणातील बदलांबाबत खूपच संवेदनशील असतात. धूर, दूषित पाणी, कर्णकर्कश आवाज, मोबाईल फोनची किरणे, प्रदूषित वातावरण, चिमण्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. जगभरात चिमण्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी, शिसारहित पेट्रोलमध्ये ‘मिथेल टेरिटेरी ब्यूटेल इथर’ या अॅण्टी नॉकिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या पदार्थामुळे लहान पिलांसाठी पोषक असलेले वातावरणातील लहान किडे मारले जातात. लहान वयात हे किडे न मिळाल्यामुळे चिमण्यांचा बालमृत्यू दर वाढला आहे. वृक्षतोडीमुळे झाडे, गवत, पालापाचोळा उपलब्ध नाही. यामुळे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही आणि घरटे तयार करण्यासाठी कच्चा मालही उपलब्ध नाही! सिमेंटच्या घरांमुळे घराबाहेरही घरट्यांसाठी जागा नाही!! पूर्वी अंगणात धान्य वाळवले जात असे. अंगणातच भांडी धुतली जायची यामुळे धान्य आणि अन्नाचे कण हे चिमण्यांचे खाद्या असायचे पण फ्लॅट संस्कृतीमुळे घराला अंगण राहिलेले नाही. झाडांवर जागा नाही आणि बाहेर ससाणा&कावळा सारख्या शत्रूंचा सामना तर साप, इतर पक्ष्यांमुळे चिमण्यांची अंडी भक्ष्य बनलेली! यामुळे आपल्या मित्रांना आपण शत्रूंच्या हाती सोपविलेय! गेल्या 10 वर्षात भारतातील शहरी भागात चिमण्यांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत तर ग्रामिण भागात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घटली आहे, अशी दाहक स्थिती असल्याचं राजन राजे यांनी स्पष्ट केलं.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ‘चिमणी’ हा निसर्गाचा अत्यंत आवश्यक घटक आहे. यामुळे चिमण्यांच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आपली आहे. यासाठी 20 मार्च जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पर्यावरण संरक्षणासाठी, वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’ वाटून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जाणार आहे. ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे सतत तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रिकाम्या खोक्यांना छिद्र पाडून, बोळके, रिकाम्या बाटल्या आदींचा वापर करूनही ‘चिमण्यांची घरटी’ बनविता येतात. अशी घरटी गॅलरीत ठेऊन एका वाटीत धान्य आणि एका वाटीत पाणी ठेवल्यास दाणे वेचण्यासाठी हळूहळू चिमण्या येथे नियमित येतात. उन्हाळ्यात पाण्याअभावी चिमण्यांचा तडफडून मृत्यू होतो. तेव्हा गॅलरी, पोर्च, पार्किंग, कोपऱ्यात जेथे शक्य आहे, तिथे पाण्याची वाटी ठेऊन चिमण्यांना जीवदान द्या, असे आवाहनही राजन राजे यांनी केले.

error: Content is protected !!