Category: कामगार

रोहा, धाटाव एमआयडीसी | रविवार, दि. २८.१२.२०२५ : कामगारांच्या बैठकीत राजन राजेंचे सडेतोड प्रतिपादन

कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं; तर, शोषक-अन्यायी भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही!
रोह्यातील कामगारांच्या बैठकीत, राजन राजे यांचे रोखठोक प्रतिपादन…
“कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे… कारण, “कामगार हाच खरा संपत्तीचा निर्माता आहे”. कामगारांनी ‘कामगारधर्म’ पाळला, एकमेकांशी स्नेहभाव जोपासून आपलं आत्मभान जागं केलं; तर, प्रस्थापित रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) शरण येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही!” असे रोखठोक प्रतिपादन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा इथे केले. रविवार, दि. २८ डिसेंबर-२०२५ रोजी, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ आणि ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीतील कामगार सभासदांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांच्या जागी ११ ने भाग धेऊन ४ काळे कामगार कायदे आणले आणि कामगारांच्या जगण्याचाच अवघा ‘भागाकार’ केलाय!त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय.
महाराष्ट्रातील मराठी-तरुण मोठ्याप्रमाणात नासवला गेलाय…तो क्रिकेटच्या, धर्मसंप्रदायांच्या आणि संध्याकाळच्या बाटलीच्या नादाने…एका बाटलीने आमची शिवबा-संतांची मराठी-संस्कृती बाटली, ही दुर्दैवी अवस्था आहे! यापुढे आपण काय खाणार, कुठलं पाणी पिणार, कुठल्या हवेत श्वास घेणार, हे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे मोजकेच भांडवलदार ठरवणार आहेत. लोकशाही ही फक्त, आता मतांपुरती मर्यादित राहिलीय…आपल्या कामाच्या ठिकाणी लोकशाही असते का? तिथे तुमच्यावर सीसीटीव्हीचा वॉच असतो. आयुष्यातला सर्वात मोठा काळ आपण कारखान्यात घालवतो, याला कारण आपणच आहोत… कारण, आपण झोपलेलो आहोत. आपली कामगार संघटना ही, फक्त तुमचे पगार-बोनस याकरिता अजिबात नाही; तर, तुमची मानसिकता बदलण्यासाठी आणि तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी आहे. भांडवलदारशाहीची कंत्राटी-कामगार पद्धत, तुम्हाला गुलामगिरीत ढकलण्यासाठी, चारही बाजूंनी पराकोटीचे प्रयत्न करत असते; पण, एकमेव ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या आपल्या युनियनने ती प्राणपणाने मोडीत काढलीय. क्रिकेटचे सामने, सार्वजनिक महापूजा, गणेशोत्सव, भंडारे आणि निवडणुकांच्या काळात येणारा दारुचा पूर आणि मटणाच्या मेजवान्या यातून तुम्हाला आधी बाहेर पडावं लागेल… याच चंगळवादी गुलामी अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आपली संघटना आहे. जर कामगारांनी एकजुटीने काम करणं नाकारलं; तर, मग सरकारने कुठलेही व कितीही काळे-कायदे आणले तरी, ही सगळी भांडवली-व्यवस्था कोलमडून पडेल…त्यासाठीच, कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे!” अशा शब्दांत राजन राजे यांनी, कामगारांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. दरम्यान, रोह्याच्या धाटाव एमआयडीसीमधील, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्य असलेल्या कामगारांना, कंपनी व्यवस्थापननाने तुटपुंज्या वेतनमानावर गेल्या अनेक वर्षांपासून झुलवत ठेवले आहे. त्यांना सन्मानजनक वेतन मिळावे, कामगारांचे हक्क मिळावेत यासाठी ‘डीआरटी अँथिया’चे कामगार संघर्ष करीत असून, त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. “माझ्या रोह्यातल्या कामगारांनी जर एकजूट दाखवली तर, कंपनी व्यवस्थापनाला शरण आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला बजावून ठेवतो, हा संघर्ष तुम्ही शंभर टक्के जिंकणार आहात… १५ हजारांच्या खाली एक रुपयाचीही पगारवाढ मी घेणार नाही आणि तीदेखील थेट पगारवाढ, सी.टी.सी. नव्हे…C.T.C. ही फक्त एकप्रकारची ‘चहा पावडर’ आहे, एवढंच आम्हाला माहिती आहे, त्याचा आमच्या पगाराशी संबंध नाही… तुमच्या आतले दिवे पेटले की, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा ज्वलंत वक्तव्यांनी राजन राजे यांनी, कामगारांना त्यांच्या अस्तित्वाची आणि ताकदीची जाणीव आपल्या भाषणाच्या शेवटी करुन दिली. याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी या पदाधिकाऱ्यांसह, ‘डीआरटी अँथिया’चे युनिट कमिटी अध्यक्ष प्रमोद जंगम, उपाध्यक्ष निखील वरणकर, सेक्रेटरी मयूर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर, रामदास साखीळकर तसेच, कंपनीतील कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी धाटाव एमआयडीसीमधील ‘अंशुल इनोवेटिव्ह’ या कंपनीच्या कामगार सदस्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

१४ ऑक्टोबर-२०२५ : आठ-साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’च्या कामगारांचा विजय सोहळा

नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीमधील ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांचा ‘आनंद-मेळावा’ मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ठाण्यातील मॉडेला चेकनाका येथील ‘आर नेस्ट’ या वातानुकुलीत सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, पगारवाढ आणि आपल्या न्याय्य-हक्कांसाठी लोकशाही व सनदशीरमार्गाने ‘रेप्रो’च्या २८७ कामगार सभासदांनी, दि. ६ मार्च-२०१७ रोजीपासून, व्यवस्थापनाविरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यासंदर्भात, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे कंपनी व्यवस्थापनाविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. अखेर साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर, व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, सर्व संपकरी कामगारांची कायदेशीर देणी, या सोहळ्याच्या निमित्ताने धनादेशाद्वारे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते अदा केली. ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील कामगार सभासदांचा कायदेशीर लढा, युनियनचे वकील के. टी. विश्वनाथन यांनी मोठ्या नेटाने लढवला आणि त्याला तेवढीच खंबीर साथ, ‘धर्मराज्य’च्या कामगार सभासदांनी दिली. या कालावधीत ‘राजन राजे’ नावाचा पंचाक्षरी मंत्र सदैव कामगारांना प्रेरणा देत राहिल्यामुळेच, तब्बल आठ-साडेआठ वर्षे, कामगार सभासद आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाहीत, ही सर्वात उल्लेखनीय बाब होय… याच पार्श्वभूमीवर या ‘आनंद-मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला व्यवस्थापनाच्या वतीने, कंपनीच्या लीगल हेड व कंपनी सेक्रेटरी अलमिना शेख आणि कंपनीचे अकाऊंटंट समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी ‘रेप्रो’च्या कामगारांचे कुटुंबीयदेखील आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्याचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन;पूर्वक अभिनंदन करुन, त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सध्या देशातील कामगार-कष्टकरीवर्गाची अवस्था अत्यंत बिकट असून, केंद्र सरकारपुरस्कृत येऊ घातलेल्या काळ्या कामगार-संहितेमुळे, भविष्यात कामगारांना आपल्या हक्कासाठी संप, उपोषण आणि आंदोलने करता येणार नाहीत. ज्या भाजपला तुम्ही निवडून दिलंत, त्याच पक्षाने कामगार देशोधडीला लावायला घेतलाय. तुम्हाला गणेशोत्सव-नवरात्रौत्सव, दहीहंड्या, जातीय व धार्मिक विद्वेष यातच गुंतवून ठेवत, सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्याचे कारस्थान, भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेले आहे… वेळीच सावध झाला नाहीत; तर, तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होणार हे निश्चित!” अशा परखड शब्दांत मा. राजन राजे यांनी, उपस्थित कामगारांना मर्गदर्शन केले. दरम्यान, याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

 

वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली-अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त

‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली एमआयडीसी आणि अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त, डोंबिवली (पू.) येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे येथे, वाल्मेट युनियन युनिटच्या वतीने रविवार, दि. ६ ऑक्टोबर-२०२४ रोजी, एका स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेतील कामगारांनी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर, वर्षभरातच मा. राजन राजे यांच्या सक्षम व प्रखर नेतृत्त्वाखाली, पगारवाढीचा पहिलावहिला त्रैवार्षिक करार यशस्वीपणे संपन्न झाला होता. याच कराराच्या वर्षपूर्तीनिमित्त, या दिमाखदार स्नेहसंमेलनाचे आयोजित करण्यात आले

होते. यावेळी कामगार सदस्यांच्या वतीने मा. राजन राजे यांना शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देतानाच, शिवछत्रपती महाराजांचे स्मृतिचिन्ह प्रदान करुन, त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री. कमलेश कोल्हे, श्री. अविनाश बढे, श्री. लोटन येलवे, श्री. संदीप पवार, श्री. मिलिंद जोशी, श्री. निलेश जगताप, श्री. सुभाष देशमुख, श्री. लक्ष्मण शिंदे या युनिट कार्यकारिणी सभासदांसह, ‘वाल्मेट’च्या डोंबिवली आणि अंबरनाथ आस्थापनेतील कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

‘हिवा इंडिया’ कंपनीत भव्यदिव्य त्रैवार्षिक करार !

, , , ,

“ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात……”
राजन राजेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास रचला…!!!

एकीकडे नवी मुंबईतील दिघा येथील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना ऐन गणेशोत्सवात दीड ते दोन लाखांच्या दरम्यान बोनस देऊन त्यांची दिवाळी साजरी झालेली असतानाच, नुकत्याच साजऱ्या झालेल्या दिवाळसणाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून नवी मुंबईस्थित महापे येथील ‘हिवा इंडिया’ कंपनीतदेखील भव्यदिव्य असा, तब्बल १२ हजार १०० रुपये पगारवाढीचा त्रैवार्षिक करार ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होऊन पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात येऊन कंपनीतील एकूण ७२ कंत्राटी कामगार कायम झाले आहेत. या करारामुळे गेली अनेक वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या कामगारांना हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळून, त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना कमीतकमी ५० हजार, तर जास्तीतजास्त ६५ हजार इतकी दरमहा पगारवाढ झाली असून, बोनस म्हणून कमीतकमी ६० हजार, तर जास्तीतजास्त ८० हजार रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदानासहित कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे ‘हिवा इंडिया’ कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटी नोकरीच्या गुलामगिरीत खितपत पडलेले कामगार आज खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ झालेले असून, आम्हाला स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मा. श्री. राजन राजे साहेबांनाच जाते, अशा शब्दांत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, गेल्या ३६ वर्षांपासून कामगारक्षेत्रात कार्यरत असलेल्या राजन राजे यांनी, तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळात हजारो कामगारांना समृद्धीचा मार्ग दाखवलाय. कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी व्यवस्थापनाशी आणि भांडवलदारी व्यवस्थेशी त्यांनी प्राणपणाने संघर्ष केलाय. गुलामगिरीचे प्रतीक असलेली कंत्राटीपद्धती ही कामगारक्षेत्रातील नव-अस्पृश्यता असल्यामुळे राजे यांनी सुरुवातीपासूनच या प्रथेविरुद्ध लढा उभारला व तो यशस्वीही करून दाखवला. ‘हिवा इंडिया’ कंपनीचा भव्यदिव्य त्रैवार्षिक करार हा उल्लेखनीय असला, तरी या कंपनीतील ७२ कंत्राटी-कामगार गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाले, हेच माझ्या आतापर्यंतच्या संघर्षाचं फलित असल्याची प्रतिक्रिया राजन राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ऐन दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवार, दि. ५ नोव्हेंबर-२०१८ रोजी पार पडलेल्या या काराराप्रसंगी ‘हिवा इंडिया’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद गांगुली हेदेखील उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि खजिनदार अण्णा साळुंखे या पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक करारान्वये १२ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांचे वेतनमान उंचावले असून, याबाबत ‘हिवा इंडिया’च्या समस्त कामगारांनी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे जाहीर आभार व्यक्त करून एकच जल्लोष केला.

इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ.

, , , , ,

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात, त्रैवार्षिक पगारवाढीचा विक्रमी करार संपन्न झाला. या करारामुळे, ‘‘इडिकॉन’’ कामगारांना रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ मिळणार आहे.

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात १ जानेवारी-२०१४ ते ३१ डिसेंबर-२०१६ या त्रैवार्षिक पगार वाढीचा करार संपन्न झाला. यानुसार किमान रूपये 10,000/- तर, कमाल वाढ रू. 4,440/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सदर पगारवाढीपैकी 70 टक्के रक्कम बेसिक व उर्वरीत 30 टक्के रक्कम इतर भत्यात समाविष्ट करण्यात खास कामगार हिताचा फॉर्म्युला अमलांत आलेला असून पूर्ण वाढीव रक्कम ही 50:25:25 या पध्दतीने तीन वर्षात देण्यात येईल. या करारानुसार 5 ते 10 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 15 दिवसाची ग्रॅच्युईटी, तर 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 20 दिवसाची ग्रच्युईटी, तसेच 15 ते 20 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 25 दिवासांची ग्रच्युईटी देण्यात आली, हे या कराराचे खास वैशिष्ट्या आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षावरून 60 वर्ष अशी 2 वर्षांने वाढविण्यात आली आहे. तसेच 22 कंत्राटी कामगारांपैकी 9 कामगारांना परमनंट केले असून उर्वरीत 14 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन, त्या कामगारांना सेवाकाळाप्रमाणे 20 लाख 50 हजार रूपयांची भरपाई देण्यात आली.

इडिकॉन कंपनीच्या वतीने करार करतांना, कंपनीचे मालक श्री. ऑब्री, व्यवस्थापक श्री. पद्माकर आठवले, श्री. मेलवीन फर्नांडीस हजर होते, तर ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने अध्यक्ष राजन राजे, महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव रूपेश पवार, खजिनदार अण्णा साळुंखे इत्यादी पदाधिकारी तसेच, कंपनी युनिटचे कमिटी सदस्य उपस्थित होते.

कराराप्रसंगी बोलतांना, महासंघाचे अध्यक्ष राजन राजे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलमुळे, प्रती महिना रूपये 5,000/- ते 6,000/- चे वेतन देऊन, कामगारांची लुट करून, कंत्राटदारी-मजूरीसारख्या गुलामगिरीला व नव-अस्पृश्यतेला कामगारांना तोंड द्यावे लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांमध्ये, राजकीय जागृतीचे भान, या करारामुळे येईल आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मुळावर आलेले चित्र बदलेल आणि या करारामुळे नवीन गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत घातकी असलेल्या, खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) या आर्थिक सुधारणांच्या तडाख्याने चैतन्यहीन झालेल्या कामगार चळवळीत केशव सुतांच्या तुतारीप्रमाणे ‘‘प्राण फुंकणारा’’ असा हा ‘इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि.’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’मधील क्रांतीकारी-करार असल्याचे कामगार क्षेत्रांत बोलले जात आहे. या करारानंतर, इडिकॉन, मुंबई येथील कंपनीतील कामगारांनी एकमेकांना मिठाई भरवून भरघोस पगारवाढीची दिवाळी साजरी केली.

error: Content is protected !!