दि. १३ मे २०२६ रोजी मार्क्सवादी शेतकरी नेते कॉ. प्रशांत सरखोत यांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे येथील कार्यालयात पक्षाध्यक्ष राजन राजे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान पर्यावरण, शेती, राजकारण आणि ग्रामीण भागासमोरील विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढते औद्योगिकीकरण, जंगलांची होणारी नासधूस, अनियंत्रित शहरीकरण आणि हवेतील वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम शेती, पाणी, पर्यावरण आणि सर्वसामान्य जनजीवनावर होत असल्याची गंभीर चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा, पाण्याचे संकट, पीक उत्पादनातील घट आणि रोगराई वाढत असून शेतकरी वर्ग सर्वाधिक संकटात सापडत असल्याचे मत चर्चेदरम्यान मांडण्यात आले. विशेषतः कोकणातील आंबा, काजू व इतर फळबागांवर बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ताकेंद्रित राजकारण सुरू असल्याची टीका करण्यात आली. बेरोजगारी, महागाई, शेतीमालाला न मिळणारा योग्य दर, वाढते खासगीकरण आणि ग्रामीण भागातील आर्थिक संकट यामुळे जनतेत असंतोष वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच मुरबाड तालुक्यातील काळू नदीवरील धरण प्रकल्पाविषयीही सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि आदिवासी समाजावर होणारे परिणाम, संभाव्य विस्थापन, पर्यावरणीय हानी तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर होणारा परिणाम या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे हक्क, पर्यावरण आणि जैवविविधता धोक्यात येणार नाही याची शासनाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.