“प्रीपेड-स्मार्ट मीटर, हे जनतेला अधिकचा आर्थिक भुर्दंड देणारं व पाणीपुरवठ्यासारखी वीजपुरवठा ही जीवनावश्यक सेवा, बेफाम नफा कमावण्यासाठी खाजगीकरणाद्वारे अदानीसारख्या सत्ताधाऱ्यांचा बगलबच्चा असलेल्या बदनाम भांडवलदाराला मोकाट सोडण्याचं; तसेच, मोठ्याप्रमाणावर कामगार-कपात करत बेरोजगारी वाढवण्याचं समाजघातकी भांडवली-धोरणं होय!”
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचा राज्य शासनावर जोरदार घणाघात…
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गत सरकारच्या काळात उर्जामंत्री असताना, त्यांनी तत्कालीन पावसाळी अधिवेशनात, (दि. ३ जुलै-२०२४ रोजी) महाराष्ट्रीय जनतेला आश्वासन देताना, “सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार नाही” अशी घोषणा केली होती. मात्र, विधानसभेत दिलेल्या आपल्याच आश्वासनाला हरताळ फासत, ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची अदानी-कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला नादुरुस्त मीटर व नवीन वीज जोडणीकरीता, प्रीपेड-स्मार्ट मीटर बसविण्यास अदानी कंपनीने बेलाशक सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य जनतेची ही घोर फसवणूक अदानीचं उखळ पांढरं करण्यासाठी सरकारने सुरु केलेली असून, या विरोधात ठाणे शहरातील विरोधी राजकीय पक्ष, समविचारी संस्था व डाव्या कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे जिल्हा स्मार्ट प्रीपेड वीज मीटरविरोधी समिती’ची स्थापन करण्यात आलेली आहे.
याच अनुषंगाने, लाखो वीज ग्राहकांवर लादण्यात येणाऱ्या, स्मार्ट प्रीपेड मीटरच्या अरिष्टाबाबत, जनजागृती करण्याच्या उद्देशाने, दि. ७ जानेवारी-२०२५ रोजी, महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट, ठाणे येथील प्रशासकीय कार्यालयात एका द्वारसभेचं आयोजन करण्यात आले होते.
या सभेला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महावितरणच्या कामगारांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, “प्रीपेड-स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रक्तपिपासू-निर्दय-शोषक व्यवस्थेकरवी (Vampire State System) पहिली कुऱ्हाड ही, तरुण कंत्राटी-कामगारांवर पडणार आहे आणि त्यानंतर ती कुऱ्हाड, मनमानी चढ्या बिलांच्या रुपाने व रिचार्ज संपताच ‘बत्ती गूल’ होण्याच्या ‘दहशती’ने वीज-ग्राहकांवर पडणार आहे. गेली ३० ते ४० वर्षे महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात याच कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात मी धर्मयुद्ध पुकारलंय…एकीकडे सरकारी आर्थिक-धोरणं, काॅर्पोरेटीय व्यवस्थापकीय व उत्पादन-पद्धती, संदेशांची देवाणघेवाण-माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीकरणासह, इतरही सगळीच क्षेत्र स्मार्ट बनलीयत… पण, आमचे पगार स्मार्ट कधी होणार? स्मार्ट मीटर लावण्याआधी आमच्या पगाराला देखील एक ‘स्मार्ट मीटर’ बसवा…देशाची आर्थिक प्रगतीसोबत महागाई, सेवाज्येष्ठता वाढताच ‘समृद्धी सर्वांची (Common-Prosperity)’ या तत्त्वानुसार ते आपसूकच भरघोस वाढले पाहिजेत…नाहीतर, आवक (पगार) वाढत नाहीत आणि वीज-बिलासारखी जावक वाढतच राहिली; तर संपूर्ण जनतेलाच ‘लाडक्या बहिणीं’सारखं दिड-दोन हजारी ‘गुलाम’ व्हावं लागेल!”, असा जोरदार घणाघात आपल्या तडाखेबंद भाषणात केला.
“मोदी-शहा आणि अदानी-अंबानी नव्हे; तर, आम्ही या देशाचे मालक आहोत…यांनी *स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला; पण, ते प्रजासत्ताकाचा अमृतमहोत्सव साजरा करायला उत्सुक नाहीत; कारण, प्रजा हीच या देशाची मालक, ही घटनादत्त संकल्पनाच यांना मान्य नाही…त्यांना मुठभरांची हुकूमशाही EVMची हेराफेरी करत निवडणुका जिंकून लादायचीय…तेव्हा, सावध होऊन काळाच्या हाका ऐका आणि सर्वसामान्य
जनता व कामगार यांनी एकत्र येऊन या ‘रक्तपिपासू-निर्दय-शोषक (Vampire-State System)’ भांडवली-व्यवस्थेविरुद्ध लढलं पाहिजे, ही काळाची गरज आहे”, अशा आवाहनासोबतच, “तरुणपण संघर्षात गुंतवलं नाही; तर, म्हातारपणी तुम्हाला लाचारीचा सामना करावा लागेल” असा गंभीर इशारा दिला. सरतेशेवटी, राजन राजे यांनी, “EVM सुरु राहिले तर, तुम्ही-आम्ही संपलो, या देशातली लोकशाही संपली, असं खुशाल समजा…कारण, सत्ताधाऱ्यांना तुमच्या जनमताची गरज EVM मुळे फारशी उरलेली नाहीये”. म्हणूनच, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, रात्रौ ठीक ९.०० वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातील, कार्यालयांतील लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’चा निषेध नोंदविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.