Month: July 2024

केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी कृतीबाबत ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात मूकनिदर्शने.

संसदेच्या सभागृहात राहुल गांधी, विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराने नीट पेपरफुटीप्रकरणी बोलत असताना, त्यांचा माईक बंद केला गेला. त्यावर लोकसभाध्यक्ष म्हणाले की, “माईक कोणी बंद केला हे मला माहित नाही” मग, सभागृह कोण चालवतंय? लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान की, राष्ट्रपती? मुळात मुद्दा असा आहे की, ओमप्रकाश बिर्ला यांना, सगळं माहित आहे, पण ते खोटं बोलत आहेत. बिर्ला हे, राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. याच कोटामध्ये नीट आणि इंजिनियरिंगपासून ते आयएएस, आयपीएस तसेच, राष्ट्रीय पातळीवरील ज्या स्पर्धा परीक्षा होतात, त्याचे कोचिंग क्लास चालतात. यात करोडो रुपयांचं उत्पन्न असून, यातील पैसा राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाटला जातो. म्हणूनच आमच्या डोक्यात असा संशय आहे, हा एकप्रकारचा कट तर नाहीये ना? नीटच्या पेपरफुटीची पोलखोल होऊ नये, यासाठीच राहुल गांधींचा माईक बंद केला गेला. कालपरवा गुजराथमध्ये राकेश राठोड आणि दीक्षित पटेल या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आलीय. याधीही सगळेच घोटाळेबाज गुजराथमधूनच पळून गेलेत आणि तेदेखील बहुतांश ‘मोदी’ आडनाव असलेले, त्यामुळे नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन असणारच, असा थेट घणाघाती आरोप ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, बुधवारी संध्याकाळी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. नव्याने स्थापन झालेल्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या, संसदेच्या सभागृहात सुरु आहे. विद्यमान संसदेचे हे पहिलेच अधिवेशन आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २८ जून-२०२४ रोजी, संसदेचे कामकाज सुरु असताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भातील पेपरफुटीच्या विषयावर बोलत असताना, अचानक त्यांच्यासमोरील माईक बंद झाला. त्यावेळी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी, “माझा माईक सुरु करा” अशी विनंती लोकसभाध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना केली असता, “मी माईक बंद केलेला नाही, त्याचे बटन माझ्याकडे नाही” असे सांगत, त्यांची विनंती धुडकावली. मुळात, पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली तर, सरकार व विरोधकांकडून एकत्रितपणे योग्य तो संदेश पोहोचेल, असा सकारात्मक आशावाद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलून दाखवलेला असतानाही, त्यांचा माईक बंद केल्याच्या लोकशाहीविरोधी कृत्याच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ३ जुलै-२०२४ रोजी, ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर मूकनिदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, “सध्या देशात जे काही सुरु आहे, ते याआधी कधीही घडलेलं नाहीये. ७० वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते, त्यांच्याही काळात घोटाळे झाले असतील, पण असा घोटाळा कधीच घडलेला नाही. बिहार, तेलंगणा, आसाम या राज्यांत भाजपची राजवट असताना, असेच घोटाळे झालेले आहेत. भारतातील लाखो तरुण, अशा स्पर्धा परीक्षांमधून आपलं आयुष्य पणाला लावत असतात. एकवेळ नव्हे; तर, दोन-दोन तीन-तीनवेळादेखील ही परीक्षा द्यावी लागते. नीटचे पेपर लिक करण्यासाठी, प्रत्येक परीक्षार्थीकडून १०/१० लाख घेतले गेलेले आहेत. ओमप्रकाश बिर्ला यांच्या कोटा मतदारसंघात तर, हजारो कोटी रुपयांचा शैक्षणिक घोटाळा झालेला आहे. यावर मोदी-शहा काहीही बोलत नाहीत, त्यांना फक्त राहुल गांधींचा माईक बंद करण्यातच पुरुषार्थ वाटतोय. भारतातील तरुण आज वैफल्यग्रस्त झालाय आणि हेच भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे द्योतक होय!” अशा शब्दांत राजन राजे यांनी आपल्या भावना परखडपणे मांडल्या. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “प्रत्येक लोकसभा सदस्य हा, गौरवशाली लोकशाहीतील जनसेवक असून, इतर मार्ग अस्तित्वात असताना माईक बंद राहणे किंवा करणे व त्याबाबतीत सभापतींनी विशेष दखल घेऊन, सदर असंसदीय प्रकारास उत्तेजन न देता, ते तात्काळ बंद करणे हे लोकशाहीस अपेक्षित असताना, सभापतीपदाची अवनती केल्याचे, यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. या माईक बंद कृतीची चौकशी न करणे म्हणजे, पुढील अगदी कोणतेही सरकार त्याचा गैरफायदा घेईल व खऱ्याखुऱ्या जनतेच्या आवाजावर; म्हणजे, लोकशाहीवर बंधने आणणे हेच होय. संसदेचे अधिवेशन चालू असताना आणि थेट प्रक्षेपणाद्वारे ते, लाखो नागरिक पाहत असताना, माईक बंद करणे व त्यावर सभापतींनी दिलेले उत्तर हे, गौरवशाली भारतीय लोकशाहीची प्रतारणा करणारे आहे. सभापती आपल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर करीत असून, भविष्यात भारतीय लोकशाही आम्हांस धोकादायक दिसत असल्याचे देशपांडे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सभापतीपदाचे पावित्र्य राखण्यासाठी, सभापतींना योग्य ती समज देऊन, गौरवशाली असणारी आपली लोकशाही वैभवशाली करावी… आणि म्हणूनच, भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्ष’ लोकशाहीमार्गाने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे, नितीन देशपांडे यांनी शेवटी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
error: Content is protected !!