Day: December 8, 2017

विनाशकारी प्रकल्पाविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीस पाठिंबा…!

अतिप्रदूषणकारी अशा रिफायनरी (तेल शुद्धीकरण कारखाना) प्रकल्पाविरोधात ‘कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती’च्या वतीने शुक्रवार, दि. ८ डिसेंबर-२०१७ रोजी मुंबईतील आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. अशोक वालम यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी, राजापूर आणि देवगडमधील शेकडो मुंबईकर चाकरमानी उपस्थित होते.

याप्रसंगी, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी समाजमान्यता असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते मा. श्री. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते श्री. राजेंद्र फातर्पेकर, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. विक्रांत कर्णिक, सत्यजित चव्हाण आदी मंडळींनीदेखील निदर्शनात सहभाग घेतला होता.

राजापूर तालुक्यातील नाणार येथे हा रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला असून, कोकणी जनतेने संघटितपणे या प्रकल्पाला केलेला विरोध कौतुकास्पद असल्याचे मा. श्री. राजन राजे यांनी स्पष्ट करून, माझा ‘धर्मराज्य पक्ष’ व माझ्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता कोकणी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही राजे यांनी यावेळी बोलताना दिली. या प्रसंगी पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ‘कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती’स १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदतनिधी जाहीर करून, समितीचे अध्यक्ष श्री. अशोक वालम यांना धनादेशाद्वारे सुपूर्द केली.

दरम्यान, यावेळी आपल्या भाषणात बोलताना मा. श्री. राजन राजे म्हणाले, “कोकणासारख्या देवभूमीला भकास करण्याचा हा डाव असून, कोकणातील नैसर्गिक संपत्तीला नष्ट करू पाहणाऱ्या या राक्षसी प्रकल्पाला गाडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोकणी माणूस कधीही या आणि अशा कोणत्याही विनाशकारी प्रकल्पाची मागणी करायला शासनाकडे गेला नव्हता, मात्र दलालीत रस असणाऱ्या काही ठराविक राजकारणी, उद्योजक आणि धनदांडग्या भांडवलदारांनीच हा विनाशकारी प्रकल्प कोकणी जनतेवर लादला आहे.” असा जबरदस्त घणाघात राजे यांनी आपल्या भाषणात बोलताना केला.

यावेळी ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे विधानसभा महिला सचिव दर्शना पाटील, महिला संघटनेच्या प्रतिनिधी पौर्णिमा सातपुते आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे युवा कार्यकर्ते नितीन उगले हेदेखील उपस्थित होते.

error: Content is protected !!