मुंबईचे ‘फुप्फुस’ अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुमारे २७०० झाडांच्या कत्तलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने शनिवार, दि. १४ सप्टेंबर-२०१९ रोजी येथील बिरसा मुंडा चौकात सनदशीरमार्गाने निदर्शने करण्यात आली. या वृक्षतोडीमुळे आरे कॉलनी परिसरातील जैवविविधता पूर्णतः नष्ट होण्याचा धोका असून, इथल्या जंगलात अधिवास असणारे बिबटे, रानमांजर आणि इतर पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकते. शिवाय अतिपर्जन्यवृष्टीच्या काळात मिठी नदीच्या पुराचा धोकादेखील वाढू शकतो. यासंदर्भात विविध पर्यावरणवादी संस्था-संघटना, तसेच ‘आरे’मधील मूळ भूमिपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांनी संघर्ष उभा केला होता. याच पार्श्वभूमीवर मुळातच भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी मान्यता असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’नेदेखील या मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार ही निदर्शने शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वा.च्या दरम्यान करण्यात आली. “विनाशकारी विकासाच्या नावाने, बेभान झालेले आसुरी ‘विकास-विचारवंत’ हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या आरे कॉलनीत ‘रखरखीत वाळवंट’ निर्माण करू पाहत असतील, तर ‘धर्मराज्य पक्ष’ स्वस्थ बसणार नाही !” असा थेट इशारा राजन राजे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्थापित धनदांडगे व भांडवलदारी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना दिला आहे. “स्मार्टसिटीच्या नावाखाली होऊ घातलेला विनाशकारी विकास आणि काँक्रीटच्या निष्प्राण जंगलांऐवजी, आम्हाला हिरवंगार जिवंत जंगल, प्राणी-पक्षी व निसर्गाने नटलेली घनदाट वृक्षराजी हवी आहे, त्यासाठी प्रसंगी आम्ही आमच्या प्राणांचीही बाजी लावू !” अशा शब्दांत राजे यांनी आपल्या रोखठोक भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात पार पडलेल्या या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, बेलापूर विधानसभा महिला अध्यक्षा रेखा साळुंखे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, प्रीती क्षीरसागर, मनीषा सांडभोर, जयश्री पारकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर, ऐरोली विधानसभा अध्यक्ष रत्नदीप कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसमवेत नरेंद्र पारकर, नितीन उगले, शरद साळुंखे, सुमित कदम, सुशांत पंडा, दत्तु पाटील, संतोष मोरे, किशोर गवळी, संकेत गाडे, हेमंत पाटणकर, सुनील सांडभोर, जगदीश जाधव, नरेंद्र शिंदे, उमेश यादव, उमेश मोरे, खंडेराव जाधव, प्रवीण तांबट, प्रकाश नलावडे, सचिन पडवळ, विरेंद्र मोरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान, आरे कॉलनीतील छोटा काश्मीर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका नूतन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उप-निरीक्षक प्रमोद सावंत, गोपनीय शाखेचे व्ही.के. सिंग, पोलीस नाईक संजय शिंदे आणि मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते वसंत पाटील या मान्यवरांनी या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बहुमूल्य सहकार्य केले.