Category: सामाजिक

दि. ५ डिसेंबर २०२५, रात्री ११ वाजता : महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांना अभिवादन, मा. राजन राजे यांची उपस्थिती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला, दि. ५ डिसेंबर-२०२५ रोजी, रात्रौ ११ वाजताच्या सुमारास ठाणे शहरातील पंचगंगा सोसायटी-राबोडी येथील ‘संजीवनी बहुउद्देशीय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आणि त्यानंतर कोर्टनाका येथे, आंबेडकरी-नेते सुनील खांबे यांनी आयोजित केलेल्या, महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांनी उपस्थित राहुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्रस्मृतींस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भीमसैनिकांना संबोधित करताना मा. राजन राजे म्हणाले की, “आजच्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ या भूमिकेच्या पलीकडे जाऊन, ‘समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणे अधिक गरजेचं असून, ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ किंवा ‘दलितांचा मसीहा’ या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं म्हणजे, ‘कोहिनूर हिऱ्या’ला अंगठीत कोंडून टाकण्यासारखे आहे. शिवछत्रपती असोत वा बाबासाहेब असोत, त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं ‘आर्थिक-उन्नयन’ करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी, शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान निश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा, ‘नांगरधारी’ शिवछत्रपती जे, न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे होते. हे जेवढे महात्त्वाचे; तितकेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही, ‘समतेचा संदेश’ देणारे बाबासाहेब जनसामान्यांसाठी अधिक महात्त्वाचे आहेत!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भाषणात मा. राजन राजे यांनी, कंत्राटी-कामगार पद्धत व केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘काळ्या-कामगार संहिते’वर एकच शरसंधान साधून, कामगारद्रोही भाजप सरकार आणि भांडवलधारी प्रस्थापित व्यवस्थेवर सडकून टीका केली. या अभिवादन कार्यक्रमाला पंचगंगा-राबोडी परिसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी तसेच, कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ मोठ्यासंख्येने भीमसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील नेते सुनील खांबे आणि संदीप खांबे यांनी केले होते.

आगरी-कराडी कामोठे महोत्सवात मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती

‘कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ आणि ‘झेंडा सामाजिक संस्था’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव-२०२५” या कार्यक्रमाचे सालाबादप्रमाणे याहीवर्षी, दि. २३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, कामोठे (ता. पनवेल) येथे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष तसेच, ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायला संबोधित करताना मा. राजन राजे यांनी, “आगरी-कोळी-कराडी समाज हा, मुंबई आणि नवी मुंबईसह, संपूर्ण रायगड जिह्याचा मूळ रहिवाशी असून, फक्त आपल्या जिल्ह्याचेच नव्हे; तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे व मराठी-भूमिपुत्रांचे रक्षण करण्याची तुमच्यावर आहे. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून आम्ही रक्तपिपासू शोषक-व्यवस्था (Vampire State System) असलेल्या, धनदांडग्या भांडवलदारांविरोधात अविरत संघर्ष करीत आहोतच… तुम्हीही ‘भूमिपुत्र’ म्हणून सावध राहिलेच पाहिजे!” अशा शब्दांत आवाहन करुन, या आगरी-कराडी महोत्सवाच्या, १४व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. महोत्सवाच्या या कार्यक्रमाला, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक-मालक संघटने’चे श्री. महेंद्र म्हात्रे, श्री. राजू म्हात्रे, श्री. आत्माराम म्हसकर, श्री. सदाभाऊ भोईर आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. गोपीनाथ भगत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

गिरणी कामगार व सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे : ‘घर हक्क परिषदे’ची पत्रकार परिषद

गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी, येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात, गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मोर्चा काढण्यात येणार असून, त्याचीच माहिती देण्यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी, गांधी भवन (कुलाबा, मुंबई) येथे, एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष मा. विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे नेते कॉ. शिशिर ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, संविधानातील अधिकारानुसार जमिनीची मालकी ही, जनतेची असते. याच अनुषंगाने, सर्व बंद कारखान्यांच्या जमिनी, त्या कारखान्यांत काम करणारे कामगार व सर्वसामान्य जनतेच्याच असल्याने, त्या जमिनींवर गिरणी कामगार व जनतेसाठी परवडणारी घरे बांधावीत, अशी मागणी पत्रकार परिषदेत करुन, दि. १ ऑगस्ट-२०१९ रोजीचा जीआर रद्द करण्यात यावा, अशीही मागणी, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चात करण्यात येणार असल्याचे मा. विश्वास उटगी यांनी सांगितले. “आमच्या जमिनीवर, आमच्या घराचा हक्क” या घोषणेनुसारच, यापुढे ‘घर हक्क परिषद’ आपला लढा सुरु ठेवणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्यात येऊन, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलीआहे. तसेच, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, अशी माहिती मा. विश्वास उटगी यांनी, यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

१५ नोव्हेंबर २०२५ : गिरणी कामगारांच्या घरहक्कासाठी परळ-भोईवाड्यात मा. राजन राजे व विविध पक्षांचे नेते एकत्र

गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, मोर्चेबांधणी सुरु झालेली असून, त्याच पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १५ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’च्या परळ-भोईवाडा येथील कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष श्री. विश्वास उटगी, राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे कार्याध्यक्ष श्री. गोविंदराव मोहिते, काँग्रेसचे श्री. गजानन देसाई, श्री. मोहन तिवारी, श्रीमती छाया थोरात, डाव्या पक्षांचे नेते कॉ. शिशिर ढवळे, कॉ. सुकुमार दामले, श्री. विजय कुलकर्णी, रेमण्ड कामगार संघर्ष समितीचे श्री. अनिल महाडिक आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्याचे बैठकीत ठरले असून, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

१३ नोव्हेंबर २०२५ : ‘जोहरान ममदानी’ यांच्या ऐतिहासिक विजयानिमित्त परळ येथे डाव्या पक्षांचा संयुक्त विजयोत्सव; ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे प्रमुख वक्ते

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून, अमेरिकन भांडवलशाहीच्या अड्ड्यात न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले. भारताच्या आणि भारतीयांच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पराभव आहे. ममदानी स्वतःला अभिमानाने लोकशाहीवादी-समाजवादी म्हणवतात. अर्थातच, जागतिक भांडवली-साम्राज्यवाद्यांना ही एकप्रकारची चपराक आहे. परिणामी, जागतिक पुरोगामी लोकशाही चळवळींना, हा मोठा हुरुप देणारा विजय आहे.
याच अनुषंगाने, जोहरान ममदानी यांचा विजय साजरा करण्यासाठी, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’च्या परळ (पू.) येथील दळवी बिल्डिंगमध्ये गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ममदानी यांच्या विजयोत्सवाच्या या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. अजित पाटील आणि कॉ. फिरोज मिठीबोरवाला आदी मान्यवर मंडळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होती. हा कार्यक्रम सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय-एमएल (लिबरेशन) आणि ‘हम भारत के लोग’ या डाव्या विचारसरणीच्या पक्ष/संघटनांनी आयोजित केला होता. याप्रसंगी सर्व प्रमुख वक्त्यांनी अमेरिकेच्या आणि एकंदरीतच जागतिक भांडवलशाहीविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, आपल्या घणाघाती भाषणात, गेल्या शतकभरातील अमेरिकन भांडवली-इतिहासाचा मागोवा घेत ममदानी यांच्या पुढ्यात उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा आढावा घेतला व त्यातून डाव्या चळवळीने कुठल्या पद्धतीने व किती सावधगिरीने आपली भविष्यकालीन वाटचाल करायला हवी…याबाबत, रोखठोक प्रतिपादन केलं.
हे प्रतिपादन करताना, “अमेरिकेचे ३२वे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी तत्कालीन ढासळती अमेरिकन अर्थव्यवस्था व टोकाला पोहोचलेली ‘आर्थिक-विषमता’ सावरताना जोहरान ममदानींप्रमाणेच ‘न्यू डील’द्वारे कशा व कुठल्या उपाययोजना केल्या होत्या व त्यांचं पुढे काय झालं…याचा ओघवता मार्गदर्शनपर धांडोळा घेतला.
“महाराष्ट्राच्या महानगरांतील सार्वजनिक वहातूक-व्यवस्थेसह महाराष्ट्राच्या खेडोपाडी पसरलेली एसटीची सेवा कशी विनामूल्य करता येईल व त्यातून, कार्बनचं ऊत्सर्जन कमी होऊन ‘जागतिक-तापमानवाढ’ रोखण्यास कसा हातभार लावता येईल…याची डाव्या चळवळीने ‘जोहरान ममदानी’ व ‘सिंगापूर’च्या धर्तीवर संगतवार मांडणी करत…वर्ष-२०२९च्या पुढील लोकसभा-विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे”, अशी लाखमोलाची सूचना केली.
विजयोत्सवाच्या या कार्यक्रमाचे आयोजन कॉ. चारुल जोशी, कॉ. विवेक मॉन्टेरो, कॉ. श्याम गोहील, कॉ. गुड्डी एस. एल., कॉ. अमीर काझी आणि कॉ. अली भोजानी यांनी यशस्वीपणे केले.

गिरणी कामगारांसाठी ‘घर हक्क परिषद’ची मोर्चेबांधणी : परळ-भोईवाड्यात २९ पक्ष-संघटनांची महत्वपूर्ण बैठक

गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, मोर्चेबांधणी सुरु झालेली असून, त्याच पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २७ ऑक्टोबर-२०२५ रोजी, मुंबईतील परळ-भोईवाडा येथील ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालया’त एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सुमारे २९ पक्ष-संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून, ठाणे, मुंबई, उपनगरे आणि महाराष्ट्रातील महात्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात येऊन, एक मसुदा तयार करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. दरम्यान, या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे, मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी डॉ. गजानन देसाई, काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, काँग्रेसचे रोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गोविंदराव मोहिते, डाव्या चळवळीतील शिशिर ढवळे, सुकुमार दामले, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते समीर चव्हाण आणि पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांच्यासह, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

१२ ऑक्टोबर-२०२५ : ‘घर हक्क परिषदे’त राजन राजे यांची ज्वलंत भूमिका — “कुणी घर देता का घर?

मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त, मुंबई आणि उपनगरांपुरता नाहीये; तर, मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, नागपूर या सगळ्या शहरांमधून तुम्ही-आम्ही सगळेजण विस्थापित झालेलो आहोत किंवा हळूहळू होत आहोत. करोना-काळात वन्यप्राण्यांनी जशा आपापल्या जागा माणसांकडून पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या; तशा, आता महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी-माणसांच्या ताब्यात देण्यासाठी, धनदांडग्यांकडून ‘जागा रिकाम्या’ करुन घ्याव्या लागतील!
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील, गणपतराव बेलवलकरांचं, “कुणी घर देता का घर”, हे जे स्वगत आहे, अगदी तशीच अवस्था मराठी माणसाची झालेली आहे. अशी ‘घरघर’ लागूच कशी शकते, मराठी माणसाला आपल्याच हक्काच्या महाराष्ट्रात? “माणसांना घरं नाहीत आणि घरांना माणसं नाहीत”, असा विलक्षण विपरीत काळ “घराच्या-दुकानांच्या साठेबाजीतून सध्या मराठी-माणसांवर येऊन ठेपलाय”, अशा रोखठोक शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले…ते दादर येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या, टिळक भवन येथील सभागृहात बोलत होते.
गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या परवडणाऱ्या घरांसंदर्भात, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आयोजित केलेल्या ‘घर हक्क परिषदे’च्या मेळाव्यात राजन राजे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, “बारा तासांसाठी बारा हजार रुपये” अशी महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती आहे. मुंबई सोडाच, ठाण्यासारख्या शहरात पाचशे-साडेपाचशे चौरसफुटांचा वन बीएचके फ्लॅट, ५० लाखांत येतो. नोकरी साधारण पस्तीस वर्षांची धरली तरी, कामगाराचा सगळा पगार दरमहा हप्ते फेडण्यात गेल्यावरच, त्याची नोकरी संपताना तो फ्लॅट खऱ्याअर्थाने त्याच्या मालकीचा होणार… या काळात तुम्ही भोजन-खानपान, कपडालत्ता, मुलाचं शिक्षण-आरोग्य कशाकशावर म्हणून खर्च करायचा नाही, हौसमौज तर विसरुनच जा…फक्त, एका हाताने पगार घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तो बँकेत भरायचा आणि शहरातल्या प्रदूषित हवेवर घरात कोंडून जगायचं… आहे शक्य कोटीतलं हे भयंकर आक्रित? एवढी केविलवाणी परिस्थिती मराठी सामान्य जनांची आपल्याच महाराष्ट्रात झालीच कशी??
…जर, अजूनही तुम्ही या जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारांना आणि त्यांना साथ देणाऱ्या मराठी राजकारणी-दलालांना आवरलं नाहीत…वेळीच जागे झाला नाहीत; तर, लक्षात ठेवा, एकदिवस वेळ अशी येईल की, जसा तुम्ही जमिनीवर-पाण्यावर कर भरता; तसाच, तो उद्या सूर्य-किरणांवर ते कर भरायला लावतील…सूर्यकिरणांचा ‘सातबारा’च त्यांच्या नावावर करुन घेतील, इतकी गंभीर परिस्थिती आहे.
वर्ष १९७०पर्यंत प्रत्येक प्रौढ व्यक्तिला जास्तीतजास्त एकच फ्लॅट खरेदी करता येत होता; पण, बिल्डर राजकारण्यांनी आणि राजकारणातून बिल्डर बनलेल्यांनी घरांचं बांधकाम, हा ‘उद्योग’ बनवला व आपल्या नफेखोरीतल्या सगळ्या अडचणी, अटीशर्ती काढून टाकल्या; त्यामुळे फ्लॅट व दुकाने खरेदी, हा बक्कळ परतावा देणारा गुंतवणुकीचा मार्ग व त्यातूनच, काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत बनला!
“अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे घर”, हा माणसाचा नैसर्गिक व मूलभूत अधिकार असताना…१९७०नंतर घरांची प्रचंड साठेबाजी व काळाबाजार सुरु होऊन भाव गगनाला भिडायला लागले व त्यातच मराठी कामगार-कर्मचारीवर्ग कायमच पिचला जायला लागला!
…तेव्हा, लक्षात ठेवा, सुदैवाने वर्ष १९७७-७८च्या राज्यघटनेतील ४४व्या घटनादुरुस्तीमुळे सुदैवाने ‘संपत्तीचा-अधिकार’, हा आता ‘मूलभूत-अधिकार’ राहिलेला नाही. तो आता फक्त, कायदेशीर-अधिकार आहे; म्हणूनच कायदा करुनच ‘संपत्तीचं फेरवाटप’ व्हायला हवं! त्याकामी, शहरं-उपनगरांमधून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक मकान, एक दुकान”असा कायदा व्हायला हवा…तो झाल्याशिवाय, गगनाला भिडलेले फ्लॅटस् आणि दुकानांचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार नाहीत!
…जसं भूदान-चळवळीतून विनोबा भावेंनी “सब भूमी गोपाल की” गर्जना करत, लाखो हेक्टर जमीन फेरवाटपासाठी मिळवली; तसेच, हे अतिरिक्त लाखो फ्लॅट्स व दुकाने…सिंगापूरच्या धर्तीवर, महाराष्ट्र-सरकारने ताब्यात घेऊन सुशिक्षित मराठी-तरुणाईला, वाजवी भाड्याने उपलब्ध करुन द्यायला हवीत…तरच, मराठी माणूस मुंबई-महाराष्ट्रात सन्मानाने व सुखासमाधानाने अस्तित्वात राहील…अन्यथा मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर (मुंठापुराना) शहरांतून त्यांचं साफ उच्चाटन होईल व वाघांसाठी जशी चंद्रपुरच्या ताडोबासारखी अभयारण्ये राखावी लागलीयत; तशी सामान्य मराठी-माणसांसाठी ‘अभयारण्ये’ निर्माण करावी लागतील!
…या परिषदेच्या निमित्ताने विविध २७ पक्ष-संघटना एकत्र आलेत, ही फार चांगली गोष्ट आहे. पण, एवढ्यावर थांबून चालणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत, जे खरंतर चळवळीतून आलेले आहेत. *ते कुठल्या बड्या श्रीमंत घराण्यातून आलेले नाहीत की, एखाद्या बड्या राजकारण्याच्या घरात पाळणा हलला, म्हणून ते नेते झालेले नाहीत, म्हणूनच त्यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा असल्याच्या भावनादेखील राजन राजे यांनी बोलून दाखवल्या. यावेळी राहुल गांधी यांचं कौतुक करताना, ते पुढे म्हणाले, मला महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल, या दोन्ही व्यक्तित्वांचा ‘संगम’ राहुल गांधीमध्ये दिसतो… आज ही माणसं काँग्रेसमध्ये आहेत, म्हणून आशा करायला काही जागा आहे… राष्ट्रीयस्तरावर राहुल गांधी तर, राज्यस्तरावर हर्षवर्धन सपकाळांसारखी नेतेमंडळी आहेत, म्हणून आम्ही कॉंग्रेससोबत आहोत. राहुल गांधींसोबत महाराष्ट्राचे ‘भीष्माचार्य’ कुमार केतकर आहेत आणि हर्षवर्धन सपकाळांसोबत महाराष्ट्राचे ‘द्रोणाचार्य’ विश्वास उटगी आहेत, अशा ओघवत्या शैलीत राजन राजे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
…याप्रसंगी, व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष शिशिर ढवळे, आयटकचे सुकुमार दामले, कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, गिरणी कामगारांच्या वकील गायत्री सिंग यांच्यासह, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार-सभासद तसेच, कामगारक्षेत्रातील व डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होती.

‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची ‘घर हक्क परिषद’ बैठकीत उपस्थिती

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी लढा देणाऱ्या ‘घर हक्क परिषद’ या संघटनेची बैठक शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ‘इंटक’चे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ-भोईवाडा, मुंबई येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी गिरणी कामगार व नागरिकांसाठीच्या जाहीरनाम्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव व ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, गिरणी कामगारांचे प्रतिनिधी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्री. विश्वास उटगी, ज्येष्ठ विचारवंत श्री. शिशिर ढवळे, रेमण्ड कंपनीच्या कामगारांचे प्रतिनिधी श्री. विलास घाग, श्री. प्रदीप साळसकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. दरम्यान, ‘घर हक्क परिषदे’ची आगामी बैठक रविवार, दि. १२ ऑक्टोबर-२०२५ रोजी, टिळक भवन, दादर-मुंबई दुपारी ३ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती, यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.

“धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा, ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं अधिक नुकसान करतात!” -राजन राजे

“अंधश्रद्धा स्वतःच एक ‘व्यवस्था’ असते; जी आतून मुठभरांच्या वर्चस्वाला चांगलीच आधारभूत होत रहाते… आणि, आजच्या भांडवली-व्यवस्थेत अशा अनेक अंधश्रद्धांना, ‘व्यवस्था’ चालवणारे जाणिवपूर्वक, याच कारणामुळे पुढावा देत असतात. म्हणूनच तर, आपल्या महाराष्ट्रात, दिवसागणिक खोल गर्तेत जात चाललेल्या मराठी-माणसाला, विविध धर्मसंप्रदायात व्यवस्थेकरवी कौशल्याने अडकवलं जातं. परिणामी, धार्मिक अंधश्रद्धा, जेवढं समाजाचं नुकसान करतात; त्याच्यापेक्षा कैकपटीने अधिक ‘राजकीय-अंधश्रद्धा’ समाजाचं नुकसान करतात!” असे रोखठोक भाष्य ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगारनेते, तथा राजकीय व सामाजिक विचारवंत राजन राजे यांनी नुकतेच ठाण्यात केले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल, समितीच्या ठाणे शहर शाखा आणि ठाण्यातील सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना, राजन राजे पुढे म्हणाले की, “कुणी बुलंद आवाजात भाषणं ठोकत, आपलं प्रतिनिधित्व करणारा अमकातमका राजकीय पुढारी (जो कधि ‘जाणता राजा’ म्हणून मिरवत असतो; तर, कधि कुठलं ‘सम्राटपद’ भूषवत असतो), आपल्या समाजाचं पुनरुत्थान करेल, आपल्यावर चारही बाजुंनी होत असलेला अन्याय दूर करेल, अशी थेट ‘अवतार-संकल्पने’ला जाऊन भिडणारी आपली अंधश्रद्धा असते; जेव्हा, तो नेता बोलत एक असतो आणि करत वेगळंच असतो… तो व्यवस्थेचा लाभार्थी तर असतोच; पण, व्यवस्थेच्या बळकट पाठिंब्यावरच त्याचं ‘नेतेपद’ अवलंबून असल्यामुळे, ही ‘राजकीय-नौटंकी’ तो तहहयात करत रहतो आणि लोकं त्या ‘राजकीय-अंधश्रद्धे’ला बळी पडत रहातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन व ‘किमान-वेतन’ सन्मानजनक झाल्याखेरीज, उत्तरेचं नोकरपेशातलं आक्रमण थोपवल्याखेरीज आणि शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान, एक मकान” धोरण राबवून धनदांडग्या गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला रोखल्याखेरीज… ‘मराठी-माणसां’चं (जे महागड्या शहरांमधून निवासाची व व्यवसायाची संधि उपलब्ध नसल्यामुळे, बहुतांश दूरवर रहाणारे कामगार आहेत) भलं होणं शक्यच नाही, हे एखादं गल्लीतलं शेबडं पोरं पण जाणतं…पण, मी मी म्हणणारा कुठलाही मराठी-नेता (ज्यांच्याविषयी मराठी भाबडी जनता ‘राजकीय-अंधश्रद्धा’ बाळगून असते), असल्या व्यवस्थेच्या गाभ्यातील अथवा ‘मराठी-जगण्या’च्या आसाला भिडलेल्या मुद्द्यांवर चुकूनही काम करणं तर सोडाच; साधा उच्चारही करताना दिसणार नाहीत. तेव्हा, या राजकीय-अंधश्रद्धांना जोवर आपण मराठी-माणसं ‘मूठमाती’ देत नाही व स्वतःला सक्षम बनवत नाही, तोवर मराठी-माणसांचं पिढ्यानपिढ्या नुकसान होतच रहाणार आहे, मराठी-माणसं गुलामीत ढकलली जातच रहाणार आहेत… मराठी-माणसानं स्वतःला सक्षम बनवणं म्हणजे, “व्यक्ति आधारित कमी आणि धोरण आधारित जास्त राजकारण करणं!” अशा परखड शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी व्यसपीठावर, प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनपीएम’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय मं.गो., ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’चे विश्वस्त दत्ता बाळसराफ, प्रा. मच्छिंद्र मुंडे उपस्थित होते. दरम्यान, समितीच्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंनिस’च्या केंद्रीय सदस्या सुशीला मुंडे यांनी केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे संजय दळवी, अनिल महाडिक, नरेंद्र शिंदे, रामसकल भर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीचं अस्तित्व, महाराष्ट्रधर्माचं रक्षण – हिंदीसक्तीविरोधात वैचारिक एल्गार!

राज्यशासनाच्या हिंदीसक्तीविरोधात, मराठी अभ्यास केंद्र यांच्या वतीने, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, माकपचे मा. अनिल नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मा. राजन राजे यांनी, आपल्या ओघवत्या शैलीत आपले विचार आक्रमकपणे उपस्थितांसमोर मांडले…
———————————-
मराठी ही जगातील एकमेव निसर्ग-पर्यावरणस्नेही भाषा!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे मातृभाषेप्रती गौरवोद्गार…
———————————-
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसह, ठाणे आणि नवी मुंबईसोबतच, महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांतील येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने, राज्यातील हिंदी-भाषिकांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु केले असून, परप्रांतीयांची एकगठ्ठा मतं भाजपाच्या पारड्यात पाडून, मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा मनसुबा आता लपून राहिलेला नाही. मराठी माणसाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्क डावलण्याचे कारस्थान, दिल्ली-दरबारी शिजल्यानंतर महाराष्ट्रद्रोही भाजपाने आता, त्यासाठी कंबर कसून, आपले मराठीद्वेष्टे राजकारण सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राज्यभरातील शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून, हिंदीसक्तीचा निर्णय राज्यशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. यामाध्यमातून मराठीची गळचेपी करुन, महाराष्ट्राच्या अधिकृत राजभाषेला दुय्यम दर्जा देण्याचा कट आखला जात असतानाच, महाराष्ट्रातील समविचारी पक्ष आणि संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, या निर्णयाला कडाडून विरोध केला. ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे निमंत्रक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या पुढाकाराने, प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या, पर्यायाने हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठीप्रेमी नागरी समाज आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत अन्याय्य शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी आणि जाहीर सभेचे रविवार, दि. २९ जून-२०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे अजित नवले आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राजन राजे यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’ची मराठीवादी भूमिका प्रकर्षाने मांडली. “संयुक्त महाराष्ट्रानंतर… आता, ‘स्वायत्त महाराष्ट्र’ ….राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त महाराष्ट्र’…. ‘शिवछत्रपती-राष्ट्र’ !!!” हीच आमची महाराष्ट्र-धर्माची खरीखुरी व्याख्या असून, राजकीयदृष्ट्या आमची ताकद कमी असली तरी, मराठी भाषा आणि मराठी माणूस या दोन गोष्टींबाबत, आम्ही कमालीचे कडवट आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या वतीने आपण सगळ्या अत्यंत उचित मागण्या मांडलेल्या आहेत. त्याला आमचा पूर्वी पाठिंबा होता, आजही आहे आणि यापुढेही राहील. आपला महत्त्वाचा मुद्दा भाषा संवर्धनाचा होता. भाषा संवर्धनाचा का? मराठी भाषेचं संवर्धन करायचं आणि कसं करायचं असे दोन मुद्दे होते. मला इथे सांगायला अभिमान वाटतोय, मराठी भाषा ही, आजच्या जागतिक-तापमानवाढीच्या पर्यावरणीय महासंकटाच्या काळात, एकमेव अशी निसर्ग आणि पर्यावर-स्नेही अशी भाषा आहे. कारण, याच भाषेत आपण “वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे” असं म्हणतो. आपले सणदेखील प्राणी, वनस्पती यांच्याशीच निगडीत आहेत. मग ती नागपंचमी असेल, बैलपोळा असेल, तुळशी-विवाह असेल, वटपौर्णिमा असेल… मला नाही वाटत, असे नैसर्गिक संस्कार इतर कुठल्या संस्कृतीत असतील. त्यामुळे मराठी भाषेच्या सक्तीसोबतच, आता तिची पर्यावरणीय महासंकटांच्या पार्श्वभुमीवर ‘भक्ती’ होण्याची खरी गरज आहे. जगभरात तिची दखल घेतली गेली पाहिजे, असे गौरवोद्गार राजन राजे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले.
दरम्यान, आपल्या ओघवत्या शैलीत ‘धर्मराज्य पक्षा’ची भूमिका अधिक ठळकपणे विषद करताना, राजन राजे पुढे म्हणाले, मराठी भाषेवर वेगवेगळ्या भाषांचे आक्रमण होतंय, संक्रमण होतंय… ते, का आणि कशासाठी होतंय हे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. मुलांवरील अभ्यासाचं दडपण आपण कमी केलं पाहिजे, गणित आणि विज्ञान हे विषय अत्यंत गुंतागुंतीचे होत चाललेत. त्यातच रेशीम बागेतून आमचा इतिहासदेखील त्यात खोटेपणा घुसडवून गुंतागुंतीचा केला जातोय…खोटेपणा घुसवून इतिहास तर बदललाच; पण, आमचा भूगोलही बदलला…लडाखच्या गलवान खोऱ्यातला आमचा चार हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश, चीनला दान देऊन! त्यातच आणखी तिसऱ्या भाषेचं दडपण, आमच्या मुलांच्या बालमनावर बिलकुल येता कामा नये. हिंदीचं शिक्षण घ्यायचं असेल; तर, काळजी करायची गरज नाही, सक्ती तर अजिबात करायची नाही… कारण, त्याची काळजी ‘बॉलिवूड’ घेत आहे. मुलं आपसूकच हिंदी शिकतील ना, त्यासाठी शाळेतून सक्ती कशाला? शिवाय, महाराष्ट्रात घुसलेले करोडो उत्तर भारतीय आहेतच ती काळजी घ्यातला, अशा उपरोधिकपणे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… पण, आपल्याला ही बाजारपेठेतील किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं असून, त्यासाठी भांडवली व्यवस्थेला हादरे द्यावे लागतील. हा प्रश्न फक्त हिंदीभाषिक म्हणून उत्तर-भारतीयांपुरता मर्यादित नाहीये; तर, गुजराती आणि मारवाडी यांच्या भांडवली-व्यवस्थेला हादरा देण्याचा सुद्धा आहे आणि म्हणूनच, अनेक गोष्टींसोबत कंत्राटी-कामगारपद्धतीचं उच्चाटन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. देशासोबतच, प्रामुख्याने महाराष्ट्रासमोरील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या गुजराथी-भाषिकांच्या भांडवली व्यवस्थेला हादरे दिलेत, तरच तुमची मराठी भाषा आणि मराठी माणूस सुरक्षित राहील, नाहीतर त्याचं महाराष्ट्रातून उच्चाटन होईल. अनेक आंदोलनं करताना, पर्यावरणीय महासंकटाच्या संदर्भात आम्हाला सांगितलं जातं की, कोण कुठे जन्माला येतो हा अपघात असतो. कोण कोकणात जन्माला येतो तर, कोण आणखी कुठे जन्माला येतो; मग, आमच्या सगळ्यांचा महाराष्ट्रातला जन्मसुद्धा एकदाचा अपघात ठरवा आणि आम्हाला अरबी समुद्रात ढकला… नाहीतरी, आमच्या महापुरुषांचा पुतळा तुम्ही अरबी समुद्रात उभारत आहातच. मराठी तरुणतरुणींचे संसार आणि व्यवसाय फुलण्यासाठी (मुं.ठा.पु.रा.ना. म्हणजेच, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक अन् नागपूर) शहरं मोकळी करुन घ्यावी लागतील….आपल्याला पुढे भविष्यात दरडोई प्रौढ व्यक्तिमागे “एक दुकान-एक मकान” अशी कडक धोरणं राबवावी लागतील…तरच आणि तरच महाराष्ट्रात मराठी माणसाचा बोलबाला होईल, मराठी भाषेला पुन्हा एकदा कायमस्वरुपी महत्त्व प्राप्त होईल. गुजराथी माणसं हिंदी बोलतात, गुजराथी माणसं इंग्लिश बोलायला लागले तरी, गुजरातचे महत्त्व कमी होणार नाही… कारण, भारताची संपूर्ण अर्थव्यवस्थाच त्यांच्या ताब्यात आहे. आम्ही पाचवीपासून इंग्लिश शिकलो. पण, उत्तम इंग्लिश बोलू शकतो, भाषण करू शकतो, उत्तम लिखाण करू शकतो. थोडं इकडे तिकडे होईल, काही फरक पडत नाही. सध्याच्या AI गुगल-भाषांतराच्या तंत्रज्ञानाने इंग्रजीसह विविध भाषांमधील भाषांतरं सोपी झालेली आहेत…त्यामुळे, आपण जी सगळी धोरणं घेतलेली आहेत, ती अनुपम आहेत, योग्य आहेत आणि त्याला आमचा सदैव पाठिंबा राहील, हे या व्यासपीठावरून आम्ही जाहीर करतो, अशा शब्दांत राजन राजे यांनी, आपले मनोगत व्यक्त करुन, भविष्यातील मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले.
error: Content is protected !!