
“संपूर्ण जगात ‘कामगार-पुढारी’ ही महत्त्वाची व्यक्ती मानली जाते व तेच प्रामुख्याने राजकारण चालवतात…आणि इथे सच्च्या कामगार पुढार्
यांना राजकारणात काळ कुत्र देखील विचारत नाही…भक्कम आधारसाठी राजकीय आधारवड नसेल; तर, कामगार-चळवळीची लतावेल जमिनीवरच खुरडून, तुडवली जाऊन उध्वस्त होईल. हे समजत नाही म्हणूनच दुर्दैवाने आज मराठी माणसाची अवस्था अतिशय बिकट झालीय…मराठी माणसाइतका मूर्ख माणूस आज जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. एवढे महान संत, शिवछत्रपती-बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष आमच्या महाराष्ट्रात होऊन गेले; तरी आमच्या जगण्यात, आमच्या आचारविचारात ते उतरत नाहीत. फक्त, “जय शिवाजी, जय भीम” म्हटलं की, आमची जबाबदारी संपली! शिवछत्रपती म्हणजे, “केवळ तलवारबाजी नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमुल्यांसाठी लावलेली प्राणांची बाजी” होय. पण, आम्ही कसली प्राणांची बाजी लावणार? छत्रपती शिवाजी महाराज यासाठी महत्त्वाचे आहेत की, त्यांनी रयतेच्या आयुष्यात स्थैर्य आणि सन्मान निर्माण केला…भूहिनांना कसायला हक्काचे जमिनीचे पट्टे दिले; म्हणजे, आजच्या परिभाषेत *”कंत्राटी-कामगारांना कायम केलं” आणि तुमच्याकडचे कारखाने, इथल्या राजकारण्यांच्या आशिर्वादाने कंत्राटी-कामगार नावाच्या गुलामांच्या घामावरच मोठ्याप्रमाणावर चालतात. शिवबा-संतांचं हिंदुत्व जाज्वल्य होतं आणि आताचं सगळंच बोगस-ढोंगी हिंदुत्व! राममंदिर बांधून झालंय, नुकताच दंभमेळा संपन्न झाला, हा कसला कुंभमेळा? ती तर, मतं मिळविण्यासाठी व देशाचा घसरलेला रुपया आणि कोसळलेला शेअरबाजार लपविण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपडच. ठाण्यातील आले; तसेच काही नव्याने प्रदूषणकारी रासायनिक-कारखाने तुमच्या रोह्यामध्ये आलेत आणि त्यामुळे तुमच्यासकट तुमच्या पुढील पिढ्या कर्करोगासारख्या (कॅन्सर) अनेक दुर्धर रोगांनी पिडीत होऊन ‘अल्पजिवी’ ठरणार आहेत…त्या तिथे फार मोठी गरज असताना उच्चदर्जाच्या सार्वजनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? दिल्लीसारख्या उत्तम सार्वजनिक शाळांचा तर पत्ताच नाही! शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव आहे का? तुमच्याकडे आहे तरी काय, तुमच्याकडे कंपनीचं भागभांडवल तरी आहे का? निवृत्तीनंतर तुटपुंज्या ग्रॅच्युइटी आणि प्राॅ. फंडामुळे अक्षरशः उघड्यावर पडाल!” असा गर्भित इशारा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांना शेवटी दिला.