Category: आंदोलन

मतपत्रिकेद्वारे निवडणुकीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’ आक्रमक…

, , , ,

१९४७ पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो, आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचे असेल तर, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. त्यानंतर, भाजपाला अगदी दोन तृतीयांश जरी मतं मिळाली तरी, आमची हरकत नाही; मात्र, अशी बनावटगिरी आणि भोंदुगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. आमच्या जनमताचा अनादर चालवून न घेण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’ने नो “बॅलेट पेपर… नो इलेक्शन” या घोषणेखाली, स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु केली असल्याचे उद्गार पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले. आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली असून, ठाणे शहराच्या विविध भागात राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर, लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले. या जनजागृती मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून, त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला… ईव्हीए की, मतपत्रिकेला? यासाठी प्रतीकात्मक मतदान घेण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. जर, त्यांचा विजय इतकाच “न भूतो” व ऐतिहासिक होता; तर, त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज, रस्तोरस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही? असा परखड सवाल उपस्थित करुन, ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून, आपली फसवणूक होतेय आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर, दिलीश्वरांना आणि गुजराथी लॉबीला धडका देण्यासाठी ईव्हीएम मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यावेळी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, यासंदर्भात आम्ही विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांना भेटून, ही संकल्पना त्यांच्या गळी उतरवणार आहोत. ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील, न पेक्षा आम्ही “एकला चालो रे” याप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने जपणूक करण्यासाठी अधिक आक्रमकपणे ‘ईव्हीएम’ला प्राणपणाने विरोध करु. “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही आमची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, येत्या २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, रात्री ठीक ९ वाजता, फक्त पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील राजन राजे यांनी यावेळी केले. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करतायेत. दिलेली मतं ‘ईव्हीएम’मध्ये दीडत नव्हती म्हणून, ‘व्हीव्हीपॅट’ आणलं; परंतु, मतं मोजली कुठली? तर, ‘ईव्हीएम’मध्ये न दिसणारी. मतपत्रिका मोजणे हे, एव्हरेस्ट शिखर चढण्याएवढे किंवा एखादा भलामोठा डोंगर खोदण्याएवढे अवघड काम आहे का? असा थेट प्रश्नदेखील राजन राजे यांनी यावेळी उपस्थित केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे, राज्यघटनेचे रक्षक असताना, ही न्यायपीठे मात्र, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झालीयेत, अशी जोरदार टीकादेखील ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी शेवटी पत्रकार परिषदेत केली.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निषेध आंदोलन

, , ,

बदलापूर येथील ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेतील दोन चिमुरड्या बालिकांवर, शाळेचा सफाई कर्मचाऱ्याने नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, बदलापूर शहरात मोठा जनक्षोभ उसळला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आल्यावर, या संपूर्ण घटनाक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करुन, गुन्हेगारांना पाठीशी घातले गेले असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होत असल्याने, दोषींवर ताबडतोब कठोर-कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार दि. २२ ऑगस्ट-२०२४ रोजी, पक्षाध्यक्ष मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, सायंकाळी ४:०० वा.पासून ते सायंकाळी ५:०० वा.पर्यंत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय विश्रागृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी कृतीबाबत ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात मूकनिदर्शने.

संसदेच्या सभागृहात राहुल गांधी, विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराने नीट पेपरफुटीप्रकरणी बोलत असताना, त्यांचा माईक बंद केला गेला. त्यावर लोकसभाध्यक्ष म्हणाले की, “माईक कोणी बंद केला हे मला माहित नाही” मग, सभागृह कोण चालवतंय? लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान की, राष्ट्रपती? मुळात मुद्दा असा आहे की, ओमप्रकाश बिर्ला यांना, सगळं माहित आहे, पण ते खोटं बोलत आहेत. बिर्ला हे, राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. याच कोटामध्ये नीट आणि इंजिनियरिंगपासून ते आयएएस, आयपीएस तसेच, राष्ट्रीय पातळीवरील ज्या स्पर्धा परीक्षा होतात, त्याचे कोचिंग क्लास चालतात. यात करोडो रुपयांचं उत्पन्न असून, यातील पैसा राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाटला जातो. म्हणूनच आमच्या डोक्यात असा संशय आहे, हा एकप्रकारचा कट तर नाहीये ना? नीटच्या पेपरफुटीची पोलखोल होऊ नये, यासाठीच राहुल गांधींचा माईक बंद केला गेला. कालपरवा गुजराथमध्ये राकेश राठोड आणि दीक्षित पटेल या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आलीय. याधीही सगळेच घोटाळेबाज गुजराथमधूनच पळून गेलेत आणि तेदेखील बहुतांश ‘मोदी’ आडनाव असलेले, त्यामुळे नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन असणारच, असा थेट घणाघाती आरोप ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, बुधवारी संध्याकाळी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. नव्याने स्थापन झालेल्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या, संसदेच्या सभागृहात सुरु आहे. विद्यमान संसदेचे हे पहिलेच अधिवेशन आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २८ जून-२०२४ रोजी, संसदेचे कामकाज सुरु असताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भातील पेपरफुटीच्या विषयावर बोलत असताना, अचानक त्यांच्यासमोरील माईक बंद झाला. त्यावेळी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी, “माझा माईक सुरु करा” अशी विनंती लोकसभाध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना केली असता, “मी माईक बंद केलेला नाही, त्याचे बटन माझ्याकडे नाही” असे सांगत, त्यांची विनंती धुडकावली. मुळात, पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली तर, सरकार व विरोधकांकडून एकत्रितपणे योग्य तो संदेश पोहोचेल, असा सकारात्मक आशावाद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलून दाखवलेला असतानाही, त्यांचा माईक बंद केल्याच्या लोकशाहीविरोधी कृत्याच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ३ जुलै-२०२४ रोजी, ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर मूकनिदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, “सध्या देशात जे काही सुरु आहे, ते याआधी कधीही घडलेलं नाहीये. ७० वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते, त्यांच्याही काळात घोटाळे झाले असतील, पण असा घोटाळा कधीच घडलेला नाही. बिहार, तेलंगणा, आसाम या राज्यांत भाजपची राजवट असताना, असेच घोटाळे झालेले आहेत. भारतातील लाखो तरुण, अशा स्पर्धा परीक्षांमधून आपलं आयुष्य पणाला लावत असतात. एकवेळ नव्हे; तर, दोन-दोन तीन-तीनवेळादेखील ही परीक्षा द्यावी लागते. नीटचे पेपर लिक करण्यासाठी, प्रत्येक परीक्षार्थीकडून १०/१० लाख घेतले गेलेले आहेत. ओमप्रकाश बिर्ला यांच्या कोटा मतदारसंघात तर, हजारो कोटी रुपयांचा शैक्षणिक घोटाळा झालेला आहे. यावर मोदी-शहा काहीही बोलत नाहीत, त्यांना फक्त राहुल गांधींचा माईक बंद करण्यातच पुरुषार्थ वाटतोय. भारतातील तरुण आज वैफल्यग्रस्त झालाय आणि हेच भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे द्योतक होय!” अशा शब्दांत राजन राजे यांनी आपल्या भावना परखडपणे मांडल्या. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “प्रत्येक लोकसभा सदस्य हा, गौरवशाली लोकशाहीतील जनसेवक असून, इतर मार्ग अस्तित्वात असताना माईक बंद राहणे किंवा करणे व त्याबाबतीत सभापतींनी विशेष दखल घेऊन, सदर असंसदीय प्रकारास उत्तेजन न देता, ते तात्काळ बंद करणे हे लोकशाहीस अपेक्षित असताना, सभापतीपदाची अवनती केल्याचे, यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. या माईक बंद कृतीची चौकशी न करणे म्हणजे, पुढील अगदी कोणतेही सरकार त्याचा गैरफायदा घेईल व खऱ्याखुऱ्या जनतेच्या आवाजावर; म्हणजे, लोकशाहीवर बंधने आणणे हेच होय. संसदेचे अधिवेशन चालू असताना आणि थेट प्रक्षेपणाद्वारे ते, लाखो नागरिक पाहत असताना, माईक बंद करणे व त्यावर सभापतींनी दिलेले उत्तर हे, गौरवशाली भारतीय लोकशाहीची प्रतारणा करणारे आहे. सभापती आपल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर करीत असून, भविष्यात भारतीय लोकशाही आम्हांस धोकादायक दिसत असल्याचे देशपांडे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सभापतीपदाचे पावित्र्य राखण्यासाठी, सभापतींना योग्य ती समज देऊन, गौरवशाली असणारी आपली लोकशाही वैभवशाली करावी… आणि म्हणूनच, भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्ष’ लोकशाहीमार्गाने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे, नितीन देशपांडे यांनी शेवटी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आंदोलनांची पुण्याई संपल्यामुळेच, भांडवलदारी व्यवस्था फोफावली! – राजन राजे

, , , , ,

‘‘या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्‍या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे… ‘कंत्राटी-कामगार पद्धत’, ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी ‘नागरी आण्विक दायित्व कायदा-123’ (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले; पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या…पण, आमच्या हाती ‘राजकीय ताकद’ नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल…इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही’’, अशा घणाघाती शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी, सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, ‘‘ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात… आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी ‘रक्तपिपासू शोषक-व्यवस्था’ म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय… ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?’’ असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *’’ज्याला आम्ही ‘कल्याणकारी राज्य’ म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य’ संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, खरं म्हणजे ‘अदानी-अंबानीकरणा’च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही… ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !’’* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील यांनी केले. यावेळी किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे, सचिव कॉ. रमेश जाधव, कार्याध्यक्ष कॉ. विलास शेलार, कॉ. भास्कर पाटील, कॉ. जयराम चंदे, कॉ. प्रकाश काठोळे, भिवंडी तालुका अध्यक्ष कॉ. बाळाराम भोईर, शहापूर तालुका अध्यक्ष भगवान दळवी, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. नारायण पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष कॉ. आदम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आरे कॉलनीमधील वृक्षतोडीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ची तीव्र निदर्शने !

,

मुंबईचे ‘फुप्फुस’ अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुमारे २७०० झाडांच्या कत्तलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने शनिवार, दि. १४ सप्टेंबर-२०१९ रोजी येथील बिरसा मुंडा चौकात सनदशीरमार्गाने निदर्शने करण्यात आली. या वृक्षतोडीमुळे आरे कॉलनी परिसरातील जैवविविधता पूर्णतः नष्ट होण्याचा धोका असून, इथल्या जंगलात अधिवास असणारे बिबटे, रानमांजर आणि इतर पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकते. शिवाय अतिपर्जन्यवृष्टीच्या काळात मिठी नदीच्या पुराचा धोकादेखील वाढू शकतो. यासंदर्भात विविध पर्यावरणवादी संस्था-संघटना, तसेच ‘आरे’मधील मूळ भूमिपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांनी संघर्ष उभा केला होता. याच पार्श्वभूमीवर मुळातच भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी मान्यता असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’नेदेखील या मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार ही निदर्शने शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वा.च्या दरम्यान करण्यात आली. “विनाशकारी विकासाच्या नावाने, बेभान झालेले आसुरी ‘विकास-विचारवंत’ हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या आरे कॉलनीत ‘रखरखीत वाळवंट’ निर्माण करू पाहत असतील, तर ‘धर्मराज्य पक्ष’ स्वस्थ बसणार नाही !” असा थेट इशारा राजन राजे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्थापित धनदांडगे व भांडवलदारी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना दिला आहे. “स्मार्टसिटीच्या नावाखाली होऊ घातलेला विनाशकारी विकास आणि काँक्रीटच्या निष्प्राण जंगलांऐवजी, आम्हाला हिरवंगार जिवंत जंगल, प्राणी-पक्षी व निसर्गाने नटलेली घनदाट वृक्षराजी हवी आहे, त्यासाठी प्रसंगी आम्ही आमच्या प्राणांचीही बाजी लावू !” अशा शब्दांत राजे यांनी आपल्या रोखठोक भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात पार पडलेल्या या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, बेलापूर विधानसभा महिला अध्यक्षा रेखा साळुंखे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, प्रीती क्षीरसागर, मनीषा सांडभोर, जयश्री पारकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर, ऐरोली विधानसभा अध्यक्ष रत्नदीप कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसमवेत नरेंद्र पारकर, नितीन उगले, शरद साळुंखे, सुमित कदम, सुशांत पंडा, दत्तु पाटील, संतोष मोरे, किशोर गवळी, संकेत गाडे, हेमंत पाटणकर, सुनील सांडभोर, जगदीश जाधव, नरेंद्र शिंदे, उमेश यादव, उमेश मोरे, खंडेराव जाधव, प्रवीण तांबट, प्रकाश नलावडे, सचिन पडवळ, विरेंद्र मोरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान, आरे कॉलनीतील छोटा काश्मीर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका नूतन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उप-निरीक्षक प्रमोद सावंत, गोपनीय शाखेचे व्ही.के. सिंग, पोलीस नाईक संजय शिंदे आणि मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते वसंत पाटील या मान्यवरांनी या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बहुमूल्य सहकार्य केले.

केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ची निदर्शने…!

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धीमाध्यमांची गळचेपी कशी केली जाते, हे ‘एन.डि.टी.व्ही. इंडिया’ या प्रख्यात वृत्तवाहिनीच्या एकदिवसीय बंदीप्रकरणावरून स्पष्ट झालेले असताना, याचाच निषेध करण्यासाठी, केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आदरणीय राजन राजे यांच्या आदेशानुसार मंगळवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाखाली पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
शिवाय कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या, जमीन अधिग्रहण विधेयकाच्या माध्यमातून शेतक-यांच्या आणि ‘वन रँक वन पेन्शन’च्या फसव्या घोषणेच्या माध्यमातून निवृत्त सैनिकांच्या झालेल्या आत्महत्यांबाबतही यावेळी मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, सल्लागार आनंदा होवाळ, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, सचिव विनोद मोरे, ठाणे विधानसभा उपाध्यक्ष सुनील घाणेकर, नौपाडा विभाग अध्यक्ष समीर कालगुडे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, पाचपाखडी विभाग अध्यक्ष अमित लिबे, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, उपाध्यक्षा साक्षी शिंदे, सचिव दर्शना पाटील, कोपरी विभाग महिला अध्यक्षा भारती सावंत, वंदना गायकवाड तसेच युवा कार्यकर्ते नितीन उगले, रॉजर सायमन यांच्यासोबत सुधन सावंत, महेश पवार, मनोज बेर्डे, राकेश पवार, भरत राणे, शरद साळुंखे, सचिन कदम आणि प्रकाश डोंगरे आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाचा धर्मराज्य पक्षाचा ऐरोलीत निषेध मोर्चा

नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीबाबत राजकीय आकस बाळगून, नवी मुंबईतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडल्याच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी ऐरोली विधानसभा क्षेत्रात एका निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, सल्लागार आणि ज्येष्ठ विचारवंत आनंदा होवाळ, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, ऐरोली विधानसभा अध्यक्ष पांडुरंग गोरे, उपाध्यक्ष विजय नांदूरकर, सचिव सिद्धेश सावंत, सह-सचिव रत्नदीप कांबळे, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष प्रा. भरत जाधव, कोकण समन्वयक नरेंद्र शिंदे आणि नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, युवा कार्यकर्ता संदीप सोनखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

खड्डयांच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठा.म.प मुख्यालयवर ‘हेल्मेट मोर्चा…!

ठाण्यातील खड्डयांबाबत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी ‘धर्मराज्य पक्षा’ला दिले दुरुस्तीचे आश्वासन…!
ठाणे शहरातील पडलेल्या खड्डयांबाबत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अभिनव पद्धतीच्या ‘हेल्मेट मोर्चा’ला ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करुन चिंतामणी चौक ते ठाणे महापालिका मुख्यालयावर हातात ठाण्यातील खड्डयांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन धडक मारली. ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामाध्यमातून होणा-या अपघातांना महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आला. शहरातील नवीन व जुन्या रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करणे, रस्त्यांची निकृष्ठ दर्जाची कामे करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, त्यांच्यावर दंडात्मक करणे, सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या गॅरेज आणि जुन्या मोटारी विकणा-यांवर कायदेशीर कारवाई करुन, ठाण्यातील सर्व रस्ते तसेच पदपथ मोकळे करणे अशा मागण्या आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी गणेशोत्सवापूर्वी ठाण्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व्हिस रस्त्यावर असलेले अनधिकृत गॅरेज आणि जुन्या गाड्यांची विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाच्या पदाधिका-यां समोर मान्य केले.
दरम्यान याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, महेशसिंग ठाकूर, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष प्रा. भरत जाधव, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा सह-सचिव दर्शना पाटील, सदस्या उज्ज्वला जाधव या महिला आणि पुरुष पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेकर नागरिकांनी विशेषतः दुचाकीधारकांनी या अभिनव ‘हेल्मेट मोर्चा’बद्दल समाधान व्यक्त करुन, पक्षाच्या या उपक्रमाबाबत आभार मानले.

संविधान मोर्चातून जनतेचा हुंकार; राजन राजे म्हणाले – पर्यावरण, कामगार आणि पाण्याच्या लढ्याला ‘धर्मराज्य पक्ष’ साथ देणार

“महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या, कंत्राटी कामगारांच्या तसेच पर्यावरणाच्या मुद्यावर डॉ. सुरेश माने यांनी लढा उभारल्यास ‘धर्मराज्य पक्ष’ अखेरपर्यंत त्यांच्या सोबत असेल” असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात ठामपणे केले. “आज राज्यभरात समाधानकारक पाऊस पडत असला तरी, अजूनही मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य गावे व शहरे तहानलेलीच आहेत आणि हे फक्त राज्य शासनानेच पाप आहे.” असा थेट आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. ‘धर्मराज्य पक्ष’ कधीही जात-धर्म मानत नाही, असे विधान करुन राजन राजे पुढे म्हणाले, “माणसाला गुलामगिरीत वाजवणारे प्रस्थापित हे आमच्यासाठी देशद्रोही आणि धर्मद्रोहीच आहेत.” या ‘संविधान मोर्चा’ला ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे, नवी मुंबई, कामोठे (रायगड) येथील सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २७ जुलै रोजी पार पडलेला जिजामाता उद्यान (भायखळा) ते आझाद मैदानापर्यंतचा “संविधान मोर्चा” प्रचंड यशस्वी ठरला. जनसामान्यांना भेडसावणा-या प्रश्नांचा राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारणा-या या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’चे अध्यक्ष डॉ. सुरेश माने आणि ‘शिवराज्य पक्षा’चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ मैदानात; ठाणे स्टेशनबाहेर स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल ट्रेन्समध्ये महिलांसाठी राखीव असणा-या डब्यांची संख्या अपुरी असून, ती वाढवावी तसेच गर्दीच्या वेळेत कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे ते सीएसटी ‘महिला विशेष’ लोकल सुरु करावी या प्रमुख मागण्यांसाठी, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने गुरुवार, दि. २१ जुलै रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर नोकरदार महिलांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.
यावेळी महिला प्रवाशांबरोबरच पुरुष प्रवाशांनीदेखील या मोहिमेस उदंड प्रतिसाद दिला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी मोहिमेत तब्बल ९५० महिला व पुरुष ठाणेकर चाकरमान्यांनी स्वाक्षरी करुन, आपला सहभाग तसेच पाठिंबा नोंदवला.
स्वाक्षरी मोहिमेच्या या कार्यक्रमात ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य सचिव स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, पक्षाच्या ठाणे महिला सचिव दर्शना पाटील, कोपरी विभाग महिला अध्यक्षा भारती सावंत, प्रतिभा टपाल, कमल बागुल, मनीषा सांडभोर, मयुरी वायदंडे आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत, ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंडाळकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराळे, शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.भरत जाधव, पक्षाचे खोपट विभाग अध्यक्ष सुनील घाणेकर, कोलबाड विभाग अध्यक्ष राजू शिंदे, नौपाडा विभाग अध्यक्ष दिनेश चिकणे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे,
लोकमान्य नगर प्रभाग अध्यक्ष महेश क्षीरसागर, चेंदणी-कोळीवाडा प्रभाग अध्यक्ष आनंद कोळी, नितीन उगले, रॉजर सायमन, संदीप सोनखेडे, विपुल कदम, महेश उतेकर, प्रकाश पवार, अश्वदीप भालेराव, सुधन सावंत, विलास दाभोळकर, सचिन निकम, प्रकाश डोंगरे, राजू सांडभोर, सुनील सांडभोर,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल जयश्री पंडित यांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
error: Content is protected !!