
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासनाने राज्यातील वर्ष-२०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना, अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा असणारी, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (HSRP) दि. ३० एप्रिल-२०२५ रोजीपर्यंत बसविणे अनिवार्य केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना वाढीव दराने टेंडर्स देण्यात आलेली आहेत. मात्र, भारतातील इतर राज्यातील दर आणि महाराष्ट्रातील दर यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे आढळून आलेले आहे. यातून वाहनधारक नागरिकांची फार मोठी लूट होऊन, त्यांची आर्थिक फसवणूक होऊ घातलेली आहे. याचाच निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, दि. ६ मार्च-२०२५ रोजी, आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, महाराष्ट्र शासनाने जारी केलेले दर हे दुचाकीकरीता, ४५०रु. तर, चारचाकी वाहनांकरीता ७४५रु. इतके आहेत. परंतु, शेजारच्या गोवा आणि गुजरात राज्यात मात्र, अनुक्रमे दुचाकीकरीता, १५५रु. आणि ३००रु. तर, चारचाकी वाहनांकरीता, २०३रु. आणि ४६०रु. इतके ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान, संपूर्ण भारतातील राज्यांच्या तुलनेत, महाराष्ट्र राज्य हे, करांच्या माध्यमातून, सर्वात जास्त निधी, केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा करीत असतानादेखील, महाराष्ट्रातील वाहनधारक नागरिकांना मात्र, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबरप्लेटच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने, ‘धर्मराज्य पक्षा’ने तीव्र शब्दांत आपला निषेध व्यक्त केला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार, भारतातील इतर राज्यांना झुकते माप देऊन, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असून, याबाबत ‘धर्मराज्य पक्षा’च्या भावना अतिशय तीव्र असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. याचसंदर्भात, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपायुक्तांना यावेळी निवेदन देण्यात येऊन, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबरप्लेटच्या वाढीव आणि अन्यायकारक दरपत्रकाचा लोकशाही व सनदशीरमार्गाने निषेध व्यक्त केलेला असून, आपण आमच्या भावना, महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपायुक्तांना निवेदनामार्फत करण्यात आली. यावेळी पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, प्रवक्ते समीर चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, कार्यालय-प्रमुख सोपान चौधरी, ‘धर्मराज्य रिक्षा-टॅक्सी संघटने’चे रमेश रेड्डी, सुशीलकुमार चंद्रा, रवी मिश्रा आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.