‘‘या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे… ‘कंत्राटी-कामगार पद्धत’, ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी ‘नागरी आण्विक दायित्व कायदा-123’ (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले; पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या…पण, आमच्या हाती ‘राजकीय ताकद’ नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल…इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही’’, अशा घणाघाती शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी, सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, ‘‘ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात… आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी ‘रक्तपिपासू शोषक-व्यवस्था’ म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय… ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?’’ असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *’’ज्याला आम्ही ‘कल्याणकारी राज्य’ म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य’ संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, खरं म्हणजे ‘अदानी-अंबानीकरणा’च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही… ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !’’* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील यांनी केले. यावेळी किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे, सचिव कॉ. रमेश जाधव, कार्याध्यक्ष कॉ. विलास शेलार, कॉ. भास्कर पाटील, कॉ. जयराम चंदे, कॉ. प्रकाश काठोळे, भिवंडी तालुका अध्यक्ष कॉ. बाळाराम भोईर, शहापूर तालुका अध्यक्ष भगवान दळवी, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. नारायण पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष कॉ. आदम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.


मुंबईचे ‘फुप्फुस’ अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुमारे २७०० झाडांच्या कत्तलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने शनिवार, दि. १४ सप्टेंबर-२०१९ रोजी येथील बिरसा मुंडा चौकात सनदशीरमार्गाने निदर्शने करण्यात आली. या वृक्षतोडीमुळे आरे कॉलनी परिसरातील जैवविविधता पूर्णतः नष्ट होण्याचा धोका असून, इथल्या जंगलात अधिवास असणारे बिबटे, रानमांजर आणि इतर पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकते. शिवाय अतिपर्जन्यवृष्टीच्या काळात मिठी नदीच्या पुराचा धोकादेखील वाढू शकतो. यासंदर्भात विविध पर्यावरणवादी संस्था-संघटना, तसेच ‘आरे’मधील मूळ भूमिपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांनी संघर्ष उभा केला होता. याच पार्श्वभूमीवर मुळातच भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी मान्यता असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’नेदेखील या मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार ही निदर्शने शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वा.च्या दरम्यान करण्यात आली. “विनाशकारी विकासाच्या नावाने, बेभान झालेले आसुरी ‘विकास-विचारवंत’ हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या आरे कॉलनीत ‘रखरखीत वाळवंट’ निर्माण करू पाहत असतील, तर ‘धर्मराज्य पक्ष’ स्वस्थ बसणार नाही !” असा थेट इशारा राजन राजे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्थापित धनदांडगे व भांडवलदारी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना दिला आहे. “स्मार्टसिटीच्या नावाखाली होऊ घातलेला विनाशकारी विकास आणि काँक्रीटच्या निष्प्राण जंगलांऐवजी, आम्हाला हिरवंगार जिवंत जंगल, प्राणी-पक्षी व निसर्गाने नटलेली घनदाट वृक्षराजी हवी आहे, त्यासाठी प्रसंगी आम्ही आमच्या प्राणांचीही बाजी लावू !” अशा शब्दांत राजे यांनी आपल्या रोखठोक भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात पार पडलेल्या या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, बेलापूर विधानसभा महिला अध्यक्षा रेखा साळुंखे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, प्रीती क्षीरसागर, मनीषा सांडभोर, जयश्री पारकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर, ऐरोली विधानसभा अध्यक्ष रत्नदीप कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसमवेत नरेंद्र पारकर, नितीन उगले, शरद साळुंखे, सुमित कदम, सुशांत पंडा, दत्तु पाटील, संतोष मोरे, किशोर गवळी, संकेत गाडे, हेमंत पाटणकर, सुनील सांडभोर, जगदीश जाधव, नरेंद्र शिंदे, उमेश यादव, उमेश मोरे, खंडेराव जाधव, प्रवीण तांबट, प्रकाश नलावडे, सचिन पडवळ, विरेंद्र मोरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान, आरे कॉलनीतील छोटा काश्मीर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका नूतन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उप-निरीक्षक प्रमोद सावंत, गोपनीय शाखेचे व्ही.के. सिंग, पोलीस नाईक संजय शिंदे आणि मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते वसंत पाटील या मान्यवरांनी या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बहुमूल्य सहकार्य केले.
वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रदेशी साजरा करण्यात येतो. याच अभिमानास्पद दिवसाचे औचित्य साधून ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या साखरे-साजगाव येथील त्यांच्या शेतघराच्या प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीसाठी आलेल्या शेकडो शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वनभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, किसळ या विद्यालयातील शिक्षकवृंददेखील उपस्थित होता. विद्यार्थीवर्गाला शालेय जीवनापासूनच निसर्गरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे महत्व कळावे, यासाठीच या वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. राजन राजे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःहून शेतघर परिसरातील विविध झाडे, वनस्पतींची माहिती दिली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी, याबरोबरच ऊस, द्राक्ष, फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यात आली.








भारतातील एकमेव पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख निर्माण झालेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा ५ वा वर्धापन दिन बुधवार, दि. १६ नोव्हेंबर ठाण्याच्या शिवाजी मैदानात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच भाडेकरु कृती समितीचे मुंबई उपनगर अध्यक्ष कॉ. मदन नाईक, टोलविषयीचे अभ्यासक व टोलचा झोल उघड करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा राजकीय इतिहास पुराव्यानिशी पटवून देणारे प्रख्यात शिवव्याख्याते किमंतु ओंबळे या मान्यवरांनी सहभागी होऊन आपले विचार मांडले. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे कोकण, विदर्भ-मराठवाड्यासहित राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धीमाध्यमांची गळचेपी कशी केली जाते, हे ‘एन.डि.टी.व्ही. इंडिया’ या प्रख्यात वृत्तवाहिनीच्या एकदिवसीय बंदीप्रकरणावरून स्पष्ट झालेले असताना, याचाच निषेध करण्यासाठी, केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आदरणीय राजन राजे यांच्या आदेशानुसार मंगळवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाखाली पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.