Category: पगारवाढीचा करार

वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली-अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त

‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली एमआयडीसी आणि अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त, डोंबिवली (पू.) येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे येथे, वाल्मेट युनियन युनिटच्या वतीने रविवार, दि. ६ ऑक्टोबर-२०२४ रोजी, एका स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेतील कामगारांनी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर, वर्षभरातच मा. राजन राजे यांच्या सक्षम व प्रखर नेतृत्त्वाखाली, पगारवाढीचा पहिलावहिला त्रैवार्षिक करार यशस्वीपणे संपन्न झाला होता. याच कराराच्या वर्षपूर्तीनिमित्त, या दिमाखदार स्नेहसंमेलनाचे आयोजित करण्यात आले

होते. यावेळी कामगार सदस्यांच्या वतीने मा. राजन राजे यांना शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देतानाच, शिवछत्रपती महाराजांचे स्मृतिचिन्ह प्रदान करुन, त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री. कमलेश कोल्हे, श्री. अविनाश बढे, श्री. लोटन येलवे, श्री. संदीप पवार, श्री. मिलिंद जोशी, श्री. निलेश जगताप, श्री. सुभाष देशमुख, श्री. लक्ष्मण शिंदे या युनिट कार्यकारिणी सभासदांसह, ‘वाल्मेट’च्या डोंबिवली आणि अंबरनाथ आस्थापनेतील कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

नवी मुंबईस्थित (Rabale TTC) ‘प्रोटेगो इंडिया’ या, जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत…’धर्मराज्य पक्ष’प्रणित “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा…अगदी टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांमध्ये सनसनाटी व थरार पैदा करणारा करार!

ऑईल-गॅस, औषधे, रासायनिक खते उत्पादक कंपन्यांना, ‘फ्लेम-ॲरेस्टर, ब्रीदर-व्हाॅल्व्ह’सारख्या औद्योगिक-सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या, नवी मुंबईस्थित (Rabale TTC) ‘प्रोटेगो इंडिया’ या, जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत…’धर्मराज्य पक्ष’प्रणित “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा…अगदी टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांमध्ये सनसनाटी व थरार पैदा करणारा करार!
…संबंधित कामगारवर्गामध्ये आनंदोत्साहाचं एकच उधाण!!
‘हिवा-इंडिया’च्या पाठोपाठ ‘प्रोटेगो इंडिया’ या बहुराष्ट्रीय कंपनीत, पगार/बोनस वाढीच्या त्रैवार्षिक-करारांचं ‘पंचक’ पूर्ण करणारा…’राजन राजे’कृत ‘धर्मराज्य’चा ऐतिहासिक सलग ‘पाचवा करार’…!!!
या कराराचा तपशील डोळ्याखालून घालण्यापूर्वी, हा करार कुठल्या परिस्थितीत झाला हे पहाणं, समस्त कामगारांसाठी व संबंधितांसाठी फारच उद्बोधक ठरावं…
कोविड-१९ काळाचा घंभीर परिणाम म्हणून, कंपनीची मागील चार वर्षांची उलाढाल खालीलप्रमाणे घसरणीला लागलेली असतानाच….
२०१९/२०…. रु.५० कोटी
२०२०/२१…. रु.४० करोड
२०२१/२२…. रु.३८ करोड
२०२२/२३….रु.३९ करोड
…पोलादी ‘कामगार-एकजुटी’च्या बळावर व कंपनीच्या भविष्यकालीन वाटचालीत ‘धर्मराज्य’ संघटनेच्या बिरुदाखाली कामगारवर्गाकडून मनापासून मिळू शकणार्या सकारात्मक योगदानाची व कडक शिस्तीची पुरेपूर खात्री, प्रोटेगो-व्यवस्थापनाला (MD डाॅ. लँडीस, HR/IR व्यवस्थापक श्रीमती पूजा विजन, उत्पादनविभाग प्रमुख श्री. उमेशजी पवार) असल्यामुळेच सदरहू करार संपन्न झालेला आहे….
वर्ष २०२४ ते २०२७ या त्रैवार्षिक कालावधिच्या नवीन करारान्वये….
१) दरडोई किमान थेट वेतनवाढ…. रु.१०,५००/-
२) कमाल थेट वेतनवाढ…. रु.१२,९००/-
३) सरासरी थेट वेतनवाढ…. रु.११,६००/-
(थेट वेतनवाढ म्हणजे, C.T.C. वगैरे सारख्या, अलिकडच्या काळातील “व्यवस्थापकीय फसव्या संकल्पने’नुसार फुगवून सांगितलेली बिलकूल नव्हे; तर, थेट महिनाअखेर पगाराद्वारे हातात पडणारी अधिकची रक्कम होय)
४) ‘सहा आकडी’ म्हणजेच, रु. एक लाखाहून अधिक रकमेचा वार्षिक-बोनस करारान्वये मिळणार… वर्ष २०२४-२५ मध्ये,
किमान बोनस….रु.१,०५,०००/-
कमाल बोनस….रु.१,१५,०००/-
(वर्ष २०२४-२५च्या पुढे, २०% सूत्रानुसार बोनस प्रतिवर्षी वाढत्या पगारानुसार वर्धिष्णू होत जाणार)
५) कराराद्वारे थेट हातात येणारा एकूण पगार,
किमान रु.६५,०००/-
कमाल रु.८०,०००/-
६) पगारातील ७०% वाढ ही, मूळ पगार व महागाई भत्त्यात (PF-Base मध्ये) समाविष्ट*, त्यामुळे, भरभक्कम भविष्यनिर्वाह निधी (PF), ग्रॅच्युईटी, बोनस रुपाने कामगार-कर्मचारीवर्गाचं नोकरीतील जीवनमान; तसेच, निवृत्तीपश्चात भविष्य सुरक्षित व सुखीसमाधानी राखणारा करार….
७) श्रेणीनिहाय (Grade-Wise), भरभक्कम ENTRY-LEVELS चा; तसेच, महागाई-निर्देशांकावर आधारित बदलत्या महागाईभत्त्याचा (Variable D.A.) अंतर्भाव करुन…संपूर्ण वेतनश्रेणी शास्त्रीय-पायावर (Scientific Base) रचण्यात आलेली* व त्याद्वारे, आजमितीस कामावर असलेल्या कामगारांसोबतच, भविष्यात कंपनी सेवेत येऊन नोकरीत ‘कायम’ होणाऱ्या, पुढील नवतरुण पिढ्यांचंही आर्थिक-सुरक्षिततेसह ‘आर्थिक-उन्नयन’ सुनिश्चित करण्यात आलंय….
८) बव्हंशी सगळे कामगार नोकरीत ‘कायमस्वरुपी’…. (‘कंत्राटी-कामगार’ नावाचे ‘गुलाम’ अथवा ‘नवअस्पृश्य’ कोणी कामासाठी घेतलेले नव्हेतच)
९) येऊ घातलेल्या ‘काळ्या कामगार-संहिते’च्या सावटाखाली…बेरोजगारी व अर्धरोजगारीचा, कामगार-कपातीचा ‘नंगानाच’, मौजूदा ‘भांडवली-व्यवस्थे’द्वारे देशभर चाललेला असताना, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिवछत्रपतींच्या राजनीतिनुसार ‘तळागाळा’तील श्रमिकांची ‘तळी’ उचलणारा, हा ऐतिहासिक करार म्हणून नोंदला जावा…
“धर्मराज्य” आणि “राजन राजे”… बस्, नाम ही काफी है!
(प्रोटेगो युनिट अध्यक्ष-ज्योतिर्लिंग घोडके, उपाध्यक्ष-संजय पालकर, सचिव-संतोष देसाई, सहसचिव-श्री. दिलीप सावर्डेकर यांच्यातर्फे प्रसारित…धन्यवाद!)

रबाळे एमआयडीसीतील ‘हिवा इंडिया’ कंपनीतील २४२ कामगारांना तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ…सलग ‘पाचवा त्रैवार्षिक-करार’!

भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही हरित पक्ष अशी मान्यता असणारा व “Zero Tolerance Towards Corruption and Exploitation Of Man and Nature”, असं ब्रीद असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापकीय अध्यक्ष आणि अवघ्या औद्योगिकविश्वात ‘कामगार-हृदयसम्राट’ अशी ख्याती असणारे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत (कंपनीला गेल्या दिडदोन वर्षांपूर्वी एका व्यवहारातून फार मोठा आर्थिक-फटका बसल्यानंतरही)…देशातील प्रस्थापित निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेऊन, पुन्हा एकदा आपल्या नावलौकिकाला साजेसा असा, ‘चमत्कार’ घडवून आणला आहे!
…चमत्कार असा की, ४ कामगारघातकी कायद्यांनी बनलेल्या ‘काळ्या कामगार-संहिते’अंतर्गत समस्त कामगार-कर्मचारीवर्गावर लादल्या गेलेल्या सद्यस्थितीतल्या ‘गुलामगिरी’त… जेवढा मासिक-पगार (विशेषतः, कंत्राटी-कामगारांना म्हणजेच, ‘आधुनिक-गुलामां’ना, १२ तासाला १२ हजार पगार, इतका तुटपुंजा मिळणारा पगार विचारात घेता) हल्ली मिळत नाही; तेवढी नुसती थेट वेतनवाढ ‘हिवा-कामगारां’ना मिळालेली आहे.
नवी मुंबईस्थित रबाळे एमआयडीसीमधील ‘हिवा इंडिया’ कंपनी; ही वहातूक, बांधकाम, खाणकाम, अवजडसाहित्य-हाताळणी वगैरे क्षेत्रांसाठी टीपर्स, हाॅक-लोडर्स, काँपॅक्टर्स यासारखी ‘हायड्रॉलिक-उपकरणे’ उत्पादित करणारी जगभरातील ख्यातनाम कंपनी होय.
या हिवा-कंपनीतील कामगार सदस्यांना, या त्रैवार्षिक कराराअंतर्गत, सरासरी तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ मिळालेली आहे. विशेष म्हणजे, ‘CTC या व्यवस्थापकीय-फसव्या संकल्पने’वर आधारित ही पगारवाढ बनावट नसून, सर्व कामगारांना समानपद्धतीने (Flat) थेट पगारवाढ देण्यात आलेली आहे…
…विशेष बाब म्हणजे, कामगार-कर्मचारीवर्गाच्या संदर्भात, या देशातील “प्रगती-समृद्धीची गंगा उलटी वहात असताना”, प्रवाहाविरुद्ध पोहून जात प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारी व कामगारविश्वाच्या हितार्थ ‘मूलगामी-बदला’चा संदेश देणारी…आपली अदम्य-साहसी परंपरा कायम राखताना, कामगार-हृदयसम्राट राजन राजे यांनी कंपनीतील उरल्यासुरल्या, हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या कंत्राटी-कामगारांना देखील (पूर्वीच्या करारांच्या माध्यमातून, याच कंपनीतील जवळपास १५० ‘कंत्राटी-कामगार’ आजवर कायम केले गेले आहेत, हे विशेषत्वाने नमूद करतो आहोत), या कराराच्या कालावधीत ‘कायमस्वरुपी’ नोकरीत सन्मानाने प्रविष्ट करुन घेतले आहे!
मंगळवार, दि. ११ जून-२०२४ रोजी, रबाळे एमआयडीसीमधील आस्थापनेत मोठ्या जल्लोषात आणि हर्षोल्हासाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या ऐतिहासिक पगारवाढीत कंपनीतील एकूण २४२ कामगारांना व भविष्यात कंपनी-सेवेत ‘कायम’ होऊ शकणाऱ्या, अशा सगळ्याच कामगारांना,
* पहिल्या वर्षी *५,८०० रुपये,
* दुसऱ्या वर्षी *४,३५० रुपये तर,
* तिसऱ्या वर्षी *४,३५० रुपये पगारवाढ देण्यात आली असून, बेसिकमध्ये ६० टक्के व इतर अलाऊन्सेसमध्ये ४० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, दिवाळी-बोनस म्हणून, कमीतकमी ८० हजार व जास्तीतजास्त १ लाखाहून अधिक रुपयांची भरघोस रक्कम कामगारांना मिळणार आहे.
अशा प्रकारचा चमत्कार, कुठलंही भक्कम राजकीय-पाठबळ सोबत नसतानाही, “राजन राजे” नावाच्या, असंख्य कामगारांचं आर्थिक-उन्नयन करणाऱ्या, ‘पंचाक्षरी-मंत्रा’ने केला आहे आणि तोच ते करु जाणे!
मरगळलेल्या औद्योगिकविश्वात सनसनाटी निर्माण करणारा, आणखी एक करार म्हणून, हा करार खचितच ओळखला जाणार आहे. या ऐतिहासिक कराराच्या माध्यमातून, ‘हिवा’च्या कामगारांना सर्व्हिस अवॉर्ड म्हणून,
पाच वर्षांसाठी ५००० रुपये,
दहा वर्षांसाठी १०,००० रुपये,
पंधरा वर्षांसाठी १५,००० रुपये,
वीस वर्षांसाठी २०,००० रुपये,
पंचवीस वर्षांसाठी २५,००० रुपये; तसेच,
पुढे एखादा कामगार २६व्या वर्षी सेवानिवृत्त होत असेल तर, त्याला २६ हजार रुपये, २७व्या वर्षी सेवानिवृत्त होणार असेल तर, २७ हजार रुपये आणि कामगार जर २७ व ३०च्या दरम्यान सेवानिवृत्त होणार असेल तर, त्या कामगाराला ३० हजारांची रक्कम देण्यात येणार असल्याचे, या करारात नमूद करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त इतर, अनेक सेवासुविधा व सेवाभत्त्यांमधेही, कराराअंतर्गत भरघोस वाढ करण्यात आलेली आल्यानं, सध्याच्या पावसाळी वातावरणात, पहिल्यावहिल्या पावसाच्या आगमनाने थुईथुई नाचणार्या मोरासारखं, समस्त हिवा-कंपनी कामगारवर्गाचं मन आनंदानं थुईथुई नाचू लागलंय!
दरम्यान, या ऐतिहासिक अशा त्रैवार्षिक करारामुळे, प्रामुख्याने भूमिपुत्र असलेल्या कामगारांच्या आयुष्यात ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा कोंबडा खणखणीत स्वरात आरवल्यामुळे, आर्थिक समृद्धीची पहाट झालेली आहे. त्यामुळेच, “केवळ एका पिढीचंच नव्हे; तर, कामगारांच्या तमाम पुढील पिढ्यापिढ्यांचंही कल्याण साधणारा नेता”, या राजन राजे यांच्या क्रांतिकारी लौकिकावर पुनश्च नव्याने शिक्कामोर्तब झालेलं आहे.
“एका कायम कामगाराच्या जागी, तीन कंत्राटी-कामगार नेमण्याचे” कामगारघातकी ‘ट्रिपल-इंजिन’ सरकारचे धोरण असताना व संपूर्ण भारतात कामगारविरोधी धोरणांचे चक्रीवादळ गरगरत असतानाच, प्रवाहाच्या विरोधात पोहून जाण्याची किमया, पोलादी कामगार-एकजुटीच्या बळावर, राजन राजे आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील ‘धर्मराज्य पक्ष’ व त्याअंतर्गत असलेल्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ नावाच्या कामगार संघटनेने, करुन दाखवलेली आहे. काळी कामगार संहिता लादून, कायम-कुशल कामगारांना अक्षरशः ‘गुलाम’ बनविण्याचे विश्वासघातकी-घृणास्पद उद्योग सुरु असताना, राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली संपन्न झालेला, हा ऐतिहासिक करार होय!
कराराप्रसंगी समस्त हिवा-कामगारांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, “कामगारांसाठी ‘अमृत’ नव्हे; तर, ‘विषाक्त किंवा विषा’समान ठरलेल्या, या ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळा’त…म्हणजेच, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेल्यावर व पुढील वर्षी देश प्रजासत्ताक झाल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाच…माझा, हिवा-कंपनीचा कामगार, या करारान्वये पगाराच्या सरासरीची ‘पंचाहत्तरी’ गाठत असावा (सरासरी पगार ७५ हजार) व स्वातंत्र्याचा ‘शतकी-महोत्सव’ साजरा होण्यापूर्वीच बोनसची ‘शंभर-हजारी’ (म्हणजेच, एक लाखाहून अधिक ‘सहा आकडी’ बोनस) मजल गाठावी…हा दुर्लभ असा, दुग्धशर्करा-योग आहे आणि तो केवळ, कामगारांच्या पोलादी एकजुटीने व संघर्षासाठी कुठल्याही त्यागाला तयार असण्याच्या दृढ निर्धारानेच घडून आला आहे…राजन राजे, हा कामगार-नेता, केवळ, निमित्तमात्र आहे!”
यादरम्यान, या कराराप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण यांच्यासह, ‘हिवा इंडिया’ युनिट अध्यक्ष श्री. निलेश बारोटे, उपाध्यक्ष श्री. संतोष गाडवे, सचिव श्री. संजय उघडे, उप-सचिव श्री. विजय सोनावणे, खजिनदार श्री. दादा मोरे, उप-खजिनदार श्री. गुरुनाथ पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री. विनोद बावकर त्याचप्रमाणे व्यवस्थापनाच्या वतीने ऑपरेशन्स डायरेक्टर श्री. प्रशांत मानकामे, एच. आर., बिजनेस पार्टनर आणि डायरेक्टर श्री. हेमंत सुर्वे, सिनियर मॅनेजर, एच. आर. आणि इंडस्ट्रीयल रिलेशन्स श्री. संदेश मोडक, डेप्युटी मॅनेजर, एच. आर. श्री. संतोष आग्रे आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.

‘हिवा इंडिया’ कंपनीत भव्यदिव्य त्रैवार्षिक करार !

, , , ,

“ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात……”
राजन राजेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास रचला…!!!

एकीकडे नवी मुंबईतील दिघा येथील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना ऐन गणेशोत्सवात दीड ते दोन लाखांच्या दरम्यान बोनस देऊन त्यांची दिवाळी साजरी झालेली असतानाच, नुकत्याच साजऱ्या झालेल्या दिवाळसणाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून नवी मुंबईस्थित महापे येथील ‘हिवा इंडिया’ कंपनीतदेखील भव्यदिव्य असा, तब्बल १२ हजार १०० रुपये पगारवाढीचा त्रैवार्षिक करार ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होऊन पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात येऊन कंपनीतील एकूण ७२ कंत्राटी कामगार कायम झाले आहेत. या करारामुळे गेली अनेक वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या कामगारांना हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळून, त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना कमीतकमी ५० हजार, तर जास्तीतजास्त ६५ हजार इतकी दरमहा पगारवाढ झाली असून, बोनस म्हणून कमीतकमी ६० हजार, तर जास्तीतजास्त ८० हजार रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदानासहित कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे ‘हिवा इंडिया’ कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटी नोकरीच्या गुलामगिरीत खितपत पडलेले कामगार आज खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ झालेले असून, आम्हाला स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मा. श्री. राजन राजे साहेबांनाच जाते, अशा शब्दांत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, गेल्या ३६ वर्षांपासून कामगारक्षेत्रात कार्यरत असलेल्या राजन राजे यांनी, तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळात हजारो कामगारांना समृद्धीचा मार्ग दाखवलाय. कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी व्यवस्थापनाशी आणि भांडवलदारी व्यवस्थेशी त्यांनी प्राणपणाने संघर्ष केलाय. गुलामगिरीचे प्रतीक असलेली कंत्राटीपद्धती ही कामगारक्षेत्रातील नव-अस्पृश्यता असल्यामुळे राजे यांनी सुरुवातीपासूनच या प्रथेविरुद्ध लढा उभारला व तो यशस्वीही करून दाखवला. ‘हिवा इंडिया’ कंपनीचा भव्यदिव्य त्रैवार्षिक करार हा उल्लेखनीय असला, तरी या कंपनीतील ७२ कंत्राटी-कामगार गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाले, हेच माझ्या आतापर्यंतच्या संघर्षाचं फलित असल्याची प्रतिक्रिया राजन राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ऐन दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवार, दि. ५ नोव्हेंबर-२०१८ रोजी पार पडलेल्या या काराराप्रसंगी ‘हिवा इंडिया’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद गांगुली हेदेखील उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि खजिनदार अण्णा साळुंखे या पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक करारान्वये १२ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांचे वेतनमान उंचावले असून, याबाबत ‘हिवा इंडिया’च्या समस्त कामगारांनी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे जाहीर आभार व्यक्त करून एकच जल्लोष केला.

error: Content is protected !!