मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगार गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. आपल्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला आता विविध उद्योगांतील कष्टकरी कामगारांकडूनही भक्कम पाठिंबा मिळत आहे.
धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाशी संलग्न रायगड, तळोजा येथील जॉन्सन मॅथे कंपनीतील कामगार सदस्यांनी अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपकरी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या संघर्षाप्रती एकजूट व्यक्त केली. यावेळी संपकरी कामगारांना रु. २२,५००/- चा धनादेश प्रदान करून आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.
विशेष म्हणजे, जॉन्सन मॅथे कंपनीतील कामगारांनीदेखील चार वर्षांपूर्वी आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. या संघर्षानंतर व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेतून एक त्रैवार्षिक वेतन करारदेखील संपन्न झाला. त्यामुळे अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या कामगारांच्या सध्याच्या संघर्षातील वेदना आणि त्यांची लढ्याची गरज जॉन्सन मॅथेतील कामगारांनीही जवळून अनुभवलेली आहे.
ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, “एक उद्योगातील कामगारांच्या न्याय्य लढ्याच्या पाठीशी दुसऱ्या उद्योगातील कामगार ठामपणे उभे आहेत,” या संघटित कामगार चळवळीच्या ऐक्याची आणि बंधुभावाची जिवंत प्रचिती आहे.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचा ठाम आणि सक्रिय पाठिंबा आहे. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन चर्चेच्या माध्यमातून लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आर्थिक मदतीमुळे संपकरी कामगारांना आपला संघर्ष पुढे नेण्यासाठी निश्चितच बळ मिळाले आहे. विविध उद्योगांतील कामगारांनी एकमेकांच्या न्याय्य लढ्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच संघटित कामगार शक्तीचे खरे सामर्थ्य आहे.
कामगार एकजुटीचा विजय असो!
गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्या आशीर्वादासाठी कार्यकर्त्यांची ठाणे कार्यालयात मांदियाळी; न्याय, पर्यावरण व कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटित संघर्षाचा निर्धार!




भिवंडीतील ‘सिम्प्रेस इंडिया’मध्ये “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा आणखी एक उल्लेखनीय करार!
वाशेरे (भिवंडी) येथील मेसर्स सिम्प्रेस इंडिया प्रा. लि. या डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील कंपनीत, अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही धर्मराज्य पक्षप्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघातर्फे कामगारांच्या पगारवाढीचा करार यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या करारानुसार, कंपनीतील ३५ कायम कामगारांना सरासरी रु. १२,९५८ (सुमारे रु. १३,०००) थेट पगारवाढ मिळणार आहे.
याशिवाय, कामगारांना दरवर्षी ६ अतिरिक्त सशुल्क सुट्ट्या, दरवर्षी ३ गणवेश, तसेच कामगार व त्यांच्या पालकांचा मेडिक्लेम प्रीमियम कंपनीतर्फे भरण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत ५ ते ६ कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात कायम होणारे व संघटनेचे सभासद बनणारे कामगारही या करारातील सर्व लाभांसाठी पात्र असतील.रोहा येथील अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपाला १०० दिवस पूर्ण; एलजी हिंग व प्रोटेगोच्या कामगारांकडून संपकऱ्यांना प्रत्येकी ₹२५ हजारांची आर्थिक मदत!
मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगारांच्या बेमुदत संपाला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त, धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाशी संलग्न एलजी हिंग, मुंबई व प्रोटेगो, नवी मुंबई येथील कामगार सदस्यांनी संपकरी कामगारांना एलजी हिंग, मुंबई व प्रोटेगो, नवी मुंबई युनिटकडून प्रत्येकी रु. २५,०००/- चा धनादेश प्रदान करून आर्थिक मदत केली. या प्रसंगी न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या संपाला संघटित कामगार चळवळीचा ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या आर्थिक मदतीमुळे संपकरी कामगारांना संघर्ष पुढे नेण्यासाठी बळ मिळाले असून, विविध उद्योगांतील कामगारांनी दाखविलेल्या ऐक्यभावनेचे हे उल्लेखनीय उदाहरण ठरले.
पुणे येथील सुल्झर इंडिया कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली राजन राजे यांची सदिच्छा भेट; कामगार हक्कांसाठी संघटनात्मक बळकटीचा संकल्प!

रोहा येथील अंशुल इनोव्हेटिव्ह कंपनीतील संपाला ७३ दिवस पूर्ण; धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाकडून संपकरी कामगारांना आर्थिक मदत
रोहा (जि. रायगड) : मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आदरणीय राजन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बेमुदत संपाला आज ७३ दिवस पूर्ण झाले. गेल्या ७३ दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष कामगारांच्या एकजुटीने आणि निर्धाराने सुरू असून, या पार्श्वभूमीवर “धर्मराज्य पक्ष” प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या वतीने संपकरी कामगारांना आर्थिक व नैतिक पाठिंबा देण्यात आला.
संपकरी कामगारांना संघर्षकाळात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने महासंघाच्या वतीने प्रत्येक संपकरी कामगारास ₹१०,००० ची आर्थिक मदत धनादेशाच्या स्वरूपात प्रदान करण्यात आली. ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, संपूर्ण धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ आणि त्याच्याशी संलग्न विविध युनिटमधील कामगार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, खजिनदार अजित सावंत, सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे, निरंजन म्हात्रे, जगन्नाथ सलगर, महेश पवार तसेच विविध युनिटमधील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॉलमेट फ्लो कंट्रोल युनिटमधील कमलेश कोल्हे, अविनाश बडे, लोटन येलवे, निलेश घरत, दिनेश पाटील यांच्यासह हिवा इंडिया नितीन भुरे, विनोद गायकवाड, दिपक जाधव, हेमंत कदम, इडिकॉनचे राजेश कदम, राकेश म्हात्रे आणि अन्य कंपन्यांतील कमिटी सदस्यांनीही उपस्थिती लावली.
कार्यक्रमादरम्यान विविध युनिटमधील पदाधिकाऱ्यांनी व कामगार प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे यांनी आपल्या भाषणात, “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ केवळ कामगारांचा पगार वाढवण्यासाठीच कार्य करत नाही, तर प्रत्येक कामगाराने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगावे यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे,” असे मत व्यक्त केले.
यावेळी महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देताना सांगितले की, करार झालेल्या कामगारांकडून संघटनेकडे जमा होणारे निधीचे स्रोत हे केवळ कामगारांच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच वापरले जातात. संपकरी कामगारांना देण्यात आलेली आर्थिक मदत हे त्याचेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अंशुल इनोव्हेटिव्हमधील संघर्ष हा केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कामगार चळवळीशी संबंधित असल्याने महासंघाच्या सर्व युनिट्सनी संपकरी कामगारांचे मनोबल उंचावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपस्थित सदस्यांनी संपकरी कामगारांनी गेल्या ७३ दिवसांत दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि एकजूट यांचे कौतुक केले. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन लवकरच समाधानकारक तोडगा निघावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपकरी कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्परांशी संवाद साधत संघर्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा केली.
“मा. राजन राजे (भाई) यांचे मार्गदर्शन, त्यांचा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव, विषयांचा सखोल अभ्यास आणि कामगार चळवळीप्रती असलेली निष्ठावान बांधिलकी यांमुळे या संघर्षाला योग्य दिशा व बळ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या दृढ विश्वासाच्या बळावर कामगार आपले न्याय्य ध्येय निश्चितपणे साध्य करतील, याबाबत कोणतीही शंका नाही.”
दरम्यान, संबंधित मागण्यांवर न्याय्य तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संपकरी कामगारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. संघर्ष कितीही काळ चालला तरी अंतिम विजय कामगारांचाच होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
कंत्राटी ते कायमस्वरूपी सेवेत; ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या संघर्षाला यश मिळाल्याने वॉलमेट कामगारांनी घेतली राजन राजे यांची सदिच्छा भेट
दि. ०८/०६/२०२६ रोजी मेसर्स. वाॅलमेट फ्लो कंट्रोल प्रा. लि., डोंबिवली/अंबरनाथ येथील कंत्राटी कामगार सभासदांनी त्यांना कायमस्वरूपी (परमनंट) सेवेत सामावून घेण्यात आल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’चे अध्यक्ष राजन राजे यांची ठाणे येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी कामगार प्रतिनिधींनी श्री. राजन राजे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला तसेच कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने उभारलेल्या संघर्षाबद्दल व मिळालेल्या न्यायाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, निरंजन म्हात्रे तसेच वाॅलमेट युनिट कमिटीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री येथील बेमुदत संपस्थळी ‘धर्मराज्य पक्ष’ प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांची भेट
मेसर्स. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि., प्लॉट नं. २१/२, एम.आय.डी.सी., गाव-धाटाव, ता. रोहा, जि. रायगड-४०२ ११६ येथील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासद असलेले कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी व विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. १० एप्रिल २०२६ पासून महासंघाच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर ठामपणे बसले आहेत.नवी मुंबईच्या ‘इडिकॉन न्यूमॅटीक’ कंपनीतील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’तर्फे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कामगारांच्या मोठ्या पगारवाढीचा त्रैवार्षिक-करार संपन्न!
“धर्मराज्य पक्ष”प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा औद्योगिक चमत्कार : रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना १४ हजारांची थेट भरघोस पगारवाढ — राजन राजे यांचे नेतृत्व ठळक!
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिकक्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ (CTC वगळून) मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे. सोमवार, दि. २ फेब्रुवारी-२०२६ रोजी, ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख श्री. लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर श्री. आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष श्री. प्रदीप जंगम, उपाध्यक्ष श्री. निखिल वरणकर, सेक्रेटरी श्री. मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य श्री. विनोद मगर आणि श्री. रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, मा. राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, मा. राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना मा. राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगारच, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत दिले!