
सामाजिक आणि राजकीय बदल घडवायचा असेल तर, आपल्या समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन सत्ता ताब्यात घेतल्यास बदल शक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन `धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामोठे येथील जाहीर सभेत बोलतांना केले. कामोठे येथील `धर्मराज्य पक्ष’प्रणित `स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटने’ने आयोजित केलेल्या या जाहीर सभेत पनवेल आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. जुई-कामोठे-नौपाडा या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बुधवार, दि. १५ जून रोजी कराडी समाज हॉल, कामोठे येथे ही सभा आयोजित केली होती.
दरम्यान, प्रकल्पग्रस्त शेतक-यांना संबोधित करतांना राजन राजे म्हणाले की, ’संपूर्ण रायगड जिल्ह्यात दि. बा. पाटील यांच्यानंतर एकही प्रभावी नेता नंतरच्या काळात निर्माण न झाल्यामुळेच दुर्दैवाने आपल्या समाजाची आज दुरवस्था झाली आहे आणि म्हणूनच सामाजिक क्रांती तसेच राजकीय बदल घडवायचा असेल तर समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन सत्ताधीश झालेच पाहिज“ अशा शब्दांत राजन राजे यांनी आपली रोखठोक मतं व्यक्त केली. त्यानंतर `धर्मराज्य महिला संघटने’च्या मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, `धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राम कोंडाळकर, नव-नियुक्त पनवेल अध्यक्ष गोपीनाथ भगत, पनवेल तालुका युवक अध्यक्ष सुमित गोवारी,पनवेल सचिव भाऊ म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, कामोठे शहर सचिव परशुराम म्हात्रे, अड . विजय कुर्ले, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराले, कामोठे गावचे माजी सरपंच विठोबा म्हात्रे आदींनी आपली मते व्यक्त केली.

यादरम्यान, पनवेल आणि कामोठे शहरांमध्ये येणारा नैना प्रकल्प, कामोठे ग्रामपंचायतीचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव, प्रस्तावित महानगरपालिकेत समाविष्ट होणारा गावठाण विस्तार तसेच प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित राहिलेल्या मागण्या इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष म्हणून गोपिनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, पनवेल तालुका युवक अध्यक्ष सुमित गोवारी, उपाध्यक्ष सागर म्हात्रे, सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपाध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम अंबाजी म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.