Blog

‘लोकसत्ते’च्या प्रक्षोभक संपादकीयाविरोधात ठाण्यात ‘धर्मराज्य पक्षा’चा धगधगता निषेध

ज्वालामुखी धगधगतो आहे….
‘लोकसत्ते’चे बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी प्रतिकात्मकरित्या ठाण्यात गोखले रस्त्यावरील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…
कामगारविश्वावर ‘४ काळ्या कामगार-संहितां’चा बुलडोझर फिरवणाऱ्या भाजप-संघीय NDA सरकारचा आणि गिरीश कुबेरांसारख्या, प्रसारमाध्यमातील त्यांच्या मेंदूविक्या ‘बोलक्या बाहुल्यां’चा…’धर्मराज्य पक्षा’तर्फे व कामगारवर्गाकडून ठाण्यात तीव्र निषेध!
—————————-
सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५च्या लोकसत्ता-‘संपादकीय लेखाला जाणिवपूर्वक “तळपत्या तलवारीचे म्यान”, असं शीर्षक देत, पद्मश्री कामगार-कवी कै. नारायण सुर्वे यांचा, आपल्या बुद्धीकौशल्याने ‘अवमान’ करणाऱ्या आणि त्या लेखातून “कामगार नेते, हे नेते कमी आणि खंडणीखोर अधिक असेच आहेत”, असं समस्त ‘कामगार-चळवळी’बाबत अपप्रचार करणारं, अत्यंत बेजबाबदार व संतापजनक वक्तव्य करणाऱ्या ‘भांडवली-दलाल’ गिरीश कुबेर यांचा कामगारांकडून लोकसत्तेचे अंक जाळून तीव्र निषेध करण्यात आला!
…तत्पूर्वी, लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ने, ‘अस्पृश्य’ मानलेले…धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्रभरातील संपूर्ण कामगारविश्वात ज्यांचं नाव दीर्घकाळ दुमदुमतंय, असे झुंजार कामगार नेते ‘राजन राजे’ यांनी, ‘लोकसत्ते’च्या हिणकस संपादकियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवणारा, एक खरमरीत लेख समाजमाध्यमातून प्रसारीत करत, पत्रकार-जगतातील या दलाली-ढोंगी प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला होता, ज्याला सगळ्या कामगार जगतातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला! त्यातच, कामगारविश्वातील संतप्त भावनेला सनदशीर मोकळी वाट करुन देणारा, लोकसत्ता-संपादकीय-दहनाचा जाहीर कार्यक्रम ठाण्यात काल, दि. २५ नोव्हेंबर-२०२५ रोजी सायंकाळी पार पडला.
राजन राजे यांच्या खांद्याला खांदा लावून सदर निषेधाच्या कार्यक्रमात…काँग्रेसच्या अर्थविभागाचे प्रमुख व नेते विश्वास उटगी, समतेच्या चळवळीतील एक अग्रणी ॲड. नाना अहिरे, आंबेडकरी चळवळीतील जाज्वल्य विचारवंत-कार्यकर्ते आनंदा ओव्हाळ व धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे सचिव समीर चव्हाण व पदाधिकारी सचिन शेट्टी; तसेच, विविध कंपन्यांतील कामगारांनी हिरिरीने सहभाग घेतला.
“तळागाळातील जनतेला कायम लुबाडणाऱ्या व श्रमिकांच्या रक्तघामाचं ‘वरकड-मूल्य’ ओरपणार्या भांडवलशाहीचे निर्लज्ज समर्थन करत भांडवलदारांच्या चरणांवर आपला मेंदू अर्पण करणाऱ्या व त्या व्यवस्थेचे मोठे ‘लाभार्थी’ असणाऱ्या गिरीश कुबेरांना…खुशाल, राष्ट्रीय संपत्तीच्या निर्मात्याची तळपती तलवार ‘म्यान’ होण्याची स्वप्न पडू द्यात; पण, टोकाच्या अन्याय-अत्याचार-शोषणाने कामगारविश्वातला ज्वालामुखी आतून धगधगतो आहे आणि तो कुठल्याही क्षणी प्रस्फुटीत होण्याचा देशाला मोठा धोका आहे”, असा इशारा देत…राजन राजे यांनी तासाभराच्या आपल्या तडफदार भाषणातून, गिरीश कुबेर बनावट अग्रलेख लिहिल्याबद्दल यांच्यावर अतिशय जळजळीत शब्दात टीका केली. शिवाय, भाषणातून आपल्या भांडवली-हितसंबंधांची जपणूक करणाऱ्या व ‘संपादकीय-हक्का’चा सर्रास गैरवापर करत जनतेची फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या ‘कुबेरी-प्रवृत्ती’चा मुखवटाही टराटरा फाडला.
ते पुढे म्हणाले की, “४ काळ्या कामगार-संहितांद्वारे कायम नोकऱ्या संपवण्यातून, कामगार-चळवळ साफ कमकुवत करण्यातून…सगळ्या कामगार-कर्मचारीवर्गावर ‘गुलामगिरी’ लादण्याच्या भाजप-संघीय सरकारी-धोरणाचं, ‘आता नव्या कायद्यांतून कामगारांचं चांगभलं होणार’, असं बनावट-विसंवादी ‘कुबेरी’ समर्थन म्हणजे, ‘दहशत-जबरदस्तीने बलात्काराला सामोरं जावं लागणाऱ्या स्त्री संदर्भात, बलात्कार ‘एन्जॉय’ करण्याची संधीच तिला उपलब्ध होतेय’, असं म्हणण्यासारखं, ते एक भयंकर गुन्हेगारी-प्रतिपादन आहे. गिरीश कुबेर, जर कामगार नेत्यांना खंडणीखोर’ म्हणत असतील; तर, त्यांना आव्हान आहे की, अशांना त्यांनी कायद्यासमोर आणून त्यांना कडक शासन करावच; त्यात एखादा जरी डाव्या चळवळीतला पुढारी आढळतो, का ते बघावंच!”
राजन राजे यांनी आपल्या शब्दांच्या अंगारातून लोकभावनेला प्रकट करताना ज्या लोकसत्तेतून नारायण सुर्वेंचा अवमान करण्यात आला, त्याच्या संपादक कुबेरांसह, अवघ्या भांडवल-व्यवस्थेला…पुन्हा एकवार नारायण सुर्वेंचा जाणिवपूर्वक ज्वलंत परिचय व जागर करुन देताना म्हटलं, “कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे २००४ साली नारायण सुर्वेंना ‘जनस्थान-पुरस्कार’ देताना त्यांच्या गौरवार्थ निवेदकाने जी प्रदीर्घ कविता म्हटली होती, त्यातील चार ओळी आठवतात…आणि, आठवतात ते नारायण सुर्वेंचे पाण्यात बुडून गेलेले डोळे!
‘आठवतं का रे तुला नारायणा, याच हमरस्त्यावर वाळत घातली होतीस तू स्वतःची आतडी कितीकदा…आणि, हिशोब केला होतास, एवढी आतडी पुरतील का, हे जग करकचून बांधायला आणि एकदा बांधल्यावर ते बदलायला’… असा हा, ‘Poet of the Proletariat’ कुठे आणि गिरीश कुबेर नावाचा भांडवली-व्यवस्थेच्या हातातला मिठू मिठू बोलणारा ‘पोपट’ कुठे? अनैतिकरित्या गलेलठ्ठ पगार घेत, भांडवली-व्यवस्थेचे लाभ ‘स्वांतसुखाय’ ओरपणारे, गिरीश कुबेर हे एक भांडवली-दलाल; तर, नारायण सुर्वे म्हणजे, कार्ल मार्क्सच्याच पावलावर पाऊल ठेऊन उन्हापावसात तडफडत, वणवण करत शोषितांचं जग बदलायला निघालेला अवलिया! कविवर्य नारायण सुर्वे यांचे महाराष्ट्राच्या कामगार-चळवळीवर थोर उपकार आहेत…आम्ही ४०-४५ वर्षांपूर्वी त्यांच्याच ‘भाकरीचा चंद्र’, ‘कामगार, एक तळपती तलवार’ वगैरे कविता, बॅनरवर छापून कामगार-चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती.”
भाषणाच्या ओघात राजन राजे पुढे गरजले, “आपला ‘EVM-जादुगरी’मधून निवडून आलेला पंतप्रधान, आईबापाशी असलेला आपला जैविक-संबंध नाकारतो आणि स्वतःला ‘नाॅन-बायाॅलाॅजिकल’ घोषित करतो; तर, तिथे मुंबईच्या गिरणगावात कुणी जैविक-आईबापच पोटच्या पोराला नाकारतात आणि एका गिरणीसमोरच्या कचराकुंडीत फेकून देतात… असं ते ‘अनाथ’ पोरं, गंगाराम व काशीबाई नावाचं सुर्वे-दांपत्य
‘सनाथ’ बनवून वाढवतात; पुढे हाच ‘नारायण’, कामगार म्हणून ‘आत्मभान’ जागृत झाल्यावर, एखादा मातीचा घडा फुटावा आणि आतला अंधार मोकळा व्हावा, ‘अवघा प्रकाशू व्हावा’… तसा त्या प्रकाशात भूतकाळाविषयी कुठलाही आकस न बाळगता, कुठलीही तक्रार न करता; आपला भवताल ‘लाल बावटे की जय’ म्हणत, चळवळ आणि साहित्याच्या माध्यमातून बदलायला बाहेर पडतो… जसं अमेरिकेतल्या नवनिर्वाचित डेमोक्रॅटिक-सोशॅलिस्ट महापौर जोहरान ममदानींसाठी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून युजिन डेब्ज आणि वर्ष-२०१५ पासून बर्नी सँडर्स, ‘डेमाॅक्रसी ॲट वर्क’चे रिचर्ड वोल्फ, अलेक्झांड्रा ओकॅसिओ काॅर्टेझ (AOC) आणि त्यांचा पुरोगामी विचारसरणीचा U.S. House of Representatives मधला सोशालिस्ट-डेमोक्रॅटिक विचारसरणीचा “The Squad” हा गट वगैरेंनी, पार्श्वभूमी तयार करुन ठेवली होती; तशीच, वामनराव दादा कर्डक, शाही अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्याकरवी नारायण सुर्वेंसाठी तयार करुन ठेवली होती; असं म्हटलं तर वावगं ठरु नये…पण, सुर्व्यांचा नारायण, त्यापलिकडे निघून गेला… त्यांच्या काव्यलेखन-शैलीची तुलना जगविख्यात आंग्ल कवी ‘राॅबर्ट फ्राॅस्ट’शी केली जाते. तशीचं संभाषणात्मक, अगदी बोलीभाषेसारखी शैली; पण, थेट भस्सकन आत जाऊन हृदयाचा ठाव घेणारी, कुणाच्या कुठल्या पूर्वपरवानगीविनाच अंतःकरणाला सरळ भिडणारी…म्हणून, मला वाटतं, तेव्हा जर आजच्या सारखं एकनाथ शिंदे, अजित पवार मिळून ‘फडणविशी ट्रिपल-इंजिन’ सरकार महाराष्ट्रात आणि मोदी-शाहांचं रासवट सरकार दिल्लीत असतं; तर, ते ‘पद्मश्री’ वगैरे नागरी-सन्मान मिळणं सोडाच; उलट सरकार-दप्तरी नारायण सुर्वेंचं नाव, ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘अर्बन नक्सलाईट’ म्हणून समाविष्ट झालं असतं. तुकारामांच्या गाथेसारखी ग्रामीण रांगडी काव्यभाषा…तळागाळातील जगण्यातल्या व्यथा-वेदनांचा वेध घेणारी; म्हणून, त्यांचं काव्य तुकारामांच्या गाथेसारखंच अक्षय/अक्षर काव्य ठरलं… म्हणूनच असेल कदाचित, एके प्रसंगी बोलताना, लक्ष लक्ष मराठमोळ्या मनांमध्ये ‘सांस्कृतिक-पूल’ बांधणारे, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणाले होते, ‘अरे, केशवसुत कशाला इकडेतिकडे शोधताय? तुमचा केशवसुत, तिकडे परळमध्ये राहतोय!’
इस्लामिक काळात वर्णव्यवस्थेला छेद देऊन कबीर, सेना न्हावी, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी आणि तुकाराम वाणी यासारखे बहुजनसमाजातले संत कवी जोरकसपणे पुढे आले खरे… पण, जसं अमेरिकेतही जागतिक-महामंदीच्या पार्श्वभुमीवर आर्थिक-विषमता, बेरोजगारी दूर करणारं व कल्याणकारी-राज्य अथवा welfare state संकल्पना राबवणारं फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं ‘न्यू-डील’ आलं…मात्र, पुढील काही दशकातच ‘भांडवली-व्यवस्थे’नं पुन्हा उचल खात ‘न्यू डील’ मोडून काढलं. आणि, त्यानंतर, आजतागायत Neoliberalism किंवा नवउदारमतवाद नावाच्या नववसाहतवादाच्या नावाखाली खाजगीकरण, आपल्याकडच्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’सारखे ‘कामगारविरोधी कायदे’ करुन कामगारवर्गाचं खच्चीकरण व आर्थिक-विषमते’चा नंगानाच, अमेरिका-भारतासह जगभर चालूच ठेवलाय…तशीच, मुस्लिम-राजवटीतील बहुजन-साहित्याच्या सुवर्ण-काळानंतर आपल्याकडच्या वर्चस्ववादी वर्णव्यवस्थेनं पुन्हा उचल खाल्ली आणि ती सगळी साहित्यिक काव्य-व्यवस्था सवर्णांच्या बेड्यात अडकून पडली; ती थेट नारायण सुर्वे यांनी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोकळी करेपर्यंत. त्यांनी फक्त, कृत्रिम रंगांसोबत गिरणीतल्या वस्त्राला आपल्या घामाचाही रंग देणार्या गिरणी-कामगारांचीच व्यथा मांडली नाही; तर, पोटाची खळगी भरण्यासाठी वस्त्रहीन अवस्थेत गिऱ्हाईकाच्या घामाचा रंग आणि गंध, आपल्या देहावर चढवणार्या वेश्यांचाही ‘श्रमिक’ म्हणून वेगळा विचार केला… ‘कामगार’ या नात्याने, वेश्यांचेही प्रश्न सोडवण्याचा व त्यांचा यातनामय प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न केला होता… कुबेरांच्या गिरीशासारखे सांपत्तिक ‘कुबेरी’ व पत्रकारितेतली ‘सुभेदारी’ उभारण्याच्या स्वार्थकार्यात ते मग्न नव्हते!”
राजन राजेंच्या या घणाघाती भाषणानंतर, लोकसत्ते’चं दि. २४ नोव्हेंबरचं बनावट व प्रक्षोभक संपादकीय, कामगारांनी मिळून ठाण्यातील ‘लोकसत्ता’ कार्यालयासमोरच जाळले…विशेष म्हणजे, या ‘लोकसत्ते’च्या प्रतिकात्मक दहनानंतर गोखले रस्त्यावर पडलेली राख, सुसंस्कृत-नागरिक, या नात्याने सगळ्या कामगारांनी गोळा करुन रस्ता पूर्वीसारखाच स्वच्छ करुन ठेवला!

आगरी-कराडी कामोठे महोत्सवात मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती

‘कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ आणि ‘झेंडा सामाजिक संस्था’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव-२०२५” या कार्यक्रमाचे सालाबादप्रमाणे याहीवर्षी, दि. २३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, कामोठे (ता. पनवेल) येथे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष तसेच, ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायला संबोधित करताना मा. राजन राजे यांनी, “आगरी-कोळी-कराडी समाज हा, मुंबई आणि नवी मुंबईसह, संपूर्ण रायगड जिह्याचा मूळ रहिवाशी असून, फक्त आपल्या जिल्ह्याचेच नव्हे; तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे व मराठी-भूमिपुत्रांचे रक्षण करण्याची तुमच्यावर आहे. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या माध्यमातून आम्ही रक्तपिपासू शोषक-व्यवस्था (Vampire State System) असलेल्या, धनदांडग्या भांडवलदारांविरोधात अविरत संघर्ष करीत आहोतच… तुम्हीही ‘भूमिपुत्र’ म्हणून सावध राहिलेच पाहिजे!” अशा शब्दांत आवाहन करुन, या आगरी-कराडी महोत्सवाच्या, १४व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. महोत्सवाच्या या कार्यक्रमाला, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख श्री. अनिल महाडिक, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक-मालक संघटने’चे श्री. महेंद्र म्हात्रे, श्री. राजू म्हात्रे, श्री. आत्माराम म्हसकर, श्री. सदाभाऊ भोईर आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. गोपीनाथ भगत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊंचे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांची राजन राजेंना सदिच्छा भेट

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे थेट चौदावे वंशज तसेच, ‘सनय छत्रपती शासन पक्षा’चे संस्थापक/अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांची, दि. २१ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजन राजे यांनी, प्रा. नामदेवराव जाधव यांचे, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, संयुक्त महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त, ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यालयातील हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला मा. राजन राजे व प्रा. नामदेवराव जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात, मोराराजी देसाई या मराठीद्वेष्ट्या-महाराष्ट्रद्रोही नरराक्षसाने दि. २१ नोव्हेंबर-१९५६ रोजी, फ्लोरा-फाउंटन (आताचा हुतात्मा चौक) येथे केलेल्या अमानुष गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या, १०६ हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, या भेटीत सद्य राजकीय परिस्थिती व मराठी तरुणांच्या सामाजिक प्रश्नांवर दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. कंत्राटी-कामगारपद्धतीमुळे मराठी तरुण गुलामगिरीत ढकलला गेलेला असून, प्रस्थापित राजकारणी आणि भांडवलशाही व्यवस्थेने, महाराष्ट्राचा मूळ भूमिपुत्र उध्वस्त केला असल्याचे रोखठोक प्रतिपादन मा. राजन राजे यांनी यावेळी केले. यादरम्यान, प्रा. नामदेवराव जाधव यांनी, मा. राजन राजे यांची “एक दुकान, एक मकान” ही संकल्पना उचलून धरत, आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपणही यासंदर्भात लोकशाहीमार्गाने चळवळ उभी करु, असे आश्वस्त केले. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘सनय छत्रपती शासन पक्ष’ या दोन्ही पक्षांची विचारसरणी ही, मराठी माणसाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याने, भविष्यात ‘मराठी-माणूस’ व ‘महाराष्ट्रधर्मा’साठी आपण नक्कीच एकत्र येऊ, असे आवाहन प्रा. नामदेवराव जाधव यांनी करताच, “जोपर्यंत तुमच्या हातून सत्कर्म घडतंय, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू… कारण, मी व्यक्तीच्या नव्हे; तर, प्रवृत्तीच्या प्रेमात पडणारा माणूस आहे!” अशी आपली थेट भूमिका मा. राजन राजे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. याप्रसंगी प्रा. नामदेवराव जाधव यांनी लिहिलेली, “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” (भाग-२), “जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज्” आणि “सनय” ही तीन पुस्तके, मा. राजन राजे यांना सप्रेम भेट दिली. या सदिच्छा भेटीवेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव श्री. नरेंद्र पंडित, प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गिरणी कामगार व सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे : ‘घर हक्क परिषदे’ची पत्रकार परिषद

गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी, येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात, गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मोर्चा काढण्यात येणार असून, त्याचीच माहिती देण्यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी, गांधी भवन (कुलाबा, मुंबई) येथे, एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष मा. विश्वास उटगी, सर्व श्रमिक संघाचे नेते कॉ. शिशिर ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, संविधानातील अधिकारानुसार जमिनीची मालकी ही, जनतेची असते. याच अनुषंगाने, सर्व बंद कारखान्यांच्या जमिनी, त्या कारखान्यांत काम करणारे कामगार व सर्वसामान्य जनतेच्याच असल्याने, त्या जमिनींवर गिरणी कामगार व जनतेसाठी परवडणारी घरे बांधावीत, अशी मागणी पत्रकार परिषदेत करुन, दि. १ ऑगस्ट-२०१९ रोजीचा जीआर रद्द करण्यात यावा, अशीही मागणी, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चात करण्यात येणार असल्याचे मा. विश्वास उटगी यांनी सांगितले. “आमच्या जमिनीवर, आमच्या घराचा हक्क” या घोषणेनुसारच, यापुढे ‘घर हक्क परिषद’ आपला लढा सुरु ठेवणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्यात येऊन, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलीआहे. तसेच, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, अशी माहिती मा. विश्वास उटगी यांनी, यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

१५ नोव्हेंबर २०२५ : गिरणी कामगारांच्या घरहक्कासाठी परळ-भोईवाड्यात मा. राजन राजे व विविध पक्षांचे नेते एकत्र

गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, मोर्चेबांधणी सुरु झालेली असून, त्याच पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १५ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’च्या परळ-भोईवाडा येथील कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष श्री. विश्वास उटगी, राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे कार्याध्यक्ष श्री. गोविंदराव मोहिते, काँग्रेसचे श्री. गजानन देसाई, श्री. मोहन तिवारी, श्रीमती छाया थोरात, डाव्या पक्षांचे नेते कॉ. शिशिर ढवळे, कॉ. सुकुमार दामले, श्री. विजय कुलकर्णी, रेमण्ड कामगार संघर्ष समितीचे श्री. अनिल महाडिक आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना, दि. १७ नोव्हेंबर-२०२५ रोजी निवेदन देण्याचे बैठकीत ठरले असून, आगामी हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांसंदर्भात ‘लक्षवेधी’ आणण्याबाबत आग्रह धरण्याची मागणी, निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर, गिरणी कामगार व लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईसह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येतील, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

नेहरू जयंतीनिमित्त ठाण्यात ‘धर्मराज्य पक्षा’ची भव्य सांजफेरी; राजन राजेंच्या नेतृत्वात ममदानींच्या विजयानंदाच्या घोषणा, धर्मविद्वेषी राजकारणावर जोरदार प्रहार

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरु यांच्या, १३७व्या जयंतीनिमित्त धर्मराज्य पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवरुन एका सांजफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली, पक्षाच्या ठाणे-नौपाडा येथील मुख्यालयापासून, सायंकाळी ५ वाजता सुरु झालेली ही सांजफेरी, मीनाताई ठाकरे चौक (कॅसल मिल नाका) येथील, पं. जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली. सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतराच्या या सांजफेरीत मा. राजन राजे यांच्या समवेत, पक्षाचे उपाध्यक्ष श्री. नितीन देशपांडे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, पक्षाचे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, सचिव श्री. नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी, श्री. सोपान चौधरी, श्री. निलेश सावंत, श्री. सुमित कदम, सौ. मनीषा सांडभोर, सौ. भावना ओरपे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह, काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत मा. विश्वास उटगी, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते श्री. राहुल पिंगळे, सरचिटणीस श्री. महेंद्र म्हात्रे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज डाकवे, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष श्री. स्वप्नील कोळी, प्रभाग क्र. ८चे राबोडी ब्लॉक अध्यक्ष श्री. जावेद शेख, डाव्या चळवळीतील नेते कॉ. उदय चौधरी आणि डॉ. विवेक कोर्डे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच, या सांजफेरीत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद व कमिटी सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते. दरम्यान, या सांजफेरीचे वैशिष्ट्य म्हणजे, जोहरान ममदानी या भारतीय वंशाच्या ‘मुस्लिम-समाजवादी’ विचारसरणीचे, अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौरांच्या निवडीबाबत, त्यांच्या अभिनंदनाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुंबईतील वरळीजवळील, मेट्रो स्टेशनला (जिथे जगविख्यात ‘नेहरु सेंटर’ असतानाही) पं. नेहरुंबद्दल आकस बाळगून, जाणूनबुजून ‘सायन्स सेंटर’ असे नाव देत, नेहरुंचे नावं पुसण्याच्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी, “गांधी-नेहरु का नाम लेगा, वो ही देश पे राज करेगा”, “वोट चोर… गद्दी छोड” यांसारख्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे ‘बालदिना’निमित्त, “भारतीय-बालकांचा आवडता नेहरु चाचा” असा गौरवपूर्ण उल्लेख करीत, मतांची चोरी करुन सत्ताधीश झालेल्या, नरेंद्र मोदींचा ‘डिजिटल-चाचा’ असा उल्लेख करुन, भाजपच्या धर्मविद्वेशी व बेबंदशाही राजकारणाविरोधात, या सांजफेरीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या, ‘धर्मराज्य पक्षा’च्या या सांजफेरीला ठाणेकर नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सांजफेरीच्या समाप्तीवेळी मा. राजन राजे यांनी, पं. जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना, एका लहानग्या बालकाच्या सोबतीने, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना विनम्र अभिवादन केल्याने, त्यांची ही कृती समस्त ठाणेकर नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरली.

पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त ‘धर्मराज्य पक्षा’ची सांजफेरी

पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, १४ नोव्हेंबर-२०२५ रोजी, एका सांजफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या सांजफेरीत, ठाणे शहरातील काँग्रेस पक्ष, डाव्या चळवळीतील नेत्यांसह, समविचारी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद व कार्यकारिणी सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते. याच अनुषंगाने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त…

१३ नोव्हेंबर २०२५ : ‘जोहरान ममदानी’ यांच्या ऐतिहासिक विजयानिमित्त परळ येथे डाव्या पक्षांचा संयुक्त विजयोत्सव; ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे प्रमुख वक्ते

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून, अमेरिकन भांडवलशाहीच्या अड्ड्यात न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले. भारताच्या आणि भारतीयांच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पराभव आहे. ममदानी स्वतःला अभिमानाने लोकशाहीवादी-समाजवादी म्हणवतात. अर्थातच, जागतिक भांडवली-साम्राज्यवाद्यांना ही एकप्रकारची चपराक आहे. परिणामी, जागतिक पुरोगामी लोकशाही चळवळींना, हा मोठा हुरुप देणारा विजय आहे.
याच अनुषंगाने, जोहरान ममदानी यांचा विजय साजरा करण्यासाठी, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’च्या परळ (पू.) येथील दळवी बिल्डिंगमध्ये गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर-२०२५ रोजी, एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ममदानी यांच्या विजयोत्सवाच्या या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. अजित पाटील आणि कॉ. फिरोज मिठीबोरवाला आदी मान्यवर मंडळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होती. हा कार्यक्रम सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय-एमएल (लिबरेशन) आणि ‘हम भारत के लोग’ या डाव्या विचारसरणीच्या पक्ष/संघटनांनी आयोजित केला होता. याप्रसंगी सर्व प्रमुख वक्त्यांनी अमेरिकेच्या आणि एकंदरीतच जागतिक भांडवलशाहीविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, आपल्या घणाघाती भाषणात, गेल्या शतकभरातील अमेरिकन भांडवली-इतिहासाचा मागोवा घेत ममदानी यांच्या पुढ्यात उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा आढावा घेतला व त्यातून डाव्या चळवळीने कुठल्या पद्धतीने व किती सावधगिरीने आपली भविष्यकालीन वाटचाल करायला हवी…याबाबत, रोखठोक प्रतिपादन केलं.
हे प्रतिपादन करताना, “अमेरिकेचे ३२वे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी तत्कालीन ढासळती अमेरिकन अर्थव्यवस्था व टोकाला पोहोचलेली ‘आर्थिक-विषमता’ सावरताना जोहरान ममदानींप्रमाणेच ‘न्यू डील’द्वारे कशा व कुठल्या उपाययोजना केल्या होत्या व त्यांचं पुढे काय झालं…याचा ओघवता मार्गदर्शनपर धांडोळा घेतला.
“महाराष्ट्राच्या महानगरांतील सार्वजनिक वहातूक-व्यवस्थेसह महाराष्ट्राच्या खेडोपाडी पसरलेली एसटीची सेवा कशी विनामूल्य करता येईल व त्यातून, कार्बनचं ऊत्सर्जन कमी होऊन ‘जागतिक-तापमानवाढ’ रोखण्यास कसा हातभार लावता येईल…याची डाव्या चळवळीने ‘जोहरान ममदानी’ व ‘सिंगापूर’च्या धर्तीवर संगतवार मांडणी करत…वर्ष-२०२९च्या पुढील लोकसभा-विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे”, अशी लाखमोलाची सूचना केली.
विजयोत्सवाच्या या कार्यक्रमाचे आयोजन कॉ. चारुल जोशी, कॉ. विवेक मॉन्टेरो, कॉ. श्याम गोहील, कॉ. गुड्डी एस. एल., कॉ. अमीर काझी आणि कॉ. अली भोजानी यांनी यशस्वीपणे केले.

१० नोव्हेंबर २०२५ : असीम सरोदे यांच्या सनद रद्दीकरणाच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे ठाण्यात मूक-निदर्शने

महाराष्ट्राच्या सार्वजनिक हिताच्या खटल्यांचे कामकाज पाहणारे व पीडितांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे निर्भीड वकील असीम सरोदे यांची सनद, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल यांनी, राजकीय दबावापोटी सुडबुद्धीने आणि आकस बाळगून, तीन महिन्यांसाठी रद्द केल्याच्या निषेधार्थ, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सोमवार, दि. १० नोव्हेंबर-२०२५ रोजी, सायंकाळी ५ वा. पासून ते ७ वा. पर्यंत, ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १च्या बाहेर, सॅटीस पुलाखाली मूक-निदर्शने आयोजित करण्यात आली होती. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. राजन राजे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मूक-निदर्शनाच्या या कार्यक्रमासाठी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते समीर चव्हाण, पक्षाचे खजिनदार अजित सावंत, ठाणे लोकसभा महिला समन्वयक पौर्णिमा सातपुते, नवी मुंबई सचिव नरेंद्र शिंदे, ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाठारे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह, संजय दळवी, सोपान चौधरी, संजय उघडे, दादा मोरे, रामचंद्र गावडे, विकास पाटील इत्यादी कार्यकर्ते आणि कामगार सभासद उपस्थित होते.

गिरणी कामगारांसाठी ‘घर हक्क परिषद’ची मोर्चेबांधणी : परळ-भोईवाड्यात २९ पक्ष-संघटनांची महत्वपूर्ण बैठक

गिरणी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी ‘घर हक्क परिषदे’च्या वतीने, मोर्चेबांधणी सुरु झालेली असून, त्याच पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २७ ऑक्टोबर-२०२५ रोजी, मुंबईतील परळ-भोईवाडा येथील ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालया’त एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सुमारे २९ पक्ष-संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून, ठाणे, मुंबई, उपनगरे आणि महाराष्ट्रातील महात्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात येऊन, एक मसुदा तयार करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. दरम्यान, या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे, मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी डॉ. गजानन देसाई, काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, काँग्रेसचे रोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गोविंदराव मोहिते, डाव्या चळवळीतील शिशिर ढवळे, सुकुमार दामले, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते समीर चव्हाण आणि पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांच्यासह, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!