
ठाणे शहरातील पडलेल्या खड्डयांबाबत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अभिनव पद्धतीच्या ‘हेल्मेट मोर्चा’ला ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करुन चिंतामणी चौक ते ठाणे महापालिका मुख्यालयावर हातात ठाण्यातील खड्डयांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन धडक मारली. ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामाध्यमातून होणा-या अपघातांना महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आला. शहरातील नवीन व जुन्या रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करणे, रस्त्यांची निकृष्ठ दर्जाची कामे करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, त्यांच्यावर दंडात्मक करणे, सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या गॅरेज आणि जुन्या मोटारी विकणा-यांवर कायदेशीर कारवाई करुन, ठाण्यातील सर्व रस्ते तसेच पदपथ मोकळे करणे अशा मागण्या आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी गणेशोत्सवापूर्वी ठाण्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व्हिस रस्त्यावर असलेले अनधिकृत गॅरेज आणि जुन्या गाड्यांची विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाच्या पदाधिका-यां समोर मान्य केले.
