नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीमधील ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सभासदांचा ‘आनंद-मेळावा’ मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर-२०२५ रोजी, ठाण्यातील मॉडेला चेकनाका येथील ‘आर नेस्ट’ या वातानुकुलीत सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, पगारवाढ आणि आपल्या न्याय्य-हक्कांसाठी लोकशाही व सनदशीरमार्गाने ‘रेप्रो’च्या २८७ कामगार सभासदांनी, दि. ६ मार्च-२०१७ रोजीपासून, व्यवस्थापनाविरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यासंदर्भात, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे कंपनी व्यवस्थापनाविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. अखेर साडेआठ वर्षांच्या संघर्षानंतर, व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, सर्व संपकरी कामगारांची कायदेशीर देणी, या सोहळ्याच्या निमित्ताने धनादेशाद्वारे मा. राजन राजे यांच्या शुभहस्ते अदा केली. ‘रेप्रो इंडिया लिमिटेड’ या कंपनीतील कामगार सभासदांचा कायदेशीर लढा, युनियनचे वकील के. टी. विश्वनाथन यांनी मोठ्या नेटाने लढवला आणि त्याला तेवढीच खंबीर साथ, ‘धर्मराज्य’च्या कामगार सभासदांनी दिली. या कालावधीत ‘राजन राजे’ नावाचा पंचाक्षरी मंत्र सदैव कामगारांना प्रेरणा देत राहिल्यामुळेच, तब्बल आठ-साडेआठ वर्षे, कामगार सभासद आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाहीत, ही सर्वात उल्लेखनीय बाब होय… याच पार्श्वभूमीवर या ‘आनंद-मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला व्यवस्थापनाच्या वतीने, कंपनीच्या लीगल हेड व कंपनी सेक्रेटरी अलमिना शेख आणि कंपनीचे अकाऊंटंट समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी ‘रेप्रो’च्या कामगारांचे कुटुंबीयदेखील आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्याचे औचित्य साधून, मा. राजन राजे यांनी उपस्थित कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन;पूर्वक अभिनंदन करुन, त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सध्या देशातील कामगार-कष्टकरीवर्गाची अवस्था अत्यंत बिकट असून, केंद्र सरकारपुरस्कृत येऊ घातलेल्या काळ्या कामगार-संहितेमुळे, भविष्यात कामगारांना आपल्या हक्कासाठी संप, उपोषण आणि आंदोलने करता येणार नाहीत. ज्या भाजपला तुम्ही निवडून दिलंत, त्याच पक्षाने कामगार देशोधडीला लावायला घेतलाय.
तुम्हाला गणेशोत्सव-नवरात्रौत्सव, दहीहंड्या, जातीय व धार्मिक विद्वेष यातच गुंतवून ठेवत, सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्याचे कारस्थान, भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेले आहे… वेळीच सावध झाला नाहीत; तर, तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होणार हे निश्चित!” अशा परखड शब्दांत मा. राजन राजे यांनी, उपस्थित कामगारांना मर्गदर्शन केले. दरम्यान, याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
