Day: September 23, 2026

‘वाॅलमेट’ (डोंबिवली, अंबरनाथ) या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये…भव्य पगार / बोनस वाढीच्या त्रैवार्षिक कराराची, ‘राजन राजे’ व ‘धर्मराज्य’तर्फे फटाक्यांची सलग दुसरी आतषबाजी…!!!

(धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघातर्फे कामगारहितार्थ; तसेच, माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी प्रसारित….)
ॲप्कोटेक्स’, प्रोटेगो इंडिया, हिवा इंडिया, डीआरटी-अँथिया, सिंप्रेससारख्या अनेक राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांपाठोपाठ…’वाॅलमेट’ (डोंबिवली, अंबरनाथ) या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये…भव्य पगार / बोनस वाढीच्या त्रैवार्षिक कराराची, ‘राजन राजे’ व ‘धर्मराज्य’तर्फे फटाक्यांची सलग दुसरी आतषबाजी…!!!
रशिया-युक्रेन व अमेरिका-इस्रायल-इराण दरम्यान सुरु असलेल्या युद्धांच्या प्रतिकूल जागतिक परिस्थितीत…’धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा समस्त कामगारविश्वात सनसनाटी व थरार पैदा करणारा करार…वाॅलमेट-कंपनीमधील कामगारांमध्ये आनंद-उत्साहाला एकच उधाण!
“घन तमीं शुक्र बघ राज्य करी…रे खिन्न श्रमिक-मना, बघ जरा तरी…का गुदमरशी आतच कुढुनी? रे मार भरारी ‘वाॅलमेट-कामगारा’परी…!!!”
———————–
सुमारे सहा वर्षांपूर्वी ३० वर्षांची वैयक्तिक मालकीची असलेली ही कंपनी, ‘वाॅलमेट’ (Valmet) या बहुराष्ट्रीय कंपनीकडे हस्तांतरित झाल्यानंतर, कंपनीतील सुमारे दिडशे कामगारांनी ‘राजन राजे’ यांच्या नेतृत्त्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चं सदस्यत्व पत्करलं. गेली कित्येक वर्षे तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या, या कामगारांना संघटनेच्या माध्यमातून पहिल्याच त्रैवार्षिक-करारात ₹१५,०००/- (रु. पंधरा हजार) ची वेतनवाढ; तर, आता झालेल्या दुसऱ्या त्रैवार्षिक-करारात ₹२१,००० (रु. एकवीस हजार) ची वेतनवाढ मिळाली आहे.
वाॅलमेट-कंपनीमध्ये केमिकल, खत व अभियांत्रिकी उद्योगांसाठी बॉल-व्हॉल्व्ह, अ‍ॅक्च्युएटर, पोझिशनर व लिमिट स्विचसह विविध उच्चदर्जाच्या ‘व्हॉल्व्ह ऑटोमेशन उपकरणां’ची निर्मिती केली जाते… “कामगारांनी आता, व्यवस्थापनाला ‘सिम सिम खुल जा’ असं म्हणत, मनमोकळेपणाने सकारात्मक प्रतिसाद व दिलखुलास सहकार्य द्यावं; म्हणजे कंपनीसह तुमच्या प्रगतीचं महाद्वार खुलं होत जाईल”, असं तीन वर्षांपूर्वीच्या पहिल्या कराराप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजन राजे यांनी केलेल्या आवाहनाला, कामगारांकडून उदंड प्रतिसाद लाभून…मागील वर्षी सुमारे ₹१८० कोटींची उलाढाल कंपनीने साध्य केली.
“तीन वर्षांपूर्वी कायम-कामगारांचा पगार, ज्या पातळीवर होता, त्या तुलनेत केवळ दोन करारांच्या या सहा वर्षांच्या अल्प कालावधीतच…अनेक कामगारांच्या पगारात अंदाजे १००% पर्यंत; तर, काही कामगारांच्या बाबतीत १००% पेक्षाही अधिक वाढ (म्हणजे दुपटीहून अधिक पगार) होणार…त्याचप्रमाणेच, कराराच्या कालावधीत, बहुतांश कामगारांचे (एकूण १५२ पैकी अंदाजे १३० कामगारांचे) ‘सहा आकडी बोनस’चे (रु. एक लाखाहून अधिक) ‘सुवर्णस्वप्न’…या कराराद्वारे साकार होणार!”
…मुख्य मुद्दा हा की, सध्याच्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’च्या कामगारविरोधी प्रतिकूल प्रवाहाविरुद्ध पोहून जात… वाॅलमेट-कंपनीतील, एकूण एक सगळ्या ‘कंत्राटी-कामगारां’ना गुलामीतून (Neo-Slavery of Socio-economic Participatiory Exclusion) बाहेर काढून ‘कायम’ करणारी व त्यांच्या आर्थिक-उन्नयनाची मुहूर्तमेढ रोवणारी…ही ‘धर्मराज्य-परंपरे’तील क्रांतिकारक व लोकविलक्षण ‘वाॅलमेट करार-मालिका’च होय!
..गेल्या त्रैवार्षिक-करारातील रु.१५,०००/- (रु. पंधरा हजार) थेट पगारवाढ व या कराराद्वारे होऊ घातलेली रु.२१,०००/- (रु. एकवीस हजार) थेट पगारवाढ मिळून दोन करारांद्वारे ६ वर्षात एकूण होणारी थेट पगारवाढ रु.३६,०००/- (रु. छत्तीस हजार) एवढी भव्यदिव्य होय!
त्रैवार्षिक-करारातील महत्त्वपूर्ण तपशील व मुद्दे….
* या त्रैवार्षिक पगारवाढीच्या करारान्वये, कायम-कामगारांची ‘थेट पगारवाढ’ (C.T.C. वगैरे सारख्या, अलिकडच्या काळातील “व्यवस्थापकीय फसव्या संकल्पने”नुसार नव्हे!) रु.२१,०००/- (रु. एकवीस हजार)….
* रु.२१,०००/- या त्रैवार्षिक थेट पगारवाढीचं प्रतिवर्ष-वाटप अनुक्रमे >> ५०% : २५% : २५%
एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ >> रु.१०,५००/-
एप्रिल २०२७ ते मार्च २०२८ >> रु.५,२५०/-
एप्रिल २०२८ ते मार्च २०२९ >> रु.५,२५०/-
…यामधील, ७०% पगारवाढ > बेसिक पगारामध्ये (PF-Base) व उर्वरित ३०% > इतर अलाऊंसेसमध्ये…!!! (व्यवस्थापकीय परिभाषेतील C.T.C. पगारवाढ >> अंदाजे, रु.२३,४७२/-हूनही अधिक)
* एप्रिल-२०२६ मध्ये ‘कायम’ करण्यात आलेल्या कंत्राटी-कामगारांसाठीची पगारवाढ रु.१६,०००/-
एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ >> रु.८,०००/-
एप्रिल २०२७ ते मार्च २०२८ >> रु.४,०००/-
एप्रिल २०२८ ते मार्च २०२९ >> रु.४,०००/-
…यामधीलही, ७०% पगारवाढ ‘बेसिक-पगारा’मध्ये (PF-Base) आणि ३०% पगारवाढ इतर अलाऊंसेसमध्ये….
* बोनस / सानुग्रह-अनुदान : एकूण पगारावर (Gross Earnings) १५%… त्यामधील, १०% > दिवाळीमध्ये आणि ५% > मार्चमध्ये (व्हेरिएबल…KPI)
* निवृत्तीपर लाभ (Retirement Benefit) : रु.३५,०००/- वरुन रु.५०,०००/- पर्यंत (रु.१५,००० ची वाढ)
* जनरल शिफ्टची वेळ अर्ध्या तासाने कमी करण्यात आलेली आहे.
आधीची वेळ > स. ८.३० ते सं. ५.३०
आताची, सुधारित वेळ १ ऑक्टोबरपासून : स. ८.३० ते सं. ५.००
* महिन्याच्या पाचव्या ‘शनिवारी सुटी’चा लाभ (पाचव्या शनिवारी, महिना अखेरीस कामाचा व्याप असल्याने, ज्या महिन्यात पाच शनिवार येतील; त्या महिन्यातल्या ‘चौथ्या शनिवारी’ सुटी ठेवण्यात आलीय)
* मृत्युपश्चात लाभ : युनियन-सभासद असलेल्या कामगाराचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, त्या कामगाराच्या अधिकृत वारसास, प्रत्येक युनियन-सभासद असलेल्या कामगाराच्या वेतनामधून…एका दिवसाचा (Gross) पगार कापून, प्रासंगिक ‘आर्थिक-मदत’ देण्याची तरतूद, या करारात करण्यात आलेली आहे.
* खास तरतूद : युनियन-सभासद असलेले; पण, कायम नसलेले उर्वरित सात कंत्राटी-कामगार वर्ष-२०२७ एप्रिलमध्ये ‘कायम’ होणार आणि त्यांची स्वतंत्रपणे होणारी पगारवाढ रु.१२,०००/-
एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ >रु.४,०००/-
एप्रिल २०२७ ते मार्च २०२८ > रु.४,०००/-
एप्रिल २०२८ ते मार्च २०२९ > रु.४०००/-
…अभेद्य कामगार-एकजुटीच्या बळावर, आश्चर्यकारकरित्या औद्योगिकविश्वात ‘वाॅलमेट-चमत्कार’ घडत असला; तरी, त्याचं यथोचित श्रेय, ‘वाॅलमेट व्यवस्थापना’लाही देणं अगत्याचं आहे; त्याचं कारण हे की, “वाॅलमेट (VALMET), ही बहुराष्ट्रीय इंजिनिअरिंग कंपनी, फिनलंडमधली म्हणजेच ‘नाॅर्डिक’ देशांमधली असल्यानेच…त्या सर्व नाॅर्डिक देशांमध्ये, सार्वत्रिकरित्या राबवल्या जाणाऱ्या ‘समृद्धी सर्वांची’ या तत्त्वानुसार (Common OR Shared Prosperity), वाॅलमेट-कंपनीचे व्यवस्थापकीय-धोरण…हे कामगारहितदक्ष व बरंचस पारदर्शक आहे. ‘वाॅलमेट’च्या जाहीर/लिखित जागतिक-धोरणात (Global Policy), कामगारांच्या युनियन करण्याच्या व द्विपक्षीय वाटाघाटीद्वारे (Collective Bargaining) पगारवाढीचे करार वगैरे करण्याच्या मूलभूत हक्काला, सुस्पष्टपणे सन्मान बहाल केलेला आहे; जेव्हा, इतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, सध्या भारतात अमानुषपणे ‘कंपनी-दहशतवादा’चा (Corporate-Terrorism) नंगानाच घडवून उघडपणे ‘युनियनबाजी’ संपवण्याचे घृणास्पद गुन्हेगारी धंदे, अत्यंत निर्लज्जपणे करत असतात व त्यातून कंपन्यांच्या नफ्याचे आकडे फुगवता फुगवता, काॅर्पोरेटीय-भ्रष्टाचारालाही मोठी चालना देत असतात!”
——————————
नवी मुंबई येथील रमाडा हॉटेलमध्ये व्यवस्थापन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या होत असताना…कंपनीचे संचालक (Plant Director) सर्वश्री कृणाल भावसार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचं तोंडभरुन कौतुक करत, वाॅलमेट-व्यवस्थापन, युनियन-कारभाराप्रति अतिशय समाधानी व संतुष्ट असल्याचं सांगितलं व अशी ‘जबाबदार’ युनियन आमच्या कंपनीला लाभली, म्हणून आम्ही नशीबवान आहोत”, असं आवर्जून सांगितलं.
यावेळी, वालमेट व्यवस्थापनाचे संचालक कृणाल भावसार यांच्यासह शिरीष राजाध्यक्ष, विश्वास लेले, ब्लेसी डिकॉस्ट्रा, सुचिता भंडारी, राजेंद्र टोके, प्रफुल जोशी, मनीष लाहोटी, रिना मुल्ला; तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेश ठाकूर, सचिव समीर चव्हाण आणि स्थानिक कंपनी-कमिटीतर्फे कमलेश कोल्हे (युनिट अध्यक्ष), अविनाश बढे (युनिट उपाध्यक्ष), लोटन येलवे (युनिट सचिव), संदीप पवार (युनिट कोषाध्यक्ष), लक्ष्मण शिंदे (युनिट संयुक्त-कोषाध्यक्ष); तसेच, मिलिंद जोशी, सुभाष देशमुख, निलेश जगताप हे सर्व युनिट समिती-सदस्य उपस्थित होते.
——————————
‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या यशस्वितेची कामगार धोरण-सूत्रे संक्षेपाने…..
१) “आधी नितीमंत…मगच, श्रीमंत!”
२) “आळशी उद्धट कामगार राष्ट्राला भार… मेहनती-नीतिमान कामगार राष्ट्राला आधार…!!!
३) ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’, ‘म्हणजे…समृद्धी सर्वांची’ (Common Prosperity) तत्त्व’ नाकारणाऱ्या भांडवलदारांची संघर्षातून हवा तंग; तर, ‘तत्त्व’ स्विकारणार्‍या भांडवलदारांशी परिपूर्ण सहकार्याचा (Collaboration) सकारात्मक ढंग!
४) “किमान-वेतन रु. ४० हजार प्रति मास… न देणाऱ्यास तुरुंगवास!”
५) ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ म्हणजे…संघर्ष आणि सहकार्याचा एकमेवाद्वितीय ‘मापदंड’…” कामगारांनो, जेवढं तुम्ही मनापासून काम करणार आणि जेवढं तुम्ही चिकाटी व धैर्याने लढणार; तेवढं तुम्हाला मिळणार!”
६) “DOWN WITH ‘CONTRACT-LABOUR!”…कंत्राटी-कामगार = गुलाम + नव-अस्पृश्य; तर, कंत्राटदार = ‘श्रमचोरी’ करणारा दरोडेखोर
error: Content is protected !!